बालाजी सुतार

पुरुषाला नेहमीच स्त्रीच्या तुलनेत जोखलं जातं, या विधानाला कितपत हरकत घेता येईल याचा मला अंदाज करता येत नाहीये. म्हणजे ‘माणसांच्या मूळ आणि खऱ्याखुऱ्या जाती दोन- स्त्री आणि पुरुष’ असं म्हटलं जातं नेहमीच. याच दोन किंवा या दोनच जाती समोर ठेवायचं म्हटल्यावर मग पुरुषाला काय किंवा स्त्रीला, एकमेकांच्याच तुलनेमध्ये पाहिलं जाणार, हे साहजिक आहे. त्याहून मुख्य म्हणजे कुणी तरी ‘स्त्री’ असतं, म्हणून कुणी तरी ‘पुरुष’ असतं. ‘स्त्री’ नसेल तर एका विशिष्ट देहविशेषाला ‘पुरुष’ म्हणण्याचीही गरज नसती. आपल्यातला पुरुष कसा आहे हे तपासायचं असेल तर स्त्रीला पुरुषाच्या तुलनेमध्ये अधिक मानवी पातळीवर आणून उभं केलं पाहिजे. तरच माझ्यातला पुरुष नक्की कितपत ‘मानवी’ म्हणजे निखळ, नितळ आहे, हे ठरवता येईल.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पण हे शक्य नसतं. मुदलात, उत्क्रांतीच्या भानगडीमध्ये ‘निखळ मानवी’ असं काही ठोस व्याख्येमध्ये बांधता येणं कठीण. ‘सुष्ट’ आणि ‘दुष्ट’ अशी माणूसपणाची दोन ढोबळ टोकं मानली तर त्या दोन दूरस्थ टोकांपैकी चांगुलपणानं ओतप्रोत अशा एका टोकावर स्वत:च्या कादंबरीतल्या मानसकन्येच्या (स्वत:च कल्पिलेल्या) दु:खांनी विव्हल होऊन रडणारे मातृहृदयी गो. नी. दांडेकर असतात आणि दुसऱ्या दुष्ट टोकावर अजमल कसाब वगैरे सारखे लोक असतात. एका बाजूला शेकडो अनाथांची माय अशा सिंधुताई सपकाळ असतात आणि दुसरीकडे इतरांची लहान मुलं पळवून त्यांना ठार मारणारी अंजनाबाई गावित तिच्या क्रूरकर्मा पोरींसकट असते. वर उल्लेखिलेली ‘मानवी पातळी’ नावाचं काहीतरी स्थिर संशोधायचं म्हटलं, तर या दोन्ही टोकांच्या दरम्यान कुठे तरी ते असणार. यात ‘दरम्यान’ म्हणजे नक्की कुठे हेही कुणी तरी ठरवून ठेवायला हवंय त्यासाठी. माझ्यातल्या किंवा एकूणच समाजातल्या पुरुषाबद्दल बोलायचं असेल, तर पुन्हा परत ‘पुरुष’ आहे म्हटल्यावर ‘तो ‘नितळ’ कसा असेल?, असंही कुणी म्हणू शकतं. पुरुष म्हणजे साने गुरुजींसारखा सदैव अंतर्बाह्य़ मृदू किंवा हिंदी चित्रपटातल्या व्हीलनसारखा चिरंतन बलात्कारी, असं कायम दोन विरुद्ध टोकांवरचं रसायन नसणार हे कितीही खरं असलं, तरी ‘पुरुष’ म्हणजे ‘नर’त्वाचा उग्र, भीषण आणि हिंस्र आविष्कार, असंच चित्र निदान मी तरी माझ्या भोवतालात पाहात आलेलो आहे. आणि हे माझ्या निरीक्षणाचं सरसकटीकरण नाहीये अजिबात. म्हणजे माझ्या ओळखीतला एक पुरुष मी माझ्या लहानपणापासून पाहात आलो आहे, की तो संध्याकाळी घरात शिरतो, तोच मुळात बायकोवर नजरेनं विस्तव सांडत. मग अवघ्या दोन-पाच मिनिटांत तो कशावरून तरी तिला लाथाबुक्क्या घालायला लागतो. काही वेळा तर त्यानं मानगुटीला धरून तिला मांजरासारखं उचललं आहे आणि दाणकन भिंतीवर फेकून दिलं आहे, असंही दिसतं. हे उघडपणे कुणालाही दिसतं, कारण पुरुषत्वाचा हा पारंपरिक आविष्कार चार भिंतींच्या आत घडत असेल, तितक्याच वेळा, तो घराच्या दारापुढच्या टीचभर अंगणात उघडय़ा रंगमंचावरच घडत असतो. रस्त्यानं माणसं जात-येत असतात. त्यातल्या कुणाला यातलं काही फारसं टोचत नाही. टोचायचं कारणही नसतं, कारण घराघरांतून कमीअधिक प्रमाणात हेच चित्र दिसू शकतं. माझं स्वत:चं घर मी याला अपवाद करत नाही. आता आपण सुशिक्षित लोक स्वत:ला ‘सुशिक्षित’ किंवा त्याही पलीकडे लेखक, कवी वगैरे काहीबाही संवेदनशील वगैरे मानून घेत असल्यामुळे, आपल्या त्या प्रतिमेच्या प्रेमात पडून किंवा ती भासमान प्रतिमा इतरांसमोर अधिक दृढ करण्यासाठी म्हणून, आपल्या ‘पुरुष’ असण्याची ‘प्रकट अभिव्यक्ती’ कदाचित काहीशी सौम्य असू शकेल. म्हणजे स्वत:ला असलंच संवेदनशील वगैरे मानत असल्यामुळे मी ‘माझ्या स्त्रीला’ कधीही मारहाण केलेली नाही किंवा मी इतरांनाही कधी गलिच्छ लैंगिक शिव्या (सहसा) घातलेल्या नाहीत, पण माझ्या भोवतालातले आणि माझ्या घरातलेही अन्य पुरुष म्हणजे माझे वडील, काके, मामे वगैरे लोक या तऱ्हेचं वागताना मी जन्मल्यापासून पाहात आलो आहे. यात काही वावगं आहे, हे लक्षात यायलासुद्धा बरीच वर्ष उलटायला लागली, इतकं हे माझ्या आसमंतात सरसकट घडताना दिसत असतं. वर उल्लेखलेला ‘साने गुरुजी’ नावाचा एक ‘मातृहृदयी’ पुरुष माझ्या याच भोवतालातला होता, की ते कल्पित पात्र आहे, असा संशय घेण्याइतपत हे कथित ‘पुरुषपण’ सर्वत्र मजबूत फैलावलेलं आहे. अगदी सहस्रकातला ‘महात्मा’ म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला माणूससुद्धा बायकोवर स्वत:चं पुरुषपण लादत गेल्याचं वेळोवेळी दिसतं, तेव्हा हे पुरुष असण्याचे संदर्भ अधिकाधिक टोकदार व्हायला लागतात.

एकंदरीतच कितपत टोकदार असतं ‘पुरुष’ असणं? इथे पहिली गोष्ट ही कबूल करायला हवी, की ‘पुरुष असणं’ म्हणजे ‘लिंगधारक’ असणं असतं. सध्या गाजत असलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब मालिके मधले ‘कालीनभैया’ त्यांच्या मुलाला विचारतात, तो ‘सा ७,  तुम आदमी हो या लिंग?’, हा प्रश्न अप्रस्तुत वाटावा, इतकं लिंग असण्याशी पुरुषत्वाचं नातं असतं. आणि लिंग असतं, म्हणजे लिंगाधारित पुरुषी आक्रमणं असतात. आपल्या एकूणच व्यवस्थेत कुणाही पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातल्या जडणघडणीतली अतिशय महत्त्वाची ‘कारक शक्ती’ त्याचं पुल्लिंगी असणं हीच असते. लिंगाधारित जाणिवांनीच कुणातलाही पुरुष सर्वार्थानं घडत जातो. याच जाणिवा अधिक पुष्ट झाल्या की स्त्रीवर आक्रमण करण्याची हिंमत त्याच्यात बळजोरपणे प्रकटायला लागते, जिला पिढय़ान्पिढय़ा आपल्या समाजात ‘मर्दानगी’ म्हणून गौरवलं जात आलं आहे.

अनंत सामंत यांची ‘एम टी आयवा मारू’ नावाची कादंबरी वाचा किंवा रंगनाथ पठारेंची ‘दु:खाचे श्वापद’ वाचा. स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणारे बाप या कादंबऱ्यांतून आहेत. हे असे इतके विखारी बाप दुर्मीळ असतीलही कदाचित, पण ‘पुरुष’ म्हणून ते पुरेसे प्रातिनिधिकही आहेत. पुरुषाच्या मनात कायम एक बलात्कारी दबा धरून असलेला असतो, हे फारच टोकाचं विधान वाटू शकेल, पण ते तितकंसं टोकाचं खरोखर नाहीये. म्हणजे या दरम्यानच्या छटा असलेले पुरुष असतातच कोटय़वधींच्या संख्येनं, पण जख्ख म्हातारपणातही हकिमाकडून जडीबुटी खाऊन सुंदर दासींमागे अविश्रांत वखवखणारा एखादा बादशहाच ‘पुरुष’ या प्रतिमेमध्ये अधिक ठळक, अधिक ठसठशीत भरलेला असतो. एरवी कितीही फाटका असलेला इसम अंतर्मनात पुरुष म्हणून कायमच सत्ताधीशाच्या आविर्भावात वावरत असतो. दिल्लीतल्या ‘निर्भया’ प्रकरणातल्या आरोपींची आणि त्यांच्या वकिलाचीही मुलाखत पाहिली, तर हे जास्त स्पष्ट लक्षात येऊ शकेल.

आता हे वरचे दोन-तीन परिच्छेद वाचताना कुणाला असं वाटू लागलं असेल, की ‘पुरुषा’बद्दल बोलायचं असताना हा माणूस पुरुषांतल्या विकृतीबद्दलच का बोलतो आहे इथे? कुणाला असंही वाटू शकेल आणि त्यात स्त्रियांची संख्याही खूपच मोठी असू शकेल, की आमच्या आयुष्यात असे पुरुष आलेलेच नाहीयेत कधी. माझे बाबा इतके मायाळू, स्निग्ध, माझा भाऊ इतका गोड, माझ्या मामाचा वाडा इतका मऊशार चिरेबंदी आणि ‘रोज रोज पोळी शिकरण’ वगैरे. तर ते खरंच असणार. असे पुरुष असतातच. पण त्यांच्या अंतर्मनात वस्ती करून असलेला सबंध पुरुष आपल्याला दिसलेला नसतो. बसमधल्या, लोकलमधल्या गर्दीत बाईला धक्के  मारणारा पुरुष कधीतरी अनुभवलेला असेलच तुम्ही, तेव्हा हे लक्षात घ्यायचं, की तो धक्के बाज इसम त्याच्या स्वत:च्या बहिणीचा प्रेमळ भाऊ, त्याच्या स्वत:च्या मुलीचा खूप वत्सल पिता असेलच. तरीही तो तुम्हाला गर्दीत टोचतो, याचा अर्थच असा, की कुणाही पुरुषात एक हिंस्र श्वापद मूलत:च असतं. तुमच्या वाटय़ाला ते कधी आलं नसेल तर तुम्ही सुदैवी आहात.

हे लिहिता लिहिताच मलाही आत्ता या क्षणी असं वाटून गेलं, की छय़ा! हे फारच एकतर्फी चित्र रंगवतोय मी इथे. पुरुषाचं जे चित्र इथे मी उभं करतो आहे, ते पुरुषाचं नाही, नाटक-चित्रपटातल्या खलनायकाचं चित्र अधिक आहे. जयवंत दळवींच्या ‘पुरुष’ नाटकात नाना पाटेकरांनी रंगवलेला, ‘त्या रात्री पाऊस होता’ या मराठी चित्रपटातला सयाजी शिंदेंनी रंगवलेला किंवा कुठल्याही मसाला हिंदी चित्रपटात गुलशन ग्रोव्हरनं रंगवलेला खलनायक इथे मी ‘समग्र पुरुष’ म्हणून सादर करतो आहे का?  तुम्हाला असं वाटत असेल, तर मलाही असंच वाटतं आहे. पुरुष याहून वेगळा असेलही. मस्तकात सदैव उसळणाऱ्या वासनांच्या दर्यापारही पुरुषपण नक्की असणार. पण हे सापेक्षही असतं फार. पुरुषी आविष्करणांबद्दल बोलताना, माणूस हा ‘पॉलिगॅमस’ प्राणी असतो, हे लक्षात घेतलं, की मग एकूणच संदर्भ अधिक स्पष्ट व्हायला लागतात. मग लक्षात यायला लागतं, की ही ‘बहुविधतेची गरज’ समाजमान्य नसल्यामुळे हे आविष्कार मग अधिक छुपे आणि हिंस्र होत राहातात. आणि इथे मग फक्त पुरुषालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणंही योग्य उरत नाही. ‘पुरुषमानवा’इतकाच ‘स्त्रीमानव’ही ‘पॉलिगॅमस’ असतो, हे कबूल करायला बराच वाव असू शकतो. आणि ‘मानव’ नावाच्या लाख वर्षांत लाख अर्थानी उत्क्रांत झालेल्या माणूसपणाला केवळ काही बेभान पुरुषी आविष्कारांच्याच संदर्भानं पाहात राहाणं, ही गल्लत घडवणारी गोष्ट असू शकते. काही त्याहून पार निराळ्या छटाही असूच शकतात.

उदाहरणार्थ, कवयित्री अरुणा ढेरे त्यांच्या कवितेतल्या राधेला पुरुष कसा असतो ते सांगतात. पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;

पाठ फिरवून नाही उणी करत;

घेतो समजून, सावरतो, आवरतो,

उराशी धरतो;

आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या   काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो!

अरुणा ढेरेंना दिसलेला पुरुष असा, इतका समंजस, इतका लोभस आहे.

राम गणेश गडकऱ्यांनी ‘भावबंधन’ या नाटकातून ‘कठीण कठीण कठीण किती पुरुषहृदय बाई’ असं पुरुषाच्या हृदयाचं चित्रण केलं आहे, ते अर्थातच रोमँटिक प्रकारचं आहे. लिंगभाव विसरून पुरुष वावरत असतो तेव्हा मात्र तो लोभस असतो खरोखर. म्हणजे रस्त्यानं जाताना सिग्नलवर भीक मागणाऱ्या बाईनं नीट सगळ्यांना दिसू शकेलसं पोटाशी बांधलेलं अर्धमेलं बाळ पाहताना मनातून आईइतका खोलवर आर्त व्याकूळ होतो, तो पुरुषही पुरुषांमध्ये वास करून असतोच किंवा ‘जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी..’ असं म्हणणाऱ्या प्रदीप निफाडकरांइतका वत्सल पिताही असतोच पुरुषांमध्ये. शिवाय आयुष्यभर प्रेयसीची वाट पाहात एकाच ठिकाणी आयुष्य कंठलेल्या जगप्रसिद्ध चित्रकार केकी मूस यांच्याइतका निष्ठावंत प्रियकरही असतो पुरुष; आणि स्वत:चा कान कापून वेश्येपुढे ठेवण्याइतका तीव्रोत्कट मनस्वी प्रतिभावंत व्हिन्सेंट व्हॅन गॉगही ‘पूर्ण पुरुष’ असतो.

माझ्यातल्या पुरुषपणात या सगळ्यांचे अंश आहेत..

आपण ‘पुरुष’ असं म्हणतो, त्या त्या प्रत्येक वेळी तिथे एक अदृश्य का होईना, स्त्रीही असतेच. सबब कुणातलंही पुरुषपण जोखायचं असेल तर ते स्त्रीच्याच तुलनेत आणि तिच्याच नजरेतून जोखायला हवं. माझ्यातला पुरुष कसा आहे हे जास्त नेमकेपणानं माझी स्त्रीच सांगू शकेल. मला विचाराल, तर, मी उत्कट, मनस्वी, हळवा, कोमल, प्रेमळ, हिंसक, स्नेहशील आणि तितकाच व्यभिचारी, आक्रमणोत्सुक, बळजोर असा थेट ‘पुरुषी’ पुरुष आहे. माझ्यातला पुरुष यातल्या अनेकानेक छटांनी आकार घेतो.

कुणाही स्त्रीइतक्याच असंख्य छटांनी!

आज जो पुरुष आपण समाजात पाहातो आहोत. तो सातत्याने स्त्रीच्या तुलनेत पाहिला गेला. दोषारोप केले गेले तेही त्याच तुलनेत. स्वतंत्र पुरुषजात या दृष्टीने पुरुषांचा फारसा विचार केला गेलेला नाही का? का आहे पुरुष असा? तो असा का घडला असावा? कोण कोण कारणीभूत आहे त्यासाठी? समाज, संस्कार, शारीरिक फरक, भावनिक-मानसिक रचना, की आणखी काही? पुरुषाची स्वत:ची अशी बाजू, विचार नेमके  काय आहेत?

हे तपासून पाहणारं पुरुषांनीच लिहिलेलं, त्यांना समजलेला पुरुष त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर- पुरुष हृदय ‘बाई’.. करोना संकटामुळे गेल्या मार्चनंतर प्रसिद्ध होऊ न शकलेलं हे सदर या वर्षी नवीन लेखकांसह.. दर पंधरवडय़ाने.

majhegaane@gmail.com