साधना तिप्पनाकजे

सरपंचपदी निवडून आल्यावर पहिले तीन महिने ममताताईंनी एकही दिवस रजा घेतली नाही. ग्रामपंचायतील लोकांनाही त्यांनी शिस्त लावायला सुरुवात केली. त्यांना कार्यालयीन वेळेचं आणि कामाचं बंधन घालून दिलं. ग्रामपंचायतीमधले ‘पिणारे, पाजणारे आणि खाऊ घालणारे’ हे तीन गट त्यांनी कायमचे बंद केले. अमरावतीमधल्या अचलपूर तालुक्यातील असदपूर गावच्या सरपंच ममता येवुतकर यांच्याविषयी..

साडेसात हजार लोकवस्तीचं गाव, पण ग्रामपंचायतीत होणाऱ्या रोजच्या दारूच्या पाटर्य़ाविरुद्ध कोणी ‘ब्र’ काढायला तयार नाही. तीस-पस्तीस लोकांकरता ग्रामपंचायतीचं कार्यालय म्हणजे ऐषारामाची जागा होती. बरं ही माणसं सत्तेत होती का? तर तसंही नाही. कारण बऱ्याचदा असे प्रकार घडतात तेव्हा स्थानिक सत्ताधारी वगैरे लोकांचं नाव यात असतं, पण आपल्या अरेरावीच्या जोरावर गेली कित्येक वर्ष असदपूरमध्ये हा प्रकार सुरू होता. ममता येवुतकर सरपंचपदी निवडून आल्यावर सर्वात आधी ग्रामपंचायत कार्यालयातले हे गैरप्रकार बंद करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. आणि यशस्वीपणे पार पाडली. अमरावतीमधल्या अचलपूर तालुक्यातल्या असदपूर गावच्या सरपंच ममता येवुतकर यांच्या यशस्वी कारकीर्दीचा हा प्रवास असा सलग सुरुच आहे.

२७ नोव्हेंबर २०१७ ला ममताताई थेट निवडणुकीद्वारे असदपूरच्या सरपंचपदी निवडून आल्या. ममताताई म्हणतात, ‘‘ग्रामपंचायत हे गावचं खरं मंदिर असतं. इथे गावातल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्याच गोष्टींची नोंद असते. हे एक पवित्र स्थान आहे. असं हे पवित्र स्थान कलंकित करणं योग्य आहे?’’ ग्रामपंचायतीला कलंक लावण्याच्या अनेक गोष्टी असदपूरमध्ये घडत होत्या. त्या येण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाने केरसुणीचं कधी तोंडही पाहिलं असेल का अशी शंका त्यांना आली. ग्रामपंचायतीचे कर्मचारी स्वत:च्या मर्जीनुसार कार्यालयात ये-जा करायचे. लोकांचं काही काम असेल तर कर्मचारी शोधण्याकरता बक्षीस लावायला लागेल ही परिस्थिती होती. ग्रामपंचायतीचं कार्यालय गावगुंडांना आंदण दिलंय अशा प्रकारेच ते वागत होते. गावगुंडांच्या दारूच्या पाटर्य़ा आणि स्वत:चं घर असूनही रात्री झोपायला पथारी पसरायचं हक्काचं ठिकाण म्हणून या कार्यालयाचा वापर होत असे. दहशतीमुळे आधीच्या ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंचांनी या गैरप्रकारांविरुद्ध चकार शब्द काढला नव्हता.

ममताताईंनी निवडून आल्यावर ग्रामपंचायत कार्यालयाचं शुद्धीकरण करण्याचा विडा उचलला. सर्वात आधी ममताताईंनी या कार्यालयाची साफसफाई करून घेतली. रोज सकाळी अकरा वाजता त्या कार्यालयात येऊ लागल्या. निवडून आल्यावर पहिले तीन महिने त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावायला सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचं आणि कामाचं बंधन घालून दिलं. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी ममताताईंकडे दुर्लक्ष केलं. ममताताईंनी कारवाईचा बडगा दाखवल्यावर मात्र हळूहळू कर्मचाऱ्यांची गाडी रुळावर येऊ लागली. दारूच्या पाटर्य़ा करणाऱ्या गावगुंडांनी आधीच्या सदस्यांसारखी ममताताईंनाही भीती दाखवली. ‘‘कशी कारभार करतेस ते बघतोच..’’ असं म्हणत दटावू लागले. ममताताईंनी दारूच्या पाटर्य़ा बंद केल्या त्यासाठी त्या रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातच थांबू लागल्या. कुणाच्याही धमक्यांना त्यांनी भीक घातली नाही.

ममताताईंनी हे आव्हान स्वीकारत निश्चय केला, आपल्या कारकीर्दीत गावाचा चेहरा बदलायचा. पोलीस ठाण्यात वर्दी दिली. ग्रामपंचायत कार्यालयात गैरप्रकार करणाऱ्यांच्या हातात थेट बेडय़ाच पडतील हा संदेश त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला. ही मात्रा लागू पडली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपास ही टोळधाड दिसणं बंद झालं. ही पहिली पायरी ममताताई यशस्वीपणे चढल्या. दुसऱ्या पायरीवर ममताताईंना आढळलं, की ग्रामपंचायतीच्या खात्यात पैसेच नाहीत. गावात कामांचा तर डोंगर उभा होता. आधीच्या सरपंचांनी कधी कामात लक्षच घातलेलं  दिसत नव्हतं. याआधी गावात दोनदा सरपंचपदी स्त्रिया होत्या, पण कागदपत्रांवर सही करण्याकरता त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात उत्सवमूर्तीसारखं आणलं जायचं आणि सही घेऊन परत पाठवलं जायचं. कामांवर पैसे खर्च केलेले दाखवले होते, पण प्रत्यक्षात काम काहीच झालं नव्हतं. गावात साधे पथदिवेही नव्हते. ममताताईंनी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून गावात विजेचे पाचशे खांब बसवले. गावात रात्री फिरणं सुरक्षित झालं. गावातल्या काही घरांमध्ये कधी विजेचा दिवा लागलाच नव्हता. ममताताईंनी या घरांमध्ये वीज पोहोचवली. विद्युत महामंडळाशी संपर्क साधून या घरांना वीजपुरवठा होण्याची व्यवस्था केली. मग हळूहळू त्या चौदावा वित्त आयोग, आमदार निधी या माध्यमांतून त्या गावात निधी आणू लागल्या. गावात आता खऱ्या अर्थाने कामांना सुरुवात झाली. ग्रामपंचायतीमधले ‘पिणारे, पाजणारे आणि खाऊ घालणारे’ हे तीन गट त्यांनी कायमचे बंद केले. ग्रामपंचायतीचे सदस्यही ममताताईंच्या कडक शिस्तीनुसार वागू लागले. ग्रामपंचायतीतल्या प्रशासकीय कामांची घडी बसू लागली.

ग्रामसभा फक्त कार्यालयातल्या रजिस्टरवरच व्हायची. गावकऱ्यांना ग्रामसभेबद्दल काही माहीतच नव्हतं. ममताताई निवडून आल्यावर त्यांनी नियमित ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली. गावात रीतसर दवंडी देऊन ग्रामसभा बोलावली जाते. ग्रामसभा जिथं नाही तिथं महिला सभेची स्थिती काय असू शकते, याची कल्पना करता येऊ शकते. ममताताईंच्या या धाडसी कामगिरीबद्दल वाचताना तुम्हाला वाटत असेल, की ममताताईंचा स्वभाव मुळातच एकदम ‘डॅशिंग’, धाडसी असणार. तर असं अजिबात नाही. ममताताईंचे वडील नारायणराव मालखेडे यांनी सरपंच ते यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य अशी कारकीर्द गाजवली. महाराष्ट्रातील तत्कालीन बडय़ा नेत्यांचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं. ममताताई पाच भावंडांमधल्या धाकटय़ा. खूप लाडकोडात वाढलेल्या. घरातलं वातावरण एकदम मोकळंढाकळं. कुठलंही बंधन नाही. कुठेही बाहेर जायचं झालं तर वडील किंवा मोठय़ा भावंडांच्या सुरक्षाकवचात, घरच्या गाडीतूनच त्या जायच्या. त्या दहावीत असताना अचानक त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सहाच महिन्यांत मोठय़ा भावाचंही आकस्मिक निधन झालं.

अचानक आजूबाजूचं सुरक्षित, आरामदायी वातावरण गळून पडलं. याचा आघात ममताताईंवर झाला. ममताताई बुजून राहू लागल्या. त्यांचं शिक्षण थांबलं. बहिणींबरोबर कधीतरी बसमधून बाहेर जाणं व्हायचं एवढंच. एकविसाव्या वर्षी ममताताई लग्नानंतर असदपूरमध्ये आल्या. सासरचं वातावरण एकदम कर्मठ. मोठय़ाने बोलायचं नाही की हसायचं नाही. डोक्यावरचा पदर पडायला नको. एकत्र कुटुंब, सडासारवण या पूर्ण वेगळ्या वातावरणात आपला निभाव लागेल का? असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ममताताईंच्या चुलत सासूबाई त्यांना त्यांच्यासोबत बचतगटाच्या बठकींना नेऊ लागल्या. तेवढाच त्यांना विरंगुळा होऊ लागला.

मग ताईंनी बचतगटात गुंतवणूक केली. साधारण दीड वर्ष त्या तिथं जात होत्या. पण मग काही कारणांनी हा बचतगट बंद पडला. ममताताई आता बचतगटात नव्हत्या किंवा बाहेरच्या इतर कोणत्या कामात कार्यरत नव्हत्या. तरी बचतगटात जाणं हा ममताताईंच्या आयुष्यातला टìनग पॉइंट ठरला. ममताताई आता घरात आणि गावात रुळू लागल्या. त्यांची भीड हळूहळू चेपू लागली. २००९ मध्ये त्यांनी थेट जिल्हा परिषद निवडणूकच लढवली. महिला मंडळांच्या साथीनं त्या प्रचार करू लागल्या. पण अवघ्या दीडशे मतांनी त्यांचा पराभव झाला. तरी ममताताईंचा उत्साह कमी झाला नाही. मात्र त्यांच्या भित्र्या स्वभावात धीटपणा येऊ लागला. त्या महिला मंडळांमध्ये नियमित जाऊ लागल्या. दारूबंदी कार्यक्रम, महिला बचतगटाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्या.

दरम्यान, त्या ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या संपर्कात आल्या. गावकारभाराविषयी, स्त्रियांच्या अधिकारांविषयी त्यांना माहिती मिळू लागली. पुढे २०१७ मध्ये नोव्हेंबर महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद स्त्रियांकरता राखीव होतं आणि थेट निवडणुकीद्वारे सरपंच निवडीची पहिलीच वेळ. गावातल्या काही स्त्रियांनी ममताताईंना निवडणूक लढवायला सांगितलं. हो-नाही म्हणत ममताताई निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि जिंकल्या. त्या ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसल्यावर, एक व्यक्ती दारू पिऊन आली आणि ममताताईंना धमकावू लागली. ताईंनी सरळ पोलीस ठाण्यात फोन केला. त्यांच्या या पवित्र्याने ही व्यक्ती घाबरली. ममताताईंनी ग्रामपंचायतीचं रूप बदलायचं ठरवलं आणि मग हळूहळू एकेका कामाची गाडी रुळावर येऊ लागली.

गावात सरकारी योजनेतून दोनशे घरं झाली. याआधी गावात एकही घरकुल झालं नव्हतं. सरपंचपदाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला विरोध करणारी मंडळी आता शांत होऊ लागलीत. गावात पाच प्रभाग आहेत. ग्रामसभा, महिला सभा कार्यरत झाल्यात. संमत झालेल्या ठरावाची प्रत गावातील कोणत्याही नागरिकाने मागणी केल्यास त्याला देण्यात येते. यामुळे गावकरीही कामांचा पाठपुरावा करतात, त्यांनाही कामातले बारीकसारीक तपशील माहीत होतात. गावकरी कारभारात सहभागी होऊ लागल्याने ग्रामपंचायत आता खऱ्या अर्थाने गावगाडा चालवण्याचं केंद्र बनलं. ममताताई प्रत्येक कामाच्या नियोजनात स्वत: सामील होतात. नियोजनासोबतच प्रत्यक्ष काम सुरू असतानाही त्या स्वत: उभं राहून कामं करवून घेतात, देखरेख करतात. यामुळे आपोआपच चांगल्या दर्जाचीच कामं होतात.

सध्या गावची लोकसंख्या साधारण दहा हजारांच्या आसपास आहे. अन् पोलीस ठाणं मात्र बाहेर १२ किलोमीटर अंतरावर होतं. एवढय़ा मोठय़ा गावात काही अनुचित प्रकार घडू नये, याकरता गावातच पोलीस चौकी असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे ममताताईंनी पोलीस चौकी सुरू करण्याकरता प्रयत्न केले. या वर्षी जानेवारी महिन्यात गावात बीट जमादार यांच्यासह पोलीस चौकी सुरू झाली. यामुळे गावातल्या गैरव्यवहार करणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत झालीय. गावात आरोग्य उपकेंद्र एका जागी नव्हतं. त्याची जागा सारखी बदलण्यात येत असे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच ग्रामपंचायतीच्या मालकीचा एक भूखंड आहे. या जागेवर कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करता येईल, असं ममताताईंनी ठरवलं. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. पुढील पंधरा दिवसांत या जागेवर इमारतीचं काम सुरू होईल. याकरता चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गावकारभार करताना विरोध होत नाही असं नाही. पण चर्चा करून प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढला जातो. ममताताई म्हणतात, ‘‘विरोध नाही असं होऊन कसं चालणार? या विरोधामुळेच आपण जास्त क्रियाशील होतो आणि काम चोख करण्याचं बंधन आपोआप आपल्यावर येतं.’’ पण म्हणून उगीचच विरोधाकरता विरोध किंवा गावविकासाच्या आड येणाऱ्या लोकांकडे त्या दुर्लक्ष करतात. ममताताईंच्या घरातलं कर्मठ वातावरणही आता गळून पडलंय.

घर आणि गाव या दोन्ही आघाडय़ांवर परिवर्तन घडविणाऱ्या ममताताईंमुळे असदपूरचा पूर्ण कायापालट होणार हे नक्की.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com