ch13वय होतं तसं त्वचा सैल पडते वा सुरकुत्या वाढतात. अशा सैल त्वचेला भराव देऊन पुन्हा घट्ट करण्यासाठी फिलर्स म्हणजे खड्डे भरणारी द्रव्यं आली आहेत. सुरुवातीला कोलाजेन पदार्थाचंच इंजेक्शन त्वचेखाली दिलं जायचं. पण आता बोटॉक्स उपचार पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो आहे.

सुंदर दिसावंसं वाटणं ही एक सहज प्रेरणा आहे. सर्व वयाच्या स्त्रियांमध्ये ती प्रकर्षांनं असतेच, पण याबाबतीत पुरुषही अजिबात कमी नसतात. वयात येणारी मुलं, महाविद्यालयीन तरुण, नोकरी-धंद्यात जम बसवू पाहणारे, खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातले अधिकारी असे सारेच आपल्या सुंदर दिसण्याबद्दल जागरूक असतात. सुंदरतेचे अनेक पैलू असले तरी या लेखात आपण त्वचेच्या सौंदर्याबद्दलच बोलणार आहोत.
त्वचेचा रंग, पोत, नितळ कांती, केसांची चमक, लांबी, जाडी असे अनेक निकष सौंदर्याचा विचार करताना महत्त्वाचे ठरतात. यामध्ये कुठेही त्रुटी आली तर सौंदर्याला बाधा येते. त्वचेतील दोष काढून तिला पुन्हा सुंदर बनवण्याच्या शास्त्राला त्वचा सौंदर्यशास्त्र म्हणतात. कित्येक वर्षांपासूनच त्वचारोगतज्ज्ञांचे प्रयत्न सुंदर व्यक्तीला अधिक सुंदर बनवण्यासाठी चाललेले असले, तरी त्यात सफाई नव्हती. कधी कधी तर रोग परवडला, पण उपचार नको अशी स्थिती व्हायची. पण आता सतत नव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सुंदर दिसण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहू शकतो आणि खरंही करू शकतो. त्वचेच्या कोणत्याही प्रश्नावर आता निश्चित उत्तर आहे, तेसुद्धा तुम्हाला कोणतीही दुखापत न होता. फक्त तुमचा खिसा भरलेला हवा आणि तो हलका करायची तयारी हवी.
अगदी केसांच्या समस्येचं उत्तरही अनेकदा त्वचेतच दडलेलं असतं. केसगळतीची तक्रार घेऊन एखादी व्यक्ती डॉक्टरकडे पोहोचते तेव्हा प्रथम केसांचं पृथक्करण केलं जातं. प्रत्येक चौरस मिलीमीटरमध्ये सामान्यपणे १२ ते १५ केस असतात, त्यांची संख्या १२ ते १० असेल तर सौम्य, १० ते ८ असेल तर मध्यम आणि ८ पेक्षा कमी असेल तर तीव्र केसगळती असं समजतात. या व्यक्तीला बायोटिन, अँटी ऑक्सिडेंट्स अशी पोषक औषधं दिली जातात. काही विशिष्ट रोगामुळे केस गळत असतील तर (उदा. बुरशीचा संसर्ग) तर अर्थातच त्याचेही उपचार केले जातात. टकलावर लावण्यासाठी मिनोक्सिडिल हे औषध वापरलं जातं. त्यासाठी खास अप्लिकेटर उपलब्ध आहेत. अजूनही एक उपाय आहे, पण वेळखाऊ! डॉक्टर आधी या रुग्णाचं रक्त घेतात, ते सेंट्रिफ्यूज करून त्यातल्या प्लेटलेट पेशी वेगळ्या काढून त्यांचं इंजेक्शन सूक्ष्म सुईने टकलाच्या त्वचेखाली दिलं जातं. या पेशींमध्ये वाढीचे घटक असल्याने केसवाढीला चालना मिळते. तिसरा उपाय म्हणजे केशारोपण. रुग्णाला ज्या ठिकाणी भरपूर केस आहेत, तिथले केस मुळासकट काढून एक एक करून टकलावर आरोपण करतात. हीसुद्धा वेळखाऊ पद्धत असून ६-७ तासांत जेमतेम १५०० केसांचं रोपण करता येतं.
आता नको तिथे केस असतील तर काय? इलेक्ट्रोलिसिसचा जमाना मागे पडला, आता डायोड लेसर वापरून केसांच्या मुळापाशी एल.एच.ई. म्हणजे ‘लाइट हिट एनर्जी’ दिली जाते. यात निर्माण होणारी उष्णता केसांची मुळे नष्ट करते. समस्या जेवढी गंभीर असेल तेवढे दिवस अपेक्षित परिणाम साधण्यासाठी लागतात. ६ ते १० बैठकीत सुमारे ८५ टक्के केस काढता येतात. १५ टक्के केस तसेच राहिले तरी तिथे पातळ लव तयार होते. त्यामुळे ते ब्लीच केले तरी चालतात.
चंद्रावरचा डाग कवींना चालत असला तरी मुखचंद्रावरचा डाग मात्र आत्मविश्वास खच्ची करतो. अनेक स्त्रियांच्या गालावर किंवा नाकावर, गर्भवती असताना, संततिनियमनाच्या अगर हॉर्मोन रिप्लेसमेंटच्या गोळ्या घेत असताना काळे डाग पडतात. वृद्ध स्त्री-पुरुषांच्या अंगावर तपकिरी रंगाचे (एज स्पॉट्स) डाग नव्याने दिसू लागतात. विशिष्ट जातीच्या गोऱ्या त्वचेवर तांबूस विटकरी डागांचा सडा पडलेला असतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर निळसर काळ्या जन्मखुणा तर काहींना पूर्वी हौसेने काढून घेतलेलं गोंदण आता नको झालेलं असतं. अशा सर्व रुग्णांसाठी आय.पी.एल. (इन्टेन्स पल्स लाइट)चा वापर केला जातो. त्यामुळे डाग हळूहळू फिके पडत जातात आणि शेवटी आजूबाजूच्या त्वचेत मिसळून जातात. आय.पी. एल. खरंच इन्टेन्स ch16असल्यानं २ सीटिंगमध्ये १ महिन्याचं अंतर ठेवावं लागतं. ५-६ वेळा हा उपचार घेतला की बहुधा इच्छित फळ मिळतं.
चेहऱ्यावर येणारे मस दिसायला कुरूप असतातच, पण ते विषाणूंमुळे उगवत असल्याने त्यांचा प्रसारही होत असतो. पापण्यांवरचे मोठे मस तर डोळाही नीट उघडू देत नाहीत. वजनामुळे खाली घसरून थेट दृष्टिपथात मधेच येतात. गोऱ्या गालावरचा छोटासा तीळ सौंदर्यात भर घालत असला तरी वेडेवाकडे मोठे तीळ (निव्हस) काही चांगले दिसत नाहीत. त्यांच्यावर तर केसही उगवतात. चामखीळ (स्किन टॅग) हा असाच एक विद्रूप प्रकार आहे. या छोटय़ा गोष्टींनी एकंदर प्रकृतीला त्रास होत नसला तरी मनस्ताप होतो. यावर उपाय म्हणजे रेडिओफ्रिक्वेन्सी मशीन, ज्याच्या साहाय्याने भूल वगैरे न देता चेहरा,
गळा आणि काखेतल्या मस किंवा चामखिळीचा नायनाट करता येतो. तळपायावर भोवरी (कॉर्न) होणे,
पावलाची त्वचा काही ठिकाणी जाड होणे, अशा गोष्टी चालणं वेदनामय करतात. त्यावर उपाय आहे क्रायो थेरपी. अतिशीत तापमानाला द्रवरूप झालेल्या नायट्रोजन वायूचा उपयोग एखाद्या धारदार पात्यासारखा करून जाड त्वचा घासून पातळ करता येते.
तोंडावरची मुरुमं ही वयात येणाऱ्या मुलामुलींना अत्यंत मनस्ताप देणारी गोष्ट आहे. मुरुमांच्या फोडांनी भरून गेलेला चेहरा मूळचा कितीही सुंदर असला तरी ‘अरेरे!’ म्हणायला लावतो. मुरुमांचं हे कुरण रासायनिक पद्धतीनं साफ करता येतं. यासाठी वापरतात अल्फा हायड्रॉक्सी पायरुव्हिक अॅसिड, सलिसिलिक अॅसिड, ट्राय क्लोर अॅसिटिक अॅसिड अशी रसायनं. या आम्ल पदार्थानी त्वचेवरच्या पेशी नष्ट होऊन गळून पडतात आणि खालची कोमल अंत:त्वचा बाहेर दिसू लागते. मुरुमांचे व्रण तर नाहीसे होतातच, पण कात टाकलेल्या सापासारखा चेहरा तुकतुकीत तेजस्वी दिसू लागतो. या उपचाराला केमिकल पील म्हटलं जातं. अर्थात ही ट्रीटमेंट अनुभवी डॉक्टरांनीच करायला हवी, अन्यथा त्वचा अगदी खालच्या थरापर्यंत जळण्याचा धोका असतो. १५ दिवसांतून एकदा असा ७-८ वेळा तरी हा उपचार करावा लागतो.
केमिकल पील या उपचाराला अलीकडे दुसरा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला म्हणतात लेसर रीसरफेसिंग. यासाठी कार्बन डायोक्साइड फ्रेक्शनल लेसर किरण वापरतात आणि त्वचेचा डागाळलेला, खड्डे पडलेला भाग वरचे पेशींचे काही थर नष्ट करून तिथली त्वचा नितळ गुळगुळीत बनवतात. यामुळे चेहऱ्याला नवसंजीवनी मिळते. रीसरफेसिंगची क्रिया काहीशी रस्ते बनवणाऱ्या मशीनसारखी असते. चेहऱ्यावर वयपरत्वे उमटणाऱ्या रेघा, सुरकुत्या काढून चेहरा अधिक तरुण, टवटवीत बनवणारी ही ट्रीटमेंट वय होण्याची प्रक्रियाच जणू थांबवते.
वय होतं तसं त्वचेखालील मेद आणि कोलाजेन नावाचा पदार्थ कमी होऊन त्वचा सैल पडते आणि म्हातारी दिसू लागते. अशा सैल त्वचेला भराव देऊन पुन्हा घट्ट करण्यासाठी फिलर्स म्हणजे खड्डे भरणारी द्रव्यं आली आहेत. सुरुवातीला कोलाजेन पदार्थाचंच इंजेक्शन त्वचेखाली दिलं जायचं. पण त्याला तीव्र अॅलर्जी येण्याचं प्रमाण जास्त असल्यानं त्याचा उपयोग मागे पडला. आता यासाठी हायल्युरॉनिक अॅसिड हा जेलीसारखा पदार्थ वापरतात. नाक आणि ओठांच्या मध्ये, दोन भुवयांमध्ये, कपाळावर, हनुवटीपासून खाली गळ्यावर बहुधा त्वचा सैल आणि वयस्कर दिसत असते, तिथं तिथं हे इंजेक्शन सफाईने दिलं जातं. परिणाम ताबडतोब दिसतो. सुरकुत्या नाहीशा होतात, तो भाग ताणला गेल्यामुळे तजेलदार दिसतो. याला ऑपरेशन थिएटर किंवा भूल देण्याची गरज नाही. क्लिनिकमध्ये करता येण्यासारखा हा उपचार आहे.
सुरकुत्या घालवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बोटॉक्स. त्वचा केवळ कोलाजेन कमी झाल्यामुळे सैल पडते आणि सुरकुतते असं नाही, तर वारंवार हसणे, डोळे मिचकावणे, आठय़ा घालणे, भुवया आक्रसणे अशा विविध भावदर्शक स्नायूंच्या हालचालींनीसुद्धा सुरकुत्या पडतात. हे स्नायू शिथिल करायचं काम बोटॉक्स करतं. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जंतूंपासून मिळणारा हा पदार्थ त्वचेखाली इंजेक्शनच्या रूपात दिल्यावर तिथले स्नायू शिथिल पडतात आणि चेहरा गुळगुळीत दिसायला लागतो. मात्र अशा चेहऱ्यावर भावभावनांचा खेळ दिसू शकत नाही. अनेक फिल्मस्टार्स ही ट्रीटमेंट करून घेतल्यावर पुतळ्यासारखे भावशून्य का दिसतात हे आता समजलंच असेल! बोटॉक्सचा परिणाम ६ महिने टिकतो. त्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट घ्यावी लागते.
वर नमूद केलेले बहुतेक उपचार खर्चीक आहेतच, शिवाय त्यांचा परिणाम ठरावीक कालावधीपर्यंत असल्याने ते पुन्हा घ्यावे लागतात. पारंपरिक विचारसरणीच्या, निसर्गक्रम मान्य करणाऱ्यांना अशा उपचारांची गरज वाटली नाही तरी आपल्या रूपाबद्दल जागरूक असणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. आणि त्वचासौंदर्याची उपचार केंद्रंही तशीच वाढत आहेत. कुरूप चेहऱ्यामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्यांना असे उपचार म्हणजे वरदानच आहे.
या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ. दिलीप शाह, एम.डी., त्वचारोगतज्ज्ञ
डॉ. लीली जोशी

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो