मानसी होळेहोन्नूर

मायकेल जॉर्डन, रॉजर फेडरर, टायगर वूड्स, सेरेना विलियम्स यांच्यामध्ये काय साम्य आहे? हे सगळे जण ‘नायके’चे अ‍ॅम्बॅसॅडर आहेत. खेळाडूंचे कपडे, बूट आणि खेळाशी संबंधित वेगवेगळ्या इतर अनेक गोष्टींचे उत्पादन ही कंपनी करते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या मोन्तानो आणि गौचर या धावपटूंनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’कडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. या दोघींनाही अपत्य जन्मानंतर लगेचच मैदानात उतरावे लागले. त्यांच्या निमित्ताने हा सगळा प्रश्नच नव्याने समोर आला. कंपनीने आम्ही जी स्पॉन्सरशिप देतो ती गुणवत्ता आणि खेळातले प्रदर्शन यावर आधारित असते त्यामुळे गर्भावस्थेत आणि त्यानंतर काही काळ स्त्री खेळाडू खेळू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे मानधन कमी करू, अशी भूमिका घेतली होती.

सेरेना विल्यम्स हिने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते जेव्हा ती ८-९ आठवडय़ांची गर्भवती होती. सप्टेंबर २०१७ मध्ये मुलीला जन्म दिल्यावर डिसेंबरमध्ये सेरेनाने परत खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने ‘विम्बल्डन’ आणि ‘अमेरिकन ओपन’च्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही सेरेनाने तिच्या खेळावर कोणताही परिणाम होऊ दिला नव्हता. तिच्यासारख्याच इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही आपली क्रीडा कारकीर्द सुरू ठेवलेली आहे. जर ‘नाइके’ने त्यांची अट शिथिल केली नसती तर सेरेनासारखा मोठा मोहरा गमवायची शक्यता होती. ते त्यांना नको होतं, त्यामुळेच त्यांनी ‘आम्ही नवीन करारात स्त्री खेळाडूंसाठी गर्भारपणात आणि प्रसूतीपश्चात काही महिने गुणवत्ता आधारित स्पॉन्सरशिपची अट शिथिल करत आहोत,’ असे जाहीर केले. त्यामुळेच या पूर्ण नाटय़ावर सेरेनाने ‘त्यांना त्यांची चूक कळली हे चांगले झाले. देर आए दुरुस्त आए,’ एवढीच प्रतिक्रिया दिली. खेळाडू होण्यासाठी शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक तयारी देखील लागते. त्यामुळे अनेकदा अनेक स्त्री खेळाडू त्यांचे लग्न लांबवतात आणि अर्थातच त्यानंतर येणारे मातृत्वही. त्यात जर त्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थांनी प्रतिकूल भूमिका घेतली तर मातृत्वाचा निर्णय घेणे अनेकींसाठी नक्कीच अवघड होते. पण सेरेनासारख्या यशस्वी खेळाडूने यावर नापसंती दाखवल्यामुळे कंपनीला त्यांचा निर्णय बदलावा लागला.

आपल्या देशातही मॅटíनटी बेनीफिटचा कायदा आहे, ज्याअंतर्गत स्त्री कर्मचाऱ्यांना सहा महिने पगारी रजा देण्याची तरतूद असते. पण अनेकदा खासगी कंपन्यामध्ये, असंघटित कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळत नाहीत. एकीकडे घरची आर्थिक जबाबदारी आणि दुसरीकडे नैसर्गिक जबाबदारी यामध्ये अनेक स्त्रियांची कुतरओढ होते. फक्त ‘फायदा’ हे लक्ष्य ठेवण्याऐवजी ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून फायदा’ असे लक्ष्य ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची नायकेसारखी वेळ इतर कंपन्यांवर नक्कीच येणार नाही.

बीजं जगवताना..

प्रत्येक देशाचं, तिथल्या मातीचं एक वेगळेपण असतं साहजिकच अनेक पिकं त्या त्या ठिकाणीच उगवतात, भरघोस पिकं देतात आणि अनेकांचा घास बनतात. पण तीच पिकं इतर देशांतही रुजतात, वाढतात, त्या देशाची होतात. जसं आपल्याकडेही परदेशांतून आलेली मिरची, बटाटा आपली कधी झाली आपल्यालाही कळलंच नाही.

स्लोव्हाकिया हा युरोपमधला एक छोटासा देश. या देशातली झुझुना पास्त्रोकोव्हा ही अगदी सर्वसामान्य स्त्री. ७ वर्ष नौकेवरून जगभ्रमण केल्यावर तिला शांतपणे गावात राहून शेती करावीशी वाटली. लहान असताना तिने ज्या भाज्या खाल्ल्या होत्या ते सगळे परत खावेसे वाटले. ते सहज मिळेना म्हणून तिनेच गावातल्या लोकांकडून बियाणे मिळवून त्याची शेती करायला सुरुवात केली. त्याच्याच सोबत तिने जगभर फिरत असताना ठिकठिकाणाहून जमा केलेली बियाणेदेखील तिच्या शेतात पेरली. त्यामुळे स्लोव्हाकियामध्ये झुझुनाच्या शेतात आर्यलडच्या बीन्स, रोमानियाचे कांदे, सायप्रसचे भोपळेसुद्धा उगवतात. जशी पोर्तुगालमधून आलेली मिरची, टोमॅटो आपल्याकडे इतके रुळले, तसाच हा बाहेरच्या देशातला भाजीपाला स्लोव्हाकियामध्ये सहजच रुळून जाईल की काही वर्षांनी हा बाहेरचा आहे यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत कदाचित.

झुझुनाची गोष्ट युरोपमधली आहे. तशीच एक वेगळी गोष्ट आहे मारिया लोरेथाची. इंडोनेशियाची रहिवाशी असलेली मारिया लोरेथाने गावोगाव फिरून आपली जुनी पिके काय होती याचा शोध घेतला तेव्हा तिला ज्वारीच्या पिकाची माहिती मिळाली. त्यांच्या भागात कैक दशकांपूर्वी ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणावर घ्यायचे, पण तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना पांढऱ्या तांदळाचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन दिले आणि त्याचबरोबर ज्वारीचे जे स्थानिक पीक होते ते माणसांना खाण्यास योग्य नाही, ते फक्त प्राण्यांना खायला घातले पाहिजे असा समज पसरवला. त्यामुळे झपाटय़ाने ज्वारीची शेती कमी झाली. तांदळाच्या शेतीमुळे पाणी जास्त लागू लागले. त्यामुळे मारियाने कमी पाणी घेणारे पण श्रम जास्त असणारे ज्वारीचे पीक घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिला फार कोणाचे प्रोत्साहन नव्हते. अर्थात यासाठी तिने सोबतीला घेतल्या होत्या स्थानिक स्त्रिया. वेगवेगळ्या संशोधनात ज्वारीचे महत्त्व नव्याने समोर आले आहे. त्यामुळे कमी पाण्यात येणारे पण अत्यंत गुणकारी ज्वारीचे पीक या स्त्रियांना आर्थिक स्थर्य देखील मिळवून देत आहे.

ज्याप्रमाणे राहीबाई पोपेरे आपल्याकडे वेगवेगळ्या बियाण्यांची बँक करत आहेत त्याच पद्धतीचे काहीसे काम झुझुना, मारिया त्यांच्या देशात करत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे वळत आहेत ही नक्कीच आशादायक गोष्ट आहे. त्याचबरोबर शेतीची गणिते घरात बसून सोडवायची नसतात. त्यासाठी माती, पाणी, आधुनिक शास्त्र आणि पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचीदेखील सांगड घालायची असते. नाहीतर आपल्याकडच्या भगर, राजगिरा, राळ, नाचणी अशा मिलेटवर्गातील धान्याची महती इतर देशांतले आपल्याला सांगतील आणि आपल्याच मातीतील पिके, आपले पूर्वज जे खात होते ते, आपण ‘बाकीचे सांगतात चांगलं आहे’ म्हणून परत खायला सुरू करू. या मधल्या काही वर्षांमध्ये, किती तरी भाज्या, फळं, धान्यं दुर्मीळ किंवा नामशेष झालेत. किमान यापुढे तरी असे होऊ नये एवढी काळजी आपण घेतली तरी ही धरतीआई लेकरांवर खूश होईल.

विद्यार्थिनीसाठी वरदान

कोणतीही मुलगी स्त्री केव्हा होते, तर तिला मासिक धर्म सुरू होतो तेव्हा. पण मासिक धर्म, मासिक पाळी या गोष्टीकडे खूपच संकुचित दृष्टीने पाहिले जाते, अगदी भारतातही. पण या गोष्टीचा परिणाम जेव्हा मुलींच्या विकासावर होत असेल तर ती गंभीर बाब ठरते, जे कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही होत आले आहे. आजही ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्येही शाळकरी मुलींमध्ये ‘त्या’ चार दिवसांत शाळा बुडवण्याचे प्रमाण जास्त आहे. जगभरात सगळीकडेच हे वास्तव बघायला मिळते. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या मालाची जाहिरात करण्यासाठी म्हणून शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वाटतात. पण कितीतरी जणी हा जादाचा खर्च दर महिन्याला करू शकत नाहीत. जुने कापड सर्रास वापरले जातात, पण ते स्वच्छ उन्हात वाळवण्याची साधी सुविधाही अनेकींना उपलब्ध नसते. या सगळ्या समस्येच्या मुळाशी जाऊन एक वेगळा प्रयोग मालावी या आफ्रिकेतल्या एका छोटय़ा देशातल्या शाळांमध्ये केला गेला.

मालावीतल्या शाळेत मुलींना बसवून त्यातल्या कोणाकोणाला मासिक पाळी येते हे विचारले आणि ज्या ज्या मुलींनी हात वर केले त्यांना एकेक ‘मेनस्ट्रएशन कप’, ते उकळण्यासाठीचे भांडे आणि एक पिशवी दिली. लुसी न्कोह्मा या मालावीमधील शाळांमध्ये जाऊन मेनुस्ट्रेशन कपबद्दलची माहिती देतात आणि त्याचे वाटप करतात. एकदा घेतलेला कप जास्तीत जास्त दहा वर्षे वापरता येत असल्यामुळे पशाची बचत होतेच पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील शून्य कचरा होत असल्यामुळे हे कप वरदान ठरत आहेत. ‘पहिल्यांदा हे कप वापरत असताना आम्हाला भीती वाटत होती, पण नंतर ते वापरणं खूप सोयीचं वाटू लागलं. त्यामुळे आमचे कपडे खराब होत नाहीत, आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो, खेळू शकतो,’ असे अनुभव तिथल्या मुलीच नव्हे तर शाळेतल्या इतर शिक्षिकांनीदेखील सांगितला.

पहिल्यांदा १९३२ मध्ये ‘मेनस्ट्रएशन कप’ची संकल्पना मांडली गेली मात्र त्याचा आकार थोडा वेगळा होता. नंतर १९३७ मध्ये लिओना चाल्मर्स यांनी विक्रीयोग्य कपची संकल्पना मांडून पेटंट मिळवले. १९६० च्या सुमारास टासअवे नावाच्या कंपनीने रबरी कप बाजारात आणले होते, पण त्याला काही यश मिळाले नाही. १९८७ मध्ये ‘लेटेक्स’ने तयार केलेले मेनस्ट्रएशन कप अमेरिकेच्या बाजारात आले, जे अजूनही मिळतात. २००१ मध्ये युकेमधल्या कंपनीने सिलिकॉनने बनवलेला मोनोकप बाजारात आणला. हे हलकेही होते आणि वापरायला सोपेदेखील त्यामुळे हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. अनेक बिगर सरकारी संस्था याच्याबद्दल जनजागृती करतात. भारतात देखील याचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे.

‘पॅडमॅन’ चित्रपटामुळे किमान आपल्याकडे सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल बोलायला तरी सुरुवात झाली. शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेनस्ट्रएशन कपबद्दल कुजबुजत्या आवाजात का होईना, पण चर्चा सुरू झाल्यात, एकमेकींच्या अनुभवावरून एकदोघी हे वापरायलादेखील लागल्या आहेत. या कपमुळे आर्थिक बचतीबरोबरच सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नसुद्धा लगेच सुटतो. या कपाच्या निमित्ताने मालावीतल्या शाळांमधल्या मुलींच्या हजेरीचे प्रमाण तर वाढलेच पण त्याचबरोबर त्यांचे शारीरिक आरोग्यदेखील जपले गेले. हे सर्व करताना पर्यावरणाचा देखील ऱ्हास झाला नाही. असे तिहेरी फायदे एका छोटय़ा कपामुळे झाले. आपल्याकडे पण लवकरच शासकीय, बिगर शासकीय पातळीवर हे पाऊल उचलले जावे अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.

(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com