प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

१९६१ मध्ये चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी ‘नासा’ची धडपड सुरू झाली. यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्राचं गणित. या गणिताचा आधार होत्या ‘नासा’मध्ये गणिती आकडेमोड करणाऱ्या स्त्रिया. त्यातल्या बहुसंख्य कृष्णवर्णीय होत्या. १९५१ मध्ये जेव्हा कॅथरीन जॉन्सन यांनी ‘नासा’त प्रवेश घेतला तेव्हा त्या शास्त्रज्ञ आणि विचारवंतांच्या संस्थेमध्येही वर्णद्वेष केला जायचा. इथे काम करणाऱ्या कृष्णवर्णीय स्त्रियांना कोणत्याही नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या नाहीत. एक तर स्त्रिया म्हणून आणि दुसरं म्हणजे या वर्णद्वेषामुळे या मानवी संगणक कमी पगारात काम करत होत्या; पण पुढच्या काळात याच संस्थेमध्ये स्त्री अभियंता आपल्या कर्तृत्वावर महत्त्वाच्या ठरल्या.

‘थ्रीइडियटस्’ या चित्रपटातला एक संवाद अनेक संदर्भामध्ये अनेक वेळा आठवतो. प्राचार्य वीरू सहस्रबुद्धे ऊर्फ ‘व्हायरस’ मुलांना विचारतात, ‘‘चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं?’’ उत्तर अर्थातच सर्वाना माहीत असतं, नील आर्मस्ट्राँग. प्राचार्य पुढचा प्रश्न विचारतात, ‘‘..आणि दुसरं?’’ मुलं विचार करायला लागतात. ‘‘विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कारण दुसरं येणाऱ्याचं नाव कुणीही लक्षात ठेवत नाही,’’ सहस्रबुद्धे गरजतात. ‘नासा’मधल्या स्त्री शास्त्रज्ञांबद्दल वाचताना तर हे प्रकर्षांनं आठवतं. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या बझ आल्ड्रीनचं नावही जगासाठी कमी महत्त्वाचं ठरत असेल तर इतरांची काय कथा!

मग हे पाऊल ठेवण्याचं सामथ्र्य देणाऱ्या, ‘नासा’मधल्या स्त्रियांचं काम काळाच्या ओघात विसरलं गेलं तर त्यात कुणालाही आश्चर्य वाटायचं कारण नाही. सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषाविरोधातल्या आंदोलनांच्या  पाश्र्वभूमीवर ‘ह्य़ूमन कॉम्प्युटर्स’ अर्थात मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रियांच्या कामाची आठवण झाली.

१९६० चं दशक संपूर्ण जगासाठीच फार महत्त्वाचं होतं. युरोप दुसऱ्या महायुद्धाच्या संहारातून सावरत होता. जर्मनीमध्ये बर्लिनची भिंत उभारली जात होती. लॅटिन अमेरिकेत

चे गव्हेराचा उदय होत होता. अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाला विरोध सुरू झाला होता. मार्टिन ल्यूथर किंग यांनी वर्णद्वेषाविरुद्धचा आपला लढा सुरू केला होता. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. १९५७ च्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा सोव्हिएत रशियानं ‘स्पुटनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला तेव्हा अमेरिकेचं धाबं दणाणलं. पुढच्याच महिन्यात ‘स्पुटनिक-२’ एका जिवंत प्रवाशासोबत अवकाशात सोडण्यात आला. हा प्रवासी म्हणजे लायका नावाची कुत्री. अमेरिकेचे प्रयत्न सुरूच होते, पण युरी गागारीनच्या पृथ्वी परिक्रमेबरोबरच सोव्हिएत रशियानं अवकाशात अनेक पराक्रम केले. रशियाचा हा उत्कर्ष पाहून १९६१ च्या मे महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांनी चालू दशक संपेपर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचा आणि सुखरूप परत पृथ्वीवर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रावर पाऊल ठेवल्यानं जगाच्या नजरेत अमेरिका अव्वल ठरणार होतीच, पण अमेरिकी  तंत्रज्ञानाला मोठी बाजारपेठ मिळणार होती आणि एकाधिकारशाही सोव्हिएत रशियाच्या तुलनेत अमेरिकी लोकशाहीचा एक प्रकारे विजय होणार होता. हे सर्व साध्य करण्यासाठी ‘नासा’ची धडपड सुरू झाली.

हा अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असणारा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्या म्हणजे तंत्रज्ञान आणि ज्यावर ते आधारलेलं आहे असं भौतिकशास्त्राचं गणित. या गणिताचा आधार होत्या ‘नासा’मध्ये गणिती आकडेमोड करणाऱ्या स्त्रिया. त्यातल्या बहुसंख्य  कृष्णवर्णीय होत्या हे विशेष. १९५१ मध्ये जेव्हा कॅथरीन जॉन्सन यांनी ‘नॅशनल अ‍ॅडव्हायझरी कमिटी फॉर एअरोनॉटिक्स’मध्ये अर्थात ‘नाका’ (१९५८ मध्ये याचं नामकरण ‘नासा’ – म्हणजे ‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ असं करण्यात आलं.) प्रवेश घेतला तेव्हा त्या शास्त्रज्ञ आणि विचारवंतांच्या संस्थेमध्येही वर्णद्वेष केला जायचा. डोरोथी व्हॉगन यांच्या नेतृत्वाखाली कृष्णवर्णीय वंशाच्या स्त्रिया ‘वेस्ट एरिया कॉम्प्युटिंग युनिट’मध्ये काम करायच्या. युद्धाचा परिणाम कोणावर कसा होतो बघा. १९४३ मध्ये दुसरं महायुद्ध टीपेला पोहोचलं होतं. अमेरिकेत गणिती, प्रयोगशाळेत काम करणारे लोक, लष्कर आणि संरक्षण क्षेत्रात काम करू शकणाऱ्या लोकांची कमतरता होती. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी संरक्षण क्षेत्रात नोकऱ्या देताना वर्ण आणि धर्मावर आधारित भेदभाव थांबवण्यासाठी अध्यादेश काढला आणि गणिताच्या शिक्षिका असलेल्या व्हॉगन ‘नाका’ संस्थेत रुजू झाल्या. कृष्णवर्णीय स्त्रिया जे करायच्या तेच काम इतर श्वेतवर्णीय किंवा युरोपियन-अमेरिकन वंशाच्या स्त्रियाही करायच्या, मात्र त्यांच्यासाठी पूर्वेच्या बाजूची वेगळी इमारत होती. या सर्वाचं काम एकच, पात्रता एक; पण एका टप्प्याच्या पुढे इथे काम करणाऱ्या कृष्णवर्णीय स्त्रियांना कोणत्याही नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या नाहीत. मग त्या कामात कितीही चोख असल्या तरीही. एक तर स्त्रिया म्हणून आणि दुसरं म्हणजे या वर्णद्वेषामुळे या मानवी संगणक कमी पगारात काम करत होत्या. व्हॉगन यांनी युनिटचं नेतृत्व कृष्णवर्णीय स्त्रियांनाही करता यावं यासाठी बरेच प्रयत्न केले. कालांतरानं १९४९ मध्ये त्या ‘नाका’ संस्थेच्या पहिल्या कृष्णवर्णीय पर्यवेक्षक ठरल्या. अर्थात या समितीमध्ये पुरुषांची आणि स्त्रियांची कामं अशीही विभागणी अनाहूतपणे केली गेली होती. पुरुष तंत्रज्ञ प्रयोगशाळेत काम करणार, नवनवे शोध लावणार, अवकाशयानांचा आराखडा तयार करणार, त्यांच्या या कामाबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध करणार आणि जगाकडून वाहवादेखील मिळवणार. त्यांच्याच तोडीच्या स्त्री शास्त्रज्ञ मात्र बंद खोलीत, मान खाली घालून आकडेमोड करत बसणार, ‘मुख्य’ कामाला पूरक असंच काम करणार. अशा या संस्थेमध्ये पुढे या स्त्री अभियंता महत्त्वाच्या ठरल्याच.

१९२० च्या दशकात अमेरिकेत खूप कमी ठिकाणी श्वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांबरोबर कृष्णवर्णीयांना शिक्षण घेता यायचं. या मोजक्या महाविद्यालयांपैकी पश्चिम व्हर्जिनियातलं महाविद्यालय होतं. अशा केवळ ३ कृष्णवर्णीयांपैकी कॅथरीन जॉन्सन एक होत्या. काही जणांसाठी तिथे प्रवेश मिळवणं हीच आयुष्यातली सर्वात गौरवाची गोष्ट ठरली असती; पण जॉन्सन यांच्यासाठी ही केवळ पहिली पायरी होती. सल्फर स्प्रिंग, पश्चिम व्हर्जिनियामध्ये १९१८ मध्ये जन्मलेल्या कॅथरीन जॉन्सन यांनी आपल्या गणिती प्रतिभेच्या जोरावर अनेक इयत्ता कमी वर्षांमध्ये पूर्ण करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्या व्हर्जिनियात पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. १९५१ मध्ये जॉन्सन यांना त्यांच्या एका नातेवाईकानं ‘नाका’मधल्या ‘वेस्ट एरिया कॉम्प्युटिंग सेक्शन’बद्दल माहिती दिली. पुढची काही र्वष त्या अवकाशयानं, त्यांच्या उड्डाण चाचण्या, यान ‘क्रॅश’ होण्याची कारणं अशा सर्व आकडेवारीचा अभ्यास करत होत्या. १९५६ मध्ये हे काम संपवताना त्यांच्या पतीचं कर्करोगानं निधन झालं. पुढच्या वर्षी- १९५७ मध्ये सोव्हिएत रशियानं कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ अवकाशात सोडला. या घटनेनं इतिहासाला कलाटणी दिली आणि कॅथरीन जॉन्सन यांच्या आयुष्यालाही! १९५८ मध्ये अमेरिकेनं अवकाश सफरीसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली. या टास्क फोर्ससाठी लागणारी गणितं जॉन्सन यांच्या प्रयत्नांनी उभी राहिली. त्यानंतर त्यांनी अ‍ॅलन शेपर्डच्या पहिल्या मानवी अवकाश सफरीसाठी ‘ट्रॅजिक्टरी अनॅलिसिस’चं काम केलं होतं. १९६० मध्ये अभियंता टेड स्कोपेन्स्कीबरोबर त्यांनी या कामाविषयीचा शोधनिबंध प्रसिद्ध केला. पहिल्यांदाच एका स्त्रीला, ‘नासा’मध्ये आपल्या कामाची पावती मिळाली होती. ‘नासा’मधल्या कामाबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध करणारी ती पहिली स्त्री ठरली.

अमेरिकेचे पहिले अवकाशवीर जॉन ग्लेन हे अवकाशात जायला निघाले तेव्हा सगळी पूर्वतयारी झाली होती; पण यात सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो यानाची कक्षा ठरवण्याचा. त्या काळच्या ‘आयबीएम’ संगणकावर आकडेमोड सुरू असताना

जॉन ग्लेन तिथे आले आणि म्हणाले, ‘‘संगणकाचं जाऊ द्या.. त्या मुलीला बोलवा.’’ कारण संगणकांवर विश्वास ठेवायचा तर त्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या  आणि इतक्या महत्त्वाच्या मोहिमेसाठी कुणीही कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतं. म्हणून कॅथरीन यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी संगणकाची आकडेमोड तपासून पाहिल्यावरच जॉन ग्लेन अवकाशात जायला निघाले. जॉन ग्लेन यांची ही यशस्वी अवकाशवारी अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधल्या ‘स्पेस रेस’मध्ये अमेरिकेचं पारडं जड करणारी ठरली.

कॅथरीन जॉन्सन यांच्या बरोबरीनं मेरी जॅक्सन यांनीही तेव्हाच्या ‘नाका’ संस्थेत ‘वेस्ट एरिया कॉम्प्युटिंग युनिट’मध्ये कामाला सुरुवात केली होती. इथे काम केल्यानंतर दोनच वर्षांत त्यांना केझीमिर्झ कॅर्झनेकी या वरिष्ठ अभियंत्याबरोबर

४ फूट उंच आणि ४ फूट रुंद असलेल्या ‘सुपरसॉनिक प्रेशर टनेल’मध्ये काम करायची संधी मिळाली. आकडेमोडीबरोबरच कॅर्झनेकी यांनी मेरी यांना प्रयोगशाळेत काही स्वत:चे प्रयोग करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं. या अनुभवामुळे त्यांना केवळ गणितज्ञ नाही, तर अभियंता होण्याचं द्वार खुलं होणार होतं; पण यासाठी त्यांना व्हर्जिनिया विद्यापीठामधून काही अभ्यासक्रम पूर्ण करायला लागणार होते. तेव्हा या विद्यापीठात कृष्णवर्णीयांना रात्रशाळेतही प्रवेश नव्हता; पण त्यांना प्रवेश देण्यात यावा म्हणून त्यांनी हँप्टन शहराच्या काऊन्सिलची परवानगी मागितली. बऱ्याच चर्चेनंतर त्यांना ही परवानगी मिळाली. त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि १९५८ मध्ये ‘नासा’मध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री अभियंता ठरल्या.

१९३९ मध्ये किटी ओब्रायन जॉयनर या पहिल्या स्त्री अभियंत्यानंतर एका कृष्णवर्णीय स्त्रीला ही संधी मिळायला तब्बल १९ वर्षे लागली. १९७५ पर्यंत जॅक्सन यांनी ‘नासा’च्या १२ महत्त्वाच्या तांत्रिक संशोधनांमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेच्या पहिल्या अवकाश मोहिमेसाठीच्या अवकाशयानाचं ‘एअरफ्लो’ आणि ‘थ्रस्ट डिझाइन’ त्यांनी विकसित केलं होतं. अवकाशात झेपावणाऱ्या यानाच्या ‘थिअरॉटिकल मॉडेल’चा अभ्यास त्यांनी केला होता. यानंतरच अंतिम डिझाइन नक्की करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी १९७९ मध्ये स्वखुशीनं हे काम सोडलं आणि ‘नासा’मध्ये स्त्रियांना अभियंत्या, शास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ म्हणून समान संधी मिळावी यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या कामामधून त्यांनी इतर स्त्रियांचा ‘नासा’मधला प्रवास सुकर केला, अनेक स्त्रियांच्या यशाचा मार्ग खुला करून दिला. १९८५ मध्ये त्या ‘नासा’च्या लँगली कार्यालयातून निवृत्त झाल्या.

२०१९ मध्ये मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉगन आणि कॅथरीन जॉन्सन या स्त्रियांच्या सन्मानार्थ ‘नासा’च्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयासमोरील रस्त्याला ‘हिडन फिगर्स वे’ असं नाव देण्यात आलं. त्यांच्या कामाची आठवण म्हणून हे नाव देण्यामागे मार्गो ली श्ॉटर्ली लिखित २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हिडन फिगर्स’ या कादंबरीचा मोठा वाटा आहे. या कादंबरीमध्ये अमेरिकेला ‘स्पेस रेस’ जिंकता यावी यासाठीच्या कृष्णवर्णीय स्त्रियांच्या योगदानाविषयी लिहिलं आहे. ‘नासा’मध्ये काम करत असताना वर्णद्वेष सहन करत, आपल्या प्रतिभेचा वापर करून वर्णभेद मोडून पाडायचं काम या स्त्रियांनी कसं केलं याची स्फू र्तिदायी गोष्ट या पुस्तकात आहे. या कादंबरीवर आधारलेला ‘हिडन फिगर्स’ हा चित्रपटही अप्रतिम आहे.

अमेरिकेत सध्या ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ ही चळवळ सुरू आहे. कदाचित त्यालाच प्रतिसाद म्हणून ‘नासा’नं २४ जूनला आपल्या वॉशिंग्टन डीसी येथील मुख्यालयाचं नामकरण ‘मेरी डब्ल्यू जॅक्सन नासा हेडक्वार्टर्स’ असं केलं आहे.

या ‘हिडन फिगर्स’चं काम, त्यांचे अनुभव वाचले, की नील आर्मस्ट्राँगच्याच त्या जगप्रसिद्ध वाक्याच्या धर्तीवर म्हणावंसं वाटतं, ‘त्यांचं काम हे एका व्यक्तीसाठी कदाचित एका पावलासारखंच असेल; पण जगातल्या सर्व स्त्रियांना एक नवं द्वार खुलं होण्यासाठी ती एक फार मोठी झेप होती!’