15 January 2021

News Flash

नवे बंध अनुबंध

आयुष्याच्या उतारचढावात आपलं माणूस आपल्याला बरोबर हवं असतं. ही साथसोबत आयुष्याच्या अंतापर्यंत हवीशी असणारी, पण अनेकांसाठी ते दु:स्वप्न ठरलेलं आहे..

आनंद करंदीकर आणि सरिता आवाड, अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी

डॉ. राधिका टिपरे – radhikatipre@gmail.com

आयुष्याच्या उतारचढावात आपलं माणूस आपल्याला बरोबर हवं असतं. ही साथसोबत आयुष्याच्या अंतापर्यंत हवीशी असणारी, पण अनेकांसाठी ते दु:स्वप्न ठरलेलं आहे.. अध्र्या रस्त्यात जोडीदाराचा हात सुटलेला असताना आलेला एकाकीपणा अनेकांना ‘करोना’च्या काळात तीव्रतेनं जाणवला.. आयुष्याच्या वळणावर या एकटेपणाला समंजस साथ मिळाली तर मात्र दोघांचंही आयुष्य समाधानाचं ठरू शकतं.. समाजात अशी जोडपी दिसू लागली आहेत. उतारवयात लग्नगाठ बांधणारी किं वा एकमेकांच्या सहवासात सहजीवन व्यतीत करणारी.. नवे बंध अनुबंध जोडणारी..

अगदी अलीकडेच एक नवी कोरी जाहिरात विविध वाहिन्यांवर झळकू  लागली आहे. ‘करोना’ काळात ज्या काही नव्या जाहिराती यायला लागल्या त्यातील हीसुद्धा एक!  एक वयस्क स्त्री टाळेबंदी शिथिल के ल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या निमित्तानं जेवणासाठी रेस्टॉरन्टमध्ये आलेली आहे.. टाळेबंदीच्या काळातला एकटेपणा तिला बरंच काही शिकवून गेला आहे.  विशेषत: नात्यांच्या बाबतीत.. मुलगा, सून, मुलगी आणि नातवंडांच्या गोतावळ्यात जेवणाच्या टेबलाजवळ बसलेली ती स्त्री, एका ‘पाहुण्या’च्या आगमनानंतर उठून उभी राहते. सर्वजण आश्चर्यानं तिच्याकडे आणि तिच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या त्या वयस्क व्यक्तीकडे पाहताहेत.. प्रत्येकाच्या, विशेषत: तिच्या मुलीच्या आणि मुलाच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपून राहात नाही.. ती काही न बोलता शांतपणे आपल्या अनामिकेतील नवी अंगठी सर्वाना दाखवते आणि तिनं नव्यानं जोडलेल्या नात्याचा गौप्यस्फोट होतो.. स्फोटच म्हणायचा! कारण या वयात आपली आई लग्न करते आहे, ही गोष्ट तिच्या सुहृदांसाठी काहीशी धक्कादायकच असणार.. टाळेबंदीच्या काळात आपल्या मुलां-नातवंडांपासून दूर एकटं राहायला लागल्यामुळे आपण किती एकटे आहोत याची तीव्रतेनं जाणीव झालेल्या तिनं सर्व बंधनं झुगारून आयुष्यातील एकटेपणा संपवण्याचा निर्णय घेतल्याचं ती सर्वाना सांगायचं धाडस ठामपणे दाखवताना दिसते.. हा निर्णय तिनं स्वत: घेतलाय आणि आपल्या उत्तरआयुष्यासाठी एका नव्या जोडीदाराची निवड केलेली आहे..

फारच छान आहे जाहिरात..! कल्पनाही मस्त आहे. जाहिरात म्हणून बघायला छानच वाटले!  मात्र ती पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनात घर करू लागले आहेत..  पहिला प्रश्न अर्थातच, ‘प्रत्यक्षात खरोखरच असं घडेल का?’ हाच होता. कारण आपल्या समाजातील एक वयस्कर स्त्री, अचानक स्वत:साठी आणि स्वत:च्या सुखासाठी, स्वत:हून असा काही निर्णय घेऊ शकेल का? हाच विचार सर्वप्रथम मनात आला. उभा जन्म नवरा, मुलंबाळं आणि कुटुंबीय यांच्यासाठी खस्ता खाणारी आपल्या समाजातील स्त्री दुसऱ्यांसाठी जगत असते.. या सगळ्यांतून तिला स्वत:साठी विचार करायला वेळच नसतो.. त्यामुळे या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे कुठलीही स्त्री; अगदी कितीही आधुनिक आणि सुखवस्तू कुटुंबातील असली तरी असा निर्णय स्वत:हून घेईल का, या मनात रेंगाळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटत होतं.. कारण कुटुंबव्यवस्थेचं विकेंद्रीकरण झालेल्या आपल्या आजच्या समाजात काळाची गरज म्हणून आता या प्रश्नाकडं पाहायची वेळ आलीय असं मनापासून वाटत होतं.

भारतीय समाजव्यवस्था अनेक पदरी आहे. त्यामुळे आपल्या समाजात सर्व प्रकारचे पर्याय जगण्यासाठी उपलब्ध असतात. उतारवयात पोहोचल्यानंतर जेव्हा जोडीदार अध्र्या वाटेतून निघून गेलेला असतो अशा वेळी  बहुतेक जणांसाठी आधीच्या आयुष्याची शिदोरी पुरेशी असते. जोडीला मुलंबाळं, नातवंडं असतात. त्यांची सोबत पुरेशी होते, कारण दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्या शेवटच्या पिढीचा हाच दृष्टिकोन अजूनही त्यांना जगण्याचे बळ देत आहे.. कुणास ठाऊक; पण आता कदाचित बदलणाऱ्या काळाची चाहूल लागताना दिसत आहे.. जोडीदार सोडून गेल्यानंतर उतारवयात उर्वरित आयुष्य एकटय़ानं न घालवता एखाद्या समवयस्क जोडीदाराचा हात हातात घेऊन जीवन त्याच्या संगतीनं घालवण्याचा धाडसी  निर्णय घेण्यासाठी जुनी पिढी तयार होत आहे.समाजात हा बदल घडत आहे आणि हा बदल स्वीकारण्यासाठी समाजमनही तयार होताना दिसत आहे. म्हटलं तर आनंदाची बाब आहे.. म्हटलं तर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन येणारा बदल घडत आहे असं सांगावंसं वाटतंय..!

अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी हे सत्तरीच्या उंबरठय़ावर पोहोचलेलं नव-जोडपं. पाच वर्षांपासून एकत्र राहात असलेलं हे जोडपं आपल्या या नव्या नात्यात खूश आहे. या नात्याबद्दल  ते खूप भरभरून बोलले.. आसावरींच्या मुलानं या नात्याला आक्षेप घेतला नाही. तसंच अनिल यांच्या विवाहित मुलीनंही आनंदानं या नात्याला मान्यता दिल्यानं पहिली पायरी अजिबात कटूता न येता पार पडली याचा त्यांना आनंद आहे. अर्थात सहजीवनात जगण्याचा अर्थ शोधणारं हे जोडपं लग्नबंधनात मात्र अडकलेलं नाही. मुख्य म्हणजे अनिल आणि आसावरी दोघंही आíथकदृष्टय़ा स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता येण्याचा प्रश्न नाही, असंही ते आग्रहानं नमूद करतात. कधी पश्चात्तापाचे विचार येतात का? या माझ्या प्रश्नाला आसावरीताईंनी त्वरित झटकून टाकत उत्तर दिलं, ‘‘अजिबात नाही. मी आनंदी आहे आणि मुख्य म्हणजे समाधानी.’’ त्या मोकळ्या मनानं सांगतात. ‘‘एकटय़ानं आयुष्य काढणं फारच कठीण असतं..’’ अशी पुस्तीही जोडतात. आयुष्याच्या उत्तररात्री एकत्र राहाण्यात सुख आहेच, परंतु त्यातही मनं जुळणं महत्त्वाचं असतंच, जे अनिल आणि आसावरी यांना शक्य झालं आहे.

आनंद करंदीकर आणि सरिता आवाड यांचा अनुभव तर मला स्वत:ला मनापासून भावला.. दोघंही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढील आयुष्यात लग्न आणि संसार यामुळे दोघांची वाटचाल वेगवेगळ्या वाटेनं झाली.. मात्र आयुष्यातील एका वळणावर दोघंही पुन्हा भेटले तेव्हा दोघांच्याही जोडीदारांनी त्यांच्या आयुष्यातून ‘एक्झिट’ घेतलेली होती.. सामाजिक कामाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोघंही एकमेकांच्या जवळ आले.. आवडीनिवडी एकसारख्या असल्यानं कामात एकमेकांची मदत होते आहे हे लक्षात आल्यानंतर दोघांनी एकमतानं  एकत्र येण्याचा निर्णय घेतला.. सरिता यांच्या दोन्ही मुलांना आईचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. दोघांनीही त्यांच्याशी बोलणं बंद केलं, पण त्यांनी ठामपणे सहजीवनासाठी आनंद यांची साथ निवडली. आता सगळं काही निवळलं आहे. लग्न न करण्याबाबत मात्र दोघंही ठाम आहेत. सरिता आता पासष्टीच्या उंबरठय़ावर आहेत, तर आनंद सत्तरी ओलांडून पुढे गेले आहेत. या नात्याबद्दल काय सांगाल? या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना आनंद यांच्या आवाजात समाधान ओसंडत होतं हे नक्की. ‘‘सरितामुळे पुन्हा नव्यानं जगायला लागलो. जगण्यातला उत्साहच संपला होता.. पण आता तिच्या जोडीनं काम करताना पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं आहे. खूप काही करतो आहे, कारण तिची साथ आहे!’’ असं भरभरून बोलले तेव्हा हे नातं किती समाधानी आहे हे लक्षात येत होतं. सरिता यांनीही आपलं समाधान व्यक्त के लं. इतरांनी अशा नात्यात पडावं का, याविषयी बोलताना त्यांनी, ‘‘स्त्रीनं नवं नातं जोडायचं ठरवलं, तरी आíथकदृष्टय़ा स्वयंपूर्ण असावं हे नक्की. कारण नात्याचं काय, ते कुठल्याही कारणानं तुटू शकतं, पण नातं तुटलं म्हणून स्त्रीवर तुटण्याची वेळ येता कामा नये. कुठल्याही नात्याला कुणीही गृहीत धरू नये हेच खरं!’’ असा सावधानतेचा इशाराही दिला.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या संदर्भात पुण्यातील माधव दामले यांनी काही वर्षांपासून सुरू केलेल्या कामाची या ठिकाणी आवर्जून दखल घ्यावीशी वाटते. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ‘ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळा’ची स्थापना केली आहे. या संस्थेतर्फे जीवनात एकटेपणाचा सामना करणाऱ्या वयस्क

आणि इच्छुक मंडळींच्या भेटीगाठी, सहली, काही रचनात्मक कार्यक्रम अशा गोष्टींचं आयोजन केलं जातं. त्या निमित्तानं वयस्कर स्त्री आणि पुरुष मंडळींच्या ओळखी होतात. भेटीगाठी वाढतात, समविचारी जोडपी एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार  एकत्र येतात. खरं तर वयोमानानुसार शारीरिक गरज म्हणून नव्हे, तर एकटेपणा घालवण्यासाठी जीवनात आवश्यक असणारी सोबत म्हणून दोन जीवांनी  एकत्र यावं हेच या संकल्पनेमागचं उद्दिष्ट आहे. दामले यांच्याशी बोलल्यानंतर बदलत्या काळाचं पाऊल नक्कीच स्पष्टपणे दिसलं.

खरं तर अनेक गोष्टी समाजात सुप्तपणे सुरू असतात. व्यक्तिगत पातळीवर तर मोठय़ा प्रमाणात. हळूहळू त्या एका व्यक्तीतून इतरांपर्यंत हा बदल पोहोचतो आणि मग समाजाला जाणवेल इतक्या मोठय़ा संख्येनं पाहायला मिळतो. ज्येष्ठांच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे. आता आता ही मंडळी स्पष्टपणे बोलायला लागली आहेत. उतारवयातील या नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने व्यक्त व्हायला लागलेली आहेत. दामले यांच्या या मंडळातही आजघडीला पन्नासहून अधिक ज्येष्ठ मंडळी आहेत. एकमेकांच्या सहवासात आनंदानं सहजीवन व्यतीत करीत आहेत. अर्थात काहींनी तर काही वर्षांच्या सहवासानंतर लग्नगाठ बांधून त्या नात्याला पूर्णत्वही दिलं. अर्थातच यासाठी दामले यांच्या या संस्थेनं काही काटेकोर नियमही घालून दिले आहेत. अनेक गोष्टींची प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतरच या नात्याला अनुमती दिली जाते. तरीही सर्व गोष्टी सुरळीत जमून येतातच असं नाही. आíथकदृष्टय़ा सुस्थितीत असलेल्या पुरुषांबरोबर जोडलेल्या नव्या नात्याचा, बऱ्याच वेळा स्त्रियांकडून गरफायदा घेतल्याची उदाहरणे घडतात, तर कधी स्वकमाई नसलेले पुरुष नव्या नात्यातील स्त्रीच्या पशांवर किंवा तिच्या कष्टानं मिळवलेल्या पेन्शनवर आयतं जगायला मिळेल, या लालसेनं नव्या नात्याला होकार देतात. हे असे प्रकारही घडल्याचं दामले यांनी सूचित केलं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. कधी मुलांना हे नवं नातं आवडत नाही. कधी काही दिवसांतच नव्या नात्यातही कणसूर जाणवायला लागतात आणि नाती विस्कटतात. त्यामुळेच काहीजणांनी लग्न न करता सरकारसंमत ‘लिव्ह इन रिलेशन’च्या नात्यात राहावं, असे अनुभवाचे बोलही व्यक्त के ले. ठाणे येथील एका ज्येष्ठ पुरुषानं मनं जुळण्याची वाट न पाहाता तातडीनं विवाह करण्याचा निर्णय घेतला खरा, पण पुढे अजिबात न पटल्यामुळे काही महिन्यांतच घटस्फोट घेण्याची वेळ आली. यात मानसिक अस्वस्थतेबरोबर आíथक नुकसान, समाजात झालेली मानहानी, या गोष्टीही ओघानं आल्याच. त्यामुळे अशा नात्यालाही परिपक्व होऊ द्यायची गरज असतेच हे जाणवल्यावाचून राहिलं नाही.

नव्या जीवनवाटा आपल्या समाजातही रुजू लागल्या आहेत एवढं मात्र नक्की. समाजाकडून या गोष्टींचं स्वागत व्हायला हवं आहे. मुळातच निवृत्तीनंतरचं आयुष्य स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला आहे, हे तरुण पिढीनं लक्षात घेतलं पाहिजे. अर्थातच तरुणांचे, आपल्या पालकांच्याबद्दल असलेले दृष्टिकोन बदलणं थोडं अवघड असतं अनेकदा. याला कारण प्रामुख्यानं आईवडिलांची संपत्ती आणि आपल्या वडिलांकडून मिळणारा वारसा हक्क दुसऱ्याकडे जाणार नाही ना, ही चिंता त्यामागे असते हेही समजून घ्यायला हवं. या गोष्टीचा विचार करता, लग्न न करता सहजीवनाचा पर्याय आहेच. पण जर नात्याला नाव देण्याची इच्छा असेल तर त्यालाही पर्याय उपलब्ध असतातच. अमेरिके त लग्नापूर्वी एक करार केला जातो ज्याला ‘प्री नॅपच्युअल अ‍ॅग्रीमेंट’ म्हटलं जातं. ज्यामध्ये ‘लग्नानंतर घटस्फोट झाल्यास एकमेकांच्या संपत्तीवर कुठलाही हक्क सांगता येणार नाही किंवा एकमेकांच्या वडिलोपार्जति संपत्तीवर दुसऱ्याचा कुठलाही हक्क राहाणार नाही,’ आदींचा समावेश केलेला असतो. अशा प्रकारचे करार तिथे श्रीमंत कुटुंबांत बऱ्याच वेळा केले जातात. काही वर्षांपूर्वी एका अत्यंत श्रीमंत अमेरिकी व्यक्तीबरोबर मी काम करत होते. त्याच्या एकुलत्या एका मुलीनं ज्याच्याबरोबर विवाह ठरवला होता तो तरुण त्याला जावई म्हणून अजिबात पसंत नव्हता. आपल्या मुलीचा घटस्फोट होणार हे गृहीत धरूनच त्यानं आपल्या मुलीला, लग्नापूर्वीच भावी वरासोबत हा करार करायला लावला होता. माझ्याशी बोलताना गप्पांच्या ओघात त्यानं मला ही गोष्ट सांगितली खरी, पण मला एक प्रश्न विचारला होता, की तुम्ही भारतीय लोक, लग्न ठरवून करता, मग असा करार करता का? त्या वेळी मी आश्चर्यचकित होऊन त्याला हेच उत्तर दिलं होतं, की ‘‘बाबा रे, आमच्याकडे लग्न झाल्यानंतर ते मोडेल असा विचारच केला जात नाही. लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जातं आणि त्या विश्वासानंच ते टिकेल यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे अपवाद वगळता, बहुतेक लग्नं टिकतातच.’’ भारतात ठरवून लग्नं केली जात असली, तरी घटस्फोटाचं प्रमाण तुलनेत  कमी असल्याचं ऐकून हा अमेरिकन थक्क झाला होता हे सांगणे न लगे! सांगायचा मुद्दा हाच, की तशीच गरज वाटल्यास या अशा कराराचा उपयोग आपल्याकडेही करायला काहीच हरकत नाही. आयुष्याच्या या वळणावर जेव्हा सहजीवनासाठी एखाद्या सुहृदाचा हात धरावासा वाटला तर असा करार करायलाही हरकत नसावी. म्हणजे मुलाबाळांना असुरक्षित वाटणार नाही. नात्याचा गरफायदा घेण्याचा प्रश्नही उद्भवणार नाही. कारण फक्त सोबतीसाठी हात धरायचा असेल तर त्यामुळे बाकीच्या नात्यामध्ये गुंता निर्माण व्हायला नको. रक्ताच्या नात्यात दुरावा यायला नको.. आणि जुन्या नात्यांवर नव्या अनुबंधांचं कुठलंही सावट यायला नको!

वाहिन्यांवरच्या त्या जाहिरातीतून पुन्हा नव्यानं पुढे आलेली सहजीवनाची संकल्पना समाजमनानं विचार करूनच स्वीकारावी, पण एकदा स्वीकारली की त्याचं सहर्ष स्वागत केलं, तर एकटेपणाच्या वावटळीत होरपळणारे कितीतरी जीव एखादी छानशी सोबत घेऊन उर्वरित आयुष्याची वाटचाल सुखानं करू शकतील. पशांनी विकत घेता येणारी सुखं बाजारात सहजासहजी उपलब्ध असतात, पण आयुष्याच्या वाटचालीत सुखाच्या क्षणांची सोबत फक्त एखादा सोबती किंवा जोडीदारच देऊ शकतो! आणि जेव्हा एकटेपणाची रखरख तुमच्या आयुष्यात अनिवार्य होऊन जाते, तेव्हा निखळ प्रेमाची सोबतच नव्या जीवनवाटांवर पुन्हा एकदा सुखाची हिरवळ फुलवू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 1:47 am

Web Title: old age new life partner
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : पारंपरिक मराठी शाळांचे प्रयोग
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : रुग्णांचा आधार!
3 चित्रकर्ती : गोंड आदिवासींची कला!
Just Now!
X