News Flash

आत्मभान

आज निवृत्तीच्या काळात समाधानाचं आणि निवृत्तिवेतनामुळे आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत असताना मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा काही कटू प्रसंगांचे व अतिशय वेदनादायक अनुभवांचे स्मरण

| January 3, 2015 01:15 am

‘माझा त्याग, माझं समाधान’च्या आवाहनाला नोकरदार मैत्रिणींनी जोरदार प्रतिसाद दिला. प्रत्येकीचा संघर्ष थोडा-बहुत सारखाच, पण प्रत्येकीनं त्याला नवा अर्थ जोडला. नवं काही शिकत, नवं काही शिकवत आजची ही स्त्री पुढे जाते आहे. तिच्या कष्टाला, त्यागाला आणि समाधानालाही सलाम! या सदरातून आपण भेटणार आहोत, अशा जगण्याला अर्थ देणाऱ्या असंख्य जणींचे मनोगत.
आज निवृत्तीच्या काळात समाधानाचं आणि निवृत्तिवेतनामुळे आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत असताना मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा काही कटू प्रसंगांचे व अतिशय वेदनादायक अनुभवांचे स्मरण मात्र नक्कीच होते.
चाळीस- पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ. स्वातंत्र्यानंतर मिळालेली स्त्रीशिक्षणाची संधी आणि त्या दृष्टीने जागृत होत असलेला समाज. गतिमान काळाची चाहूल नि बदल स्वीकारण्याच्या उंबरठय़ावर असलेली समाजाची मानसिकता. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न झालं. शिक्षण घेण्याची मनस्वी आंतरिक ओढ होतीच, त्यामुळे शिक्षण पूर्ण करणं, नोकरी मिळवणं, लग्नानंतर येणाऱ्या सासर-माहेरच्या जबाबदाऱ्या, निसर्गाने टाकलेली जबाबदारी-गर्भारपण, मुलांना जन्म देणं-त्यांचं संगोपन अशा सर्वच जबाबदाऱ्या लहान वयातच पाठोपाठ निभावल्या. त्यामुळे प्रत्येक वळणावर संघर्षही अपरिहार्य नि त्याचबरोबर जुळवून घेणं नि तडजोड करणं हेही तेवढंच अपरिहार्य.
   मग आठवतं नोकरी, संसार करत केलेला तो एम.ए.चा अभ्यास. त्यानंतर मुलीच्या वेळचं गरोदरपण, बी.एड्.च्या अभ्यासाची लगबग. मुलीचा  जन्म आणि पाठोपाठ बी.एड्.ची परीक्षा ही सगळी एका वर्षांतली कसरत. तीन महिन्यांचं मूल घरी ठेवून शाळेच्या प्रचारासाठी दिवस-दिवसभर फिरणं. बॉसच्या छळवादाला तोंड देत निभावलेला पुढील बाळाचा जन्म. त्याला दीड महिन्याचं असतानाच घरी ठेवून शाळेत हजर होणं. फीडिंग करण्यासाठी मधल्या सुट्टीत धावत पळत घरी येणं. नवऱ्याच्या फिरतीच्या नोकरीमुळे मुलांची एकहाती जबाबदारी, संस्कार, अभ्यास, स्पर्धा, सासर-माहेरच्या लोकांना सांभाळणं अशा सर्वच आघाडय़ांवर प्रसन्न मनानं उभं राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं जिवघेणी कसरतच आणि त्यातच समाज, शेजारी नातलग या चौकटीत स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान.
प्रत्येक ठिकाणी प्रचंड घुसमट नि तेवढीच तडजोड. कधी कधी वाटायचं, मला मन आहे की नाही? समाजातील हितचिंतक, आप्त, शेजारी, घरात नवरा या सगळय़ांना दिसायचा तो फक्त माझा पगार. पण त्यामागची प्रचंड धडपड कोणालाच समजली नाही. अशा वेळी आधार असायचा तो फक्त मैत्रिणींचा नि शाळेतील सहकारी शिक्षिकांचा.
अशा संघर्षांच्या क्षणी मनाची घुसमट होत असताना मी माझ्या मनाला तडजोडीच्या सुरात समजावलं. ‘‘अगं नोकरी हीच तर तुझी खरी मैत्रीण. जिनं तुला बाहेरच्या खुल्या जगात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली. जिच्यामुळे तुला आर्थिक स्वावलंबन मिळालं नि त्यातून तुला आत्मसन्मान मिळाला. एक वेगळं आत्मभान आलं. तुझ्यातील अनेक सुप्त कौशल्यांना विकसित करण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यामुळेच तू स्वत:चा विकास व समाजाचाही विकास केलास. तुझ्यात स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता निर्माण झाली. प्रचंड आत्मविश्वास मिळाला. त्यातून समर्थपणे जगण्याचं बळ मिळालं. हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी मिळाली.
     नोकरीमुळे झालेल्या वैचारिक विकासातून जुन्या, बुरसट, पारंपरिक विचारांना फाटा द्यायचं बळ मिळालं. समाजातील अनेकींसाठी लढण्याचं सामथ्र्य आलं. स्त्री-विकासाची चळवळ उभी केली. लेखन-वाचनाचे ग्रुप अनेक वर्षे चालवले. ‘महिलांनो लिहित्या व्हा’ ही चळवळ आजही समर्थपणे उभी आहे. अनेकींना आर्थिक स्वावलंबी नि आत्मविश्वासपूर्ण जगण्याचा मार्ग दाखवू शकले. ३७ र्वष पौगंडावस्थेतील मुलांसाठी काम केलं. त्यांच्या समस्यांचा अभ्यास करून निवृत्तीनंतर ‘किशोरांना समजून घेताना’ (पद्मगंधा प्रकाशन)  हे पुस्तक जन्माला आलं.  
    थोडक्यात योग्य वेळी प्रचंड सहनशक्तीच्या साहाय्याने तडजोड केली खरी, पण त्यामुळेच आज मी समाधानात जगत आहे व सामाजिक कामात पूर्णपणे झोकून देऊन ‘स्वयंप्रेरणा’ केंद्राचं काम मोठय़ा आत्मविश्वासाने करत आहे. ज्याद्वारे शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी कार्यशाळा व्याख्यानं दिली जातात.    
(या सदरासाठी मजकूर पाठवताना  आपला ई-मेल, संपर्क क्रमांक व पासपोर्ट साइज फोटो अवश्य पाठवावा. ई-मेलवर मजकूर पाठवताना- पीडीएफ व आरटीएफ या फोरमॅटमध्ये मजकूर पाठवावा. पाकिटावर वा ई-मेलवर माझा त्याग, माझं समाधान लिहिणे आवश्यक.)
नलिनी जुगारे, कोल्हापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2015 1:15 am

Web Title: self awareness
टॅग : Challenges
Next Stories
1 हरवत चाललेलं अवकाश
2 हौसले हो बुलंद तो..
3 वनवासी मी या संसारी
Just Now!
X