डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

नकारात्मक मानसिकता केवळ बालसंगोपनापुरती मर्यादित नसते, तर ती खोल झिरपत जाऊन आपल्या जीवनतत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग होते. इतकंच नव्हे, तर ती मानसिक आरोग्याचीही अपरिमित हानी करते. या मानसिकतेवर उतारा म्हणून ‘आनंदाच्या मानसशास्त्रा’ची संकल्पना मांडली गेली. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर आभासी सकारात्मकतेऐवजी ‘सम्यक सकारात्मकता’ जोपासली पाहिजे. ‘लक्ष फक्त नकारात्मकतेवरच नको, दोन्ही बाजूंकडे द्या,’ असा सम्यक दृष्टिकोन त्यात बाळगला जातो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

एका पाच वर्षांच्या मुलीचे वडील बगीच्यात काम करत होते आणि मुलगी तिथंच खेळत होती. वडिलांनी तिला हाक मारली, ‘‘ निकी, बास झालं आता हुंदडणं. इथं ये आणि मदत कर बघू मला. ’’ ती नाखुशीनं उठली आणि त्यांच्यासमोर येऊन म्हणाली, ‘‘एक विचारायचंय.’’

‘‘ हं..बोल,’’ वडील खुरप्यानं जमीन उकरण्यात मग्न होते.

‘‘बाबा, माझ्या मागच्या वाढदिवसापासून मी किरकिर करणं बंद केलंय. जर मी ते करू शकते तर तुम्हीही मला हे करू नकोस, ते करू नकोस , असं सारखं म्हणत राहता, ते बंद करू शकणार नाही का?’’

वडील दिङमूढ झाले. त्यांच्या लक्षात आलं, की तिच्याशी होणाऱ्या संवादात ‘नाही’, ‘नको’ची नकारघंटाच आपण वाजवतो. ‘अमुक ठिकाणी जाऊ नकोस’, ‘अमुक करू नकोस’, ‘हे चांगलं नाही’, किंवा ‘ते कसं वाईट आहे,’ अशा सूचना देत असतो. याचा दूरगामी परिणाम काय असेल याचा आपण कधी विचारच केला नाही. जेव्हा बालसंगोपनाचा भर मुलांना काय चूक आहे ते सांगून त्यांना सुधारणं हा असतो, तेव्हा आपण मुलांना एक सुप्त संदेश देत असतो, की ‘तू जसा आहेस तसा योग्य नाहीस म्हणून तुला सुधारायला हवं.’ याचा अर्थ मुलांच्या मनावर आपण ती कशी चांगली नाहीयेत, हे ठसवतो. थोडक्यात, नकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो. त्याद्वारे आपण मनात नकारात्मक मानसिकता तर जोपासतोच, पण मुलांच्या मनातही नकळत या मानसिकतेचं बीज पेरतो.

आपल्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर मानसिकतेत शोधणाऱ्या या वडिलांचं नाव आहे, मार्टनि सेलिग्मन. या विषयानं त्यांना झपाटून टाकलं. त्यावर संशोधन करताना त्यांना कळलं, की नकारात्मक मानसिकता केवळ बालसंगोपनापुरती मर्यादित नसते, तर ती खोल झिरपत जाऊन आपल्या जीवनतत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग होते. इतकंच नव्हे, तर ती मानसिक आरोग्याचीही अपरिमित हानी करते. या मानसिकतेवर उतारा म्हणून त्यांनी ‘आनंदाच्या मानसशास्त्रा’ची संकल्पना मांडली. हे मानसशास्त्र सांगतं की आनंदी राहणं आत्मसात करता येतं, पण त्यासाठी प्रथम नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडणं आवश्यक आहे. नकारात्मक मानसिकतेची जडणघडण बालवयात होत असते व ही मानसिकता आपण अनभिज्ञपणे मुलांमध्ये रुजवत असतो. उदाहरणार्थ, अनोळखी माणसांपासून सावध राहण्याच्या सूचना जेव्हा आपण मुलांना वारंवार देतो तेव्हा नकळत त्यांच्यावर असे संस्कार रुजवतो की आजूबाजूचं जग अतिशय धोकादायक आहे. बाहेरची माणसं त्यांना पळवून न्यायला किंवा मारायला टपून बसली आहेत. यावर पालक विचारतील, की आजूबाजूला इतके गुन्हे होत असताना मुलांना त्याबाबत सावध करायला नको का? हवं. आपण जे मुलांना सांगत असतो ते चुकीचं नसतं, पण ते अर्धसत्य असतं. जगामध्ये जशी दुर्वर्तनी माणसं आहेत, तशीच सद्वर्तनी माणसंही असतात, हेही आपण मुलांना सांगतो का?.. की आपण वास्तवातल्या फक्त नकारात्मक गोष्टी वेचून बाहेर काढतो? ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो’च्या (‘एनसीआरबी’) टक्के वारीप्रमाणे संपूर्ण लोकसंख्येच्या १ टक्क्यापेक्षाही कमी माणसं गुन्हेगार आहेत. म्हणजेच सद्वर्तनी माणसांचं प्रमाण दुर्वर्तनी माणसांपेक्षा किती तरी अधिक आहे. आपण स्वत:ची गणनाही चांगल्या माणसांमध्ये करत असतो. किंबहुना आपल्यापकी प्रत्येकाला जर  विचारलं, की तुम्हाला जीवनात माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव किती आले आणि वाईटपणाचे किती आले, तर चांगुलपणाचं पारडं नक्कीच जड भरेल. एवढं असूनही आजूबाजूची माणसं धोकादायक आहेत किंवा विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत, अशी नकारात्मक भावना आपण स्वत:च्या मनात जोपासतो आणि मुलांपर्यंतही पोचवतो. थोडक्यात, आपण सद्वर्तन गृहीत धरतो आणि दुर्वर्तनाबाबत अतिसंवेदनशीलता दाखवतो.

याचा परिणाम असा होतो, की आपण सर्वप्रथम अवगुणांवरच बोट ठेवतो. आज कुठल्याही पालकांना त्यांच्या मुलांबद्दल विचारलं, तर ‘आमचा हा (किंवा ही) नीट जेवतच नाही’, ‘ऐकतच नाही’ किंवा ‘अभ्यासच करत नाही’ अशा असंख्य तक्रारींचा पाढा ते वाचून दाखवतात.  म्हणजेच मुलांमध्ये काय चांगलं आहे यापेक्षा काय चांगलं नाही, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. परिणामी मुलंही घाबरट, भयाकुल, न्यूनगंडग्रस्त होतात आणि ती स्वत:च्या नकारात्मक बाजूचाच विचार जास्त करत राहतात. अवघड प्रसंगांना सामोरं जाण्याऐवजी निराश होऊन हातपाय गाळून बसतात. म्हणूनच बालसंगोपनाचा केंद्रिबदू हा ‘मुलांना सुधारणं’ हा न ठेवता त्यांच्यामध्ये काय उत्कृष्ट आहे, ते शोधून काढून त्याचा विकास करण्याकडे वळवला पाहिजे.

एकदा का आपण नकारात्मकतेचे वाहक झालो की मग नकारात्मकतेबद्दल अतिसंवेदनशील होत जातो. ही अतिसंवेदनशीलता फक्त एकटय़ादुकटय़ा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहात नाही तर तिचं सामाजिक संक्रमण होत जातं. नकारात्मकतेच्या अतिसंवेदनशीलतेची अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. आपल्याला आजूबाजूला अशा अनेक पाटय़ा दिसतात की ज्यावर लिहिलेलं असतं, ‘तुम्हाला तक्रार करायची असेल तर अमुक यांना भेटा’. पण अशी पाटी पाहिली आहे का कधी, की जिच्यावर लिहिलं आहे, ‘तुम्हाला खूप छान वाटत असेल तर अमुक व्यक्तींना भेटा आणि आपला आनंद सर्वत्र पसरवा’? अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण समुपदेशकाला भेटतो, पण आनंदाची जोपासना करण्यासाठी समुपदेशकाला कुणी भेटल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?.. सध्याच्या ‘करोना’काळात तर नकारात्मकतेला चहूबाजूनं जसा काही पूर आला आहे. नीट आठवलं तर लक्षात येईल, की आपल्यापकी प्रत्येकाला या काळातही काही चांगले अनुभव आले आहेत. पण आपल्या लक्षात राहतात ते मात्र या काळातले दुर्दैवी मृत्यू, गरसोयी, हालअपेष्टा यांचे नकारात्मक अनुभव. म्हणजेच आनंदाचं अवमूल्यन करण्याची आणि नकारात्मकतेबाबत अतिसंवेदनशील राहण्याची सवय आपण स्वत:ला जडवून घेतली आहे.

नकारात्मकतेच्या अतिसंवेदनशीलतेवर अनेक संशोधनं झाली आहेत. संशोधक याचं उत्तर मनुष्याच्या उक्रांती अवस्थेत शोधतात. जेव्हा मनुष्यानं हिमयुगात प्रवेश केला तेव्हा प्रतिकूल हवामानाला सज्ज राहण्यासाठी माणसाच्या मेंदूत बदल (‘बॅड व्हेदर ब्रेन’) घडून आले. त्यात नकारात्मक मानसिकतेचं मूळ सापडू शकतं. कारण त्यामुळे ‘कधीही हवामान बदलू शकतं आणि आपण सतत सतर्क राहायला पाहिजे,’ हा विचार मनात इतका प्रबळ झाला, की नकारात्मकतेची संवेदनशीलता वाढली. म्हणूनच आपल्याला दहापकी नऊ गुण मिळाले तर नऊ उत्तरं बरोबर आहेत या आनंदापेक्षा चुकलेल्या एका उत्तराची लागलेली चुटपुट जास्त प्रभावी असते. पण याचा अर्थ असा नव्हे की नकारात्मक मानसिकता अटळ आहे. प्रयत्न केला तर ती बदलू शकते. याचा अर्थ सकारात्मक विचार करायचे असा होतो का?.. ‘माझ्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे’, किंवा ‘सगळं छान होईल’, अशा सकारात्मक विचारांचं लोण हल्ली सर्वत्र आलं आहे. हे विचार सकारात्मक असले तरी आभासी आहेत. कारण जगात काही नकारात्मक आहे हे वास्तव हे विचार अमान्य करतात. ते फक्त खोटा दिलासा देतात आणि भाबडय़ा आशावादाला खतपाणी घालतात. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर आभासी सकारात्मकतेऐवजी ‘सम्यक सकारात्मकता’ जोपासली पाहिजे. ‘लक्ष फक्त नकारात्मकेतवरच नको, दोन्ही बाजूंकडे द्या,’ असा सम्यक दृष्टिकोन त्यात बाळगला जातो. नकारात्मक बाजू त्यात दुर्लक्षिली जात नाही.

आपल्याला वाटत असतं की नकारात्मकतेचं उच्चाटन केलं की आपण आपोआप आनंदी होऊ. सम्यक सकारात्मकता सांगते, की नकारात्मकतेचा अभाव म्हणजे सकारात्मकता नाही. उदाहरणार्थ, नराश्य दूर होणं म्हणजे आनंदी होणं नाही. त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. समजा आपल्याला उत्तम बाग फुलवायची आहे. आपण त्यातलं तण काढलं तर उत्तम बगिचा आपोआप तयार होईल का?  उत्तम बगिच्यासाठी जसं तण काढणं आवश्यक आहे तशी चांगली झाडंही मुद्दाम लावायला हवीत. तद्वतच नुसती नकारात्मकता बदलून चालणार नाही तर सम्यक सकारात्मकतेसाठी मुद्दाम प्रयत्न करायला हवेत.

नकारात्मकता पसरवण्यात सर्व प्रकारच्या माध्यमांचा वाटा जास्त असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर आपल्याला काही करता येणार नाही असं वाटून आपण हतबल होतो, आणि परत नकारात्मक मानसिकतेचे वाहक बनतो. नकारात्मक मानसिकतेचं वाहक बनणं नाकारणं व आनंदाची जोपासना करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करणं, हे सम्यक सकारात्मकतेसाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी एक सराव करता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या तीन आनंददायक गोष्टी आठवून पाहा. त्या गोष्टी फार मोठय़ा नसतीलही.  कदाचित बाल्कनीतून दिसणाऱ्या समोरच्या घरातील बाळाचं निरागस हसणं असू शकेल, मित्राचा आपुलकीनं आलेला फोन असू शकेल किंवा वाचनात आलेलं चांगलं पुस्तक असू शकेल. तुम्ही जर हे नेटानं करत राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल, की तीनपेक्षा किती तरी अधिक आनंददायक गोष्टी तुम्ही शोधू लागला आहात.

तुम्ही एकदा का आनंदाची जोपासना करायला सुरुवात केलीत की सम्यक सकारात्मकता फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर ती तुमची कृती, व्यवहार, आचार-विचार-प्रदानातून इतरांपर्यंत संक्रमित होईल. इतकंच नाही, तर ती वृिद्धगत करण्याचे अनेक मार्ग तुम्हाला समोर दिसू लागतील. ते अमलात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. सम्यक सकारात्मकतेचा पुरस्कार करणाऱ्या काही स्तुत्य प्रयत्नांना हातभारही लावू शकाल. त्या वेळी तुम्ही खऱ्या अर्थानं सम्यक सकारात्मकतेचे वाहक बनला असाल. नकारात्मकतेचा जोर जास्त असलेल्या सध्याच्या काळात त्याची नितांत गरज आहे.