25 February 2020

News Flash

गरज आणि वासना

परमात्म्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. पण तो एखाद्या कोहिनूरप्रमाणे नव्हे. भुकेल्याला अन्न मिळावं, तहानलेल्याला पाणी मिळावं, आनंदी भावावस्थेत एखादं गीत वा नृत्य आपसूक निर्माण व्हावं

| October 4, 2014 01:01 am

परमात्म्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. पण तो एखाद्या कोहिनूरप्रमाणे नव्हे. भुकेल्याला अन्न मिळावं, तहानलेल्याला पाणी मिळावं, आनंदी भावावस्थेत एखादं गीत वा नृत्य आपसूक निर्माण व्हावं तसा तो तुमच्या जीवनात येईल. वासना सुटली की मोक्ष मिळेल. वासना हे बंधन असतं.
माणसाच्या गरजा फार थोडय़ा असतात. त्या पुऱ्या होणं सहज शक्य असतं. त्यात काही अडचण नसते. सगळय़ांच्या गरजा पुऱ्या होऊ शकतात. वासना, अपेक्षा मात्र पुऱ्या होऊ शकत नाहीत. एका माणसाच्या वासनासुद्धा पुऱ्या व्हायची मारामार, तिथं सगळय़ांच्या वासनांची पूर्ती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
वासनेचा अर्थ काय तर जे तुम्हाला आवश्यक नाही; ज्याच्यावाचून आयुष्य अडत नाही त्याची मागणी! गरज म्हणजे काय जे आवश्यक आहे, जगण्यासाठी ज्याची जरुरी आहे त्याची मागणी! गरज भागू शकते. अन्न हवं. पाणी हवं. शरीराचा थंडीवाऱ्यापासून बचाव करण्यासाठी कपडे हवेत. डोक्यावर आसरा हवा.. या गरजा सहज पुऱ्या होऊ शकतात. त्यात काय अडचण आहे? या गरजा पुऱ्या झाल्यावर तुम्ही निवांतपणे झाडाखाली बसून बासरी वाजवू शकता. या साऱ्या गोष्टींमध्ये समस्या उद्भवायचं कारणच नाही. अगदी पशुपक्षीसुद्धा आपल्या गरजा सहज भागवतात. वृक्ष तर गरजांच्या पूर्तीसाठी इकडेतिकडे जातही नाहीत. जागेवर उभे राहून ते गरजा भागवतात. गरजांची पूर्ती म्हणजे जीवनाचं श्रेष्ठ शिखर गाठणं किंवा जीवनविकासाची सर्वोत्तम कृती थोडीच आहे की त्या पूर्ण करायला अनेक अडचणी दूर कराव्या लागतील किंवा अपार मेहनत करावी लागेल?
एके काळी ही पृथ्वी आनंदी होती. खुशाल होती. अजूनही ती तशी होऊ शकते. पण त्यासाठी माणसानं आपला विक्षिप्तपणा सोडायला हवा. काही कामना, इच्छा अगदीच अनावश्यक असतात. उदाहरणार्थ तुम्हाला ‘कोहिनूर’ (हिरा)हवा आहे. आता कोहिनूर खाणार, पिणार की काय करणार? मूल आजारी पडलं तर कोहिनूर औषध म्हणून पाजता येईल? भूक लागली तर ती कोहिनूरने भागेल? तो डोक्यावर ठेवून हिंडत बसणार का?
जपानची एक गोष्ट सांगतो. तिथं एक मोठा फकीर होऊन गेला. त्याच्यामुळे सम्राट खूप प्रभावित झाला. त्यानं काय केलं तर मखमलीवर हिरे, माणकं, रत्नं वगैरे जडवून एक पोशाख बनविला. एक मुकुट बनविला. कारण अर्पण करायचं ते एका सम्राटाच्या गुरूला! फकीर एका झाडाखाली राहात असे. तिथं हा पोशाख आणि मुकुट घेऊन महाराज आले आणि गुरुचरणी हा आहेर अर्पण केला. फकीर म्हणाला, ‘‘मी जर हे परत केलं तर तू दु:खी होशील. पण तूसुद्धा माझी फजिती करू नकोस.’’ सम्राटानं आश्चर्यानं विचारलं, ‘‘म्हणजे काय?’’ फकीर म्हणाला, ‘‘असं पाहा, माझ्याकडे इथं कुणी येत-जात नाही. या मुकुटाची, कपडय़ांची किंमत इथं कुणाला आहे? कोण त्यांचा मौल्यवानपणा समजून घेणार? इथं माझ्या आसपास जंगली पशुपक्षी असतात. तेच माझे सगेसोबती. इथं हरिणं येतात. मोर येतात. मी जर हे कपडे घातले तर ते हसतील, माझी चेष्टा करतील आणि म्हणतील, ‘‘बघा, हा माणूस वेडा झाला. हे काही तरीच अंगाखांद्यावर घातलंय पाहा.’’ म्हणून तुला सांगतो, माझी अशी फजिती होऊ देऊ नकोस. मी याचा स्वीकार केला. तुझ्या भावनांची कदर केली. आता हे परत घेऊन जा. इथं ही गोष्ट बेकार आहे. इथं पशू, पक्षी, वृक्ष, वेली याची टर उडवतील. माझी मोठी बेअब्रू होईल. या गोष्टीचं मी काय करणार? (सतत निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या त्या फकिराला वासनांचा स्पर्शही झालेला नव्हता. गरज न भागवणारी गोष्ट त्याच्या दृष्टीनं अगदीच नगण्य होती.)
वासना या एक प्रकारे अनैसर्गिक म्हणायला हव्यात. बिनगरजेच्या वस्तूंची त्या मागणी करतात आणि त्यांची तृप्ती कधीच होत नाही. पशुपक्ष्यांना कुठे हिरे-माणकं आणि जडजवाहिराची पर्वा असते? पण त्यांचं सौंदर्य त्यामुळे कधी उणावतं का? आपला सुंदर पिसारा फुलवून जेव्हा मोर नाचू लागतो तेव्हा सौंदर्याच्या बाबतीत कोणता कोहिनूर त्याच्याशी स्पर्धा करू शकेल? पण आपण नृत्य विसरलो. आपल्याला कोहिनूरचा हव्यास लागला. जेव्हा कोकिळा गाऊ लागते तेव्हा कोहिनूरची आठवण येते का? पण आपण संगीत विसरलो. आपल्याला कोहिनूर हवासा झाला.
 जीवन फार साधं, सरळ होऊ शकतं. थोडीशी जाण हवी इतकंच! आपल्या जगण्यासाठीच्या गरजा अवश्य पूर्ण करा. या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर जिवंत कसे राहणार? गीत कसं गाणार? नाचाल कसे? परमेश्वरासाठी मनात भरून आलेली कृतज्ञता कशी व्यक्त कराल? आपल्या गरजा जरूर भागवा. थोडं समजून घ्या. ज्याशिवाय जगणं अशक्य असतं ती गरज. वासनेचा आपल्या जगण्याला काहीच उपयोग नसतो. तिच्यामुळे एकच कार्य घडतं. ती अहंकार निर्माण करते आणि वाढवते. ज्याच्या मालकीचा कोहिनूर असतो त्याचा अहंकार भक्कम असतो एवढंच!
वासना अहंकार पैदा करते आणि वाढवते. आवश्यकता किंवा गरज पूर्ण झाली तर समाधान निर्माण होतं. तुम्ही या समाधानाचा शोध घ्या. पण तुमचे महात्मे, महाराज तुम्हाला उलट समजावतात. ते म्हणतात, ‘‘कोहिनूर कवडीमोलाचा आहे. मोक्ष मिळवा. धन प्राप्त करून काय करणार? परमात्म्याला प्राप्त करा. (हे असं सांगून) ते तुमची वासना भयंकर स्वरूपात वाढवत आहेत. परमात्म्याचं काय करणार? भूक लागली तर खाणार? तहान लागली तर पिणार? मूल आजारी पडलं तर सहाणेवर उगाळून त्याची मात्रा चाटवणार? काय करणार? कशाला हवाय (असला वावदूक) मोक्ष?
 परमात्म्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. पण तो एखाद्या कोहिनूरप्रमाणे नव्हे. भुकेल्याला अन्न मिळावं, तहानलेल्याला पाणी मिळावं, आनंदी भावावस्थेत एखादं गीत वा नृत्य आपसूक निर्माण व्हावं तसा तो तुमच्या जीवनात येईल. वासना सुटली की मोक्ष मिळेल. वासना हे बंधन असतं. ज्या वेळी फक्त गरजा भागवल्यावर तुम्ही समाधान प्राप्त करू शकाल, त्या वेळी मोक्ष फार दूर नसेल.
भविष्यात ज्यांची पूर्ती व्हावी अशा अपेक्षा, कामना म्हणजे वासना. त्या कधी तृप्त होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंधनात ‘मनुष्य’ नेहमी पारतंत्र राहतो. गरज म्हणजे वर्तमानात जगण्यासाठी आवश्यक गोष्ट ती भागवणं कठीण नसतं आणि फक्त गरजा पूर्ण करणारा माणूस तसा मुक्त असतो.
किती छोटय़ाशा गरजा आहेत या जीवनाच्या! थोडीबहुत मेहनत करून त्या पुऱ्या होऊ शकतात, (त्यासाठी आवश्यक ते शारीरिक कष्ट मनुष्याला सुदृढ आणि मानसिकरीत्याही सक्षम ठेवतात.) हे परिश्रमसुद्धा माणसाची गरजच आहे. ती पुरी झाली नाही तर माणूस प्रेतवत होऊन जाईल. जीवन रसरशीत, जिवंतपणे जगायचं तर हे कष्ट आवश्यक आहेत. पण वासना कधी तृप्त होत नाहीत. एक संपली की दुसरी अशी शृंखला वाढत राहते. वासनापूर्तीसाठी केलेले हे श्रम घातक ठरतात. सारखे ताणतणावाखाली राहून पैसे कमावताना जी माणसं विचार करतात, भरपूर कमावून सुख उपभोगेन (इथं परत सुखाची संकल्पना भविष्यकाळाशी जोडलेली आणि कामांची संकल्पना त्या काम करते वेळच्या सुखाशी नव्हे तर मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांशी आणि त्यानं खरेदी करता येणाऱ्या सुखांशी जोडलेली असते), त्या माणसांचा जेव्हा सुख भोगण्याचा काळ येतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. सगळं ठीक आहे, आता आपल्याला सुख मिळवता येईल असं वाटत असताना त्यांच्या स्वत:त बिघाड होऊन दु:ख वाटय़ाला येतं. जोवर भूक होती तोवर नीट अन्नग्रहण केलं नाही. आपल्या स्वप्न महालांची निर्मिती झाल्याशिवाय हे जेवणार तरी कसे? महाल झाला एकदाचा तयार.. अन्न समोर तयार होऊन आलं.. पण भूकच उरली नाही. आता जेवू शकत नाहीत. पोट भरून अन्नग्रहण केल्याचं समाधान घेऊ शकत नाहीत. कारण या सगळय़ा घटनाक्रमादरम्यान स्वत:च नष्ट झाले. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. घर तयार होतं पण तुमची पडझड होऊन भग्नावशेष उरतात. पैसे जमा होतात पण तुम्ही स्वत: निर्धन होता. सतारीच्या तारा जुळून आल्या पण सतारिया संपून गेला असं घडतं.
आपल्या आवश्यकता कोणत्या आणि वासना कोणत्या हे जो नीट जाणू शकतो त्याला मी बुद्धिमान म्हणतो. त्याला वेद आणि उपनिषदं भलेही माहिती नसोत. आवश्यकता पुऱ्या करा आणि वासनेचा वारू पहिल्या पावलाला अडवा. एकदा तो धावू लागला की त्याला काबूत आणणं कठीण होतं. व्यर्थ गोष्टींची कामना करू नका. त्यांना प्राप्त करून काय करणार? ज्यानं तृप्ती मिळते त्याची प्राप्तीच अर्थपूर्ण उरते. वासना सहजपणे चित्तातून मावळतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जीवनात समाधानाची बासरी वाजू लागली आहे.    
(मनोविकास प्रकाशनच्या ‘ओशो विचारतरंग’ या पुस्तकातील संपादित अंश, साभार)

First Published on October 4, 2014 1:01 am

Web Title: need and desires
टॅग Chaturang
Next Stories
1 श्वसनावर नियंत्रण
2 मुलांसाठी फक्त..
3 आदर हा उपचार नसावा!
Just Now!
X