माणसाच्या सुसंस्कृतपणाचा, सभ्यतेचा कस लग्नात लागतो. आपण एरवी पुरोगामित्वाच्या, सुसंस्कृततेच्या कितीही गप्पा मारल्या तरी लग्न हा विषय जिथे निघतो तिथे या पुरोगामित्वाला, सौजन्याला पूर्णविराम दिलेला दिसतो. लग्नाच्या या बाजारात नाती जोडणं आणि टिकवणं यावर भर असायला हवा. आश्वस्त वाटतं, निर्भर वाटतं ते घट्ट नात्यांमुळे. पण नात्यांची सुरुवातच व्यवहारावर आधारित असेल तर ते नातं विसविशीत होणार. एकमेकांचा पाणउतारा होत असेल सुरुवातीपासूनच तर ते नातं कसं टिकावं?
‘‘अ हो, किती फोन करायचे? किती मेल्स केल्या, एकाही फोनचे उत्तर नाही. परवा एका ठिकाणी फोटो पत्रिका पाठवून आठ दिवस झाले होते म्हणून फोन केला तर त्या मुलाची आई म्हणाली.  ‘अहो, अजून त्याला सांगितलेच नाहीये.’ एके ठिकाणी दहा दिवसांपूर्वीच परिचयाचा कार्यक्रम झाला, पण त्यांच्याकडचे अजून उत्तर नाही.’’ माझ्या मुलीला म्हटलं, ‘‘अगं, आपण करू या फोन’’ तर ती म्हणे, ‘‘त्यांना करू दे ना फोन.’’ आता ती लोकं पण आमच्यासारखी वाट पाहतायत की काय कुणास ठाऊक? पण तुम्हाला सांगते, लोकं उत्तरच देत नाहीत. एका ओळीचा मेल, की बा नाही जमत आपलं किंवा एखादा फोन? गेल्या आठवडय़ात मी स्वत ३०-३५ मेल्स पाठवल्या, पण काही उपयोग नाही. आणि गरज काय फक्त आम्हालाच आहे का? त्यांना नाही का त्यांच्या मुलाचं लग्न करायचं? नकार असेल तर तसं कळवा ना! आम्ही काही त्यांच्या मागे नाही लागलेलो. दुसरा उद्योग नाही का आम्हाला ? सकाळी उठल्यापासून तेच.’’ प्रियाची आई अगदी वैतागून गेली होती.
अगदी याच तऱ्हेचा अनुभव आलोकच्या बाबांचा. ते म्हणाले, ‘उत्तर येणार नाही हे तर मी आता गृहीतच धरले आहे. उत्तर आले तर बोनस! एका एका स्थळासाठी चार चार फोन करावे लागतात आणि एव्हढे करून निर्णय कळत नाही तो नाहीच. फोनवर तर माणसं वाट्टेल ते बोलतात. अजून कुठेच कशात काही नसतं, पण प्रश्न तर इतके विचारतात, की त्यांची कमाल वाटते.  घरात स्वयंपाकाला बाई आहे का? आणि ती दांडय़ा नाही ना मारत? हो नाही तर.. असं एका मुलीच्या आई परवा विचारात होत्या. अजून आमची भेटही झालेली नाही. हा प्रश्न विचारण्यासाठी काही अवधी जायला हवा, आम्ही पुढे जाऊ शकतो की नाही याचा अंदाज घ्यायला हवा, असा विचार कसा नसतो? आणि स्वयंपाकाला येणारी बाई एक माणूस आहे, तिच्या घरी अडचणी असतील तर ती सुट्टी घेणारच ना, पण.. माणसं अशी का वागतात कळत नाही आणि हे विचारण्याची ही वेळ आहे का..’
विवाहसंस्थेत काम करत असताना रोज अनेक जणांशी बोलण्याचा योग येतो. त्यावेळी लोकं उत्तर देत नाहीत ही सर्वसाधारणपणे जाणवणारी समस्या आहे. या उत्तर न देण्यामागे त्यांची कारणमीमांसा असते. अनेकदा ‘नाही’ कसे सांगायचे असे वाटत असते. कितीतरी वेळा एकच रविवारी चार चार परिचयाचे कार्यक्रम होतात आणि मग मनाचा गोंधळ वाढतो. कुणाला होकार द्यायचा याबद्दल संदिग्धता तयार होते.
 शिवानी म्हणाली, ‘एकाचे घर आवडले होते, तर दुसऱ्याचे शिक्षण मला हवे तसे होते. तिसऱ्याची आई समंजस वाटत होती. चौथा होता त्याचं भारी होतं. आणि मग मला निर्णयच करता येईना. मग मी आईला काहीच सांगितलं नाही. गेले त्यातच २५-३० दिवस. आता कसं सांगायचं असं वाटून फोनच नाही केला.’
चिन्मयचे नाव त्याच्या वडिलांनी  कुठल्याशा विवाहसंस्थेत नोंदवलं आणि एका दिवसात ७० स्थळे आली. चिन्मयचे बाबा एका मोठय़ा कंपनीमध्ये सरव्यवस्थापक म्हणून काम करतात. आईसुद्धा बँकेत जॉब करते, त्यांना आता प्रश्न पडलाय, या सर्व स्थळांची स्क्रुटिनी करायची, त्यातली आवडलेली स्थळे शोधायची, पत्रिका पाहायची, फोटो पाहायचे-कसे होणार हे काम? त्यातून चिन्मयला  वेळ हवा, त्याला वेळ मिळाला तर त्या तिघांचे एकमत व्हायला हवे. परिणामी उत्तरे देणे लांबणीवर पडते.
मला नेहमीच असं वाटतं की माणसाच्या सुसंस्कृतपणाचा, सभ्यतेचा कस लग्नात लागतो. आपण एरवी पुरोगामित्वाच्या, सुसंस्कृततेच्या कितीही गप्पा मारल्या तरी लग्न हा विषय जिथे निघतो तिथे या पुरोगामित्वाला, सौजन्याला पूर्णविराम दिलेला दिसतो. या ठिकाणी शिक्षणाचा, शिक्षित, अशिक्षित असल्याचा काहीही संबंध नाही. किंबहुना जितकी माणसे सुशिक्षित तितकी ती असंस्कृत आणि असुरक्षित असल्याचे जाणवते. आलेल्या स्थळांना उत्तर न देण्यापासूनच याची सुरुवात होते. ज्या आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव असं मानलं जातं, त्या ठिकाणी पत्रिका घेऊन आलेल्या एखाद्या ज्येष्ठाला पाणीही विचारलं जात नाही. हल्ली तर फोनवर सांगतात की सुरुवातीला मेलच पाठवा. (एका परीने हे त्यातल्या त्यात चांगलं आहे.) त्यानंतर तर असंस्कृतपणे वागण्याची चढाओढ लागलेली दिसते. लग्नाच्या संदर्भात अजूनही मुलाची बाजू आणि मुलीची बाजू अशा दोन पाटर्य़ाच मानल्या जातात. मग एक जण सांगतो, अमूकच हॉल हवा, तर दुसरा म्हणतो, आम्हाला काही नको, पण लग्न मात्र आम्हाला साजेसं व्हायला हवं. शेवटी एकुलता एक मुलगा आहे आमचा. आमचं मानपान असं करा, असं म्हणणारी प्रत्येक गोष्ट माणुसकीचा अनादर करणारी असते.
शैलेश म्हणाला, ‘च्यायला मी काय आकाशातून पडलोय का, की माझं लग्न शाही थाटातच व्हायला हवं. या एकुलते एक असण्याचा तापच आहे आणि आईबाबा याचं एव्हढं प्रेस्टिज पॉइंट करतात की समजत नाही कसं वागावं ते.’
काही ठिकाणी तर अनेक वस्तू मागण्याची रीतसर प्रथा दिसते. कायद्याने हुंडा या प्रकाराला  बंदी असली तरी त्यात अनेक पळवाटा आहेत. वैभव आणि रीमा यांचे नुकतेच लग्न ठरले. रीमाला अमेरिकेत एम.एस. करायचे होते. वैभव अमेरिकेतच काम करत होता. वैभवने सरळ सांगितले, की एम. एस. करायला पसे तुझे बाबाच देतील ना. रीमा खमकी होती. ती म्हणाली, हो काही हरकत नाही, एम. एस.नंतर मला जॉब लागेल तेव्हा कंपनीमध्ये बाबांचाच अकौंट नंबर देईन, म्हणजे माझा पगार त्यांच्या खात्यात जमा होईल. मग त्यावरूनही त्यांची जुंपली.
 काही समाजामध्ये तर  त्यांच्या प्रथेप्रमाणे रीतसर सगळा संसार उभा करून देतात, मग भलेही त्या मुलीच्या वडिलांना कितीही कर्ज झालं तरी बेहत्तर. मुलीचे वडीलही लोकं काय म्हणतील या भीतीपोटी आणि लग्नानंतर आपल्या मुलीला नीट नांदवले नाही तर..या धास्तीपोटी आयुष्यभर कर्जबाजारी राहतात.
नुकत्याच सुधाताई आल्या  होत्या. सहा महिन्यांपूर्वीच अनयाचं, त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यावेळी त्यांच्या साधारण लक्षात आलं होतं की, मुलाची आई जरा जास्त मागणी करणारी आहे. पण त्यांनी मनाची समजूत घालून घेतली. लग्नाच्या आधी सुधाताई म्हणाल्या, आम्ही लग्नात अनयाला सोन्याच्या बांगडय़ा करू. त्यावर त्या म्हणाल्या, ‘अनया किती बारीक आहे. तिचं मनगट किती लहान आहे. किती कमी सोन्यामध्ये तिच्या बांगडय़ा होतील. त्यामुळे अजून एखादा दागिना करा तिला. अहो, शेवटी ते तिचंच असणार आहे.’
कितीही गोडीगुलाबीनं सांगितलं असलं तरी तो सल सुधाताईंच्या मनात राहिला तो राहिलाच.
असंच अजून एक उदाहरण. अमृता आणि तिची आई लग्न जमलं म्हणून आनंदाने पेढे द्यायला आल्या होत्या.
सहज खरेदीच्या गप्पा निघाल्या. अमृताच्या आई म्हणाल्या, ‘कालच तिची मंगळसूत्राची खरेदी झाली. जातानाच तिला बजावलं होतं चांगलं घसघशीत मंगळसूत्र घे. नाहीतर घेशील बावळटासारखं ते कमी वजनाचं. हल्ली मुलींना ते नाजूक दागिन्यांचा फंडा आहे ना. शेवटी ते आपलं स्त्रीधन आहे, हो की नाही?’
मी अवाक् झाले. काय हे संस्कार..स्त्रीधन कधी लागतं? कुठे गेली संस्कृती? कोणत्या तोंडाने ही माणसं स्वताला सुसंस्कृत म्हणतात? लग्नाच्या या बाजारात-होय हा बाजारच होत चालला आहे. नाती जोडणं आणि टिकवणं यावर भर असायला हवा. आश्वस्त वाटतं, निर्भर वाटतं ते घट्ट नात्यांमुळे. पण नात्यांची सुरुवातच व्यवहारावर आधारित असेल तर ते नातं विसविशीत होणार. एकमेकांचा पाणउतारा होत असेल सुरुवातीपासूनच तर ते नातं कसं टिकावं? आणि टिकलं तरी त्याची गुणवत्ता कशी जोपासली जाणार?
लग्नाच्या संदर्भात माणसं सुसंस्कृत होतील तो सुदिन!