शिल्पा कांबळे

माझी ‘मी’ची गोष्ट ही केवळ माझ्यापुरती, माझ्या कुटुंबापुरती मर्यादित नाही. ही ‘मी’ची गोष्ट तेव्हाच सफळ संपूर्ण होऊ शकते जेव्हा भारतभरातील नव्हे तर जगभरातील मुलींना-स्त्रियांना त्यांच्या हक्काची सुरक्षितता मिळेल.

‘मी’ची गोष्ट सांगताना माझ्या जन्मापासूनची गोष्ट सांगावी लागेल. माझ्या आईची माझ्याआधीची मुले काही कारणाने जगत नव्हती. तिला जे दोन मुलगे झाले ते जन्म झाल्यानंतर लगेचच वारले होते. त्यामुळे आईवडील दोघेही फार दु:खी असायचे. मग आईने देवीला नवसच केला, ‘या वेळी मुलगी होऊ दे म्हणजे ती जगेल.’ तसाही जन्मदराच्या आकडेवारीनुसार स्त्री-भ्रूण जिवंत राहण्याचे प्रमाण पुरुष भ्रूणापेक्षा जास्त असते. दोन भावांच्या पाठीवर पाय देत मी जन्मले, जगले, वाचले. वडील माझ्या जन्माने आनंदी झाले तरी पुढे हळहळ करायचे, की त्यांना मुलगा झाला नाही. त्यांचा वंश बुडाला. मग पुढे कळत्या वयात व सामाजिक चळवळीच्या संपर्कात आल्यावर मी ठरवले, की आपण लग्न झाले तरी आडनाव वडिलांचेच लावायचे म्हणजे त्यांचा वंश पुढे (निदान माझ्या पिढीपुरता तरी) चालेल. अर्थात, इथे वडिलांचे आडनाव लावणे हीदेखील पितृसत्ताक संस्कारांची मर्यादा होतीच.

तर ज्या समाजात मी जन्माला आले, वाढले, तिथे घरातील स्त्रीची स्वतंत्र ओळख नसायची. मला आठवते, आजोबा सकाळी तोंड धुत असताना माझी आजी त्यांच्यासाठी पाण्याचा तांब्या हातात घेऊन उभी राहायची. मग त्यांना टॉवेल द्यायची. त्यांच्याच ताटातील उरलेले जेवण खायची. ते तिला कशावरूनही रागावून मारायचे. माझ्या आईवर व तिच्या समवयस्क बायकांवरही घरातील पुरुष सर्रास हात उचलायचे. त्यांना मारण्यासाठी काहीही कारण चालायचे. लोकगीतात म्हटलंय ना, ‘वाटी गं वाटी, मेल्यानं मारलं, तंबाखूसाटी’ किंवा ‘नवरा म्हणजे उशाखालचा साप, कधी उलटेल याचा नेम नाही’. तर अशा विषमतेच्या वातावरणात माझी आई माझं प्रेरणास्थान होती. माझी आई ही एक प्रचंड जिद्दी बाई आहे. चिवट, वाटेवरच्या बोरीबाभळीसारखी. कोणत्याही संकटाला ती अंगाखांद्यावर घेऊ शकते. आमचं गाव दुष्काळी भागातील, बीड-कर्जतच्या पट्टय़ातलं. त्या दुष्काळात तगून राहण्यासाठी जे लागतं, ते आपसूकच माझ्या डीएनएमध्ये आलेले आहे. म्हणून मी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटात तगून राहू शकते. तर, माझ्या अशक्त आईने लहानपणापासून एक स्वप्न माझ्यात पेरले, की तू आपल्या पायावर भरभक्कम उभी रहा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीतून मी शिक्षणाला अमृत मानलं. शिक्षणानेच मृत झालेल्या जीवनाला संजीवनी मिळणार होती. विकास हायस्कूल (विक्रोळी) येथील शाळेत भेटलेले शिक्षक वाघमारे, रुईयामधील मराठी विभागाच्या गोखले मॅडम आणि नंतरचे सोमण सर. या शिक्षकांनी शिकतानाच्या वाटेवर साथ दिली. आयुष्य बिघडवणारे व घडवणारेही मित्रमत्रिणी भेटल्या. त्यातही मत्रिणी जास्तच. सुखदु:खाच्या वेळी या मत्रिणी सावलीसारख्या सोबतीला उभ्या राहिल्या. या मत्रिणींबरोबर मोठे होत जाताना जातीधर्माच्या-वर्ण-वर्गाच्या भिंती गळून पडल्या. खऱ्या अर्थाने भगिनीभाव समजला.

नोकरी लागल्यानंतर कार्यालयात बाई म्हणून कधी भेदभावाचा सामना करावा लागला, तर कधी ‘सेंकड सेक्स’ असल्याने काही सवलतीही मिळाल्या. उदाहरण द्यायचं तर, केंद्र सरकार स्त्रियांना अपत्यसंगोपनाची दोन वर्षे पगारी सुट्टी देते. यावर कार्यालयातील पुरुष खूप टोमणे मारायचे, ‘आम्हालाही सुटी हवी’ असा त्यांचा आग्रह असायचा. मग एकदा मी ट्रेनिंग चालू असताना भर वर्गात म्हणाले की, ‘बाईला ब्रेस्ट फीडिंग करावे लागते. तुम्ही करणार का?’ माझ्या या बोलण्याने काही जणांना मी फटकळ बाई वाटले, तर काही जणांनी त्याला टाळ्या वाजवून दादही दिली. आता मी जिथे नोकरी करते त्या आयकर विभागामध्ये गायपट्टय़ातील राज्यांमधून येणाऱ्या मुलींचे प्रमाणही वाढत आहे. या मुली हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसारख्या भागांतून येऊन मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात. नोकरीसाठी त्यांचे मुंबईत झालेले हे स्थलांतर त्यांच्या वागण्याबोलण्याला एक वेगळेच परिमाण देऊन जाते.

कार्यालयात नोकरदार स्त्री म्हणून एका वेगळ्या भूमिकेत मी वावरते, तर समाजात लेखिका म्हणून वेगळी भूमिका असते. कित्येकदा व्याख्याते म्हणून एखाद्या कार्यक्रमात बोलावले गेले, की मंचावर असलेले पुरुष व्याख्याते बोलण्यासाठीचा माइक तुमच्याकडे येऊच देत नाही हा अनुभव तर अगदी नेहमीचाच आहे. त्यामुळे जेव्हा कधी माइक मिळेल तेव्हा मार्मिक व मौलिक बोलून आपला मुद्दा मांडायची कला मी शिकले. असाच पण एक वेगळा प्रसंग म्हणजे सहकाऱ्याबरोबर पार्टीला गेले असतानाचा, त्या कार्यक्रमात डीजे सुरू झाल्यावर बहुतेक पुरुष बिनधास्त नाचत होते, तर स्त्रिया आपल्या अंग चोरून उभ्या होत्या. हे पाहिल्यानंतर मीही स्वत:हून नाचू लागले. मला नाचताना पाहून अनेक मुली, बायका त्याही नाचू लागल्या. बरोबरीचे पुरुष, आदराने स्त्रियांना नाचण्यासाठी जागा करून देऊ लागले. भाषण करण्यासाठी माइक हातात घेणे व नाच करण्यासाठी फ्लोअरवरची जागा मिळविणे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच तोलामोलाच्या आहेत. व दोहोंमध्ये आपल्यासाठी एक समतल भवताल तयार करण्याची साक्षेपी कृती आहे.

आता मी वडाळा, अ‍ॅन्टॉप हिल येथे राहते. या भागात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा- मुस्लीम वस्त्याही आहेत. तर इथे राहणाऱ्या मुली बहुतेक वेळा बुरख्यामध्ये असतात. एकदा मी मॉर्निग वॉकसाठी नेहमीप्रमाणे बाहेर गेलेली असताना काही मुली शाळेतर्फे मैदानात खेळण्यासाठी आल्या होत्या. सगळ्या विद्यार्थिनी, हातपाय झाकणाऱ्या पूर्ण कपडय़ांमध्ये; पण त्या बिनधास्त खेळत होत्या. धर्माच्या साखळदंडांनी बांधलेल्या मुलींना, हसतखेळत मदानात हुंदडताना पाहून मला इतका आनंद झाला, की तो शब्दात सांगणंच कठीण आहे. त्याच मदानात अधूनमधून मुलींची क्रिकेट टीमही दिसते. पालक मुलींचा सराव पाहण्यासाठी, त्यांची खाऊ-पाण्याची बाटली घेऊन कौतुकाने कोपऱ्यात उभे असतात. त्या लहानग्या मुलींना बॉलिंग, बॅटिंग करताना पाहून आपला समाज हळूहळू बदलत आहे याची जाणीव होते.

बदलाचे वारे असे आपल्याकडे तेजीने वाहतेय, पण कित्येकदा त्याची दिशा चुकलेलीही असते. म्हणजे पुरुष सिगरेट ओढतात, दारू पितात, तर आपण का नाही प्यायची? अशी धारणा स्त्रियांमध्ये पक्की होताना दिसते. आता कोणत्याही पार्टीत गेले की दारू हा मेन्यूवरचा न टाळता येण्यासारखा पदार्थ झालाय. समस्या ही आहे, की कोणत्याही व्यसनाचे दुष्परिणाम बाईला जास्त भोगावे लागतात. आमच्या घरातील कित्येक पुरुषांच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबाची राखरांगोळी होताना मी पाहिले आहे. सिगरेट व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा बाईच्या प्रजननक्षमतेवर जास्त घातक परिणाम होतो; पण स्त्रिया अधिक भावनाशील असल्याने व्यसनी होण्याचा धोका त्यांच्याबाबत जास्त असतो. त्यांना जर दारूची अथवा इतर व्यसनांची सवय लागली तर त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात, हे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातूनही लक्षात येते.

सोबतच आजच्या या मॉर्डन जगात, स्मार्ट दिसण्याचा एक ताणही प्रत्येक स्त्रीवर आहे. मीही त्याला अपवाद नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांची अनेक चकचकीत उत्पादने बाजारात आलेली आहेत. जाहिरातींचा भडिमार सतत डोळ्यांवर होत असतो.

स्मार्ट राहणे ही काळाची गरज झालीय, पण या गदारोळातही माझ्या जोडीदाराला – प्रवीणला मी गबाळी, मेकअपशिवाय असली तरी नेहमीच सुंदर वाटते. माझ्या या ‘मी’ असण्यात, राहण्यात, त्याचाही मोठा वाटा आहे. त्याला मी आवडले तेच मुळी एकटी हॉटेलमध्ये जाऊन चिकन बिर्याणी खाताना पाहून. पुढे आमच्या पहिल्या भेटीची आठवण मी त्याच्याशी राजकीय प्रश्नावर हुज्जत घालून, त्याला निरुत्तर केले होते अशी आहे. बुद्धविहारात दहा हजार रुपयांत लग्न केल्यानंतर, आम्ही एकदम झोपडपट्टीत भाडय़ाने घर घेऊन सोबत आयुष्य सुरू केले. आमच्या या खडतर प्रवासात त्याने माझ्या करियरला खूप हातभार लावला. ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी लिहिताना तो आमच्या मुलाला सांभाळायचा, तर मी लायब्ररीत बसून लेखन करायचे. मुलाला त्याचा इतका लळा आहे, की त्याने पहिला शब्द उच्चारला तोही ‘पप्पा’ असा. अजून एक आठवण म्हणजे मुलाला आम्ही दोन दिवसांसाठी पाळणाघरात ठेवण्याचा प्रयोग केला होता. तेव्हा मुलगा तिथे पप्पा-पप्पा करून गोंधळ घालायचा. तिथल्या बायकांनी एकदम आश्चर्यानं सांगितले होते की, ‘बाकीची मुलं आई किंवा मम्मी करून रडतात, तुमचा मुलगा जरा वेगळाच आहे हो.’ तर आम्ही नवराबायकोनं दैनंदिन कामंही वाटून घेतलीत. मी थोडी आळशी असल्याने घरातील जास्त कामे त्याची, तर कमी कामे माझी आहेत. तो मुलाची सकाळची शाळेची तयारी करतो, वॉशिंग मशीनला कपडे लावतो, भांडी मांडणीवर रचतो, पाणी भरतो आणि बाजारहाटही करतो. माझ्या १० वर्षांच्या मुलालाही मी स्वयंपाकघराची ओळख करून दिलेली आहे. तो कधी लसूण निसतो, कधी तव्यावर डोसा टाकतो. स्त्री-पुरुष समानता अशी घरातून सुरू होते व मगच समाजात पोहोचते.

पण माझी ‘मी’ची गोष्ट ही केवळ माझ्यापुरती, माझ्या कुटुंबापुरती मर्यादित नाही. ही ‘मी’ची गोष्ट तेव्हाच सफळ संपूर्ण होऊ शकते जेव्हा भारतभरातील नव्हे तर जगभरातील मुलींना स्त्रियांना त्यांच्या हक्काची सुरक्षितता मिळेल. कासवाला पाठीवर एक घर असते, संकट आले की ते कासव त्यात स्वत:ला कोंडून घेते; पण एखाद्याला परतायला घरच नसेल तर? सीरिया, मेक्सिको, इराक किंवा भारतातील विस्थापित मुली, मुझफ्फरनगरमधील दंगलीमुळे निर्वासित झालेल्या बायका यांची घरे कुठे हरवलीत? माझी एक मत्रीण अशा घर हरवलेल्या तरुण मुलींसाठी शेल्टर होम चालवते. तिथे येणाऱ्या मुलींच्या सगळ्या कहाण्या फार हेलावून टाकणाऱ्या असतात. त्यांच्यासाठी काम करणारी ती मत्रीण मला एकदा म्हणाली होती, ‘या मुलींसाठी शेल्टर होमच तयार करावे लागू नये, असा समाज बनवायचाय गं आपल्याला.’

बस्स, माझ्या ‘मी’ची जगातील सगळ्या ‘ती’शी नाळ जोडलेली असावी, हीच माझी गोष्ट आहे.

shilpasahirpravin@gmail.com

chaturang@expressindia.com