संसार म्हटलं की, ‘त्याग’, विशेषत: स्त्रियांनाच तो अपरिहार्य असतो. त्यावेळी विशेष काही करतोय असंही वाटत नाही. पण जेव्हा सगळय़ा संसारचक्रातून तावून-सुलाखून निवृत्तीच्या उंबरठय़ावर उभं राहतो तेव्हा मागे वळून पाहताना मी हे सारं खरंच केलं का? असा प्रश्न पडतो.
मुंबईमध्ये छान नोकरी, दोन गोंडस-हुशार मुली, जोडीदाराची सर्वच स्तरावर उत्तम साथ. अशी मी सुखात संसार करत होते. उपनगरांतून एक-दीड तास प्रवास, मुली पाळणाघरात. खूप कष्ट होते. मोठी माणसंही नव्हती दुर्दैवाने, तरीही छान निभावून जात होतं.
त्यातच माझ्या नवऱ्याला बढती मिळाली. ही चांगली गोष्ट होती, पण आयुष्यातला हा प्रसंग निदान माझ्यासाठी तरी कठीण होता. यांची पुण्याला बदली झाली. हे मूळचे पुण्याचेच असल्यामुळे मुंबईचं घर विकून पुण्यालाच सगळा संसार न्यायचा हे एकतर्फी ठरलं. माझ्या मुली ५ व्या व ८ व्या इयत्तेत इतक्या लहान होत्या. पुण्याला स्थायिक होणं कठीण गोष्ट नव्हतीच. पण.. हे पण माझ्या दृष्टीने अवघड वळण होते. मला नोकरीतून बदली मिळणं अवघड होतं. कुठल्याही परिस्थितीत मुलींच्या भविष्यासाठी नोकरी सोडणं शक्यच नव्हतं.
पुण्यात घर घेतलं. सगळय़ांची छान सोय झाली. पण मला मात्र पुणे-मुंबई ये-जा करून नोकरीच्या आवर्तात गरगरायला लागलं. सकाळी सहा ते रात्री १० हा माझा, माझ्या मुलींचा हक्काचा काही वेळ पूर्णपणे घरातून मला दूर घेऊन गेला. संसाराची, चांगलंचुंगलं करून खायला घालायची मला खूप हौस. पण हे सारं माझ्याकडून त्याकाळात हिरावलं गेलं.
पहिल्याच दिवशी भरगच्च गाडीत प्रवेश केला आणि सगळय़ा प्रवासात माझं रडू काही थांबेच ना. माझ्यासारख्या खूपच होत्या. पण लगेच काही मनाची समजूत पटेना. हळूहळू सवय करून घेतली. एक रविवार फक्त हातात मिळायचा. मुलांचा, घराचा सहवास अल्पकाळ. एवढय़ा प्रदीर्घ प्रवासात, खडतर वाटचालीत खूप कठीण प्रसंग आले. पावसाळय़ात गाडीमध्ये १६-१८ तास मुक्काम केला. एकदा गाडीला अपघात झाला तर ७-८ तास चालून मिळेल ते वाहन घेऊन मध्यरात्री घर गाठलं. असे कितीतरी प्रसंग.. सांगायचे झाले तर जागाच अपुरी पडेल.
पण हरले नाही, मुलींसाठी रात्रीचा दिवस केला. प्रसंगी रजा घेऊन त्यांचा अभ्यास, त्यांचं संगोपन केलं. इतकंच नव्हे तर या गाडीतल्या वेळेचा सदुपयोग करून माझं अपुरं राहिलेलं शिक्षण पूर्ण करून मी एम.ए. (मराठी) केलं. या माझ्या जिद्दीचा माझ्या मुलींवर खूप प्रभाव पडला. आईचा आदर्श समोर ठेवून त्यांनीही आयुष्यात उज्ज्वल यश मिळवलं. माझ्या या कष्टाचं सार्थक झालं.
दोन्ही मुली. एकतर परदेशात ज्ञानदान करते आहे. एक इकडे एका एन.जी.ओ. मध्ये उच्चपदावर नोकरी करते आहे. दोघी ते सारं करून आपले संसार छान संभाळत आहेत. स्वत:समोर कठीण प्रसंग आला तर आईच्या कष्टांना आठवतात.
कष्ट अपरिमित होते, पण आज मागे वळून पाहताना समाधानाचा प्याला काठोकाठ भरलेला दिसतो.    
आशा टांकसाळे, पुणे