18 July 2019

News Flash

अभिव्यक्ती वाढतेय, पण..

सकाळी उठून व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या नको असलेल्या कित्येक प्रतिमा डिलीट करण्यात आजकाल माझा काही वेळ नक्की जातो.

|| मनस्विनी लता रवींद्र

मनोरंजनाच्या क्षेत्रात चित्रपट, सीरियल वेबसीरिज, यूटय़ूबर, ऑडिओ बुक्स, रेडिओ.. आता या क्षेत्राचा विस्तार वाढतच जातोय. अभिव्यक्त होण्याच्या जागा, स्थळ याला आता मर्यादा राहिलेल्या नाहीत. तरीही पुरुषी आशय बनवण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. त्यामुळे या क्षेत्रात अजून जास्त स्त्रिया आल्या तर यात काहीतरी फरक पडू शकेल का?

सकाळी उठून व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या नको असलेल्या कित्येक प्रतिमा डिलीट करण्यात आजकाल माझा काही वेळ नक्की जातो. गुलाबाच्या फुलांच्या गुड मॉर्निगपासून ते सिरियन रेफ्यूजी असलेल्या बुडून मेलेल्या तीन वर्षांच्या कुर्दिश जमातीच्या आलनच्या फोटोपर्यंत. अनेक न माहितीतल्या लोकांच्या सत्कार समारंभांच्या फोटोजपासून ते योगी आदित्यनाथने बदललेल्या स्टेशनच्या पाटीपर्यंत. दिवसभरात मी असंख्य प्रतिमा बघते. अनेकदा या प्रतिमा तुम्हाला काहीतरी विकायचा प्रयत्न करत असतात. या प्रतिमांचा सडा असलेल्या या सध्याच्या काळात दृक्श्राव्य माध्यमात परत प्रतिमांनाच विकण्याचं अथवा त्यातून अभिव्यक्त होण्याचं काम आधीपेक्षा जास्त गुंतागुतीचं झालंय हे नक्की.

आज हिंदी चित्रपटातल्या स्त्रीची प्रतिमा नव्वदच्या दशकापेक्षा प्रचंड प्रमाणात बदललेली दिसते. त्या वेळी स्त्रिया या कायमच व्हर्जिन असायच्या. त्या दारू सिगरेट प्यायच्या नाहीत, त्या स्वत:च्या सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल सबमिसिव्ह असायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हतबल असण्यात गौरव वाटायचा. मात्र आताच्या चित्रपटात स्त्रीची ही प्रतिमा अजिबातच राहिलेली नाही.. दारू पिणाऱ्या स्त्रिया वाईट आणि स्वयंपाक येणाऱ्या स्त्रिया चांगल्या या ढोबळ ठोकताळ्यातून तरी तिची सुटका झाली आहे. म्हणजे स्त्रियांचं हिंदी, मराठी किंवा एकूणच भारतीय चित्रपटातलं स्थान बदललं आहे का? किंवा समाजात वावरणाऱ्या स्त्रियांमध्ये जितके बदल झालेत, होतायत त्याचं तरी प्रतिनिधित्व चित्रपट/ वेबसिरीज या माध्यमात होतं आहे का?

तर आजच्या चित्रपटातल्या (मुख्य प्रवाहातील) स्त्रिया या अनेक बाबतींत मोकळ्याढाकळ्या झाल्या असल्या तरी त्या काम करताना दिसत नाहीत. अनेकदा त्या नेमकं काय करतात हेदेखील चित्रपटात दाखवलेलं नसतं, त्याचं इतिकर्तव्य प्रेम सापडवून लग्न करणं इतपतच मर्यादित राहतं. चित्रपटात लग्नानंतर मूल नको म्हणणारी स्त्री किंवा स्वत:च्या कामासाठी वेगळे प्रयत्न करणारी स्त्री फार क्वचित दिसते. ‘बँड बाजा बारात’मधली वेडिंग प्लॅनर किंवा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’मधली करिअर करण्यासाठी लग्नातून पळून जाणारी मुलगी किंवा ‘दम लगा के हैशा’मधली लग्नानंतर परीक्षा देणारी बायको असे काही अपवाद सोडता. इम्तिआज अली स्त्रियांचं वेगळं चित्रण करणारा दिग्दर्शक, पण त्याच्या ‘जब वुई मेट’मधली गीत किंवा ‘रॉकस्टार’मधली हीर यांची शैक्षणिक पात्रता काय आहे हेपण आपल्याला कळत नाही. त्याउलट त्यातल्या पुरुषांचं करिअर मात्र प्रेम या गोष्टीमुळे फळतं फुलतं, भरभराटीस येतं. या स्त्रिया स्वत:च्या लैंगिकतकेबद्दल मोकळेपणे बोलताना-वागताना दिसत असल्या तरीदेखील त्यांना नाही म्हणायचा अधिकार आहे का हे कळत नाही. अनुराग कश्यपसारख्या चित्रपटाची वेगळी वाटचाल करणाऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातल्या स्त्रिया एका मोकळेपणाच्या वेष्टनात गुंडाळून परत पुरुषाला हव्या असलेल्या पद्धतीनेच वागताना दिसतात. उदाहरणार्थ ‘गॅग्स ऑफ वासेपूर’मधली बाई नवऱ्याला सांगते, बाहेर जे करायचं ते कर. घरी अंघोळ करून ये. (आता असं म्हणणाऱ्या स्त्रिया नसतीलच असं नाही, पण याला ग्लोरिफाय करून दाखवलं जातं तेव्हा त्याच्यातली दाहकता जाऊन त्यातला पुरुषी अहंकार मोठा होतो असे वाटते.)

त्याउलट जाहिरातीतली स्त्रीची आणि त्या अनुषंगाने पुरुषाचीदेखील प्रतिमा मात्र जास्त मोकळी झालेली दिसते. जसं प्रेग्नंट असताना स्वत:चं काम ‘परस्यू’ करणारी स्त्री जाहिरातीतून दिसते तर रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करून घरी आल्यावर  बायकोसाठी स्वयंपाक करून ठेवणारा नवरादेखील त्यात दिसतो. आपल्याला मूल हवं की नको हा निर्णय घेण्याचा हक्क असलेली आय पील किंवा तत्सम गर्भनिरोधकं वापरणारी बाईपण जाहिरातीत आढळते. पण मग प्रश्न पडतो की या मुक्ततेच्या किंवा स्वतंत्रतेच्या स्त्रीच्या व्याख्येसोबत कुठलंतरी प्रॉडक्ट का बरं जोडलं गेलं असावं. काहीतरी कन्झ्यूम केल्याशिवाय आजच्या माध्यामात दाखवली जाणारी स्त्री मोकळी का असू शकत नाही. आणि स्वतंत्र होण्यासाठी तिला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची गरज का भासते?

मला अनेकदा स्त्री नाटककार अथवा स्त्री लेखिका असं संबोधलं जातं. तेव्हा मला कायम असा प्रश्न पडतो की लेखक हा पुरुष लेखक का नसतो, दिग्दर्शक हा पुरुष दिग्दर्शक का नसतो. भाषेतही सर्वनामिक संबोधन करताना ते पुरुषवाचकच का असतं. कारण स्त्रीचं लेखक असणं किंवा दिग्दर्शक असणं ही काहीतरी ‘अ‍ॅबनॉर्मल सिच्युएशन’ असते समाजात. समाजमान्य व्यवस्थेत स्त्री ही केवळ स्त्री असते, जिला एका अर्थी दुय्यम स्थान असतं. अनेकदा आजूबाजूचे लोक सर्रास काही विधानं करताना दिसतात. ती बाई असून ती उत्तम गाडी चालवते, ती गरीब असूनदेखील तिची भाषा शुद्ध आहे इत्यादी. या विधानांमध्येच भेदभाव नक्कीच आहे. म्हणजेच या गोष्टी येण्यास पात्र जे आहेत ते कुणीतरी वरच्या जातीचे, किंवा वरच्या लिंगाचे किंवा वरच्या वर्गाचे असतात. आणि कुठलेही कौशल्य ही फक्त त्यांचीच मक्तेदारी असते. मग दुसरं कुणी ते करू लागलं तर त्यांना ते वेगळं काढून त्यांच्यातल्या इतरांना हे जमणार नाही. हे अपवाद आहेत असं मानतात. या अपवाद मानण्यातूनच लेखिकाला स्त्री-लेखिका, दलित लेखक, आदिवासी कवी अशी बिरुदं लावली जातात. आपल्याच समाजात असलेल्या तृतीयपंथी समाजाला तर कुठल्याच क्षेत्रात असण्याचा अजून हक्कदेखील मिळाला नाहीये. त्यांची अभिव्यक्ती या माध्यमात आली तर कदाचित प्रतिमांच्या या माध्यमात अजून काही बदल घडेल.

दृक्श्राव्य माध्यमात एकटी व्यक्ती काम करू शकत नाही. एका प्रचंड मोठय़ा साखळीचा ती भाग असते. त्यामुळे अनेक माणसं सतत संपर्कात येतात. आपल्या समाजातच पुरुषप्रधान व्यवस्था असल्यामुळे इथेपण तोच प्रत्यय कायम येतो. वरच्या पदावर स्त्रिया असतील तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांना त्यांचा आदेश मानायला त्रास होतो. पण याउलट पुरुषांचं ते सहजच ऐकतात. एखादी दिग्दर्शिका सेटवरती तिच्या हाताखालच्या लोकांना निक्षून काही सांगत असेल किंवा तिला जे हवंय त्याबाबत आग्रही किंवा ‘असर्टिव्ह’ असेल तर लगेचच तिच्या मानसिक आरोग्याबद्दल बोललं जातं. तिच्या घरी काही समस्या आहेत का? याबद्दल चर्चा होते. तिचं वैयक्तिक आयुष्य उघडय़ावर आणलं जातं. याउलट त्या जागी पुरुष असेल तर दिग्दर्शक म्हणून त्याने केलेला आरडाओरडा, वस्तू फेकणं, नटांवर, हाताखालच्या लोकांवर ओरडणं याला सततच आपल्याकडे गोंजारलं गेलं आहे. अशा व्यक्ती परफेक्शनिस्ट, पॅशनेट ठरतात. त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही.

अनेकदा मला लेखक म्हणून जेव्हा जेव्हा लोक बोलवतात तेव्हा बहुसंख्य माणसं आम्हाला ‘फीमेल परस्पेक्टिव्ह’ने चित्रपट लिहायचाय म्हणून तुम्हाला बोलवलंय असं सांगतात. एखाद्या मुलीने लिहिलं तर त्याला एक हळवी किनार, भावनिक बाजू लाभेल असं काहीसं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे थ्रिलर, सस्पेन्स आणि पुरुष कथानक असलेल्या चित्रपटांचं काम स्त्रियांकडे क्वचितच येतं आणि मुख्य म्हणजे राजकीय आशय असलेलं काहीही स्त्रिया लिहू शकत नाहीत, असं काहीसं लोकांना वाटत असतं. अ‍ॅगाथा क्रिस्ती या लेखिका होत्या आणि त्यांनी सस्पेन्स थ्रिलर कादंबऱ्या लिहिल्या, कॅथरीन बिएलो जिने ‘हर्ट लॉकर’सारखा वॉर थ्रिलर चित्रपट केला आहे.  ‘ओय लकी लकी ओय’, ‘लव्ह सेक्स ऑर धोखा’सारख्या राजकीय आशय असणाऱ्या आणि वेगळ्या आकृतिबंधाचा वापर केलेल्या चित्रपटांचं लेखन ऊर्मी जुवेकर या लेखिकेने केलंय यासारखी उदाहरणं कायमच विसरली जातात.

याउलट अझगर फरहादी किंवा पेद्रो आल्मोदाबारसारख्या उत्तम लेखक-दिग्दर्शकांनी (जे पुरुष आहेत)अत्यंत नाजूक पद्धतीने नातेसंबध, स्त्रियांचे कॅरॅक्टर्स हाताळलेले दिसतात.  तरीदेखील पुरुषांनी पुरुषप्रधान गोष्टी लिहायच्या, राजकीय आशय किंवा सस्पेन्स थ्रिलर हा फॉर्म पुरुषांनी हाताळायचा आणि मानसिक आंदोलनं, नात्यातला गुंता, कौटुंबिक विषय स्त्रियांनी हाताळायचे असं सरसकट का मानलं जात असेल?

कारण इथे एक गल्लत होते पुरुषी मानसिकता ही स्त्री प्रोटॅगोनिस्ट असणाऱ्या कथेतही असू शकते आणि फेमिनिझम हा फक्त पुरुष पात्रं असणाऱ्या कथासूत्रात असू शकतो हे आपण विसरतो. फेमिनिझम म्हणजे स्त्रीप्रधान व्यवस्था नाही. स्त्रीवाद हा जास्त व्यापक आहे. आणि माणूसपणाकडे नेणारा असतो. हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे लोक अनेकदा फेमिनिझम या शब्दाचा राग राग करताना दिसतात.

चित्रपट, सिरियल वेबसिरीज, यूटय़ूबर, ऑडिओ बुक्स, रेडिओवरील कंटेंट आता या क्षेत्राचा विस्तार वाढतच जातोय. अभिव्यक्त होण्याच्या जागा, स्थळ याला आता मर्यादा राहिलेल्या नाहीत. एका मोबाइलवर माणसं चित्रपट करू शकतात आणि यू टय़ूबवर टाकू शकतात. दुसरीकडे ‘मनोरंजन’ अधिकाधिक वैयक्तिक होत जात आहे. एका घरातली चार माणसं पूर्वी एक कार्यक्रम बघायचे. आता प्रत्येकी चार लोकांसाठी चार वेगळे कार्यक्रम बनतात. परंतु यातही पुरुषी आशय बनवण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. त्यामुळे या क्षेत्रात अजून जास्त स्त्रिया आल्या तर यात काहीतरी फरक पडू शकेल का? त्यातल्या काही स्त्रिया पुरुषी मानसिकतेच्या नसतीलच असे नाही. परंतु ढोबळमानाने स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त बदलल्या आहेत आणि जास्त डोळसपणे जगाकडे बघत आहेत असे मला वाटते.

पण स्त्रिया या क्षेत्रात आल्या तर काय बदलेल? ‘गल्ली बॉय’चंच उदाहरण घेऊ. यात अमृता सुभाष (हिरोची आई) तिच्या नवऱ्याला म्हणते, ‘‘मुझे जैसे चाहिये वैसे कभी तुने छूवा है?’’ किंवा एमसी शेरला त्याच्या फॉरेनर गर्लफ्रेंडबद्दल मुराद विचारतो तेव्हा तो म्हणतो की, ‘इनके यहां ना जात देखते है ना क्लास. सीधे आंखो में देखते है.’ हे स्त्रण नाही, हे नाजूक नाही, पण निडर मात्र नक्की आहे. मला वाटतं हेच ते आहे जे स्त्रिया अ‍ॅड करतात.

बेट्टी फ्रेइडन नावाच्या लेखिकेने साठच्या दशकातल्या अमेरिकेतल्या अनेक गृहिणींचा सव्‍‌र्हे करून ‘फेमिनाइन मिस्टिक’ नावाचं पुस्तक लिहिलं. आणि तिला जाणवलं की सगळं नीट चालू असताना मुलंबाळं असलेल्या या गृहिणी खूप ‘डिप्रेस्ड’ आहेत. आनंदी नाहीत. तिने त्यांच्या प्रश्नाला ‘अ प्रॉब्लेम विच हॅज नो नेम’ असं संबोधलं. या बायकांची समस्या काय होती? तर त्यांना स्वत:ची अस्मिता नव्हती. आजच्या काळात आपल्याकडेपण अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होत आहे असं मला वाटतं. सगळ्या गोष्टी ‘कन्झ्यूम’ करायचं स्वातंत्र्य तर मिळालंय पण त्यात आपण सरसकट सगळ्यांसारखे होतोय का हा प्रश्न वाढत जातोय. बायकांनी सगळंच असण्याचा आग्रह सर्व माध्यमातून सतत ओतप्रोत वाहताना दिसतो. सेक्सी गर्लफ्रेंडपासून ते संस्कारी बहूपर्यंत. नोकरदार स्त्रीपासून ते नवऱ्याच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या बाईपर्यंत. आणि या सगळ्या बायका कायम फॅशनच्या बाबतीत सजग, सतत नवऱ्यासाठी, बॉयफ्रेंडसाठी, घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी तत्पर.. तयार.. रेडी.. वॅक्सिंग केलेलं, आयब्रोज केलेल्या, स्लीम, फिट. आज बऱ्याच अंशी स्त्रियांची सगळी एनर्जी त्या जे नाहीत ते बनण्यात खर्च होताना दिसते. यात प्रत्येक व्यक्तीची खासियत, वेगळेपण त्यात मागे पडतं. कदाचित काही वर्षांत आपल्याकडेपण ‘अ प्रॉब्लेम विच हॅज नो नेम’ येण्याची शक्यता आहे का? आणि तसं असेल तर या क्षेत्रातल्या प्रतिमांचं खंडन करून नवीन प्रतिमा निर्माण करायला हव्यात. आपणच. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी सगळ्यांनी मिळून.

manaswini.lr@gmail.com

First Published on March 9, 2019 12:04 am

Web Title: loksatta chaturang marathi article on 8 march international womens day part 9