सरिता आवाड

हे आयुष्य ते दोघं प्रत्यक्ष जगले.  लग्न न करता सहजीवनाचा स्वीकार के ला, पण प्रतिक्रियास्वरूप त्यांच्या कु टुंबीयांनाही अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या. पुरुषप्रधान संस्कृतीत काही गोष्टी बदलत नाहीतच. त्यातून फरफट होते ती त्या पुरुषाला केंद्रबिंदू मानून जगणाऱ्या त्याच्याच स्त्रियांची. दोनदा डाव मांडलेल्या सुभाषची कहाणी अधुरी राहिली खरी, पण याला जबाबदार कोण? सुभाष- सरोज यांच्या ‘अधुरी एक कहाणी’चा हा उत्तरार्ध..

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

लग्न न करता ‘सहजीवन’ जगण्याचा निर्णय घेऊन सुभाषच्या कोकणातल्या घरी सरोज आली ते नव्या आयुष्याला जिद्दीनं सामोरं जाण्याच्या ईर्षेनंच. आता सुभाषच्या म्हाताऱ्या आई-वडिलांचीसुद्धा जबाबदारी तिच्यावर होती. सुभाषच्या साथीने येईल त्या परिस्थितीशी सामना करायला तिची मनोमन तयारी होती.

मात्र गावात आल्यावर सुभाषला ओढ लागली होती ती आपलं कर्तृत्व सिद्ध करायची. ज्या गावात कुडाच्या भिंती असलेल्या घरात आपलं बालपण गेलं तिथे आपण टुमदार घर बांधलं, याचा सुभाषला अभिमान वाटत होता. या घराचं त्यानं नाव ठेवलं ‘कर्तृत्व’!  आई-वडिलांना सुभाषचं कौतुक वाटत होतं. गावच्या लोकांना, भावकीतल्या लोकांना घरी बोलवून-बोलवून सुखसोयी असलेलं घर दाखवताना त्याचा जीव सुपाएवढा होत होता. सरोजची मात्र चांगलीच धावपळ होत होती. तिला मिळालेलं पोस्ट ऑफिस घरापासून दहा किलोमीटरवर होतं. घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर मुख्य रस्ता होता. रस्ता उताराचा होता, पण घरी येतानाचा चढ चढताना जीव थकून जायचा. घरी यायला दिवेलागण व्हायची. नंतर स्वयंपाकपाणी झाकपाक करून झोपायला उशीरच व्हायचा. मुंबईला कामाला जायची-यायची दगदग होती, पण घरी कामाचा व्याप बेताचा होता. आता परिस्थिती बदलली होती.

सुरुवातीच्या काही दिवसांतच सरोजच्या लक्षात आलं, की आल्यागेल्यांना सुभाषच काय त्याच्या आईदेखील तिची ओळख करून द्यायच्या नाहीत. सरोजनं मुकाटय़ानं पाहुण्यांसाठी चहापाणी आणावं एवढीच अपेक्षा असायची. आईंचे डोळे मुळात अधूच होते, त्यामुळे त्यांची विशेष मदत नसायची. गप्पा मारायचा प्रयत्न केलाच, तर बारीकसारीक कामांत त्या दिवशी सुभाषची कशी धावपळ झाली याचंच त्या साग्रसंगीत वर्णन करायच्या.

सुभाषचा वेळ घराची इतर कामं करण्यात जायचा. हळूहळू बस्तान बसल्यावर मात्र त्याला बऱ्यापैकी सवड मिळायला लागली. गावात त्याच्या शाळेतल्या मित्राचं दुकान होतं. सुभाषचा मुक्काम सहसा तिथेच असायचा. आणखी एक-दोघं त्याला सामील झाले. आता नोकरीची धावपळ नाही, काहीच नाही. मुंबईला असताना सरोजला भेटण्यात एक प्रकारचं थ्रिल असायचं. ते थ्रिलही आता संपलं होतं. शहरातल्या, कधीमधी सलवार-कमीज घालणाऱ्या दुसऱ्याच बाईबरोबर राहातो, याबद्दल सूक्ष्म फुशारकी सुरुवातीला सुभाषच्या वागण्यात होती. कालांतरानं त्याचीही नवलाई संपली. त्याच्या आयुष्याची गती हलके हलके मंदावत गेली. सकाळी दुकानाच्या दारात बसून अथपासून इतिपर्यंत पेपर वाचायचा, चार-पाच सिगारेटी आणि आल्यागेल्याशी गप्पा झाल्या की दुपारी घरी जेवायचं अन् झोपायचं. सरोज येईपर्यंत पुन्हा बाहेर. घरात टीव्ही होताच. आई-वडील सहसा तिथेच असायचे. वडिलांचे पाय साथ देत नव्हते. त्यामुळे त्यांचं फारसं बाहेर जाणं व्हायचं नाही. आई सतत वडिलांच्या भोवती-भोवती असायच्या. एकूण काय, सुभाष आणि        आई-वडील धिम्या लयीत जगत होते. सरोजची मात्र धावपळ सुरू होती.

या धावपळीत सरोजच्या गावात फारशा ओळखी झाल्या नाहीत. लोक दूरदूरच राहायचे. कारण त्यांच्या दृष्टीनं बायका एक तर कुमारिका तरी, सधवा तरी किंवा विधवा तरी, किंवा फार तर नवऱ्यानं ‘टाकलेल्या’ असायच्या. पण लग्नाशिवाय सुभाषबरोबर राहाणाऱ्या सरोजला नेमक्या कोणत्या चौकटीत बसवायचं हे लोकांना समजेना. त्यामुळे सरोज गावात रुळली नाही. लोकांच्या दुराव्यानं सरोजचं मन करपून जायचं. याबद्दल सुभाषशी बोलण्याचा तिनं प्रयत्न केला. पण सुभाषचं म्हणणं असं, की ‘कोणी तुझ्याशी वाईट नाही ना वागत?  मग झालं तर. तू अपेक्षाच करू नकोस.’ खरोखरच सरोजच्या अपेक्षा आक्रसल्या. तसं मनही आक्रसलं.

सरोजवरचा आर्थिक ताणही आता वाढला. कारण सुभाषनं मिळालेला सगळा पैसा घर बांधण्यात घालवला होता. पेन्शन तुटपुंजी होती. महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात संपून जायची. नंतरचा खर्च, औषधपाणी सरोजला सांभाळायला लागायचं. सरोजपुढे हात पसरण्यात सुभाषला कमीपणा वाटायचा. म्हणून सरोजच आपल्या प्रवास खर्चाचे आणि मुलासाठी औरंगाबादला पाठवायचे पैसे वगळून उरलेला पगार आधीच सुभाषला देऊन ठेवायची. तरी काटकसर करून उरलेले पैसे महिनाअखेरीला लागायचेच. बचत करता येईना. नोकरी सोडल्यावर थोडे पैसे सुभाषनं बँकेत ठेवले होते. त्या बचतीवरही लवकरच घाला पडला.

एकदा रविवार असल्यानं सरोज घरातच होती. बाबांना अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. सरोजनं पाठीशी उशा देऊन त्यांना बसतं केलं. खूप घाम यायला लागला. रस्त्यावरच्या मुलाला सांगून तिनं सुभाषला निरोप धाडला. सुभाषनं घाईनं कोणाच्या तरी मोटारसायकलवरून गावात जाऊन डॉक्टरला आणेपर्यंत फार उशीर झाला होता. बाबा गेलेच. सुभाषच्या बहिणी, भावकीमधले सगळे नातलग घरी आले. आली नाही ती जया- सुभाषची बायको. सरोज कावरीबावरी झाली. तिची कुणाशीच ओळख नव्हती. बहिणींनी तिची दखल घेतली खरी, पण मोकळेपणाने कोणी बोललं नाही. दोन दिवसांनी चर्चा झाल्या. त्यांचा निष्कर्ष असा, की वेळेवर डॉक्टर न आल्यानं बाबा गेले. इतक्या आडगावात कसा मिळणार डॉक्टर?  ती काय मुंबई आहे? पण मग आलेच का इथे आई आणि बाबा? तर सरोजमुळे. सगळ्या प्रश्नांची साखळी सरोजपाशी थांबली. आरोपीचा पिंजरा तिच्याभोवती उभा राहिला.  साहजिकच एकलेपणाच्या कोशात जाऊन सरोज घर, नोकरी, असा कामाचा गोफ विणत राहिली. सुभाषला बाबांचा लळा होता. बाबा गेल्यावर सुभाषही उदासीन झाला. आईचं तर आयुष्यच बाबांच्या भवतीभवती गेलं होतं. आता तो मध्यच डळमळीत झाला. कळत-नकळत बाबांची जागा सुभाषनं घेतली आणि आईंच्या आयुष्याचा केंद्रबिंदू सुभाष झाला. मृत्यू एकच. पण मागे राहिलेल्या प्रत्येकाच्या दु:खाचा पोत निराळा होता.

बसमधून येता-जाताना सरोज निळे डोंगर, निसर्गाचे विभ्रम बघत एकाकीपण सावरायची. मनाशी आपल्या भूतकाळाचा वर्तमानाशी सांधा जुळवू पाहायची. जुळवता जुळवता थकून जायची. अशातच एक दिवस कथेचा पक्षी तिच्या खांद्यावर बसला.  तिनं लिहिलेली एक कथा पोस्टात येणाऱ्या एका मासिकाच्या पत्त्यावर पाठवून दिली. आपला पत्ता पोस्टाचाच दिला. एका महिन्यानं तिला कथा स्वीकारल्याचं संपादकांचं पत्र आलं आणि कथा छापून आलेला अंक पुढच्या महिन्यात मिळाला. मासिकात कथेबरोबर आपलं नाव छापून आलेलं पाहून तिला समाधान वाटलं.. पण यातलं काहीच तिनं सुभाषला सांगितलं नाही. काळाच्या ओघात सरोज आणि सुभाषमधले भावनिक अनुबंध दिवसाच्या उजेडातल्या चंद्रासारखे निस्तेज झाले होते. पण तिची शब्दकळा मात्र सतेज झाली. भाषेच्या आंतरिक लयीचा तिला लळा लागला. तिच्या कथा मासिकांमधून प्रसिद्ध व्हायला लागल्या. ही प्रसिद्धी सुभाषनं फारशी मनावर घेतली नाही. सरोजच्या मनाला मात्र उभारी आली.

दिवस सरकत होते. एक दिवस दुपारी सगळे डबेडुबे आईंनी मागच्या अंगणात घासायला नेले आणि परत येताना पाय घसरून पडल्या. सुभाषनं त्यांना उचलून खाटेवर ठेवलं आणि डॉक्टरांना गावातून घेऊन आला. आईंच्या खुब्याला मार बसून फ्रॅ क्चर झालं होतं. जवळच्या शहरात नेऊन त्यांची शस्त्रक्रिया के ली खरी, पण त्या अंथरुणाला खिळल्या त्या खिळल्याच. सरोजनं रजा काढली. आईंचं तर लहान मूल झालं होतं. त्यांना भरवायचं, चहा-पाणी पाजायचं, स्पंजिंग करायचं, बेडपॅन द्यायचं, सगळंच काम सरोज वर पडलं. सुभाषची मदत होत नव्हती, कारण आयुष्यात त्यानं कधीच घरकाम केलं नव्हतं. आईंना मात्र काळजी असायची ती त्याचीच. तो जेवला का, झोपला का, वगैरे वगैरे.

एक दिवस स्पंजिंग करता करता सरोज दचकली. कारण आईंच्या जागी तिला आपणच आहोत असं वाटलं. ती थबकलीच. आपल्यावर अशी वेळ येईल तेव्हा आपल्यापाशी कोण असेल? असा प्रश्न पडला आणि तिचे हातपाय गार पडले. जेमतेम महिना गेला असेल नसेल आणि आईंनी सरोजच्या मांडीवरच प्राण सोडले.

आता सुभाष आणि सरोज दोघंच उरले घरात. पण मनाचा तजेला संपला होता. ‘ती न आर्तता सुरात, स्वप्न ते न लोचनी’ अशी अवस्था होती. दरम्यान मोबाइल नावाची एक गोष्ट  त्यांच्या आयुष्यात आली. तिच्यामुळे सुभाषचा त्याच्या मुलीशी आणि जयाशी संवाद व्हायला लागला. सरोज आणि तिची आई, तिचा मुलगा वरचेवर बोलायला लागले. पण साता समुद्रापार संवाद घडवण्याची ताकद असलेला हा मोबाइल जया आणि सरोज, किंवा सुभाष आणि सरोजचा मुलगा यांच्यात संवाद घडवू शकत नव्हता. जयाची तब्येत ठीक नव्हती. रक्तदाब, मधुमेह यांनी तिला पोखरलं होतं. सरोजचा मुलगा शिक्षण संपवून नोकरीला लागला होता. आजीला त्याच्या लग्नाचे वेध लागले होते. सरोजही थोडय़ाच दिवसांत निवृत्त होणार होती.

एकदा शांतपणे वाचत बसलेल्या सुभाषकडे पाहून सरोजला वाटलं, की सुभाषकडे नवरा म्हणून पाहाणारी आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जिवाचं रान करणारी जया, सुभाषकडे मैत्रभाव मागून विफल झालेलो आपण आणि सुभाषभोवती प्रेमाचा कोश विणून त्यातच अडकून पडलेली त्याची आई, या बाईपणाच्या तीन मिती आहेत. या तिघींचा जीवनरस शोषत सुभाष मात्र फक्त स्वत:साठी जगला आणि जगतोय. सरोजच्या मनात जयाबद्दल भगिनीभाव जागा झाला. या भगिनीभावाला करुणेचा स्पर्श होता.

आज सुभाष आणि सरोज मुंबईत आपापल्या घरी स्वतंत्रपणे जगत आहेत. झालं असं, की जया जग सोडून गेली. एकटय़ा पडलेल्या मुलीकडे सुभाषला जावंच लागलं. दरम्यान, सरोजचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. मुंबईच्या साहित्यिक वर्तुळातले काही जण तिच्या ओळखीचे झाले. त्यांच्या लेखी तिचं लग्न झालेलं आहे की नाही हे महत्त्वाचं नव्हतं, तर तिच्या कथा महत्त्वाच्या होत्या. आता सरोजला तिच्या निवृत्तीनंतर का होईना, निजखूण सापडली. सरोज आणि सुभाषचं लग्न न झाल्यानं त्यांचं वेगळं होणं ताणाताणीचं नव्हतं. आजही ते रोज फोनवर, तर मधूनमधून प्रत्यक्ष भेटतात. ते पुन्हा जवळ येतील का? आत्ममग्नतेच्या कवचातून सुभाष बाहेर पडेल का? काळच या प्रश्नांची उत्तरं देईल.  पण एवढं मात्र निश्चित, की डाव अधुरा राहिला असला तरी इथून पुढच्या स्वत:च्या आयुष्याची संहिता सरोजनं स्वत:च लिहिलेली असेल..

( या कहाणीतील व्यक्ती वास्तवातील असून त्यांच्या विनंतीनुसार त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.)

sarita.awad1@gmail.com