News Flash

स्नेहस्निग्ध आश्वासन

गोपाळ कृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू यांचा स्नेहबंध म्हणजे दोघांना मिळालेले स्नेहस्निग्ध आश्वासन होते. ते सरोजिनीदेवींना म्हणायचे, ‘‘तुझ्या मनातला एक कोपरा मला दे. पूर्ण माझाच

| August 2, 2014 01:13 am

सरोजिनीदेवींपाशी त्या तशा कोपऱ्यात गोखल्यांच्या असंख्य मर्मस्पर्शी आठवणी साठत राहिल्या. कृतींच्या, विभ्रमांच्या, शब्दांच्या आठवणी. चेहऱ्यावरच्या उत्कट, बदलत्या भावांच्या आठवणी. स्वप्नांच्या, स्मृतींच्या, आदर्शाच्या आठवणी. ध्येयांच्या आणि ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांच्या आठवणी. आशा-निराशेच्या, यशापयशाच्या आठवणी..
राजकारणाच्या धुमाळीतही व्यक्तिगत आपुलकीचा बंध सांभाळून त्यातून उभयपक्षी बळ मिळवणारी काही माणसं भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वावरताना दिसतात. देशसेवेवाचून या माणसांचा दुसरा धर्म नव्हता. आपली शक्ती-युक्ती-बुद्धी सर्व राष्ट्रहिताच्या एकाच ध्यासासाठी पणाला लावून यांनी आपलं आयुष्य त्यात वेचलं. लहानमोठे संघर्ष यांनी धडाडीने केले. लहानमोठी वादळं निर्भयतेनं झेलली. यांनी चुका केल्या आणि त्यांची प्रामाणिक किंमतही मोजली. व्यक्तिगत यशापयशाच्या पलीकडच्या मोठय़ा गोष्टींसाठी यांनी सर्वस्व दिलं आणि तो धर्म निभावण्यासाठी, युद्धं लढण्यासाठी, वादळं झेलण्यासाठी, किंमत चुकवण्यासाठी आणि सर्वस्व दान करण्यासाठी त्यांनी रक्ताच्या नात्यांपलीकडच्या स्नेहसंबंधांचं बळ मिळवलं. एक प्रकारे तोच त्यांचा जीवनरस होता. त्यांचा ऊर्जास्रोत होता.
गोपाळ कृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू यांचा स्नेहबंध डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला असं निश्चित म्हणता येईल. गोखले पत्रव्यवहारातूनच नव्हे, तर सरोजिनी नायडूंनी गोखल्यांच्या निधनानंतर ‘बॉम्बे क्रॉनिकल’मध्ये लिहिलेल्या लेखांमधूनही त्या स्नेहबंधाचं स्वरूप आपण समजू शकतो.
गोखल्यांचा तिच्याशी परिचय झाला तो कलकत्त्याला. ते १९०६ साल होतं. पंचविशीचा उंबरा ओलांडलेली सरोजिनी तेव्हा भारताच्या राजकीय-सामाजिक क्षितिजावर नुकती उदयाला येत होती. गोखले अनुभवी लोकनेते बनले होते आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात मवाळांचे पुढारी म्हणून त्यांची एक लक्षवेधी प्रतिमा उभी राहिली होती. कलकत्त्याला भरलेल्या सामाजिक परिषदेला विठ्ठल रामजी शिंद्यांचे स्नेही आणि निराश्रित साह्य़कारी मंडळाचे हितचिंतक म्हणून गोखले हजर होते. याच परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी सरोजिनीदेवींना प्रथम पाहिलं, ऐकलं. त्यांचं बोलणं तिथे उपस्थित असलेल्या सर्वानाच आवडलं. गोखल्यांनी तिथेच त्यांना एक लहानसं अभिनंदनपत्र पाठवलं. त्यात लिहिलं होतं- ‘आपले सादर आणि सोत्साह अभिनंदन करण्याची संधी मला मिळेल का? आपले भाषण उच्च प्रतीच्या विद्वत्तेचा परिचय देणारे होते आणि बौद्धिक आनंदाचाही अनुभव देणारे होते.’
सहानुभूतीचा असा सुखद स्वर लावून या दोघांचा परिचय झाला आणि त्यांच्या स्नेहात तोच स्वर क्रमाने विकसित होत गेला. परिपक्वतेचं एक गाढ सौहार्द त्याला लाभलं. असं सौहार्द म्हणजे सरोजिनीदेवींच्या लेखी जीवनातला सर्वोच्च गौरव होता. गोखले त्यांच्यासाठी एक वडीलधारे मित्र होते. त्यांच्या गुणांचे कौतुक करणारे, त्यांच्या कठोर शब्दांनी क्षुब्ध होणारे, त्यांच्या सदासतेज वृत्तीने आनंदित होणारे आणि त्यांना वात्सल्ययुक्त मैत्री देणारे असे एक सहृदय स्नेही होते.
दोघांच्या मैत्रीचा प्रारंभ व्यक्तिगत नव्हे, तर सामाजिक आस्थेतून झाला; पण पुढे मात्र गोखल्यांचं कोसळत चाललेलं आरोग्य आणि स्वत:च्या आजारांची पर्वा न करता त्यांना दिलासा देण्यासाठी सरोजिनीदेवींची चाललेली धडपड यांमधून एक अनिर्वाच्य अशी जवळीक जन्माला आली. देहतेचा स्पर्शही नसलेल्या त्या जवळिकीचे रंग अनेक होते.
गोखले मुळातच भावनाप्रधान. त्यातून कुटुंबात राहून बायको-मुलींना प्रेम देण्याइतका निवांतपणा त्यांना आयुष्यात कधी मिळाला नाही. सततचं आजारपण भोगून प्रथमपत्नी ऐन पंचविशीत साथ सोडून गेलेली, पाठोपाठ दोन वर्षांनी आईचं  छत्र हरपलेलं, त्यांना तीन मुले, दोन मुली आणि एक मुलगा. दोन मुलींच्या पाठीवर मुलाला जन्म देऊन त्यांची दुसरी पत्नी मृत्युमुखी पडली आणि पाठोपाठ तान्हा मुलगाही मरण पावला. किशोरवयात वडिलांचा मृत्यू, आगरकरांसारख्या सहकाऱ्याचा आणि रानडय़ांसारख्या गुरूचा मृत्यूही स्वीकारावा लागलेला. गोखल्यांनी व्यक्तिगत जीवनात मृत्यूचं असं तांडवच अनुभवलं. एका अर्थानं त्यांचं जीवन म्हणजे आप्तांचं मरणपर्वच होतं.
या पर्वातलं दु:ख गोखल्यांनी सगळ्या राजकीय धकाधकीत एकाकीपणे अनुभवलं असणार. स्वत:च्या आणि बंधूंच्याही परिवाराची जबाबदारी त्यांनी नेकीने पार पाडली तरी भावनिकदृष्टय़ा दु:ख वाटून घ्यावं आणि मुलींच्या सहवासात राहून त्यांचं आंतरजीवन समृद्ध करावं, अशी संधी मात्र राजकीय आयुष्यानं त्यांना दिली नाही. कदाचित यामुळेच की काय, पण सरोजिनीदेवींसारख्या तेरा वर्षांनी लहान असणाऱ्या परिचितेसाठी त्यांच्या खोल मनातल्या स्नेहभावाला वात्सल्याची एक लहानशी किनार लागलेली दिसते.
     गोखले त्यांना ‘गाणारा पक्षी’ म्हणत. त्यांच्या आजारपणात पत्र पाठवून  ‘Why should the songbird have a broken wing?’ अशी चौकशी करीत. हे शब्द, ही आस्था गोखल्यांच्याही कविवृत्तीची निदर्शक आहे आणि आशावादासंबंधी बोलायचं, तर वास्तवाच्या धुमाळीत प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या त्या माणसाला स्वप्नं पाहता येत होती; पण जमिनीवरचे पाय उचलणं वेडेपणाचं होतं, हेही तो जाणून होता.
कवी मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि अशी मोठी स्वप्नं पाहिल्याशिवाय मोठी करय उभी राहत नाहीत, हे गोखल्यांसारखा अतिबुद्धिमान माणूस जाणू शकला नसेल असं थोडंच आहे? त्यांच्या डोळ्यांसमोरही स्वतंत्र भारताचं सुंदर आणि मोठं स्वप्न होतंच.
 मात्र ते स्वप्न साक्षात करण्यासाठी स्वप्नाळूपणा बाजूला ठेवून चिखलात उतरून निर्भय प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करूनही स्वप्नांना गिळंकृत करणारी परिस्थिती प्रतिकूल होत असेल, तर तिचं नेमकं आणि स्पष्ट भानही खऱ्या कार्यकर्त्यांला असावंच लागतं. गोखल्यांना या गोष्टीची पूर्णपणे जाणीव होती. सुरत काँग्रेसनंतरची राष्ट्रीय पातळीवर झालेली लोकनेत्यांची बिकट अवस्था, ब्रिटिशांचे नवनवे पवित्रे, जीनांची वाढती महत्त्वाकांक्षा हे सर्व जवळून पाहणाऱ्या, नव्हे त्या सर्व ताण्याबाण्यांमध्ये जगणाऱ्या आणि घटना-प्रसंगांना वळण देण्यात महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या गोखल्यांना सरोजिनीदेवींइतकं आशावादी राहणं शक्यच नव्हतं. त्यांच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं पुष्कळ लहान असणाऱ्या सरोजिनीदेवींनी आशापूर्ण स्वरात, अशक्य ते शक्य होण्यासंबंधीचा उल्हास दाखवावा आणि गोखल्यांनी थोडय़ा कठोरपणे त्यांच्या स्वप्नाळूपणाला छेद द्यावा, मात्र त्याच वेळी प्रयत्नांचं सातत्य ठेवत काम करीत राहण्याचा आग्रह करावा, ही गोष्ट कविवृत्ती आणि आशावाद याविषयी गोखले साशंक असल्याची द्योतक नव्हे; त्या दोहोंच्या सामर्थ्यांविषयी आणि मर्यादांविषयी अचूक जाण त्यांना असल्याची ती निदर्शक आहे. गोखल्यांच्या जीवनविषयक समजुतीचं आणि परिपक्व राजकीय दृष्टीचंच ते दर्शन आहे.
तसं नसतं तर लखनौला भरलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात हिंदू-मुस्लीम ऐक्याचं वातावरण तयार झाल्याची वार्ता ऐकून आजारी गोखले नव्या चैतन्यानं अभिभूत होऊन उठल्याचं दृश्य सरोजिनीदेवींना दिसू शकलंच नसतं.
 २२ मार्च १९१२ रोजी लखनौला मुस्लीम लीगचं अधिवेशन झालं. एका अर्थी ते ऐतिहासिक अधिवेशन होतं. राष्ट्रकल्याणासाठी आपल्या हिंदू बांधवांशी नैष्ठिक सहकार्य करण्याचा शपथवत् उच्चार हा या अधिवेशनात लागलेला मुख्य स्वर होता. मुस्लीम समाजातले नव्या-जुन्या दोन्ही पिढय़ांचे नेते एकमुखाने ऐक्याचा स्वीकार करत होते. पाच वर्षांत हिंदू-मुस्लीम एकता होईल, असं गोखल्यांना सांगणाऱ्या सरोजिनीदेवी या अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या आणि व्यासपीठावरून बोलल्याही होत्या. आपलं वर्षभरापूर्वीचं बोलणं खरोखरच प्रत्यक्षात उतरत आहे, असं या अधिवेशनात अनुभवून सरोजिनीदेवी इतक्या उल्हसित झाल्या, की त्या लखनौवरून थेट पुण्याला आल्या. रँग्लर परांजप्यांना बरोबर घेऊन फग्र्युसन कॉलेजमधून त्या पायीच भारत सेवक समाजापर्यंत गेल्या. गोखले तेव्हा गंभीर आजारी होते; पण तशा रोगजर्जर अवस्थेतही वृत्तपत्रांमधून आलेल्या लखनौ अधिवेशनाच्या बातम्या ते बारकाईने वाचत होते.
त्यांनी सरोजिनीदेवींना पाहिलं आणि हात पसरून ते म्हणाले, ‘‘वा! वा! माझं स्वप्न खरं ठरलं असं सांगायला तू आली आहेस तर!’’ अन् मग श्वासाचीही उसंत न घेता अधिवेशनाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांनी सरोजिनीदेवींवर प्रश्नांचा वर्षांव केला.
दुपार कलताना पुन्हा एकदा भेटायला येण्याचा त्यांनी सरोजिनीदेवींना आग्रह केला. त्या वेळी तर गोखल्यांचं बदललेलं रूप पाहून त्या चकितच झाल्या. आजारपणाची चिन्हं त्यांच्या चेहऱ्यावरून पुसली गेली नव्हती; पण तो चेहरा हसण्यानं, उत्साहानं नुसता फुलून आला होता. सरोजिनीदेवींना घेऊन ते सरळ गच्चीवर निघाले, तेव्हा त्या जवळजवळ किंचाळल्याच. एवढय़ा आजारी अवस्थेत गोखल्यांनी जिना चढण्याचे श्रम करू नयेत, असं त्यांना वाटलं, पण गोखले म्हणाले, ‘‘तू मला आज नवीन आशा दिली आहेस. आयुष्याला टक्कर देण्यासाठी आणि काम करण्यासाठी मला खूप बळ मिळालं आहे.’’
ती दोघे मग वर गेली. गोखल्यांची बहीण आणि त्यांच्या दोन्ही मुली थोडा वेळ येऊन गप्पा करून गेल्या. व्यक्तिगत आयुष्याच्या पैल वावरणाऱ्या त्या कार्यकर्त्यांच्या परिवाराचा छोटासा हृद्य परिचय सरोजिनीदेवींना पहिल्यांदाच घडला़
नंतर मग संध्याकाळ उतरून आली. अंधार दाटत चालला. आभाळात चांदण्या उगवल्या. भोवती निळ्या टेकडय़ा होत्या.  सांजेच्या अर्धस्फुट प्रकाशात दोघे जण किती तरी वेळ शांत बसून राहिले. मग गोखले एकाएकी म्हणाले, ‘‘ये. माझ्याबरोबर इथे उभी राहा. या ताऱ्यांना, या पर्वतांना साक्षी ठेवून तुझी वाणी, तुझी कविता, तुझे विचार आणि तुझी स्वप्नं मातृभूमीच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प कर. तू कवयित्री आहेस. पर्वतशिखरांवरून तुझ्या इच्छांचे भविष्यातले आदर्श तू पाहा आणि खाली दऱ्यांमध्ये त्यासाठी रक्त आणि घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आशेची वार्ता सांगत राहा.’’
ते शब्द इतके भव्य, उदात्त आणि प्रेरक होते, की सरोजिनीदेवींचं कविहृदय त्यांनी सोनेरी उजेडानं भरून टाकलं. निरोप घेऊन त्या निघाल्या, तेव्हा गोखले त्यांना म्हणाले, ‘‘तू आज मला नवीन विश्वास आणि धैर्य दिलं आहेस. आज मला अगदी शांत झोप लागेल.’’
आणि मग खरोखरच गोखले फिरून नव्या जोमाने कामाला लागले. मग हळूहळू इंग्लंडच्या सार्वजनिक जीवनात छान मिसळून गेलेले गोखले त्यांना दिसले. पाटर्य़ाना जाणारे, ब्रिज खेळणारे, नाटकं बघणारे आणि नॅशनल लिबरल क्लबच्या गच्चीवर इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित महिलांना ‘डिनर’साठी आमंत्रित करणारे हे गोखले अगदी वेगळेच होते. अर्थात सरोजिनीदेवींविषयीचा त्यांचा जिव्हाळा मात्र पूर्वीचाच होता. कलकत्त्याला एका दीर्घ मुक्कामात ते सरोजिनीदेवींना एकदा गमतीने म्हणाले होते, ‘‘इतके दिवस तुला उडतीच पकडत होतो मी. आता चांगली पिंजऱ्यात बंद करून ठेवीन. तुझं आत्मतत्त्व समजून घ्यायचंय मला.’’ लंडनमधल्या मुक्कामात गोखल्यांनी ती संधी अधिक निवांतपणे घेतली असं वाटतं. सरोजिनीदेवींची प्रकृतीही फार ठीक नसायची. गोखले नेहमी त्यांच्या भेटीला जात. त्यांना आवडत असत म्हणून खूपशी चेरीची फळं सरोजिनीदेवी मुद्दाम आणून ठेवीत असत. त्या चेष्टेनं म्हणत, ‘‘प्रत्येक माणसाची काही तरी किंमत असते ना? तुमची किंमत म्हणजे चेरी.’’
  सरोजिनीदेवी लंडनमध्ये बॅरिस्टर जीनांच्या निकटवर्ती वर्तुळात काम करणाऱ्या होत्या. ‘लंडन इंडियन असोसिएशन’ या नावाची एक विद्यार्थी संघटना जीनांनी स्थापन केली होती. लंडनमधल्या भारतीय विद्यार्थ्यांचं संघटन आणि राष्ट्रकार्यासाठी त्यांची सिद्धता, अशा दुहेरी हेतूनं स्थापन झालेल्या या संघटनेच्या कार्याचा शुभारंभ गोखल्यांच्या हस्ते करण्याची जीनांची इच्छा होती. स्वत:ला ‘मुस्लीम गोखले’ होता यावं अशी त्यांची सुप्त आकांक्षा असल्याचंही गोखले चरित्रकारांनी नोंदवलं आहे.
काही असो; पण गोखले योगायोगाने लंडनमध्ये होते आणि त्यांना समारंभासाठी बोलावण्याची जीनांची इच्छा होती. सरोजिनीदेवी मध्यस्थ होत्या आणि गोखल्यांच्या वतीने जीनांना त्यांनी परस्पर होकारही देऊन टाकला होता.
गोखले तेव्हा मोठय़ा आजारातून उठून नुकते हिंडू-फिरू लागले होते. एकदा सरोजिनीदेवींकडे ते गेले असताना जीनांची इच्छा सरोजिनीदेवींनी त्यांच्या कानावर घातली. आपण परस्पर होकार भरल्याचंही सांगितलं. ते ऐकून गोखले रागावले. ‘‘माझ्या वतीने होकार देण्याचा तुला काय अधिकार?’’ ते म्हणाले. ‘‘नव्या पिढीसाठी आशादायक संदेश मागण्याचा अधिकार!’’ सरोजिनीदेवींनी शांतपणे म्हटलं आणि गोखले २ ऑगस्टला कॅक्स्टन हॉलमध्ये उत्साही विद्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत अप्रतिम बोलले.
 .. १९१४ च्या वसंतात गोखले इंग्लंडला पोचले, तेव्हा सरोजिनीदेवींशी त्यांच्या पुन्हा गाठीभेटी होऊ लागल्या. आजारपणाच्या दाट छायेतल्या त्या भेटी होत्या. गोखल्यांना तर काही दिवस बिछान्यावरून उठण्याचीही परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती. ते जरा बरे झाले, तर सरोजिनीदेवी आजारी पडल्या. ते समजल्यावर गोखले त्यांना भेटायला गेले. ‘‘तुझ्यासारख्या गाणाऱ्या पाखराला हे मोडके पंख कसे काय मिळाले?’’ ते उदासपणे म्हणाले. मग म्हणाले, ‘‘माझ्या हातात तर डॉक्टरांकरवी थेट यमराजाचाच परवाना आला आहे, पण जर मी नीट स्वत:ची काळजी घेतली, तर आणखी तीन र्वष जगू शकेन.’’
आपल्या हाती किती कमी आयुष्य आहे, हे समजल्यावर जणू गोखले जिवावर अधिकच उदार झाले असावेत. काम करू शकण्याइतकी ताकद विश्रांती-औषधांमधून मिळवायची आणि पुन्हा कामाचे डोंगर उपसायचे, असंच जणू त्यांनी ठरवलं, पण डॉक्टरांनी सांगितलं तशी तीन र्वष काही त्यांना मिळू शकली नाहीत. १९१५ च्या प्रारंभीच गोखल्यांनी जगाचा निरोप घेतला.
  अखेरच्या वर्षांत आजारी गोखले त्या धडपडीसाठी आवश्यक ती शक्ती जणू इंग्लंडमध्ये शक्य तितकी गोळा करत होते. ती त्यांना दोन ठिकाणांहून मिळत होती. एक म्हणजे व्हिची या गावी त्यांनी घेतलेली विश्रांती. तिथे त्यांनी अनुभवलेला विश्रब्ध एकटेपणा. त्यांचं उभं आयुष्यच जणू त्यांना तिथं भेटायला आलं. सरोजिनीदेवींना व्हिचीहून लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी म्हटलं-
‘Here in the intense mental solitude, I have come upon the bed-rock truths of life and must learn, to adjust myself to their demands.’
अशा आंतरप्रतितीच्या गोष्टी गोखल्यांनी सहजपणे सरोजिनीदेवींना लिहिल्या आहेत. ते जणू त्यांच्या विश्वासाचं आणि विसाव्याचं दुसरं ठिकाण होतं. थोडी हिंडण्या-फिरण्याची अनुमती डॉक्टरांनी दिली असेल आणि थोडी शक्ती असेल, तेव्हा दोघांनी मोटारीतून फिरायला जाणं आणि केसिंग्टन गार्डनमधल्या मोठाल्या झाडांखाली गप्पा करीत बसणं गोखल्यांसाठी परमसुखदायी होतं. वारा फार बोचरा आणि जोराचा नसायचा. ऊन थोडं सुखद असायचं. अशा वेळी झाडांच्या छायेत बसून गोखले सरोजिनीदेवींपाशी मनातल्या अनेक गोष्टी बोलत राहायचे. ते म्हणायचे, ‘‘तुझ्या मनातला एक कोपरा मला दे. पूर्ण माझाच असला पाहिजे तो.’’

सरोजिनीदेवींपाशी त्या तशा कोपऱ्यात गोखल्यांच्या असंख्य मर्मस्पर्शी आठवणी साठत राहिल्या. कृतींच्या, विभ्रमांच्या, शब्दांच्या आठवणी. चेहऱ्यावरच्या उत्कट, बदलत्या भावांच्या आठवणी. स्वप्नांच्या, स्मृतींच्या, आदर्शाच्या आठवणी. ध्येयांच्या आणि ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांच्या आठवणी. आशा-निराशेच्या, यशापयशाच्या आठवणी..
गोखले कधी आपल्या कामांविषयी बोलायचे, कधी भावी योजनांविषयी सांगायचे. लोकसेवा आयोग, मोर्ले-मिंटो कमिशन, व्हॉइसरॉयची परिषद, राष्ट्रीय महासभा- त्यांच्या अनुभवांच्या अशा विविध क्षेत्रांविषयी बोलायचे. सार्वत्रिक आणि सक्तीचे शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हिंदू-मुस्लीम ऐक्य ही त्यांची अंतरीची तळमळ होती. नव्या पिढीच्या जबाबदाऱ्या हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता आणि भारत सेवक समाज हा त्यांच्या सर्वस्वाचा ध्यास होता. या चार विषयांवर ते वारंवार बोलत असत.
कधी ते आपल्या प्रारंभकाळातल्या यशापयशांबद्दल बोलत, कधी प्रौढ वयातल्या संघर्षांविषयी बोलत. कधी केल्या कामांच्या कडू-गोड फळांविषयी बोलत आणि कधी वेगवेगळ्या लोकनेत्यांच्या क्षमतांचं आणि मर्यादांचं अचूक मूल्यमापन करत. भारताविषयीचं अपार प्रेम तर सततच बोलण्यातून झरत असे आणि भावी भारताची कल्पनाचित्रं रंगवण्यातही कधी त्यांचा काळ सरत असे.
ते राजकीय-सामाजिक क्षेत्रांतल्या चिंताजनक प्रश्नांविषयी बोलत असत, पण त्या चिंतेपलीकडे नेणाऱ्या अनेक सुंदर गोष्टींविषयीही बोलत असत. ललित साहित्याच्या नितांतमृदू स्पर्शाविषयी ते बोलत, मृत्यूविषयी बोलत आणि भविष्याच्या अंतरंगामधल्या, आदर्शाना जोजवणाऱ्या गाढ विस्मयकारी अंधाराविषयीही बोलत.
कधीकधी मृत्यूच्या कल्पनेविषयी स्वप्निल होत ते म्हणत, ‘‘तुला सांगू का, मला नेहमी असं वाटतं, की तुझ्या या सदाआनंदी आणि तेजस्वी वृत्तीच्या तळाशी एक चिरउदासी आहे. याचं कारण असं तर नाही, की तू मृत्यूच्या खूप जवळ जाऊन परत आलीस!’’ सरोजिनीदेवींनी ती उदासी नाकारली नाही; पण गोखल्यांच्या कोवळ्या प्रश्नाचा चेहरा तेवढय़ाच कोवळिकीने सत्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळवीत उत्तर दिलं, ‘‘खरं सांगू? ती आहे, पण मृत्यूच्या जवळ जाऊन आल्यानं नव्हे. मी तर जीवनाच्या खूप जवळ गेले, म्हणून त्या धगीनं काळवंडले.’’
हे असे संवाद वाचताना वाटतं, की इंग्लंडमधल्या दीर्घ वास्तव्यात मृत्यूची पावलं अगदी जवळ वाजलेली ऐकू येत असताना गोखल्यांच्या मनावरचे सगळे थर, सगळे पापुद्रे दूर झाले आणि त्यांचं भावनिक जग अगदी पारदर्शी सरलतेनं आणि संवेदनशीलतेनं प्रकट होत गेलं.
आजारी गोखल्यांना भेटायला इतरांना बंदी असतानाही सरोजिनीदेवी त्यांच्या खोलीत मुक्त प्रवेश करीत. दारातूनच विचारत, ‘‘आज मी कोणत्या प्रकारचं औषध बनून यायचंय? उत्तेजक की शामक?’’ आणि त्यांचं येणं हेच सर्वोत्तम औषध आहे, असं मानणारे गोखले उत्तर द्यायचे, ‘‘दोन्हीही!’’ त्यांच्या या अंतिम पर्वातल्या व्याकूळतेच्या साक्षिणी आणि सहभगिनी होत्या सरोजिनीदेवी. त्यांनी गोखल्यांवर बंधुवत् प्रेम केलं. ‘डियर बिगब्रदर’ म्हणून त्यांना संबोधिलं. त्या ‘बिगब्रदर’चा उभयविध अर्थ त्यांना अपेक्षित होता. व्यक्तिगत जीवनात गोखले त्यांना वडीलधाऱ्या भावासारखे होतेच; पण भारताच्या सार्वजनिक जीवनातली गोखल्यांची भूमिकाही तशीच होती, हे त्या जाणून होत्या.
विमनस्कतेतून पार होण्यासाठी गोखल्यांना हात देणं, हे त्यांनी आपलं कामच मानलं. १९१४च्या नोव्हेंबरमध्ये गोखल्यांनी इंग्लंड सोडलं. त्याआधी थोडेच दिवस सरोजिनीदेवी भारतात परतल्या. बोटीवरून त्या गोखल्यांना लिहीत राहिल्या, ‘माझा अमर्याद उत्साह आता तुमच्यामध्ये थोडासा भिनवून घ्या. जीवनातला आनंद, विजिगीषू वृत्ती, तेजस्विता- जे जे सगळं माझ्याजवळ आहे ना, ते तुमच्यामध्येही यायला हवं. या अलीकडच्या दिवसांत माझ्यासाठी तुम्ही खूप धडपडलात. मला आस्था दिलीत. माझ्या काळजीनं क्लेशही सहन केलेत. दुसऱ्याला सहानुभूती आणि सहकार्य देण्याच्या तुमच्या वृत्तीचं मीही सदैव पालन करीन, पण तुमचं सारखं काळजी करत बसणं मात्र निर्थक ठरवीन. माझं एक वाक्य तुम्हाला फार आवडलं होतं, असं तुम्ही म्हणाला होता. त्या वाक्यानं हे पत्र संपवते,  ‘ To each his own infinity.’ अशा पत्रांमधून गोखल्यांच्या हृदयात चैतन्ये निर्माण करण्यासाठी सरोजिनीदेवी धडपडत राहिल्या. कधी नर्मविनोदी शैलीत समुद्रसफरीच्या गमती सांगत राहिल्या.  ‘I am once again captain of my soul’ अशी आनंदवार्ता कळवत राहिल्या आणि कधी ‘One who marched breast forward,  Never doubting clouds would break’ अशा ब्राऊनिंगच्या ओळींची आठवण देत राहिल्या.
 त्या लिहिण्यातून त्यांनी गोखल्यांना जणू एक प्रकारचं घरगुती वातावरण, भावनिक स्थैर्य, दिलासा आणि सांत्वन देण्याची धडपड केली. धाकटय़ा बहिणीचं आणि स्नेहशील मैत्रिणीचं प्रेम तर त्या धडपडीमागे होतंच; पण राजकीय सहकारी म्हणून देशाच्या राजकीय पटावर गोखल्यांचं स्थान किती मोठं आहे, याची जाणीवही होती. गोखल्यांना गमावणं, म्हणजे काय गमावणं आहे हे समजून त्या गोखल्यांना लिहीत होत्या, ‘मी फार रागावलेली आहे. तुम्ही माझ्याकडे येणाऱ्या पाच हजार सदतीस माणसांपैकी एक असता, तर मी कडकच भाषा वापरली असती; पण दैवाच्या एका फटकाऱ्याने तुम्ही आज हिंदुस्थानाचे सर्वश्रेष्ठ नररत्न बनला आहात. देशातला एकमेव थोर पुरुष अशी तुमची ख्याती आहे, म्हणून माझे शब्द कडक होऊ शकत नाहीत, पण मला सांगा, तुमच्यासारख्याला सर्दी व्हावी आणि त्याने आमची झोप उडावी हे बरोबर आहे का? ताबडतोब बरे व्हा.’ कधी त्या लिहीत होत्या, ‘तुम्ही उत्तर लिहू नका. तो त्रास तुम्हाला पडू नये. मीच मधूनमधून लिहीन.’ आणि तरीसुद्धा कधी लिहीत होत्या, ‘फार दिवसांत तुमची हकिकत कळली नाही. तुम्ही लिहिण्याची तसदी घेऊ नका, असं मीच बजावून सांगितलं असलं, तरीसुद्धा तुमच्याकडून काही कळावं, अशी हुरहुर वाटतेच..’
आणि एखाद्या पत्रात विनोदानं काही लिहून गोखल्यांना आग्रह करीत होत्या, ‘Now laugh! Relax your solemn brow and laugh whole heartedly.’
 त्या अशी सातत्याने गोखल्यांच्या प्रकृतीची चिंता करीत होत्या. कधी थट्टेने, कधी रागावून आणि कधी गंभीर आपुलकीनं स्वत:ची काळजी घेण्याविषयी त्यांना विनवीत होत्या, पण मृत्यू झपाटय़ाने गोखल्यांना स्वत:जवळ खेचून घेत होता.
..त्या जेव्हा इंग्लंड सोडून भारतात निघाल्या होत्या, तेव्हा गोखले इंग्लंडमध्येच होते. ते महिन्याभराने परतणार होते. ८ ऑक्टोबरला बोटीवर चढताना सरोजिनीदेवींनी त्यांचा निरोप घेतला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘आपण पुन्हा कधी भेटू असं मला वाटत नाही. तू जगली-वाचलीस तर तुझं आयुष्य देशासाठी आहे, हे विसरू नकोस. माझं काम मात्र संपलं आहे.’’
व्हिचीच्या मुक्कामात निर्भयपणे सामोरी आलेली सत्यं गोखल्यांनी स्वीकारली होती. मृत्यू हे त्यातलंच एक सत्य. त्याच्या स्वीकाराची एक उदास घनदाट छाया गोखल्यांवर अखेरच्या पर्वात पसरून होती. त्या छायेचा विचार करताना वाटतं, की सरोजिनीदेवींचा जीवनाने उचंबळलेला अम्लान रसरशीत सहवास हे गोखल्यांना आयुष्याच्या उत्तरकाळात मिळालेलं एक स्निग्ध असं आश्वासनच होतं. महापुरुषांच्या विद्ध आयुष्यांना असं आश्वासन फार क्वचित मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:13 am

Web Title: radiant friendship of gopal krishna gokhale and sarojini naidu
टॅग : Friendship Day
Next Stories
1 मैत्री संयमाच्या भानातली
2 ल्हादिनी
3 निखळ मैत्रीची चाळिशी
Just Now!
X