ch25‘‘अगं..माझे शब्द लक्षात ठेव हा थोडा मोठा झाला ना की तू काय.. तोच तुझी काळजी घेतो की नाही बघ अगदी माझ्यासारखीच. अगं सर्जाला इथे आणताना मी त्याच्याकडून तसे प्रॉमिसच घेतलेय बघ.’’ स्वतच्याच विनोदावर हसता-हसता त्याच्या डोळ्यांतून पाणी आले.. सत्यघटनेवर आधारित..

प हाटे डोळे उघडताक्षणी तिची नजर चंदनाचा हार घातलेल्या त्याच्या हसऱ्या फोटोकडे गेली. चेहऱ्यावरचे हे मिश्किल हास्य अखेरच्या क्षणापर्यंत कायम राखण्यासाठी त्याने केलेली धडपड आठवली आणि तिला उदासीने घेरले. तिचा आणि साऱ्या जगाचाच निरोप घेऊन तो अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले.
चार दिवसही त्याच्या-पासून दूर राहण्याची कल्पना सहन न होणाऱ्या तिला जाणवले की त्याच्याविना आपण चक्क ३६५ दिवस जगलोच की. प्रामाणिकपणे कबूल करायचे तर आप्त-मित्रांसोबत काहीवेळा छोटे मोठे आनंदही साजरे केले. अर्थात.. या सगळ्याला त्याच्या नसण्याची एक काजळी किनार होतीच पण ते सर्व स्वत:मधे खोल खोल गुंतलेले असताना जगासमोरचा मुखवटा काढल्यानंतर..
सरावैरा धावणाऱ्या विचारांना वेसण घालत तिने अंथरूण आवरले त्याबरोबर कान टवकारलेला सर्जा आपले अंग घुसळून शेपटी हलवत तिच्या पायात घोटाळू लागला. त्याला लाडाने थोपटताना पुन्हा नवऱ्याची आठवण ch24आली. सुमारे दीड वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्याने छोटेसे कुत्र्याचे पिल्लू तिच्या हाती सोपवले. आधी तर तिने नापसंतीच व्यक्त केली. त्याला सांभाळताना येऊ शकणाऱ्या अनंत अडचणींचा पाढा वाचला.पण विश्वास ठेव.. पुढे यदाकदाचित मी जरी नसलो तरी याच्यामुळे तुला एकटेपणा वाटणार नाही छान कंपनी मिळेल. मुलांना खेळवायची राहिलेली हौस याचे लाड करून पूर्ण कर..’’ असं त्यानं म्हटलं होतं आणि बोलताना त्याने पटकन जीभ चावल्याचे तिच्या नजरेने टिपलेच. म्हणूनच बहुतेक वातावरणातला ताण घालवत पुढे म्हणाला, ‘‘अगं..माझे शब्द लक्षात ठेव हा थोडा मोठा झाला ना की तू काय.. तोच तुझी काळजी घेतो की नाही बघ अगदी माझ्यासारखीच. त्याचे नावही एकदम मर्दानी ठेवायचे-सर्जा. चालेल ना. अगं सर्जाला इथे आणताना मी त्याच्याकडून तसे प्रॉमिसच घेतलेय बघ.’’ स्वतच्याच या विनोदावर हसता-हसता त्याच्या डोळ्यातून पाणी आले होते. त्यावेळी त्या पाण्याचा अर्थ तिला कळला नव्हता. त्याच्या मनातील कोलाहल तिच्यापर्यंत पोचलाच नव्हता.
त्याच्या कानामागच्या छोटय़ाशा फोडाचे रूपांतर जीवघेण्या आजारात झालेले कळल्याबरोबर त्याने विचारपूर्वक तिच्या सोबतीसाठी सर्जाला घरी आणले, मात्र स्वतच्या आजाराचे गांभीर्य लपवूनच आणि तिच्या वाढदिवसाचा बहाणा करून. शेवटच्या टप्प्यांत समजलेल्या दुखण्याने शरीरात हातपाय पसरायला सुरुवात केल्यावर तो स्वतच्या वेदनांना आवर घालत अखेपर्यंत तिला धीर देत राहिला आणि सर्जावर मायेचा वर्षांव करत राहिला. जेमतेम चार महिन्यांत सर्जाला तिच्या सोबतीला ठेवून तो अखेरच्या प्रवासासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्या मुक्या जनावराची तगमग पाहून सर्वाचेच डोळे पाणावले होते.
सर्जाच्या चुळबुळीने ती भानावर आली आणि घडय़ाळाकडे नजर गेल्यावर झपाटय़ाने आवरायला लागली. त्याचा प्रथम स्मृती दिन असला तरी दिवसभर त्याच्या आठवणीत बुडून जाण्याइतकी फुरसद तिला नव्हती. ऑफिसमध्ये दुपारी महत्त्वाची मिटिंग होती त्यासाठी वेळेवर पोचून तयारी करायची होती. तोंड धुवून किचनकडे जाता जाता सर्जा पुन्हा तिच्या पायाशी घोटाळला. त्याबरोबर एरवी कधीही किचनमध्ये न शिरणाऱ्या सर्जाला तिने दटावले खरे पण तीही थोडी चकितही झाली. जेमतेम महिन्याभराचे पिल्लू आणल्यावर त्याच्याबद्दल काही तक्रारी ती करू लागली की तो म्हणे, ‘‘अगं.. इतकी वष्रे मला कसे शिस्तीत ठेवलेस तसेच यालाही आतापासूनच शिस्तीचे धडे दे, म्हणजे बघ कसा आज्ञाधारक होईल.’’ नवऱ्याने तेव्हा हे हसत हसत सुचवले होते. पण आता तिला वाटले आयुष्यात प्रत्येक गोष्ट तो सहजपणे स्वीकारत गेला अगदी अवेळी येऊ घातलेला मृत्यूही. पुन्हा ती कटू आठवणींशी ठेचकाळली. गॅसवर चहाचे आधण ठेवताना डोळ्याच्या कोपऱ्यातून सर्जा कूं.कूं आवाज काढत किचनमध्ये घुसायचा प्रयत्न करतोय ते तिला दिसत होते.
हो..माहितेय रे बाबा..तुला भूक लागलीय. ते म्हणताना तिने त्याच्या दुधाचा वाडगा पॅसेजमध्ये ठेवला आणि चहा पिऊन कुकरची तयारी करून ती आटपायला गेली. आंघोळ आटोपून तिची नजर वाडग्याकडे गेली पुढचे २ पाय पसरून त्यावर मान टाकून बसलेल्या सर्जाने दुधाला तोंडही लावले नव्हते. त्याला तसे पाहून तिला गलबलून आले. ‘‘काय झाले सर्जा. आज दूध का नकोय.. मगाशी ओरडले म्हणून राग आलाय का.. की.. तुलासुध्दा आज त्याची सारखी आठवण येतेय?’’ शेवटचा प्रश्न मात्र ती मनाशीच पुटपुटली. सर्जाने तिच्याकडे केविलवाणे बघून पुन्हा डोळे मिटले. त्याचे सकाळपासूनचे वागणे तिला कोडय़ात टाकणारे होते. एकदा घाईची कामे उरकली की थोडा वेळ रुसलेल्या सर्जाजवळ जवळ बसून त्याचे लाड करावे त्याला मायेने भरवावे असा विचार करत ती किचनच्या ओटय़ाशी गेली. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर ती झाकण उघडायच्या बेतात असतानाच दारापासून वीजेच्या वेगाने येऊन सर्जाने तिला अशी काही धडक दिली की ती धडपडत ओटय़ापासून दूर ढकलली गेली. त्याच्या अशा वागण्याने प्रचंड चिडून ती काही ओरडणार तोच मोठय़ा आवाजाने आणि समोरच्या दृश्याने ती सुन्न झाली होती. कुकरमधल्या वाफेच्या प्रेशरने त्याचे झाकण दूर उडाले होते आणि आतील अन्न पदार्थ सर्जाच्या अंगावर तसेच छतापासून जमिनीवर भांडय़ासकट उडाले होते. सर्जाने तिला ढकलले नसते तर.. टळलेल्या म्हणण्यापेक्षा सर्जाने टाळलेल्या ,स्वतवर घेतलेल्या संकटाच्या कल्पनेनेच तिला हुंदका फुटला…
अलकनंदा पाध्ये