|| सरिता आवाड

एकमेकांबद्दल ओढ वाटणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाला लग्न हवं असणं आणि दुसऱ्याला नको असणं, हे विरळाच दिसतं. ते दीपा आणि शंतनू यांच्या बाबतीत घडलं. त्याला तशीच काही ठोस कारणं होती. या कारणांबद्दल त्यांच्यात नीट संवाद होऊ शकला नाही आणि अखेर त्यांचं लग्न झालं.. पुढे अर्थातच ते टिकलं नाही. पण तरी त्यांच्यातली आपलेपणाची जाणीव हरवली नाही. त्याच आपलेपणानं लग्न तुटल्यानंतर अनेक वर्षांनी या दोघांना एकत्र आणलं, पण लग्नाशिवाय!

दीपा आणि शंतनू  ७५ वर्षांचे आहेत. दीपा डॉक्टर आहेत, तर शंतनू अभियंता. दोघे अजून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे, मानसी. तीही जवळच राहाते. किती साधं, सरळ कुटुंब दिसतं ना.. पण दिसतं तसं नसतं! दीपा आणि शंतनूंचा सव्वीस वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. नंतर अठरा वर्ष ते वेगळे राहात होते. तरीही आठ वर्षांपूर्वी पुन्हा, अर्थात लग्न न करता एकत्र राहायचा निर्णय घेतला. आणि आता ते खरंच शांतपणानं नांदताहेत.

ही गोष्ट खरी असली तरी संबंधित व्यक्तींच्या इच्छेला मान देऊन त्यांची नावं बदलली आहेत. तर दीपा आणि शंतनू यांची ही कहाणी. दीपा तशी माझी चुलत मैत्रीण. म्हणजे माझा मित्र शामची ती मैत्रीण. मी ओळखत होते तिला, पण दुरून. तिच्या आयुष्यानं असं अनोखं वळण घेणं मला खूपच विशेष वाटलं. थोडं जवळून समजून घ्यावं असं वाटलं आणि समजून घेता घेता मी पार गुंतून गेले. त्या गोष्टीत खोल खोल गेले. ही सत्यकथा आहे, पण त्यात कादंबरीचं बीज लपलं आहे असं जाणवलं.  किती पदर, किती बाजू! पण हे सगळं कमीत कमी शब्दांत सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

दीपा यांची पार्श्वभूमी थोडक्यात अशी- वडील हरहुन्नरी, पण अगदी बेभरवशाचे. स्थिर नोकरी-व्यवसाय करून कुटुंबाचा सांभाळ ते कधीच करू शकले नाहीत. दीपाला एक भाऊ, एक बहीण. वडिलांच्या अशा फिरस्तेपणामुळे आईला शिवणकाम करून मुलांचं संगोपन करावं लागलं. मुलं मोठी झाल्यावर डॉक्टर झालेल्या आणि मुंबईत राहात असलेल्या दिराकडे त्यांची आई या मुलांना घेऊन आली. तिथे सतत आश्रित असल्याचं दडपण. नुकत्याच लग्न झालेल्या काकूची जाचणारी नाराजी. अशा कोळपून गेलेल्या वातावरणात दीपाच्या मोठय़ा बहिणीनं आत्महत्या केली. १०-१२ वर्षांच्या दीपासाठी तो जबरदस्त धक्का होता. पुढे काकांच्या आग्रहानं ती वैद्यकीय शिक्षण घ्यायला लागली आणि भाऊ अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यास करायला लागला. शंतनू म्हणजे दीपाच्या भावाचा वर्गमित्र. त्याच्यामुळे दीपा आणि शंतनूची ओळख झाली. दीपा वसतिगृहात राहायला लागली. शंतनू तिला भेटायला यायचा. घरच्या परिस्थितीमुळे दीपा तणावग्रस्त आणि उदास असायची. शंतनूचा गाता गळा होता. दीपाची उदासी जाण्यासाठी तो तिला गाणी गाऊन दाखवायचा. वाचनाचाही दोघांना छंद. शिक्षण झाल्यावर शंतनूला बाहेरगावी नोकरी मिळाली. शंतनू आणि दीपाची पत्रांतून भेट व्हायला लागली. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या, वाचनाची आवड असलेल्या, दागिन्यांचा सोस नसलेल्या, डोळ्यांत बुद्धीची चमक असणाऱ्या दीपाच्या प्रेमात शंतनू पडला. दीपाच्या भावानं स्वत:चं वेगळं घर थाटलं. तिथे अनेक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांची ऊठबस असायची, चर्चा रंगायच्या. हे वातावरण शंतनूला आवडलं.

शंतनूची आई त्याच्या लहान वयात गेलेली. वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं. त्याच्या आसपासच्या मुली सणवार करणाऱ्या, हातभर बांगडय़ा, गळाभर माळा घालणाऱ्या अशा होत्या. शंतनूनं ठरवलं होतं की अशा परंपरागत मुलीशी लग्न करायचं नाही. साहजिकच दीपा त्याला जशी हवी तशी वाटली. पत्रांतून त्यानं दीपाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दीपानं होकार दिला नाही. फक्त मैत्रीच ठीक आहे, लग्न वगैरे नकोच, असं दीपाला वाटत होतं. शंतनूला हे स्त्रीसुलभ आढेवेढे वाटले. इथंच शंतनूचा पहिला गैरसमज झाला. त्याला वाटलं तसे हे वरवरचे आढेवेढे नव्हते. दीपाला तिच्या विस्कटलेल्या कौटुंबिक अनुभवामुळे लग्न, कुटुंब नकोसं वाटत होतं. लहान वयात वडील बाहेरगावी असताना लैंगिक शोषणाचा अतिशय धक्कादायक अनुभव तिला आला होता. त्यामुळे लैंगिक संबंधांबद्दल तिच्या मनात खोलवर अढी होती. हे सगळं तिनं शंतनूला सांगायला हवं होतं. पण इतक्या स्पष्टपणे तिला हे सांगता आलं नाही. कदाचित तेव्हा आपल्या मानसिकतेची तिची तिला स्पष्ट जाणीव झाली नसावी. शेवटी शंतनूच्या अनुनयाला तिनं मान्यता दिली आणि रजिस्टर लग्न पार पडलं. शिक्षण पूर्ण झालं होतं. लग्न झाल्यावर शंतनूच्या कामाच्या गावी ती रवाना झाली. दीपा आणि शंतनूचा संसार सुरू झाला. दुसऱ्या वर्षांत मानसीचा जन्म झाला.

दीपाचं ‘टिपिकल’ बायकांसारखं नसणं शंतनूला भावलं होतं. पण नवऱ्याच्या भूमिकेत शिरल्यावर मात्र त्याच्या अपेक्षा टिपिकल नवऱ्याच्या होत्या. दीपाच्या मनात लैंगिक संबंधांबद्दल असलेल्या अढीचा त्यानं सहानुभूतीनं विचार केला नाही. या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीची किंवा समुपदेशकाची मदत त्यानं घेतली नाही. वैद्यकीय शिक्षण असूनदेखील दीपालाही या अढीबद्दल समुपदेशन घ्यावं असं वाटलं नाही. या संबंधातला अपेक्षाभंग, असमाधान खदखदायला लागलं. त्याचा परिणाम म्हणजे क्षुल्लक कारणांनीसुद्धा स्फोट व्हायला लागले. त्याच्या झळा मानसीलाही बसत होत्या. काळ पुढे सरकत होता. शंतनूला पुण्याजवळ नोकरी मिळाली. दीपाच्या काकांच्या मदतीनं त्यांनी पुण्यात घर बांधलं. दीपाला आता घराबाहेर पडून आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करावासा वाटायला लागला. त्याप्रमाणे पुण्याजवळ ग्रामीण भागात जाऊन ती काम करायला लागली. दीपाचं घरापासून लांब राहाणं शंतनूला सहन होत नव्हतं. दीपाला तर खदखदणाऱ्या ज्वालामुखीसारख्या घरातून बाहेर पडायचं होतं. ग्रामीण भागात काम करण्यात तिला समाधान लाभत होतं. आठवडय़ात दोन दिवस ती घरी येत होतीच. असंच घरी आली असताना बारीकशा कारणानं भडका उडाला. नेमका दीपाचा भाऊ तिथं होता. त्यानं चिडून शंतनूला घर सोडून जा असं सांगितलं. घरबांधणीत शंतनूचा सहभाग असला तरी घर दीपाच्या काकांचं होतं हे वास्तव होतं. नंतर परस्परसंमतीनं त्यांनी घटस्फोट घेतला, लग्नानंतर १६ वर्षांनी.

शंतनूनं घटस्फोट घेतला खरा, पण मनापासून कधी स्वीकारला नाही. मानसीशी त्याचा सतत पत्रव्यवहार होता. तिला आर्थिक मदतही तो करत होता. घटस्फोटानंतर दीपा मात्र घरात आणि कामात खूपच अडकली. ग्रामीण भागातला दवाखाना, तिथलं लोकशिक्षणाचं काम, मुलीचं शिक्षण, घर, या सगळ्याच आघाडय़ांवर तिची लढत सुरू होती. तिचा भाऊ-वाहिनी यांच्याव्यतिरिक्त कामामुळे जोडलेले कार्यकर्ते आणि मैत्रिणींची तिला खूप मदत झाली. तिच्या आईवर जेव्हा एकटीनं संसाराची जबाबदारी पेलण्याचा प्रसंग आला तेव्हा मदत करणारी फक्त कुटुंबसंस्था होती. आता मदत करणारे हात कुटुंबाबाहेरचेही होते. नंतर दीपा-शंतनूच्या लेकीनं- मानसीनं स्वत:चं स्वत: लग्न ठरवलं आणि ती स्वतंत्र राहायला लागली.

म्हणता म्हणता २००७ उजाडलं, शंतनू निवृत्त झाले. निवृत्तीनंतर कुठे राहायचं, असा प्रश्न आला तेव्हा त्यांना पुण्याच्या घराची आठवण झाली. हे घर उभारण्यासाठी त्यांनीही कष्ट घेतले होते. त्यांचे भावनिक अनुबंध अजूनही कुटुंबाशीच संलग्न होते. विशेष म्हणजे दीपांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. एक तर मानसीचं लग्न झाल्यावर त्या एकटय़ा होत्या. त्यांना सोबत हवी होती. शंतनू यांनी इतक्या वर्षांत जसा मानसीशी संपर्क ठेवला, तसाच दीपांशीही ठेवला होता. वेगळं राहायला लागून १३ वर्ष उलटली होती. काळ हेच औषध ठरलं होतं. पूर्वीच्या तणावाची तीव्रता कमी झाली होती. माणुसकीच्या नात्यानं दीपा यांनी शंतनूंच्या प्रस्तावाचा स्वीकार केला.

वयोमानानं नात्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये फरक पडला आहे. आता एकमेकांना सोबत करणं, काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हे महत्त्व अधोरेखित करणारा प्रसंगही नुकताच घडला. शंतनू यांना मधुमेहाचा विकार आहे. एका सकाळी त्यांची साखरेची पातळी खूप खाली घसरली. जवळजवळ बेशुद्धावस्था आली. दीपांच्या हे वेळीच लक्षात आल्यानं पुढचा अनर्थ टळला. बाथरूममध्ये धडपडल्यानं दीपांच्याही मागे आता पाठदुखीची व्याधी आहे. अशा परिस्थितीत एकमेकांची जवळीक महत्त्वाची ठरते. ते एकत्र राहातात त्यामुळे भूतकाळातल्या सगळ्या जखमा गेल्या, नात्यातल्या भेगा सांधल्या गेल्या असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल. दोघांमधला संवाद अजून वाढू शकतो, क्षमाशीलतेची झुळूक आल्हाददायक ठरू शकते. ते दोघं आता एकत्र असल्यानं निदान तशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. शंतनूंच्या गळ्यातला सूर त्यांना सोडून गेलेला नाही. संगीत आणि पुस्तकं यांत दोघंही रमतात. मुख्य म्हणजे दोघांचे हात अजून काम करताहेत. दोघांचं स्वत:चं जग आहे, अवकाश आहे, जे संवादी आहे. हा संवाद अधिकाधिक सघन होईल अशी आशा आहे. दीपांचा भाऊ- म्हणजे शंतनूंचा वर्गमित्र घरी येतो-जातो. दोघांनी सत्तरी ओलांडली आहे. त्यांच्या मैत्रीचे धागेही जुळायला लागले आहेत.

दीपा यांना लग्नाशिवायचं हे मैत्रीचं नातं चांगलं वाटतं. त्यांच्या अनुभवाप्रमाणे विवाहबंधनात कुणी काय करायचं याच्या निश्चित अपेक्षा असतात. आंतरिक नातं असो नसो, सामाजिक नात्यांचे पाश असतात. या अपेक्षांच्या ओझ्याशिवाय असलेलं मैत्र दीपांना हवंहवंसं आहे. शंतनू तर मनापासून या नात्यात होतेच. नात्याला कायद्याचं लेबल लावा न लावा, त्यांना फरक पडत नव्हता. त्यांनी ज्या घराच्या बांधकामात भरपूर सहभाग घेतलाय त्याच्या स्वच्छतेत, त्याची पुनर्रचना करण्यात त्यांना मनापासून रस आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मनातलं दीपा आणि मानसीबद्दलचं प्रेम जाणवल्याशिवाय राहात नाही. दीपांच्याही मनात हे प्रेम जाणवतं. प्रेमाच्या या चिवट धाग्यानं मला एकीकडे चकित केलं आणि आश्वस्तही केलं. कबिराच्या ओळी मला आठवल्या, ‘पोथी पढी जग मुआ पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेमका पढे सो पंडित होय’.

शंतनूंना हे प्रेमाचं रसायन दीपांना त्यांचा अवकाश देण्याचं शिकवत राहील. दीपांच्या मनातले गंडही याच रसायनात विरघळून जातील अशी मला आशा वाटते. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दीपा आणि शंतनूंच्या घरी मी गेले होते. त्यांच्याशी तीन-साडेतीन तास गप्पा मारल्या. त्यांनाही मनमोकळा संवाद झाल्यानं आनंद झाला. अंधार पडल्यानं नाइलाजानं त्यांचा निरोप घेतला. परतीच्या वाटेवर मनमोकळा संवाद करण्याच्या अवकाशाची, तशा संधीची किती गरज आहे याची जाणीव मला खोलवर होत होती. दीपा आणि शंतनूंच्या सहजीवनाला खूप खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात.

sarita.awad1@gmail.com