News Flash

स्मृती आख्यान : ‘नाव’स्मरण

ज्येष्ठांबरोबर तरुण मंडळींनाही भेडसावणारा हा अनुभव अनेकदा अडचणीत टाकतो. त्यातून पळवाटा शोधल्या जातात.

मंगला जोगळेकर mangal.joglekar@gmail.com

‘चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय.. पण नाव काही केल्या आठवत नाहीये!’ असा प्रसंग जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. काहींच्या बाबतीत हे वारंवार घडतं. ज्या व्यक्तींना आपण एकाहून अधिक वेळा भेटलो, बोललो, त्या पुन्हा समोर आल्यावर त्यांची नावं न आठवल्यामुळे आपली स्वत:वर चिडचिड होते. कित्येकदा त्या समोरच्या व्यक्तीला हा अपमान वाटतो आणि त्यांचा गैरसमज झाल्यामुळे आपण अधिकच ओशाळतो. पण नावं लक्षात ठेवण्याचेही काही साधे उपाय आहेत. प्रत्येक जण थोडय़ाफार प्रमाणात ते वापरतच असतो. त्यांचा जाणीवपूर्वक वापर केला तर ‘नाव’स्मरण नक्की साध्य होईल. 

आप्पासाहेब कुठल्याशा कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम चांगलाच रंगला होता. मध्यंतरात पाठीवर कुणाची तरी थाप पडली. ‘‘काय आप्पासाहेब, कसं काय?’’ म्हणून ती व्यक्ती बोलतच राहिली. बोलण्यावरून चांगली ओळख असावी, गृहस्थ घरीसुद्धा येऊन गेले असावेत असं दिसत होतं. आप्पासाहेबांना मात्र काही केल्या त्यांची ओळख पटेना. कुठं पाहिलंय यांना? कधी बोललो आहे मी यांच्याशी?  काहीच आठवत नव्हतं. शेवटी आप्पासाहेबांचा गोंधळलेला चेहरा बघून त्या गृहस्थांनीच सांगितलं, ‘‘अहो, मी तुमच्या शेजारच्या वसंतरावांचा भाऊ.’’ वसंतरावांचा इतक्या वर्षांचा शेजार, त्यांच्याकडे नेहमी येणारा, मी इतक्यांदा बघितलेला हा माणूस! आप्पासाहेबांना इतकं ओशाळवाणं झालं की पुढच्या कार्यक्रमात त्यांचं लक्षच लागेना.

विस्मरणाचे अनुभव येणाऱ्या जवळजवळ नव्वद टक्के लोकांना ‘चेहरा आठवतोय, पण नाव लक्षात येत नाही’ असा प्रसंग ओळखीचा असतो. नाव न आठवणं ही सर्वानुमते विस्मरणाची एक मोठी समस्या मानली जाते. विस्मरणाचे इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यापुढे किरकोळ समजले जातात. व्यक्तीला न ओळखणं म्हणजे एक प्रकारे त्याचा अपमान करण्यासारखं आहे, असं सर्वसाधारणपणे समजलं जात असल्यानं या प्रश्नाला इतर प्रश्नांच्या तुलनेत मोठं समजत असावेत. या प्रश्नामुळे स्वत:च्या स्मरणशक्तीवरचा आपला विश्वास उडाला, असंही बऱ्याच जणांना वाटून त्यातून स्वत:ची काळजी वाढू लागते.

ज्येष्ठांबरोबर तरुण मंडळींनाही भेडसावणारा हा अनुभव अनेकदा अडचणीत टाकतो. त्यातून पळवाटा शोधल्या जातात. समोरच्या माणसाला आपण ओळखलेलं नाही, हे त्याला समजू नये म्हणून खोटं हसणं, पावसापाण्याच्या गप्पा मारणं, हळूच बायकोला विचारणं, नाही तर मित्रांची ढाल वापरणं अशी एखादी युक्ती वापरायला आपण शिकतो. चक बेरी हा अमेरिकेतील एक राजकीय नेता कुणाशीही बोलताना त्याला ‘जॅक’ म्हणून संबोधायचा. तर झा झा गबोर ही नटी कुणाशीही बोलताना वाक्याची सुरुवात ‘डार्लिग’ या संबोधनानं करायची. प्रसिद्ध नटीनं आपल्याला ‘डार्लिग’ म्हणणं हा किती रोमांचकारी अनुभव! पण कधी कधी कशाचाही उपयोग न होऊन कात्रीत सापडू असे प्रसंग घडतात आणि लाजिरवाणं होतं.

माझ्या क्लासमध्ये आलेले एक जण मला सांगत होते, ‘‘आपलं स्मरण कमी झालं असेल असं म्हणावं, तर इकडे कॉलेजच्या रूममेटच्या मित्रांची नावंसुद्धा आठवत असतात. गेल्या महिन्यात ‘गंप्या’ (गणपुले) पंचवीस वर्षांनी भेटला, मी खाडकन त्याचं नाव सांगितलं. तोदेखील अवाक झाला! गंप्याबरोबर बोलताना कुणाकुणाच्या आठवणी निघाल्या. ‘भाट’ (भाटिया), ‘रहाट’ (रहाळकर), ‘सुंदर’ (सुंदरेश्वरन) या सगळ्यांची नावं ते काल भेटल्यासारखी खडाखडा तोंडावर येत होती.  त्यांनी ही उदाहरणं देऊन नावं कशी लक्षात ठेवायची याची एक युक्तीच सांगितली होती.

कुणाला टोपणनाव देणं, कुणाच्या शारीरिक किंवा इतर लकबींवरून उपनाव देणं, नावाचं छोटं स्वरूप करणं, अपभ्रंश करणं, नावाशी अनुप्रास जुळवणं, यातून नावं लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणूनच ‘कोंबडय़ा’, ‘बुटक्या’, ‘गिरणी’, ‘रडूबाई’, ‘तडतडी’, ‘डेक्कनक्वीन’, ‘मोरू’, ‘जगदंबा’ आणि बरीच (त्यातली काही इतरांना न सांगण्यासारखीही) अशी आपल्या बालपणापासूनची प्रिय नामावली तत्काळ स्मरते. तीसुद्धा त्या व्यक्तीच्या इतिहासासकट! तात्पर्य काय, तर अशा रीतीनं व्यक्तीचं नाव लक्षात ठेवणं ही एक हुकमी युक्ती आहे. पण इतरांना आपण दिलेली टोपणनावं त्यांना समजू नयेत म्हणून काळजी मात्र घ्यायला हवी! कारण शारीरिक व्यंगावरून ओळखलं जाणं अनेकांसाठी न्यूनगंडाचं कारण ठरू शकतं.

तुमच्या व्यवसायामध्ये नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं असेल तर नावं लक्षात ठेवण्याच्या कामात तुमचा मेंदू विशेष लक्ष घालतो असं तुम्हाला आढळून येईल. शिक्षण क्षेत्रात काम करणारे, विक्री आणि विपणन क्षेत्रात काम करणारे, यांना नावं लक्षात ठेवण्याची खुबी जमलेली असते. ज्यांचा कामानिमित्तानं खूप जनसंपर्क असतो तेही यात पारंगत असतात. गेल्या आठवडय़ात आम्ही एका अडीचशे फ्लॅट्स असलेल्या सोसायटीमध्ये गेलो होतो. तिथल्या रखवालदाराला आम्ही ‘फ्लॅट नंबर २१२ कुठे आहे?’ असं विचारलं. त्यावर त्यानं ‘जुनेजांकडे जायचं आहे का?’ असं उलटं विचारलं. कौतुक वाटावं अशीच या लोकांची नावांबाबतीतील स्मरणशक्ती असते. तीसुद्धा त्यासाठी कुठलाही प्रयत्न मुद्दामहून न करता!

नावांच्या बाबतीतील आणखी एक सर्वसाधारण अनुभव म्हणजे अगदी दहा-पंधरा मिनिटांपूर्वी ऐकलेलं नाव विसरणं. समजा तुम्ही एखाद्या लग्न समारंभाला गेले आहात, तिथं कुणाची तरी तुमच्याशी ओळख होते, थोडय़ा वेळानं ती व्यक्ती तुमच्यासमोर येते, पण तिचं नाव अजिबात तोंडावर येत नाही. तुम्हीदेखील घेतला आहे ना हा अनुभव? त्या वेळी साहजिकच चक्रावल्यासारखं होतं. असे प्रसंग टाळण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो. पुष्कळ वेळेला त्या व्यक्तीचं नाव मुळातच आपल्याला नीट कळलेलं नसतं, कधी कधी नाव आपल्या ओळखीचं नसतं. कधी आपण आजूबाजूच्या गोंधळात ते नीट ऐकत नाही. कारण काहीही असो, जर नाव अंदाजानंच समजलेलं असेल तर ते आठवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपल्याला नाव नीट समजलं आहे याची खात्री केल्यामुळे हा प्रश्न टाळणं आपल्या हातात असतं.

नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलताना त्या नावाचा संभाषणात पुन्हा पुन्हा वापर केल्यानं ते नाव मनातल्या मनात गिरवल्यासारखं होतं. त्यामुळे ते लक्षात राहाण्याची शक्यता जास्त असते. उदा. हे एका व्यक्तीचे भोवतालच्या व्यक्तींशी घडलेले संवाद पाहा. ‘‘निनावे, पण मी असं म्हणत होतो..’’, ‘‘आत्ताच निनाव्यांशी ओळख झाली..’’, ‘‘हे माझे मित्र घोलप. निनावे कोथरूडमध्ये राहातात.’’ अशी बोलता-बोलता त्या नावाची आपोआप उजळणी होते.  ओळख झालेल्या व्यक्तीबद्दल माहिती जमा करण्याच्या चौकस सवयीमुळेही नाव लक्षात राहाणं सोपं होतं. परवा माझी ज्या बाईंशी ओळख झाली त्या माझ्या मामीला ओळखत होत्या. शिवाय त्यांच्या सुनेचं माहेर मी राहाते त्याच भागात होतं. अशी काही माहिती मिळाली की त्या व्यक्तीच्या नावाबरोबर ती जोडली जाते. जितकी त्या व्यक्तीसंदर्भातील मेंदूमधील फाइल मोठी मोठी होत जाईल, तितकं ते नाव आठवण्याची शक्यता जास्त होईल.

नाव लक्षात ठेवण्याबाबतचा आणखी एक हुकमी एक्का म्हणजे त्या व्यक्तीमधील खासियत शोधून ती त्याच्या नावाला जोडणं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही तरी वैशिष्टय़ असतंच. कुणाचं कपाळ भव्य असतं, कुणाचं नाक मोठं असतं, कुणाचे डोळे मोठे असतात, कुणाच्या भुवया जाड असतात, कुणाचे दात एकसारखे असतात. हे वेगळेपण शारीरिकच असायला पाहिजे असंही नाही. तुम्हाला असं लक्षात येईल, की कुणी खांद्याला शबनम बॅग अडकवल्याशिवाय कुठं जात नाही. कुणी साडी कुठलीही असली, तरी त्यावर पांढराच ब्लाऊज घालतं. कुणाला कानात रिंग घालायला फार आवडतात. कुणाची बोलण्याची धाटणी विशिष्ट असते. एकदा वेगळेपण शोधायची सवय लावून घेतली की डोळे आपोआप ते शोधतात. ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटेल, त्या वेळी त्याच्यातील ती खास गोष्ट दिसली रे दिसली की नाव आठवणार नाही असं होण्याची शक्यता खूपच कमी होईल. वेगळेपण व्यक्तीच्या नावाला डकवण्याच्या कलेमध्ये सवयीनं निष्णात होता येतं. स्मरणशक्तीचे तज्ज्ञ एकेका वेळी शंभर, दोनशे नावं लीलयेनं स्मरण्याची प्रात्यक्षिकं दाखवतात त्या वेळी ते हीच युक्ती वापरून आपल्याला मंत्रमुग्ध करत असतात.

कधी कधी आपण नवीन ऐकलेलं नाव दुसऱ्या कुणाच्या तरी नावासारखं असतं.

उदा. तुम्हाला एक घाटपांडे माहीत असतात आणि घाटगे नवीन ओळखीचे होतात. अशा वेळी घाटगे आणि घाटपांडे या दोन नावांची एकमेकांशी केलेली तुलना घाटगे हे नाव आठवणीत राहायला मदत करेल. किंवा नवीन माहिती झालेल्या शेवडय़ांचं आणि अगोदरपासून ओळखीच्या असलेल्या कान्हेरेंचं पहिलं नाव एकच असतं. चेतन शेवडे लक्षात ठेवण्यासाठी चेतन कान्हेरेच्या नावाशी केलेल्या त्याच्या तुलनेमुळे दोन्ही चेतन खात्रीनं लक्षात राहातील. या दोन्ही उदाहरणांमध्ये मेंदूमध्ये पहिल्यापासून असलेल्या माहितीशी नवीन माहिती जोडण्याचा आपण प्रयत्न केला. या जोडकामामुळे घाटगे आणि चेतन शेवडे ही नावं लक्षात राहायला मदत होईल.

एखाद्या ठिकाणी नियमित भेटणारी व्यक्ती त्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या ठिकाणी भेटल्यावरही ओळखीचा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे भाजी बाजारात भेटणाऱ्या व्यक्ती वेगळ्या असतात, योगाच्या क्लासला भेटणाऱ्या वेगळ्या आणि नातीच्या बालवाडीत भेटणाऱ्या व्यक्ती वेगळ्या. योगाच्या क्लासला येणारी व्यक्ती बाजारात दिसली की चटकन ध्यानात येत नाही; परंतु योग क्लासमध्ये मात्र असं होत नाही. याचं कारण एखाद्या ठिकाणाची आणि तिथं भेटणाऱ्या व्यक्तींची मेंदूनं सांगड घातलेली असते.

एखाद्या वेळी सावकाशीनं बसून अशी नावं गटानुसार लिहून काढावीत. मनात त्यांचं चित्रही नावाशी जोडावं. त्या चित्राला गटाबाहेर काढून जोडय़ा लावण्याचा काल्पनिक खेळ खेळावा. अशा खेळाचा फायदा झाल्याशिवाय राहात नाही. साधं डायरीत ओळखीच्या माणसांची नावं लिहून ठेवून मधून मधून ती वाचली, तरी नावांच्या स्मरणात बरीच सुधारणा झाल्याचं दिसून येईल.

या सर्व चर्चेवरून असं लक्षात येईल, की नाव लक्षात ठेवण्याच्या क्लृप्त्या अनेक आहेत. (तुम्हीही काही शोधल्या असतीलच.) त्यापैकी तुम्हाला कुठल्या आवडतात आणि तुम्हाला कशाचा अधिक फायदा झाल्यासारखं वाटतं ते वापरूनच समजेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 1:05 am

Web Title: smruti akhyan simple tips to remember names tips for remembering names zws 70
Next Stories
1 जगणं बदलताना : ब्रेकअप वेकअप!
2 पुरुष हृदय बाई : प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेला पुरुष
3 जोतिबांचे लेक : समानतेचा पाया रचताना..
Just Now!
X