गायत्री कशेळकर

गर्भवती अवस्थेत जर स्त्रियांनी चुकीचा आहार म्हणजेच जंकफूडचा अतिप्रमाणात वापर, तसेच फळे-भाज्या यांचा आहारात समावेश न केल्यास गर्भवती अवस्थेत मधुमेह होऊ शकतो. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा होणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो.

जागतिक महिला दिनानिमित्त एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व्याख्यान देत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आजकाल गर्भवती अवस्थेत मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.’ त्यांचं निरीक्षण बरोबर होतं. खरंच आजकाल १० पैकी ६ जणींना गर्भवती अवस्थेत मधुमेह दिसून येतोच आहे.’ त्याकरिता गर्भवतींना, स्वत:सोबतच बाळालाही कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गर्भवती अवस्थेत आढळणाऱ्या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबिटिस मलायटिस’ असेही म्हणतात.

मागील लेखात आपण पाहिले की बाळाची गर्भातील वाढ ही नाळेवर अवलंबून असते. जर यामध्ये संप्रेरकांच्या पातळीत काही बदल झाला तर त्याचा परिणाम इन्सुलिनवर होऊन आईचे शरीर तिच्या शरीरात तयार होणारे इन्सुलिन वापरूशकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची (ब्लड शुगर) पातळी वाढत जाते. यामागील कारण कोणालाही सांगता येत नाही. ते प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यावर अवलंबून असते.आईचे वजन गरजेपेक्षा जास्त असल्यास म्हणजेच स्थूलपणामुळे देखील मधुमेह होऊ शकतो. संपूर्ण गर्भवती अवस्थेतल्या काळामध्ये साधारण तिचे वजन १२-१५ कि.ग्रॅम. इतपत वाढणे अपेक्षित असते. परंतु यापेक्षाही जास्त प्रमाणात वजनवाढ झाल्यास त्याचा त्रास आई तसेच होणाऱ्या बाळावर होऊ शकतो. पुढे जाऊन गर्भवती अवस्थेतील मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भवती अवस्थेत जर गर्भवतींनी चुकीचा आहार म्हणजेच जंकफूडचा अतिप्रमाणात वापर, तसेच फळे-भाज्या यांचा आहारात समावेश न केल्याने गर्भवती अवस्थेत मधुमेह होऊ शकतो. ज्या स्त्रियांना प्रथम गर्भधारणेच्या वेळी मधुमेह होता, त्यांना दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळी मधुमेह होण्याची शक्यता ७०-८० टक्क्य़ांनी जास्त असते. घरामध्ये आनुवंशिकता असल्यासदेखील शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी आवश्यकता आहे ती गर्भवती अवस्थेतील मधुमेह ओळखण्याची. गर्भवती अवस्थेत २४-२८ आठवडय़ांमध्ये याचे निदान करणे गरजेचे आहे. गर्भवती अवस्थेत ग्लुकोज घातलेले पाणी पिण्यास देतात. त्याला ‘ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट’ असेही म्हणतात. त्यानुसार रक्तातील साखरेची पातळी ठरवली जाते. ती जर वाढलेली आढळल्यास मधुमेह असल्याचे निदान होते. अशा वेळी संतुलित आहार, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे किंवा इन्सुलिन यांमुळे मधुमेह नियंत्रित होऊ शकतो.

* अशा वेळी मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर होणाऱ्या बाळावर असा परिणाम होतो –

* अतिवजनाचे बाळ जन्माला येते.* बाळाला श्वसनाचा विकार होणे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो.* बाळाच्या जन्मावेळी बाळाच्या शरीरातील किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यालाच ‘हायपोग्लायसेमिया’ म्हणतात.* जन्मानंतर बाळाला कावीळ होऊ शकते.

अनियंत्रित मधुमेहामुळे आईला उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आईच्या पायावर व शरीरावर सूज येणे, बाळाचे वजन कमी भरणे, मुदतीपूर्वी बाळ जन्माला येणे (५ महिन्यांमध्ये) हे नाकारता येत नाही.

यासाठी गरजेचा आहे तो आहार. त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. एकेदिवशी सृष्टी जराशी घाबरत घाबरतच माझ्याकडे आली. तिची ‘ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट’ जरा जास्तच आली आणि डॉक्टरांनी गर्भारकाळातील मधुमेहाचे निदान करून आहारात बदल करण्यासाठी पाठवले होते. नेहमीप्रमाणे तिला प्रश्न विचारले. उंची, वजन (सध्याचे व गर्भधारणेपूर्वीचे), आनुवंशिकता (घरात कोणाला मधुमेह आहे का?), खाण्याच्या आवडी-निवडी, खाण्याच्या सवयी, वेळा, ऑफिसची वेळ, या सर्वामध्ये असे दिसून आले की, पूर्वीपासूनच तिच्या खाण्याच्या सवयी व वेळा चुकीच्या होत्या. सकाळचा नाष्टा होत नाही. रोजची जेवणाची वेळ वेगवेगळी, आहारात भाज्या व फळे यांचे प्रमाण कमी. उलटय़ा व मळमळ हा त्रास पहिल्या दिवसापासून असल्यामुळे साखर, ज्युस यांचे प्रमाणही जास्त होते. व्यायामाचा अभाव, आहारात जंकफुडचे प्रमाण जास्त. थोडक्यात तिला गर्भवती अवस्थेतील मधुमेह चुकीच्या आहार पद्धतीमुळे झाला होता. बऱ्याचदा जेवण जात नाही म्हणून बिस्किटे, खारी, टोस्ट, ब्रेड या गोष्टींचा तसेच ज्युसेस, ग्लुकोज पाणी यासारख्या पदार्थाचा आहारात समावेश गर्भवती जास्त करतात. त्यामुळे यामधून कबरेदके जास्त जातात. बऱ्याचदा कमी शारीरिक व्यायाम व जास्त कबरेदके यांमुळे गरजेपेक्षा वजन वाढत जाते व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत जाते. प्रथिनांचादेखील अभाव आहेच. गरम किंवा उष्ण या चुकीच्या समजुतीखाली अनेकजण चिकन, मासे, अंडी याला आहारातून बाद करतात. हे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे. बऱ्याचदा फळे नकोत, ही भाजी खाल्ली तर अमुक घडेल, तमुक होईल म्हणूनही बंधन घातले जाते. या सर्वाचा परिणाम हा आईच्या आरोग्यावर तसेच बाळाच्या वाढीवर होत असतो.

मधुमेह झाल्यास आहारातून अतिगोड पदार्थ, साखर, मध, गूळ, बेकरी पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. तृणधान्ये, कडधान्ये, ताजी फळे व भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दोन खाण्याच्या वेळांमध्ये जास्त अंतर ठेऊ नये. संपूर्ण दिवसभराचा कडकडीत उपवास टाळावा. बाहेरील खाद्यपदार्थ, पॅकबंद पाकिटे यांचा आहारात समावेश टाळावा. मुबलक प्रमाणात पाणी प्यावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम चालू ठेवावा.

एग फ्रॅन्की

साहित्य – १  अंडे, १/२  बारीक चिरलेला कांदा, १/२  बारीक चिरलेला टोमॅटो,

१/२  बारीक चिरलेली सिमला मिरची,

१ चमचा आलं – लसूण पेस्ट , १ चमचा तेल, १  चमचा धणे  – जिरे पावडर,

१/२ चमचा हळद, लाल तिखट चवीनुसार,  मीठ चवीनुसार,  १ मूठभर गव्हाचे पीठ, मेथीचे थोडे दाणे,

कृती  –  प्रथम गव्हाच्या पिठाची पोळी लाटून भाजून घ्यावी. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यात मेथीचे दाणे टाकावे. त्यावर कांदा, आलं-लसूण पेस्ट भाजून घ्यावी. नंतर भाज्या घालाव्या. त्यानंतर अंडे फोडून एकजीव करावे व त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, मीठ घालून

५ मिनीट शिजू द्यावी. पोळीवर अंडय़ाचे मिश्रण घालून त्याचा रोल करावा.

उष्मांक – २४०  ,  प्रथिने – १० ग्रॅम

पौष्टिक खीर 

साहित्य : १/२ किसलेले गाजर, १ मोठा चमचा नाचणी पीठ, १ मोठा चमचा राजगिरा पीठ, २-३ खजुराचे तुकडे, २ चिमूट वेलची पूड, ३-४ किसलेले बदाम व अक्रोड,

१ चमचा साजुक तूप.

कृती  –  प्रथम कढईमध्ये तूप गरम करावे. त्यावर नाचणी पीठ व राजगिरा पीठ खरपूस भाजून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेले गाजर ५ मिनीट परतून घ्यावे. दूध घालून उकळी आणावी. गॅस बंद करून त्यात खजुराचे तुकडे, वेलची पावडर, बदाम व अक्रोडचे छोटे तुकडे घालावे.

उष्मांक –  ३२०,

प्रथिने  – ७.५ ग्रॅम

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com