News Flash

देता मातीला आकार : विज्ञानप्रेमी

आपल्यासाठी हे आयुष्य कधीच सोप्पं नसतं. पण मग काय झालं? आपल्याकडे चिकाटी हवी, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास हवा. आपल्यात काहीतरी देणगी आहे यावर आपला विश्वास

| August 23, 2014 01:02 am

‘‘आपल्यासाठी हे आयुष्य कधीच सोप्पं नसतं. पण मग काय झालं? आपल्याकडे चिकाटी हवी, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास हवा. आपल्यात काहीतरी देणगी आहे यावर आपला विश्वास हवा आणि ती गोष्ट मिळवता आली पाहिजे!’’ अशा आशावादी विचारांची पेरणी करणारी, शास्त्रज्ञ मारी क्युरी यांच्यावर त्यांच्या पित्याच्या शिकवणुकीचा गहिरा प्रभाव होता.
एका छोटय़ाशा जागेत, भिंतींवर अडकवलेल्या निरीक्षण तबकडय़ांमध्ये शुद्ध रेडियम क्लोराइडचे असंख्य सूक्ष्म कण प्रखरतेने चमकत होते. काचेच्या त्या छोटय़ा तबकडय़ांमधल्या निळ्या उत्सर्जनांनी मारी आणि पिअर यांची दृष्टी व्यापली होती आणि रेडिअम या मूलद्रव्याच्या शोधाचा तो सुवर्णक्षण ते दोघेही अनुभवत होते.
ते दोघेही लहान मुलाच्या जिज्ञासेने आपल्या प्रयोगशाळेतला, वैज्ञानिक संशोधनातला प्रत्येक क्षण पराकोटीच्या उत्कंठतेने जगत. याबद्दल, मारी क्युरी यांचं मत होतं, प्रयोगशाळेतला एखादा शास्त्रज्ञ हा निव्वळ तंत्रज्ञ नसून तो एखाद्या बालकाप्रमाणं एखाद्या नैसर्गिक सिद्धांताला सामोरा जातो, जणू काही ती एक परिकथाच आहे.
 आपल्या आयुष्यातलं प्रत्येक संशोधन, आपलं प्रत्येक कार्य, विश्वकल्याणासाठीच अंगीकारलं जावं, अशीच या दाम्पत्याची खटपट होती. अत्यंत कसोटीच्या काळामधून मार्गक्रमण करीत असतानाही नीतिमूल्यांची कास धरत, सदसद्विवेकबुद्धी तेवती ठेवत, प्रलोभनांना थारा न देता आपलं काम परिपूर्ण करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता.
या नोबेल पुरस्कारविजेत्या क्युरी दाम्पत्यांमधल्या, मारी क्युरी यांच्या बालपणीच्या जडणघडणीवर एक दृष्टीक्षेप. मारी हिचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी वॉर्सा या आजच्या पोलंड देशातल्या भागात झाला. त्या वेळी पोलंड हे जर्मनी, रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांत विभागलेला होता. वॉर्सा हा विभाग झारशाही असलेल्या रशियात झाला. तिचे वडील क्लॉडिस्लाव स्क्लोडोवस्की. ते वॉर्सा इथल्या एका शिक्षण संस्थेचे प्राध्यापक आणि शाळांचे तपासणीदार होते. तिच्या आईचे नाव ब्रोनिस्लाव्हा स्क्लोडोवस्की. ती उत्तम पियानोवादक होती. ती एका शाळेत शिक्षिका होती. नंतर ती त्या शाळेची मुख्याध्यापिकादेखील होती. अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होती, त्यामुळे तिच्या सहवासात सगळेजण अतिशय खुललेले असायचे, सगळे जण मोकळेपणानं वावरायचे. तिला पाच मुलं, मोठी सोफी, ती पुस्तकातल्या गोष्टी आपल्या भावंडांना वाचून दाखवायची तसंच गोष्टी स्वत: रचूनदेखील ती सांगायची. तिच्या पाठोपाठ एक भाऊ  होता. त्याचं नाव जोसेफ. त्याच्यापेक्षा लहान होत्या हेलन आणि ब्रोन्या. सर्वात धाकटी मारिया पण तिचे लाडाचे नाव होते मान्या.
 कौटुंबिक पाश्र्वभूमी शैक्षणिक असल्यामुळे, घरात सगळेजण शिक्षणाला महत्त्व देत होते. मुलांचीसुद्धा शिक्षणात उत्तम कामगिरी होत होती. अशा वातावरणात असल्यामुळे मान्यालासुद्धा अतिशय लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली होती. एक दिवस घरात सगळे असताना अभ्यासाचा कार्यक्रम चालला होता. प्रत्येकजण त्यात सहभागी होता. ब्रोन्याचं मोठय़ानं वाचन चालू होतं. पण का कोण जाणे, तिला सलगपणे वाचता येईना. सतत अडखळत राहिली. त्याच वेळी अचानकपणे साडेतीन वर्षांची मान्या ते पुस्तक घेऊन घडाघडा वाचायला लागली. सगळेच जण आश्चर्यचकित झाले. त्याच वेळी तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की, इतक्या लहान वयात ही इतकं वाचायला शिकली म्हणजे तिचं खेळणं बरंच कमी झालंय. तिच्यावर वाचनाचा ताण पडता कामा नये, तिचं खेळणं चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून तिच्या वाचनावर काही काळ बंदी आली. ती वाचायला काही घेऊ  लागली तर तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न व्हायचा.
मान्याच्या आईला मान्याच्या जन्मानंतर वरचेवर बरं नसायचं. नंतर नंतर बारीक ताप यायला लागला आणि डॉक्टरांनी आईला क्षयरोग झाल्याचं निदान केलं. त्यामुळे, ती मान्याचं कौतुक करताना तिला फारसं स्वत:जवळ येऊ  देत नसायची. मान्याला आईचं प्रचंड वेड होतं पण आई तिला स्वत:जवळ येऊ  देत नाही याचं फारच कोडं वाटायचं. आईला देखील हे समजायचं. ती देखील होता होईल तेवढं तिच्याशी गप्पागोष्टी करायची. सतत संवाद साधायची.. आणि मान्याला तेवढंदेखील पुरेसं असायचं.
त्यांनी तब्येत बरी नसल्यामुळं शाळेतल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मान्याच्या वडिलांच्या पगारावरच घर चालू होतं. त्यामुळं होता होईल तेवढी काटकसर चालू होती. घरात त्या वेळी आईवडिलांचा संवादाचा नेहमीचा विषय म्हणजे, रशिया, झार, बंडाचा कट, इ. त्यामुळे मुलांमध्येही झारशाहीचा तिटकारा आणि पोलंडबद्दलचं देशप्रेम हे रुजलं जात होतं.
 हळूहळू आजार बळावत गेल्यानं आई पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहायला लागली, पण त्याही परिस्थितीत, मुलांकडे लक्ष ठेवायचा प्रयत्न करत राही. रशियन राजवटीत, पोलंडमधल्या शाळांमध्ये पोलिश भाषा शिकवायला बंदी होती. पोलिश भाषा, पोलिश इतिहास याचं उत्तम शिक्षण मिळावं म्हणून एका शाळेची मुख्याध्यापिका असलेल्या तिच्या एका मैत्रिणीने, या मुलांची शाळेत लपूनछपून सोय केली होती. आपल्या मुलांना आपण स्वत: जास्त माहिती देऊ  शकत नाही परंतु ती माहिती या मुलांना उपलब्ध होत आहे याचं तिला त्यातही समाधान मिळत होतं.
सोफी, आईची अगदी मनापासून सेवा करायची, भावंडांची काळजी घेत होती. वाढत्या खर्चाशी तोंडमिळवणी करण्यासाठी, स्क्लोडोवस्की कुटुंबानं घरात काही विद्यार्थी ठेवायचा निर्णय घेतला. त्या विद्यार्थ्यांपैकी, एकाला विषमज्वर झाला होता. सोफी आणि ब्रोन्या यांच्या शरीरात त्याचे जंतू शिरले. ब्रोन्या त्यातून सुधारली पण सोफी मात्र त्याची शिकार झाली. सोफीच्या निधनाने आई मात्र खूपच खचून गेली. तिनं परत उभारी धरलीच नाही आणि तीही लवकरच मृत्यू पावली. त्या वेळी मान्या फक्त अकरा वर्षांची होती. या दोन मृत्यूमुळं मान्या नैराश्येच्या छायेत वावरू लागली. तिची आई अतिशय धार्मिक होती, मात्र या दोन दुर्घटनेमुळं मान्याचा श्रद्धेवरचा विश्वास उडला.
  आईच्या मृत्यूनंतर स्क्लोडोवस्की कुटुंबानं घर बदलायचं ठरवलं. पपासुद्धा जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी ठेवत होते. त्यांचा स्वभाव हळवा झाला होता. आपल्या चारी मुलांना जवळ बसवून उत्तमोत्तम उतारे, कविता, दर्जेदार निबंध वाचून दाखवत असत. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतंच. धाडस आणि शौर्यकथा, क्रांतिकारकांची चरित्रं यावर भर असे. यामुळे, चौफेर विकास घडवला जाऊ   लागला. हळूहळू ते सहलीचे कार्यक्रमही आखायला लागले. याचं प्रयोजन म्हणजे, प्रेक्षणीय स्थळांबद्दलची माहिती, त्याच्या भौगोलिक महत्त्वाबरोबर सांगणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पर्यावरणाचं महत्त्व या सर्व गोष्टींची माहिती, देऊन सामान्य ज्ञानानं सजग करणं.
 कालांतरानं, पपांच्या निवृत्तीचं वय जसजसं जवळ येऊ  लागलं, तसं त्यांना आपल्या गुणवंत मुलांसाठीची आपली मदत तोकडी पडणार या विचारानं ते अतिशय अस्वस्थ व्हायचे. त्यांना समजावत ही मुलं म्हणायची, ‘‘पपा, आम्ही तरुण आहोत. खंबीर आहोत. आमच्या मनात जिद्द आणि मनगटात बळ आहे. आयुष्यात आम्ही यश मिळवून दाखवू!’’
आपल्या पपांनी केलेल्या जडणघडणीबद्दल, पुढे मान्यानं म्हटलंय, ‘‘शाळेत असताना, गणित आणि पदार्थविज्ञान, हे विषय मी सहज आत्मसात करू शकले. कारण, माझ्या वडिलांमुळे मला या विषयाची गोडी लागली. ते विज्ञानावर प्रेम करायचे त्यामुळे त्याचं शिकवणंही तसंच असायचं.’’ शाळेत तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रथम क्रमांक कायम ठेवला. डबल प्रमोशन्स घेत, ती आपल्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली, हेलन हिच्याबरोबर आपली इयत्ता आणली. शालान्त परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, घराण्याच्या सुवर्णपदकांच्या कमाईची परंपरा कायम राखली होती. अभ्यासाच्या परिश्रमानं आणि आई-बहिणीच्या अनुपस्थितीनं खचलेली मान्या अचानक कोसळली. वडिलांच्या सांगण्यानुसार, मान्यानं एक वर्षभराचा गॅप घेतला. पोलंडमध्ये विखुरलेल्या अनेक नातेवाईकांकडे तिनं वर्षभराचा मुक्काम करायचा ठरवला. या हवापालटामुळे, मान्याच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली.
ब्रोन्या आणि मान्या यांनी एकमेकींना आळीपाळीनं उच्चशिक्षणासाठी मदत करायचं ठरवलं. ब्रोन्या डॉक्टर झाली. या तिच्या शिक्षणाच्या काळात, मान्यानं गव्हर्नेसची नोकरी करीत तिला मदत केली. ब्रोन्याचं दरम्यान लग्न झालं. त्यानंतर मान्या पॅरिसमध्ये काही काळ ब्रोन्याकडे आली. तिच्या नवऱ्याबरोबर मान्याचं भावा-बहिणीचं नातं निर्माण झालं होतं. कधी कधी संध्याकाळी तो, मान्यालाही, त्या उभयतांबरोबर जेवणासाठीचं आग्रहाचं आमंत्रण द्यायचा. मग नाच, करमणुकीचे कार्यक्रम असे, वेळ त्यात जायचा पण जेव्हा पपांना हे कळलं तेव्हा त्यांनी याबद्दलची नाराजी पत्रातून कळवली होती. याची योग्य ती दखल घेत, मान्यानं आपला गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र यांचा अभ्यास जोमानं सुरू ठेवला. पाठोपाठच्या वर्षांत मान्यानं पदार्थशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये मास्टर्स ही पदवी मिळवली. पदार्थशास्त्रात ती पहिली आली, गणितात दुसरी.
 योगायोगानं मारी स्क्लोडोवस्की आणि पिअर क्युरी यांची संशोधनाच्या निमित्तानं भेट झाली आणि यथावकाश ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतरही मारीची पिअरच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं संशोधनं चालूच राहिली. या सगळ्या सव्यापसव्यात तिनं आपलं रेडिअमबद्दलच्या शोधाबद्दलचे आपले पेपर्स सादर करून डॉक्टरेट मिळवली. याबद्दल मारीच्या वडिलांनी आपल्या लेकीचं अभिमान, समाधानयुक्त पत्र लिहून कौतुक केलं, त्यांच्या निधनाच्या केवळ आठ दिवसांपूर्वी.
काही दिवसांनी क्युरी दाम्पत्याला या संशोधनासाठी पदार्थविज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.
आपल्या पित्याचं सदैव स्मरण ठेवून तिनं संशोधनातली आपली प्रगती कायम ठेवली. तिचा साहचरी तिच्या या विज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अध्र्या वाटेवर सोडून गेला. पण त्याच्याच सांगण्याप्रमाणं तिनं तिची विज्ञानावरची वाटचाल अखेपर्यंत चालू ठेवली.
रेडिअममधून जे कण परावर्तित होतात, त्यावरून रेडिअमचे वजन तोलण्याची पद्धत मारी क्युरी यांनी शोधून काढली. या संशोधनाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. दोन वेळेला नोबेल पुरस्कार जाहीर झालेली मारी क्युरी या एकमेव महिला शास्त्रज्ञ.
त्यांना दोन लेकी इव्ह आणि इरीन. इरीननं आपल्या आईवडिलांची संशोधनाची परंपरा कायम राखत नोबेल पुरस्कार पटकावला. ६ जुलै, १९३४ रोजी, मारी क्युरी यांचं किरणोत्सर्गाच्या अतिरेकानं मृत्यू झाला.
अनेक पारितोषिकं, अनेक मानसन्मान यांच्या गदारोळात आपलं माणूसपण जपत, एका घटकद्रव्याला पोलोनियम हे नाव देऊन आपली देशभक्ती जाणवून दिली. आपल्यावर झालेल्या संस्कारांबद्दल बोलताना, त्यांनी म्हटलंय, ‘‘प्रगतीचा मार्ग हा कधीच जलद आणि सहजसोपा नसतो, असं आम्हाला शिकवलं गेलंय.’’
या शिकवणीचा त्यांनी आपल्या जीवनात सतत अंगीकार केला. त्याचीच परिणती म्हणजे, हे त्यांचं तत्त्व, ‘‘आपल्यासाठी हे आयुष्यं कधीच सोपं नसतं. पण मग काय झालं? आपल्याकडे चिकाटी हवी, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास हवा. आपल्यात काही तरी देणगी आहे यावर आपला विश्वास हवा आणि ती गोष्ट मिळवता आली पाहिजे!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 1:02 am

Web Title: scientist marie curie
Next Stories
1 प्रेम.. कुठे मिळेल का?
2 जोडीने बहरली सृष्टिजिज्ञासा
3 ग्रॅका
Just Now!
X