राजन गवस

का कोपला असेल पाऊस? का संतापला असेल तो इतका? असतील त्याच्याही मनात काही दुखरे कोनाडे. निर्दयता आणि अविवेकी विकास यांचा काही संबंध असेल का? कळतच नाही काही. अविवेकी विकासाच्या उंच उडय़ा आणि आधुनिक होत चाललेला समाज यांना पावसाची गरजच उरली आहे कुठं? नळाला बेसुमार पाणी आलं की यांचं सर्व भागलं; पण हे पाणी पावसामुळं येतं हे कोण सांगणार कोणाला? कदाचित यामुळेच  माणसाचा पावसाशी संवाद संपून गेला असावा.

भयानक कोसळतोय पाऊस.. त्याचं आजचं अक्राळविक्राळ रूप भलतंच भीतीदायक. पूर-महापूर सततच पाचवीला पुजलेले; पण आत्ताचा महाप्रलय कधीच न बघितलेला. ठरवलंय तरी काय पावसानं? पावसाशी बोलत, पावसाला शिव्या घालत, पावसाची विनवणी करत आमच्यासारख्या खेडय़ापाडय़ांतल्या लोकांचं सरत असतं आयुष्य. तो येतो तेव्हा आनंद. तो प्रचंड कोसळतो आणि थांबतच नाही तेव्हा प्रचंड राग. तो येऊन पुन्हा गडप झाला की, जीव कासावीस. त्यानं आमच्या आज्ञेत राहावं हा अट्टहास कायम. त्याला काही मन-भावना आहेत, त्यालाही येत असेल राग, तोही करत असेल कशाचा तरी विचार, असं आम्ही आजवर तरी मानलेलं नाही. त्याच्यावर कविता कधी आजवर लिहिली नाही. वाचल्या मात्र कैक; पण आमच्या पंचक्रोशीतला पाऊस कुणाच्या कवितेत भेटलाच नाही. भेटले, वाचले ते भलतेसलते. त्या वेळी मनात यायचं, असा कुठं असतो पाऊस?

कृष्णात खोतच्या ‘झडिझबड’मध्ये मात्र तो एकदा सापडला होता. अगदी आमच्या गावशिवारात वावरतो तसा. हाक्या घालणारा, झोडपून काढणारा, भीती दाखवून घाम्याघूम करणारा, तर कधी कुणाचा तरी जीव घेणारा. सगळ्यांना जीवदान देणारा. त्याचं आमचं नातंच प्रेम आणि तिरस्काराने ओथंबलेलं. ठरल्या वेळी तो आलाच नाही तर सगळी  तारांबळ. पाण्यासाठी दिवसरात्र वणवण. तो कधी येतो याची वाट पाहत आभाळात डोळे रुतवून बसणं. आज येईल. उद्या येईल. आलाच नाही तर गाव गोळा. करायचं काय? उत्साही पोरं बेडकाच्या शोधात. कुठं सापडेल तिथून शोधून आणायचा बेडूक. त्याच्या पायाला बांधायची दोरी आणि उंच काठीवर लटकवायचं त्याला देवळासमोर. बिचाऱ्या बेडकाचा संबंध काय? त्याचा छळ उगाच कशासाठी? असा प्रश्नही यायचा नाही कुणाच्या मनात. पूर्वज करत आले म्हणजे असेलच काही तरी संबंध बेडकाचा आणि पावसाचा. मध्यरात्री होते बोलणे, ठरवतात ते दोघे काहीबाही, मग येतो पाऊस, अशी धारणा. कधी ऐकायचा पाऊस बेडकाचा निरोप. कधी सहज धुडकावूनही लावायचा. मग पुन्हा जाणत्यांची घालमेल. चला, आता देवालाच कोंडून टाकू पाण्यात.

घराघरांतल्या सवाष्ण बाया ठेवणीतल्या साडीची घडी मोडून यायच्या घागरी घेऊन. भरलेल्या घागरीला हळदीकुंकू वाहून सुरू व्हायची मिरवणूक. हलगीच्या ठेक्यावर गाव घालायचा पावसाला हाक्या. गावातल्या ग्रामदैवताला बुडवून ठेवायचं पाण्यात. मग गुरव घालायचा गाऱ्हाणं आणि देवाच्या दारांना लावायचा कुलूप. कोंडलंय आता देवाला म्हणजे येणारच पाऊस, प्रत्येकाची धारणा. कधी-कधी व्हायचं मनासारखं. लोक म्हणायचे, ‘बघा, देवाला कोंडल्यामुळं आला पाऊस.’ पण कधी कधी दादच द्यायचा नाही पाऊस. देवाला बसू द्यायचं पाण्यात. मग गावाचा जीव लागायचा टांगणीला. पुन्हा जाणत्यानेणत्यांचे व्हायचे विचारफिचार. करायचं काय? धोंडिलगाजा! पुन्हा बेडकाच्या जिवावर उठायचे सारे. बेडकं आणायची. काठीला उलटी टांगायची. गावातला एखादा निब्बार आडमूठ गडी व्हायचा नागडा. त्याच्याभोवती बेडकं नाचवत सुरू व्हायची मिरवणूक. त्याचं नाव धोंडिलगाजा. हलगीचा ठेका आणि ‘धोंडी.. धोंडी.. पाणी दे’चा अखंड गजर.

सगळ्या गावभर फिरायची मिरवणूक. नागडय़ा आडमूठ गडय़ालाही चढलेला असायचा चेव. त्याच्या नाचण्यानं धरती व्हायची बेहोश. बायाबापडय़ा तोंडाला पदर लावून उभ्या असायच्या दारात. धोंडिलगाजा गावभर घुमायचा. कधीकाळी आपापल्या परीने पावसाला बोलावण्याचा गावगाडय़ाने शोधलेला उपाय आजच्या काळात हास्यास्पद; पण त्या काळात त्यांच्याजवळ दुसरे होते तरी काय? मनाच्या समाधानासाठी ही सामूहिक धडपड. बोलाला आणि फुलाला पडत असेल गाठ. कधीकधी पडलाही असेल पाऊस. पाऊस सुरू झाला तर ओसंडून व्हायची गावगाडय़ाची कृतज्ञतेची भावना. आपल्याला जगवण्यासाठीच आलाय पाऊस तर त्याची करायला हवी पूजा. मग गावोगाव नव्या पाण्याच्या जत्रा. वाजत-गाजत आणायचं पाणी. देवळात पुजायचं. देवाच्या पायावर ओतायचं. नदीची भरायची खणानारळानं ओटी. साजरा करायचा आनंद. शेताभातातल्या कामाला पुन्हा घ्यायचं जुंपून. पावसानं ऐकलं आपलं याचा आनंद.

कधी-कधी पाऊस एकदम घ्यायचा पाठ. झड लागल्यागत कोसळायचा. गारठून जायचं शिवार. नदी-ओढे व्हायचे चौमाळ. थांबता थांबायचा नाही पाऊस. पुन्हा नवी काळजी. पावसाच्या दारावर काटय़ाचं शिरं मारण्याची धमकी. तरीही थांबायचं नावच घ्यायचा नाही पाऊस. घरांची सुरू व्हायची पडझड. घराघरांत शिरायचं पाणी. तेव्हा सगळ्यांची धडपड माणसांपेक्षा गुराढोरांची व्यवस्था लावण्याची. सगळं गाव विसरून जायचं भांडणतंटा. एकमेकाला द्यायचे हात. अडीनडीला सारेच यायचे धावून. घरातली म्हातारी चुलीतला विस्तव घेऊन यायची शेणकुटावर. नातवाला नागडं करून उभं करायची उंबऱ्यावर आणि वाकून ढेंगतनं गल्लीत फेकायला लावायची विस्तव. नातवानं ढेंगतनं विस्तव फेकला की म्हणायची, ‘या पावसाला इस्तु लागुदे!’ संतापानं बोटं मोडायची पावसाच्या नावानं. कळतच नाही पावसाचं आणि माणसाचं नातं. रुसायचे, भांडायचे पुन्हा गुण्यागोविंदाने नांदायचे एकमेकासोबत. त्या काळी कळायचंच नाही कोण कुठं वाहून गेला आणि कोण कुठं बुडला पाण्यात? कधी तरी महिन्याभरानं कळायचे इकडतिकडची बातमी कुणाच्या तरी सांगाव्यानं.

पावसाचं आणि माणसाचं हे नातं बिघडलं कधी आणि कशानं? संवादच संपला पावसाचा आणि माणसाचा. माणूस आधुनिक आणि विकसित होता-होता त्यालाच बिनगरजेचा वाटू लागला पाऊस. मारलीच दडी पावसाने तर आपण पाडू शकतो कृत्रिम पाऊस. कशाला विचारायचं या पावसाला? आणि मोजणार तरी कोण? एवढं आधुनिक झालंय जग. बनवू शकतो हवेतून अन्न पावसाशिवाय असली घमेंड घर करत गेली का माणसाच्या मनात? त्यामुळेच त्याने तोडला असावा संवाद आणि तुटलं असावं पावसाचं नातं.

असं सगळं चाललंय मनात तर बाहेर अक्राळविक्राळ पाऊस. सगळीकडे पसरलेली भीती. चौमाळ पाणी. सरभर झालीत माणसं. काय वाचवायचं आणि काय सोडून जायचं, असा प्रश्नच येत नाही मनात. फक्त जीव वाचला तरी खूप. आयाबायांसह, गोतावळ्यासह पाणी नसलेल्या ठिकाणी जायची धडपड. प्रत्येकाचा चेहरा आक्रसलेला. थंडीची हुडहुडी, अंगावरच्या कपडय़ानिशी पाण्यातून काढायची वाट. माणसांना हात द्यायला कोल्हापुरातील हजारो स्वयंसेवी संस्थेचे हात. अनेक तरुण मंडळं. स्वयंसेवी संस्था, अनेक पेठांमधील तरुण, व्हाइट आर्मीचे जवान, सरकारी यंत्रणा अहोरात्र धडपडते आहे माणसांचे जीव वाचवण्यासाठी. ‘माणसं इथे अडकलेत, तिथं अडकलेत, अमक्या ठिकाणी अमुक वस्तूंची गरज, तमक्या ठिकाणी तमुक वस्तूंची गरज..’ येताहेत निरोपावर निरोप. जिवाच्या आकांतानं धावताहेत माणसं. कोल्हापूर-सांगली शहरांत शिरलेल्या पाण्यानं अनेकांना करून टाकलंय बेघर. क्षण दरक्षणाला पाण्याची पातळी वाढते आहे. महामार्गासह सगळे रस्ते ठप्प झाले. गावात- शहरात यायला कोणताच मार्ग शिल्लक नाही. प्रत्येकाची पुरात अडकलेल्या माणसाला सुखरूप स्थळी पोचवण्याची जीवघेणी धडपड. शहरातल्या पाण्यातून धावताहेत नावा, अडकून पडलेल्या माणसांना दिला जातोय धीर. अनेक स्वयंसेवी तरुण जिवावर उदार होऊन उतरले आहेत पाण्यात. कोणी टायर टय़ूबची बनवली आहे होडी, तर कोणी एकटाच इन्नरीची नौका बनवून शोधतो आहे पुरात अडकलेल्या माणसांना. अशी सगळ्यांची माणसाला वाचवण्याची जीवघेणी धडपड, तर अशा धावपळीत टीव्हीवाल्यांच्या कॅमेऱ्यांची अनावश्यक सळसळ. सगळी दृश्यं कॅमेऱ्यात पकडण्यासाठी चाललेली वचवच, तर ‘ड्रोनमधून घेतलेले विहंगम दृश्य’ अशी मधीच कोणी तरी करतोय बडबड.

लोकांच्या नाकातोंडात पाणी चाललंय, म्हातारेकोतारे हतबल झालेत, लहान मुलांचा आक्रोश. पाऊस थांबायलाच तयार नाही. गावंच्या गावं पाण्याखाली. धास्तावून गेलेत सारे. माणसांना कोठून ना कोठून सुरक्षित स्थळी हलवलं जातंय. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत; पण गावागावांतील मुकी जनावरं, कोंबडय़ा-कुत्री, शेरडं-करडं बेवारस झालेत. माणसाला हलवलं, पण जनावरांचं काय? कोंबडय़ा-कुत्र्यांचा तर कुणाच्या डोक्यात विचारही असण्याच्या शक्यता नाही. त्यांचे जीव मातीमोल. त्यांना वाचवणार तरी कसं?

बिचाऱ्या शेतकऱ्याचा जीव मात्र त्यांच्यासाठी तीळतीळ तुटतोय. कारण या मुक्या जनावरांनी जगवलाय त्याचा संसार. त्यातला एखादाच शेतकरी दावं कापून आलाय गोठय़ातलं. ‘जगला वाचला तर पुन्हा या गोठय़ात.’ म्हणून हातही जोडलेत त्यानं. तर अनेकांच्या डोळ्यांत फक्त पाणी. पुराच्या पाण्यात डोळ्यातलं पाणी. काठावर येताना पुन:पुन्हा बघतायत सारेच पाठीमागं, येईल एखादं जनावर पोहत म्हणून. ‘देव राहिले पाण्यात. बघतील ते त्यांचं त्यांचं,’ असं मध्येच कोणी पुटपुटतो. एवढय़ात कुठे तरी होडी उलटल्याची बातमी येऊन थडकते. मेलेले असतात आठ-नऊ. हंबरडा  फुटतो आपोआप. कोणी द्यायचा कोणाला धीर? कोणी पुसायचे कोणाच्या डोळ्यातील अश्रू? हतबल- अगतिकतेचा सर्वत्र पसरलेला तवंग. तर काठावर बघ्यांची चिक्कार गर्दी. कोणी बायकामुलांसह आलेत, कोणी फक्त एकटाच पाण्यात हुंदडण्यासाठी. शेजारी चिक्कार खाऊच्या गाडय़ा. कोण भाजलेली कणसं खातंय, कोण भेळवर ताव मारतंय, कोण पोरासोरांसह सेल्फी काढण्यात गुंग. सगळेच चरबीदार गोंडस चेहरे. पाऊस एंजॉय करत आहेत. समोर बेघर झालेल्या माणसांचा तांडा, आक्रोश करणाऱ्या बायका, कुडकुडणारी लहान मुलं. त्यांना वाचवण्यासाठी कोल्हापुरातील विविध पेठांतील तालीम मंडळं. स्वयंसेवी संस्थांतील किती तरी तरुण या सर्वाना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून धडपडताहेत. तेव्हाच हे लोक पाऊस एंजॉय करताहेत. म्हणायचं काय याला?

कोठून उगवलं हे तणकट या शहरात? कळायलाच मार्ग नाही. कोण पाण्यासाठी तडफडतंय, कोण भुकेनं व्याकूळ, कोणाच्या अंगावर कपडे नाहीत, तर कोण धाय मोकलून रडतंय. अनेक जण त्यांना धीर देतायत, हवं नको पाहतायत, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसताहेत. तेव्हा हे लोक एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी काढण्यात गुंग आहेत. एवढा निर्दयपणा आला कुठून? कसा लावायचा कशाचा अन्वय? कदाचित यालाच म्हणत असतील आधुनिक आणि विकसनशील.

निर्दयता आणि अविवेकी विकास यांचा काही संबंध असेल का? कळतच नाही काही. अविवेकी विकासाच्या उंच उडय़ा आणि आधुनिक होत चाललेला समाज यांना पावसाची गरजच उरली आहे कुठं? नळाला बेसुमार पाणी आले की यांचं सर्व भागलं; पण हे पाणी पावसामुळं येतं हे कोण सांगणार कोणाला? कदाचित यामुळेच अस्तित्वात असणारा माणसाचा पावसाशी संवाद संपून गेला असेल.

शंभर-सव्वाशे वर्षांत कोल्हापूरने न अनुभवलेले पावसाचे भयंकर रौद्र रूप. का कोपला असेल पाऊस? का संतापला असेल तो इतका? असतील त्याच्याही मनात काही दुखरे कोनाडे. अपरिमित पाण्याची नासाडी, उपजाऊ जमिनीवर क्रूर पद्धतीने वाढत गेलेले सिमेंट-काँक्रीटचे जंगल.

बेसुमार जंगलतोड, डोंगरच्या डोंगर नेस्तनाबूत करणाऱ्या हिंस्र राजकारण्यांच्या टोळ्या; हवेचं, मातीचं प्रचंड प्रदूषण, भूगर्भाची करून टाकलेली चाळण, ऊर्जेची अमाप नासाडी, नद्यांचे-ओढय़ांचे आवळलेले गळे, गटारांच्या घाणीने व्यापलेले शहर या साऱ्यालाच वैतागला असेल पाऊस किंवा आधुनिक झालेल्या या जमावात कोणी तरी ढेंगेतून विस्तव टाकेल रस्त्यात म्हणून वाटही पाहात असेल; पण विस्तव शोधायला चूल कुठे उरली आहे या शहरात!

chaturang@expressindia.com