News Flash

जिव्हाळा आणि अलिप्तताही

आभाळमाया

|| ज्ञानदा नाईक

तात्यांच्या लेखनात आणि वृत्तीत जिव्हाळा आणि अलिप्ततता यांचे एक वेगळेच रसायन होते. ही वृत्ती माझी संपादक म्हणून सर्वात मोठी शक्ती ठरली. चेकॉव्ह, गार्की, मोपसॉसारखे लेखक, लोकमान्य टिळक, आगरकर, राजवाडे यांचे समग्र साहित्य, तुकाराम, रामदास, नामदेव यांचे साहित्य, ग्रंथ, उपनिषदे, धर्मशास्त्राचे ग्रंथ, गार्सिया माक्र्वेझ, स्पेनचा लोयेझ, आयरिश लेखक लियाम ओ फ्लॅहर्टी. एरवी ही सारी थोर माणसे मी कशाला वाचली असती? तात्यांमुळे ती वाचली. त्यांचे म्हणणे होते, ‘चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो. ज्या साहित्यिकांनी जीवन त्याच्या मुळाकडे जाऊन पाहिले, त्या साहित्यिकांचे अनुभव आपण वाचावेत, कुवतीनुसार समजावून घ्यावेत आणि हेतूपूर्वक जगावेत.’ मी लहानपणापासून खूप वाचत आले. कुवतीनुसार समजावून घेत आले आणि हेतूपूर्वक जगत आले.. ’’ सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करताहेत त्यांची कन्या ज्ञानदा नाईक.

मी शाळकरी होते, लहान होते, तेव्हापासून आमचे वडील मोठे लेखक आहेत, आपले घर लेखकाचे घर आहे आणि आपण लेखकाची मुलगी आहोत, हे सतत जाणवत गेले. निबंधात १० पैकी ९ गुण पडले. बाईंनी वही तपासून देताना म्हटले, ‘वडिलांनी मदत केलेली दिसते तुला?’ मी मनाशी म्हटले, ‘‘आता यांना काय माहीत, की मी कितवीत आहे, काय शिकते हे आलेल्या पाहुण्यांनी विचारले की वडील स्वयंपाकघराकडे तोंड करून आईला विचारायचे, ‘काय गं विमल, बाबी (मला ते बाबी म्हणत) कितवीत आहे?’’

बाईंनी असे मला विचारले, तसा त्यांचा मला राग आला. शेजारी बसणाऱ्या माणिकला म्हटले, ‘‘तुला आठ मार्क पडले तर तुझे कौतुक झाले, मला मात्र विचारले, वडिलांनी मदत केली का?’’ माणिक म्हणाली, ‘‘अगं! तुझे वडील केवढे प्रसिद्ध लेखक आहेत, म्हणून बाईंना तसे वाटले असणार.’’ आपले वडील (तात्या) लेखक आहेत म्हणून आपल्या निबंधाचे कौतुक झाले नाही, याचे मला त्यावेळी वाईट वाटले.

घरी अनेक साहित्यिक यायचे, साहित्यचर्चा रंगायच्या. आकाशवाणीतील नोकरी करून घरी आले की तात्या रात्री उशिरापर्यंत लिहीत बसलेले असायचे नाही तर वाचत बसायचे. मी मॉडर्न हायस्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकत होते. एक दिवस कशावरून तरी आईवर रागावून मी न जेवता, डबा न घेता शाळेला निघून गेले. शाळेत गेल्यावरही मनातला राग धुमसत होता. त्यातच गृहपाठ करून आणला नाही म्हणून कुलकर्णीबाईंनी त्यांच्या तासाला बाकावर उभे केले. मधली सुट्टी झाली, इतरजणी डबे उघडून खायला लागल्या. मला भयंकर भूक लागली होती. साऱ्या जगावर संतापून, अस्वस्थपणे मी बाकावर बसून राहिले. इतक्यात शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या मैत्रिणी सांगत आल्या, ‘‘माडे! तुझे वडील आले आहेत.’’ त्या तशा चिडलेल्या अवस्थेतही मला अत्यंत आश्चर्य वाटले. असे अनेक प्रसंग आले होते, की आपले कौतुक पाहायला तात्यांनी शाळेत यावे, असे माझ्या बालमनाला तीव्रतेने वाटले होते. अभिनयातले बक्षीस, नृत्यातले बक्षीस किंवा जास्त मार्क पडले म्हणून मिळणारे बक्षीस द्यायच्या वेळी मी अनेकदा तात्यांची वाट पाहात बसून राही. इतर जणींचे आई-बाबा येत. माझीही आई येई, पण तात्या कधी आले नाहीत. ते आले नाहीत की मी आईवरच चिडून बसे आणि आज तात्या शाळेत कसे आले? मी धावत वर्गाबाहेर गेले. शाळेच्या गेटपाशी तात्या माझा डबा हातात घेऊन उभे होते. मला फार अपराधी वाटून रडायला आले. तात्या जवळ घेऊन म्हणाले, ‘‘आई म्हणाली, तू आज रागावून न जेवताच गेलीस. अगं, अन्नावर असा राग काढू नये. आता पटकन डबा खाऊन घे बरे!’’ त्या वेळी मला पहिल्यांदा वाटले, हे लेखक वगैरे मोठे असले, तरी आधी माझे वडील आहेत.

लहानपणी तात्याच माझा ज्ञानकोश होते. कोणतीही गोष्ट त्यांना अशक्य नाही, असे मला वाटे. शाळेत शिकवताना जेव्हा बाईंना एखादा शब्द अडे, तेव्हा मला वाटे, आता तात्या असते तर? मी तिसरीत असताना त्यांनी मला ‘अरेबियन नाइट्स’चे भाग आणून दिले. दोन दिवसांनी मला विचारले की ‘आशुक माशुक’ आणि ‘नाटकशाळा’ या शब्दांचे अर्थ काय? मी सांगितले की, ‘‘ते मला काही कळले नाही. म्हणून मी ते सोडून पुढचे वाचले.’’ त्यांचे म्हणणे की लहान मुलांवर वाचनाने वाईट परिणाम वगैरे काही होत नाही. ज्या विषयात त्यांना गम्य नसते किंवा जो भाग त्यांना अनाकलनीय वाटतो तो भाग मुले सोडून देतात आणि त्यातले जेवढे आवडते, ते वाचतात, लक्षात ठेवतात. अजूनही आम्ही पोरांनी खूप काही वाचावे असे त्यांना फार वाटे. मी, माझा चुलतभाऊ कुमार, चुलत बहीण दीपा (गदिमांची मुले) सिनेमाला निघालो, की ते म्हणत, ‘‘तुम्हा पोरांपुढे केवढे थोरले आयुष्य आहे. खूप वाचावे. सर्व विषयांचे ज्ञान करून घ्यावे. त्यावर विचार करावा. सारखे चित्रपट, नाटके पाहणे तुम्हा पोरांना का आवडते, मला कळत नाही. कदाचित थंड ठिकाणी आरामशीर बसून डोक्याला काही त्रास न देता समोरची रंगीबेरंगी चित्रे पाहणे बरे वाटत असेल. पण त्याचा काही उपयोग असतो का?’’

ते स्वत: खूप वाचत. रसेल, डेकार्ट्स आदी थोर साहित्यिक, तत्त्वज्ञ यांची पुस्तके वाचत. मेडिसीनच्या ग्रंथांबरोबर इकॉनॉमिक्सची पुस्तके त्यांच्या हातात दिसत. ‘क्लासिक्स’ म्हणून गाजलेली जवळजवळ सर्व पुस्तके त्यांच्या स्टडी रूममध्ये होती. ‘‘ज्याँ पॉल सात्र्, अलबेर्त कामू हे लेखकच फक्त तू वाचतोस. त्यामुळे तुझे विचार बिघडलेत,’’ असे तात्यांना म्हणणारे पपा (गदिमा) बैठक जमलेली असताना इतरांना सांगत, ‘‘आमच्या तात्याचे वाचन फार सखोल आणि सर्वंकष आहे. मीसुद्धा इतके वाचलेले नाही. आपल्यातल्या किती जणांनी त्यांच्याएवढे वाचले असेल याची मला शंकाच वाटते.’’

एकदा मी तात्यांना सांगितले की, ‘मनोहर’ मासिकामध्ये मला ‘तरुण पिढी आणि वाचन’ या विषयावरच्या चर्चेसाठी जायचे आहे. तात्यांनी डोळे बारीक केले. काही तरी आठवत स्वत:शी हसले. म्हणाले, ‘‘तुला एक गमतीदार पॉइंट सांगतो. शॉपेन हॉवरनं लिहिलं आहे की सतत घोडय़ावर बसणारा मनुष्य जसा चालायचे विसरून जातो. तसं सतत पुस्तकं वाचणारा मनुष्य विचार करायचे विसरून जातो. जरा थांब. मी तुला ती पुस्तके वाचायलाच देतो.’’ असे म्हणून त्यांनी त्यांच्या स्टडी रूममधून शॉपेन हॉवर, रसेल, प्रिस्टले यांची पुस्तकेच आणून दिली. ते म्हणाले, ‘‘तू ज्या चर्चासत्रासाठी जाणार आहेस, त्या चर्चासत्राच्या विषयावर या तिघांनी फार, सुरेख लिहिले आहे. ते तू चर्चेच्या तयारीसाठी जरूर वाच!’’

जंगलात शिकारीसाठी गेले असताना एकदा त्यांच्या पायात काटा मोडला. तो बराच काळ पायातच राहिला. कालांतराने त्याचे कुरूप झाले. मृत झालेले स्नायू-पेशी असा लिंबाएवढा तळपायाचा भाग काढून टाकणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया झाली. तळपायावर बँडेज आले. सतत प्रवासाला, चित्रे काढायला, शिकारीला हिंडणारे तात्या काही महिने पूर्णपणे अंथरुणाला खिळले. ते म्हणत, ‘‘पायाच्या पायी मी सर्व बाजूंनी लंगडा झालो आहे!’’ या काळात ते खूप वाचत राहिले. चांगले पुस्तक वाचले की मला आणि आईला त्याचे कथानक सांगायचे. त्यांना भेटायला पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, बा.भ. बोरकर, दि.बा. मोकाशी, पु.भा. भावे अशी अनेक मंडळी यायची. गप्पा व्हायच्या. त्यांना झोप लागायची नाही. दिवसभर वेदना सोशीत ते अंथरुणावर पडून असायचे. भिंतीवरच्या पुस्तकांच्या कपाटावर अर्धवर्तुळाकार कोनाडा होता. त्यात एका चिमणीच्या जोडप्याने बांधकाम सुरू केले होते. हे कपाट तात्यांच्या उशाशी डाव्या बाजूला होते. अंथरुणावर पडल्या पडल्या एका अंगावर होऊन ते हे बांधकाम पाहात. एकदा ते मला म्हणाले, ‘‘चिमण्यांच्या चोचीत काडय़ा दिसत नाहीत. चिमणा एकटाच खिडकीत बसतो. तुझ्या जन्माच्या वेळी प्रसूतिगृहाच्या व्हरांडय़ात बापुडवाणा होऊन मी उभा असायचो. तसा हा चिमणा आपल्या घराबाहेर उभा आहे.’’ एके दिवशी कपाटावरून नाजूक चिवचिव ऐकू आली. चिमणा-चिमणीचे बाहेर जाणे, खायला आणणे, वरचेवर घराच्या दाराशी बसून मुलांना हाका मारणे तात्या कौतुकाने पाहात आणि मला, आईला चिमण्याचे कुशल सांगत. एके दिवशी तात्यांनी आईला हाक मारली. ‘‘विमल, चिमण्यांची पोरे ओरडेनात का गं?’’

आई म्हणाली, ‘‘उन्हे फार आहेत हो. झोपली असतील गप.’’

तात्या ठामपणे म्हणाले, ‘‘आज दिवसभरात त्यांचा आवाज नाही. बघ तरी दिसतात का!’’

आई पायाशी स्टूल घेऊन वर चढली. तात्यांनी कॉटवर बसून विचारले, ‘‘आहेत का?’’

आई ओरडली, ‘‘अगं बाई! ओंजळभर मुंग्या लागल्यात. खाल्ली की हो त्यांनी ही बिचारी पोरे.’’ हे ऐकून मला फार रडायला आले. रडू थांबेचना. तात्या म्हणाले, ‘‘बाबी, रडू नकोस. अगं, आपल्याला हळहळ वाटते. पण पाखरांच्या दुनियेत ना खेद, ना खंत. अपघाताने ती खचत नाहीत. जिद्दीने जगतात. वाटय़ाला आले जीवन जसेच्या तसे पत्करतात आणि आकाशात गिरक्या घेत गातात.’’ तेवढय़ात चिमणा-चिमणी दिसले आणि माझे रडे पळाले.

पाखराच्या दुनियेतली तात्यांना जाणवणारी ही जिद्द त्यांच्या स्वत:तही होती. आयुष्यातले अनेक खाचखळगे त्यांनी ओलांडले. लहानपणी विहिरीत पडलेल्या तात्यांना त्यांच्या वडिलांनी शेंदून वर काढले होते. त्याबाबत लिहिताना ते म्हणतात, ‘‘त्यानंतर मी आयुष्यात अनेकदा विहिरीत पडलो. पण शेंदून वर काढायला कोणी नव्हते.’’ मला वाटते, त्यांच्यातल्या या जिद्दीनेच ते स्वत:च विहिरीतून बाहेर आले असावेत.

एका मसाई योद्धय़ाची ते गोष्ट सांगायचे. वाघाने त्याच्यावर हल्ला केला होता. त्याची अनेक हाडे मोडली होती. झोळीत घालून दोन लोकांनी झोळी काठीला बांधून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. अनेक मैलांचा खडतर प्रवास होता. या शूर मसाई योद्धय़ाने हूँ की चू आवाज केला नाही. तो विव्हळला नाही, की कण्हला नाही. मोठय़ा धीराने वेदना सोशीत राहिला. तात्या या मसाई योद्धय़ासारखेच वाटायचे. यातना आणि वेदना त्यांनी धीरोदात्तपणे आयुष्यभर सहन केल्या आणि आम्हाला सहनशीलतेचा आदर्श घालून दिला. जिद्द आणि करुणा या दोन गोष्टी तात्यांकडून माझ्यात आल्या. अपार मानवी करुणा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. त्यांचे अठरापगड जातींचे जिवाभावाचे मित्र होते. मानवी दु:ख त्यांना फार फार अस्वस्थ करून टाके. त्यांच्यातली ही मानवी करुणा वृक्ष-वेली, पशू-पक्षी, कृमी-कीटक यांना कवटाळून त्यांच्याही पार गेली होती. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीविषयी ही करुणा त्यांच्या मनात पाझरत होती. तळी, डोंगर, नद्या, दऱ्या सारे त्यांच्या करुणामय विश्वात सामावलेले होते. त्यांच्या सगळ्या साहित्यकृतींमध्ये ही करुणा जाणत राहते.

ते सांगायचे, ‘अनुभवाशी प्रामाणिक राहा आणि स्वत:शी अभिरुची साक्षी ठेवून लिहा. कुठलीही मळलेली वाट धरू नका. तुमची वाट तुमच्या पायांना पाडू द्या. ही भूमी एवढी विशाल आहे, की नव्या वाटेसाठी तिच्यावर नित्य जागा असते. कोणासारखे होण्यासाठी खपू नका. स्वत:ला ओळखण्यासाठी खपा.’

परकराच्या ओच्यात सुंदर फुले, रंगीबेरंगी पाने, रसाळ मधुर फळे गोळा करावीत तसे बालपणापासून मी तात्याच्या सहवासामुळे वाचणे, फिरणे, पाहणे, ऐकणे गोळा करत आले आहे. जीवनात जे सुंदर आणि मंगल आहे ते वेचून पदरात बांधून ठेवण्याची वृत्ती मी आजही जपत आहे. लहान वयात मी तात्यांबरोबर नदीच्या काठाने भटकले. मोठेपणी त्यांनी घेतलेल्या धायरीच्या शेतात त्यांच्याबरोबर फिरले. पानाफुलांचे, पाखरा-कीटकांचे विलक्षण विश्व मला दिसले. रानावनात फिरण्याची गोडी लागली. वन्यजीवनातला निरागसपणा कळायला लागला. माझ्या लेकींना हा वारसा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना ससे, कासव, पक्षी पाळायला आणून दिले. अनेकदा अभयारण्यात नेले. रान वाचायला शिकवले. वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून न परवडणारी पुस्तके हप्त्याच्या योजनेखाली का होईना, घेत राहिले. चित्रकलेची आवड जोपासण्यासाठी चित्र प्रदर्शनांना नेले. चित्रकारांची चित्रे, चरित्रे त्यांच्यासाठी आणत राहिले.

तात्यांनी मला चित्रे काढायला शिकवले. त्यांच्या शेजारी बसून मी ऑइल पेंटिंग शिकले. रंगसंगती, कंपोझिशन याचे भान मला आले. त्यांनी आणलेली जगातल्या थोर चित्रकारांची चरित्रे वाचली, चित्रे पाहिली. फोटोग्राफी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकले.

मोठी झाले तसे अनेक उद्योग केले. तात्या सांगत आले की, ‘कुठलीही कला सर्वस्वाचे दान मागते. मी हे करीन आणि तेही थोडे करीन, असे केले तर कशातच उंची गाठता येत नाही.’ तात्यांचे सांगणे मी ऐकले, पण अमलात आणले नाही. मांजर जसे प्रत्येक भांडय़ात कुतूहलाने डोकावत राहते तसे डोकावत राहिले. पी.डी.ए. थिएटरच्या अकादमीच्या नाटकातून कामे केली. हँडिक्राफ्टचे दुकान चालवून पाहिले, उद्योग-व्यवसाय करून पाहिला. डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या. मुलांसाठी पुस्तके लिहिली. मग वयाच्या तिशीच्या आसपास पाठय़पुस्तक मंडळात ‘किशोर’ मासिकाच्या संपादनाचे काम स्वीकारले. वाचत आलेले साहित्य, चित्रकलेची जाण, निसर्गाचे प्रेम आणि तात्यांची जीवनघाटणी या सगळ्याचा मला संपादनाच्या कामात उपयोग झाला.

तात्यांच्या लेखनात आणि वृत्तीत जिव्हाळा आणि अलिप्ततता यांचे एक वेगळेच रसायन होते. ही वृत्ती माझी संपादक म्हणून सर्वात मोठी शक्ती ठरली. अंकाची मांडणी कशी असावी, मुखपृष्ठ कोणते घ्यावे, आतील साहित्याचे विषय कोणते घ्यावेत, याबद्दल कधी अडचण आली नाही. मी संपादन केलेल्या अंकाचे, एखाद्या लेखांचे, चित्रांचे कौतुक केले, की मला प्रगतिपुस्तक दाखवल्यावर कौतुक झाले की होतो तसा आनंद व्हायचा.

निसर्ग जसा नाना गोष्टींनी समृद्ध असतो, तसेच आमचे घरही माणसांनी समृद्ध होते. पुस्तकांनीही समृद्ध होते. प्रचंड पुस्तके तीही विविध विषयांवरची! ज्ञानकोश, शब्दकोश, गॅझेटियर्स यांसारखी गंभीर तोंडावळ्याची पुस्तके होती. त्यांची ओळख मला शालेय वयातच झाली. शब्द अडला, अर्थाचा गोंधळ झाला, माहिती अपुरी वाटली, की कोशवाङ्मय पाहायचे. कधी काही चुकीचे लिहायचं नाही, स्वीकारायचे नाही ही सवय संपादनाच्या कामात मोलाची ठरली.

‘चेकॉव्ह, गार्की, मोपसॉसारखे लेखक, लोकमान्य टिळक, आगरकर, राजवाडे यांचे समग्र साहित्य, तुकाराम, रामदास, नामदेव यांचे साहित्य, ग्रंथ, उपनिषदे, धर्मशास्त्राचे ग्रंथ, गार्सिया माक्र्वेझ, स्पेनचा लोयेझ, आयरिश लेखक लियाम ओ फ्लॅहर्टी. एरवी ही सारी थोर माणसे मी कशाला वाचली असती? तात्यांमुळे ती वाचली, कारण खूप वाचावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांचे म्हणणे होते, ‘चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो. ज्या साहित्यिकांनी जीवन त्याच्या मुळाकडे जाऊन पाहिले, त्या साहित्यिकांचे अनुभव आपण वाचावेत, कुवतीनुसार समजावून घ्यावे आणि हेतूपूर्वक जगावे.’

मी लहानपणापासून खूप वाचत आले. कुवतीनुसार समजावून घेत आले आणि हेतूपूर्वक जगत आले. या वाचनात किती तरी विलक्षण पुस्तके हाती आली. मिळेल ते पुस्तक झपाटेबंदपणे मी वाचून काढले. त्यापैकी अनेक पुस्तके मी पुन:पुन्हा वाचली. त्या आवेगी वाचनाचे संस्कार मनात कायमचे रुजून बसले. ज्यांच्यापुढे मेरूमंदार धाकुटे वाटावे अशी थोरो, जेन गुडाल, बर्टन अशी किती तरी माणसं या पुस्तकांच्या वाचनातून मला भेटली, मळलेली वाट चालून जायचे नाकारणारी स्वत: शोधून ती एकाकी चालत राहणारी.

आयुष्यात मलाही थोडे उंच जाता आले, कोळ्याप्रमाणे स्वत:चे जाळे विणता आले. माझी आई ब्रेनहेमरेजने गेली. हॉस्पिटलच्या उदास खोलीत तिच्या कृश चेहऱ्यावरून थरथरता हात हळुवारपणे फिरवत तात्या भरल्या डोळ्यांनी किती तरी वेळ उभे होते. त्यांचे ओठ कापत होते, खांदे ओघळले होते. त्यांच्याकडे पाहताना मला भडभडून आले. लक्षात आले की, या क्षणापासून आमच्या दोघांची, जागांची अदलाबदल झाली आहे. पूर्वी तात्या आमची काळजी घेत होते. आता मला त्यांची काळजी घेतली पाहिजे. ते थकले आहेत. आयुष्यातल्या हादरवून टाकणाऱ्या अनेक प्रसंगांना त्यांनी ज्या खंबीरपणे आपल्या भक्कम बाहूंवर झेलले, त्याच बळाने मला यापुढे जीवनाला सामोरे गेले पाहिजे.

त्यानंतर तात्यांच्या ‘सत्तांतर’ कादंबरीवर वाङ्मयचौर्याचा गदारोळ झाला. ते म्हणाले, ‘न लढणे हा पराभव आहे.’ पळत राहण्याची सवय लागू नये. केव्हा तरी उभे राहून लढायची सवय लागावी, म्हणून दहापैकी एक लढाई लढावी. तात्या लढले, लिहीत राहिले. आई गेल्यानंतर गृहस्थी चालवणे एकटय़ाला जमेना, तेव्हा मी ‘अक्षर’ बंगल्यात राहायला आले. तात्यांचे आजारपण सुरू झाले होते. मूत्रपिंडाच्या आजारानं ते डायलिसिसवर होते. डायलिसिसला जातानाही कडक इस्त्रीचे कपडे, चकचकीत पॉलिश केलेले बूट, भांग पाडलेले केस आणि रुमालावर परफ्यूमचा ठिपका टाकून ते डायलिसिसला निघायचे. आयुष्यात हार मानणे त्यांना माहीतच नव्हते.

या काळात आम्ही दोघे खूप जवळ आलो होतो. दिवस कलायला लागलेला होता. खिडकीमधून येणारा प्राजक्ताचा सुरेख गंध तात्यांची स्टडी रूम भरून टाकत होता. तारेवर पाखरे गप्प बसावीत, तशी भिंतीवरच्या लाकडी शेल्फमध्ये अनेक पुस्तके हाराने बसून होती. खोलीतल्या मंद प्रकाशात आम्ही बाप-लेक गप्पा मारत बसलो होतो. सडसडीत अंगकाठी, वृद्धत्वामुळं किंचित काळवंडलेला गोरापान चेहरा, व्यवस्थित भांग पाडलेले पांढरे शुभ्र केस, चेहऱ्यावर जीवनाचा आनंदोत्सव.

तात्या मला म्हणाले, ‘बाबी, तुझ्याशी बोलायचे आहे. सगळ्या गोष्टी तुला ठाऊक असाव्यात असे मला वाटते. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक.’

बंगल्यात आम्ही दोघेच होतो. चित्रकार डेंगळे यांनी काढलेले वाघोलीच्या मंदिरातील जलरंगातील भव्य चित्र, कोपऱ्यात उभी केलेली डबलबारी बंदूक, लिखाणाचे मोठे टेबल, त्यावरचे कागद आणि शेफरचे सोनेरी पेन, गुबगुबीत मरून रंगाची खुर्ची, शेल्फवरील डिस्कथ्रोवरचा पीळदार स्नायूंचा पोर्सेलियमचा ग्रीक पुतळा, लक्ष्मी-विष्णूची चोला ब्राँझची कोरीव मूर्ती, बुद्धाचे चकचकीत पितळी मस्तक, खिडकीत ठेवलेला आदिवासींचा बाण आणि अश्मयुगीन तीन हत्यारे, सारे सारे स्तब्ध होते.

आयुष्यात जे कधीच कुणाशी बोलले नसतील, ते तात्या माझ्याशी बोलले. बराच वेळ बोलले. शेवटी म्हणाले, ‘‘मी आयुष्यात जे लिहिले, ते कायम स्वत:शी व माझ्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लिहिले. याचा मला अभिमान आहे. मी संतुष्ट आहे.’’

navaminaik@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:01 am

Web Title: love and aloofness
Next Stories
1 ‘फोमो’ विरुद्ध ‘जोमो’
2 .. तुम्ही वयात आलात
3 संतुलित आहार
Just Now!
X