News Flash

उद्योगिनी  – धागा  धागा अखंड विणू या..

लहान मुलांच्या कपडय़ांपासून सुरू झालेला निर्मलाताई रासकर यांचा हा व्यवसाय शर्ट, रेडिमेड कपडेनिर्मितीपर्यंत पोहोचला आहे.

होजिअरीच्या कंपनीत धागा कापण्यापासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. मनासारखा जोडीदार मिळाला आणि जोडीनं व्यवसायालाही सुरुवात झाली. लहान मुलांच्या कपडय़ांपासून सुरू झालेला निर्मलाताई रासकर यांचा हा व्यवसाय शर्ट, रेडिमेड कपडेनिर्मितीपर्यंत पोहोचला आहे.

गि रणी कामगार असलेल्या वडिलांची नोकरी गेल्यामुळे शाळकरी वयातच होजिअरीच्या कंपनीत धागा कापण्याचं काम त्यांनी सुरू केलं. घरकाम करणारी, शाळा अध्र्यावर सोडायला लागलेली ही मुलगी मात्र लवकरच शिवणकामात नैपुण्य मिळवण्यात यशस्वी झाली. लग्न झाल्यावर तिला साथ मिळाली ती पतीची. लहान मुलांचे कपडे शिवून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज रेडिमेड कपडे व्यापारापर्यंत येऊन पोहोचलाय. आनंदी स्वभाव, सकारात्मकता, अथक परिश्रम, कष्ट यांचं जणू बाळकडूचं प्यायलेल्या निर्मलाताई रासकर यांनी आज तयार कपडय़ांच्या व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे.

२५-३० वर्षांपूर्वीचा तो काळ. निर्मलाताईंचे वडील गिरणी कामगार. गिरणी कामगारांची झालेली दैनावस्था ही आपल्या महाराष्ट्राची दुर्दैवी घटना. वडिलांची नोकरी नसल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी त्यांनी घरकाम सुरू केले. त्याबरोबर ‘हायलँड कॉपरेरेशन’ या होजिअरीच्या कंपनीत धागा कापण्याचं कामही सुरू केलं. लहान वय असलं तरी शिकण्याची ओढ होती. धागा कापण्याबरोबरच त्यांनी शिलाई मशीन, शिवणकाम यांची माहिती करून घेण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी लवकरच शिवणकामाचे बारकावे शिकून घेतले.

कंपनीतील या चुणचुणीत हसऱ्या मुलीचं मन तेथील ‘सॅम्पल मेकर’ने जिंकलं आणि दुग्धशर्करा योग जुळून आला. एकच आवडनिवड असणाऱ्यांचा संसार जसा फुलतो, तसंच या दोघांचं झालं. दोघंही शिवणकामात हुशार. लग्न झाल्यावर प्रथम यांनी शिलाई मशीन भाडय़ानं घेऊन घरीही काम सुरू केलं. लहान मोठी कामं करत असतानाच ‘न्यू मोड एजन्सी’नं त्यांचं कौशल्य बघून आपलं काम त्यांना दिलं. दिवसरात्र कष्ट करून त्यांनीही अगदी वेळेत आणि आवडेल असं काम करून एजन्सीचा विश्वास जिंकला. हे काम मिळालं होतं तेव्हा अगदी छोटंसं भाडय़ाचं झोपडीवजा घर होतं. पण त्याची कधीच अडचण वाटली नाही, असं निर्मलाताई सांगतात. यादरम्यान कंपनीचे मालक महेश माणिक शेठ यांनी त्यांना टी-शर्ट शिवण्याचं प्रशिक्षण दिलं. ते आमचे देवदूतच होते, असं त्या नम्रपणे सांगतात.

तान्हुल्यापासून ते १२ वर्षांच्या सोनुल्यांपर्यंतचे कपडे शिवायला त्यांनी सुरुवात केली. दादरच्या रानडे रोडवरील ‘सिद्धिविनायक क्रिएशन’ या दुकानात त्यांनी शिवलेले कपडे विक्रीसाठी ठेवलेले असायचे. त्याचा फायदा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी झाला.

लहान मुलांचे कपडे शिवत असतानाच त्यांनी टी-शर्ट्स्, ट्रॅक पँटस्, शाळेचे गणवेश शिवण्यास सुरुवत केली. या कपडय़ांकडे वळण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली होती. निर्मलाताईंचा मुलगा शिशू वर्गात असताना त्यांना दिसलं की त्याच्यासहित ३-४ मुलं उघडी फिरताहेत. त्या वेळी त्यांची आर्थिक स्थिती फार चांगली होती असं नाही. मात्र मनाची संपदा मोठी असलेल्या त्यांनी डझनभर चड्डय़ा शाळेला भेट दिल्या. शाळा होती राम मोहाडीकर  आणि प्रकाशभाई मोहाडीकर यांनी स्थापन केलेलं दादरचं साने गुरुजी विद्यालय. शाळेतील भाटकर व लवलेकर बाईंना निर्मलाताईंच्या या कृतीचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी शाळेतील मुलांचे गणवेश शिवायची ऑर्डरच त्यांना दिली. १००-१५० गणवेश शिवायचे होते. नंतर बऱ्याचदा ऑर्डरची चिठ्ठी व पैसे यांची देवाणघेवाण मुलांच्या खाऊच्या डब्यातून होई. आजही त्या शिक्षिकांचे ऋण त्या विसरल्या नाहीत. तेव्हापासून निर्मलाताईंना कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही. आजही साने गुरुजी विद्यालयासह आदर्श विद्यालय व रत्नागिरीतील गोरेगाव येथील शाळा यांचे गणवेश त्यांच्याकडे शिवायला येतात.

यशाची पायरी चढताना प्रत्येक पायरीवर निर्मलाताईंसह संपूर्ण रासकर कुटुंबानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अर्थात हा प्रवास सोप्पा नव्हता. छोटंसं घर, लहान मुलं, आर्थिक चणचण अशा अनंत अडचणी. या अडचणींनीच त्यांना यशोशिखर चढायला बळ दिलं.

सध्याची तरुण पिढी ही स्वत:च्या दिसण्याकडे अधिक लक्ष देणारी आहे. ती त्यासाठी कपडालत्ता यावर मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च करते. निर्मलाताईंनी तरुणाईची ही नस बरोबर ओळखली आणि तरुणाईला वेड लावेल असे टी-शर्ट्स बनवायला सुरुवात केली. वाजवी दर, सुबक माप, मनोवेधक रंगसंगती यामुळे टी-शर्टस् व ट्रॅक पॅन्ट्सना खूप मागणी आहे.

निर्मलाताईंनी तयार केलेल्या स्पोर्टस् टी-शर्टस्ना तर मागणी आहेच शिवाय दहीहंडीच्या वेळेला २५-३० गोविंदा पथकांची टी-शर्टची मागणी असते. जवळजवळ ८ ते ९ हजार टी-शर्टस् १५ दिवसांत शिवून द्यावे लागतात. तेव्हा जेवणाखाण्याचंही भान नसतं.

काही वर्षांपूर्वी हाताने तसंच साध्या मशीनवर ते काम चालायचं. आता तेच काम मोठमोठय़ा यंत्रांवर चालतं. आज त्यांच्याकडे दोन कटिंग मशीन्ससहित १७ मशीन्स आहेत. तसंच १५ माणसं सतत काम करत असतात. शर्टस् कटिंगचं काम त्यांचे पती करतात. दिवसभरात २५०-३०० शर्टस्चं कटिंग होतं. अत्यंत काळजीपूर्वक हे काम करावं लागतं. काज-बटण मशीनही आहे. आजूबाजूच्या परिसरातले टेलर्स काज-बटनांचं काम यांनाच देतात. छोटं काम म्हणून ते त्या नाकारत नाहीत. हीच माणसं जोडण्याची हातोटी.

आनंदी स्वभाव, सकारात्मकता, अथक परिश्रम हे निर्मलाताई रासकर यांच्या उद्योगाचं गमक. त्यामुळे निर्मलाताईंनी आज तयार (रेडिमेड) कपडय़ांच्या व्यवसायात चांगलीच भरारी मारली आहे. आज त्यांचा उद्योग सर्वदूर पसरला आहे.

मुलगी सीमा रासकर (नोदोस्कर) व मुलगा रोहित दोघेही आता या व्यवसायात आहेत. मुलगी एमबीए झाली आहे. मुलगा १२ वीनंतर याच उद्योगात गुंतलाय. शर्टस्वर नाव, नंबर, लोगो डिझाईन, पेंटिंग ही कामं दोन्ही मुलं बघतात. आता त्यांना दिवस पुरत नाही.

मेहनत जेवढी आवश्यक तेवढंच व्यवसायासाठी भांडवलही महत्त्वाचं आहे. हे सांगताना त्या सारस्वत बँकेविषयी भरभरून बोलत होत्या. सुरुवातीपासूनच त्यांच्या व्यवसायासाठी बँकेचा खंबीर पाठिंबा आहे. बँकेने कर्ज तर दिलंच पण त्याचबरोबर व्यवसायातल्या आर्थिक घडामोडीही शिकवल्या, हे निर्मलाताई आवर्जून सांगतात. आज व्यवसायाचा यशस्वी डोलारा सांभाळताना त्या वेळच्या वरळी शाखेतील व्यवस्थापिका गौरी सावंत यांनी केलेलं मार्गदर्शन आणि मदत खूपच महत्त्वाची होती. त्यामुळे त्याचं नाव घेताना सर्व रासकर कुटुंबाच्या डोळ्यात आदर दिसून येत होता. सध्या लहान मुलांचे कपडे त्या फक्त प्रदर्शनासाठी शिवतात व महाराष्ट्र-गोव्यात ते विक्रीला ठेवतात. मीनलताई मोहाडीकर यांचे प्रदर्शन आणि अन्य गोष्टींसाठी नेहमीच खूपच प्रोत्साहन असते.

निर्मलाताईंच्या या कष्टाला, त्यांच्यातील उद्योजिकेला अनेक संस्थांनी गौरवलं आहे. २००५ मध्ये त्यांना ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं तर या वर्षीचा महापौर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. मात्र गोविंदा पथकं व वेगवेगळ्या खेळांतील मुलं आम्ही शिवलेले शर्टस् घालून खेळाची मजा लुटतात, त्यांना टीव्हीवर पाहतो तोच आमचा खरा पुरस्कार होय, असं त्या अभिमानाने सांगतात.
-सुलभा आरोसकर-  sulabha.aroskar@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:25 am

Web Title: nirmala raskar story
Next Stories
1 स्त्री आंदोलनाचा परिवर्तन बिंदू
2 गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
3 राणीपूर्वीच्या राण्या
Just Now!
X