मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘मराठी  माध्यमातून शिकल्याचा मला फायदाच झाला. मी माझ्या संस्कृतीशी जोडलेली राहिले. संस्कृतीशी माझी नाळ घट्ट झाली, त्यामुळे मला आपली पैठणी कळली. माझं पैठणीचं इंडो वेस्टर्न फ्युजन आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील लोकप्रिय आहे. मी आपली संस्कृती जागतिक पातळीवर नेऊ शकले.  पण इंग्रजीतून शिकताना विषयांची पकड यावी यासाठी वेगळे प्रयत्नही के ले. शाळेत इंग्रजी विषय पाचवीपासून असल्याने वर्गात शिकवलेलं सहज समजायचं, पण ते इंग्रजीतून नीट मांडता येण्यासाठी मेहनत घेतली. मी दररोज वाचनालयात विषयाशी संबंधित दोन-तीन पुस्तकं आणि शब्दकोश घेऊन बसायचे. शिकवलेल्या अभ्यासाची शक्यतो त्याच दिवशी उजळणी करायचे. त्यामुळे इंग्रजीवरही पकड मिळवता आली..’’

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
ग्रामविकासाची कहाणी

वस्त्रांचा झगझगाट, कॅमेऱ्यांचा लखलखाट, रॅम्पवरून दिमाखात चालत येणाऱ्या सौंदर्यवती, ‘हाय बेब, डय़ूड’ अशा शब्दांचा चित्कार, अशा ‘पेज थ्री’ संस्कृतीमध्ये एक मुलगी आत्मविश्वासाने वावरत आहे, राजधानी दिल्लीत ‘इंडिया रनवे’ या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या ‘फॅशन शो’मध्ये ती आपलं सादरीकरण करत आहे, अंकुश चौधरी, शुभांगी गोखले, सायली संजीव, तौफिक कुरेशी अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती जिचे नियमित ग्राहक आहेत, फॅशन जगतात जिने पैठणीची ‘इंडो वेस्टर्न’ वस्त्रे हा नवीन मापदंड  निर्माण केला आहे, ती एक मराठमोळी मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी, सोनिया सांची.  मराठी माध्यमात शिकून आज त्यांनी ग्लॅमरस फॅशन इंडस्ट्रीत चांगलंच बस्तान बांधलं आहे. यासाठी त्यांना सुरुवातीच्या काळात इंग्रजीशी सातत्याने सामना करावा लागला. कसा होता तो प्रवास याविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न : सोनियाजी, तुमचं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये  पूर्णपणे मराठी माध्यमातून झालं. अकाऊंट्सची आवड असल्याने तुम्ही दहावीनंतर माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयातून पदवी संपादन केली. त्या वेळी  सर्व विषय पूर्णपणे इंग्रजीतून सामोरे आले असतील.  या मोठय़ा बदलाशी तुम्ही कसं जुळवून घेतलंत?

सोनिया : आत्तापर्यंत पूर्णपणे मराठी माध्यम आणि आता पूर्णपणे इंग्रजी माध्यम, सभोवतालचं इंग्रजाळलेलं वातावरण हा बदल जरा बुजायला लावणारा होता. मला आजही माझा अकरावीचा पहिला दिवस तसाच्या तसा आठवतो आहे. आमचा वर्ग मराठी भाषिक मुलांचा होता. आमच्या वर्गशिक्षिका वर्गात आल्या. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते मी कधीही विसरणार नाही. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही महाविद्यालयामधलं आजूबाजूचं वातावरण, ‘फाडफाड’ इंग्रजी बोलणारी मुलं बघून घाबरून जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल, की ही इंग्रजी बोलणारी मुलं खूप हुशार आहेत. ती हुशार असतीलही, पण त्या हुशारीचा आणि त्यांच्या इंग्रजी बोलण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. ते इंग्रजी जोमाने बोलत असले तरी व्याकरणात्मकदृष्टय़ा ते बरोबर असतंच असं नाही. त्यामुळे तुम्ही सर्व पूर्वग्रह डोक्यातून काढून टाका. आज जी गोष्ट तुम्हाला नवीन वाटत असेल, ती काही काळाने जुनी झालेली असेल. तुम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी, चांगला अभ्यास करण्यासाठी आला आहात. कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि अभ्यासावर भर द्या,’’ अशा अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला नीट समजावून सांगितल्या. त्यामुळे आमचा बुजरेपणा जाण्यास मदत झाली आणि आमचं ध्येय डोळ्यांसमोर स्पष्ट  झालं.

प्रश्न : विषय समजून घेणं, त्यांची तयारी या गोष्टी कशा आत्मसात केल्या?

सोनिया : कोणतीही गोष्ट करायची तर नीटच करायची, त्यात आपले दोनशे टक्के  द्यायचे असा माझा स्वभाव आहे. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. शाळेत इंग्रजी विषय पाचवीपासून असल्याने वर्गात शिकवलेलं सहज समजायचं, पण ते इंग्रजीतून नीट मांडता येण्यासाठी मेहनत घेतली. मी दररोज वाचनालयात विषयाशी संबंधित दोन-तीन पुस्तकं आणि शब्दकोश घेऊन बसायचे. शिकवलेल्या अभ्यासाची शक्यतो त्याच दिवशी उजळणी करायचे. त्यामुळे विषयांवर पकड यायला लागली.

प्रश्न : विषयावर पकड तर आली, पण मित्रमैत्रिणींशी बोलताना आपण कुठे कमी पडत आहोत असं कधी वाटलं का? विशेषत: ‘फाडफाड’ इंग्रजी बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींशी  संवाद साधताना?

सोनिया : अभ्यासाबरोबरच आमच्या

शिक्षिके ने आम्हाला आणखी एक सल्ला दिला होता, तो म्हणजे एकमेकांशी जमेल तसं, न घाबरता इंग्रजीतून बोलण्याचा. तो आम्ही अमलात आणला. शाळेमुळे आमचं इंग्रजी भाषेचं व्याकरण तयार झालेलं होतंच. कोणतीही भाषा बोलून बोलून सरावाने जमते. त्यानुसार आम्ही सहजपणे इंग्रजी बोलू लागलो. शिवाय बी.कॉम.बरोबरच मी सी.ए.पण करत होते. आर्टिकलशिपमधूनही माझं इंग्रजीचं ज्ञान वाढत होतं.

प्रश्न : पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही नोकरी करायला सुरुवात केलीत. तेव्हा मुलाखतीच्या वेळी काय अनुभव आला?

सोनिया :  मी दादरला एका प्रख्यात रुग्णालयात एक वर्ष नोकरी केली. तेव्हा मुलाखत दोन-तीन पातळ्यांवर आणि तीही इंग्रजीमधून झाली होती. तो माझा पहिला अनुभव होता. त्या वेळी एक गोष्ट लक्षात आली, की तुमची मुलाखत घेणारे तुमचा आत्मविश्वास, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पदाशी संबंधित विषयाचं  तुमचं ज्ञान हे मुलाखतीमध्ये तपासतात. ते तुमचं इंग्रजी तपासण्यासाठी बसलेले नसतात.  त्यापुरतं आवश्यक इंग्रजी बोलणं आपल्याला जमू शकतं. तुम्ही कुठून आला आहात, मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम हे तुमच्या यशाच्या आड येत नाही.

प्रश्न : वा! म्हणजे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यासाठी भाषा अडथळा बनून येत नाही.

सोनिया : अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या कामात पक्के असाल, कामात स्वत:ला झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करत असाल तर यश तुमच्याकडे येतंच. रुग्णालयात एक वर्ष नोकरी केल्यानंतर मी बँकिंग क्षेत्राकडे वळले. एच.डी.एफ.सी. या मोठय़ा बँकेत माझी निवड  झाली.

प्रश्न : म्हणजे तुमचा कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश झाला. तिथलं वातावरण कसं होतं?

सोनिया : इथे जरा वातावरणात बदल झाला. तिथे चकचकीत, इंग्रजीचा जास्त पगडा असलेलं वातावरण होतं. सुरुवातीला थोडं दडपण आलं त्या सर्व वातावरणाचं. पण मी मनाशी एक पक्की खूणगाठ बांधली. आपण जे काम करण्यासाठी आलो आहे ते भाषेचा बाऊ मनात, डोक्यात न ठेवता सर्वस्व झोकून देऊन करू या. आपलं काम बोलेल, तेच आपली ओळख निर्माण करेल. तिथे सतत इंग्रजी बोलावं लागायचं. पण न घाबरता, निरीक्षण करत बोलत राहिले. ग्राहकांशी संवाद साधताना मी त्यांच्या भाषेतून थोडंसं अनौपचारिकसुद्धा बोलत असे. म्हणजे ‘काय काका, जेवलात का? गावावरून कधी आलात?’ वगैरे वगैरे. यातून त्यांच्याशी जोडलं जायला खूप मदत झाली. कारण संवाद म्हणजे फक्त भाषा आणि भाषेतील शब्द नसतात तर तुम्ही दुसऱ्यांशी कसं बोलता, त्यांना समजून घेऊन त्यांना मदत कशी करता, त्यांच्याशी जोडले कसे जाता हे महत्त्वाचे असते. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की इथे आल्यानंतर सहा महिन्यांतच एक उत्पादन विकण्याची स्पर्धा होती, त्यात माझा पहिला क्रमांक आला व एच.डी.एफ.सी.चे प्रमुख आदित्य पुरी यांचं वैयक्तिक पत्र मला मिळालं. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. मला नऊ वर्षांत सहा बढत्या मिळाल्या. ज्या वेळी मी बँकिंग क्षेत्राला रामराम केला, त्या वेळी मी वरिष्ठ व्यवस्थापक या उच्चपदावर होते. त्या वेळी माझा अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, अध्यक्ष अशा सर्वोच्च पातळीवरच्या लोकांशी कायम संबंध यायचा.

प्रश्न : एवढय़ा मोठय़ा पदावर असताना तुम्ही छान स्थिरावलेलं बँकिंग क्षेत्र सोडून अचानक फॅशनच्या नवीन ग्लॅमरस क्षेत्रात आलात.

सोनिया : अचानक नाही. ती माझी पहिल्यापासूनची आवड होती. मी स्वत:चे व घरच्यांचे कपडे डिझाइन करत असे. ते लोकांना, नातेवाईकांना आवडत. मी माझ्या छंदाचं रूपांतर व्यवसायात करण्याचा निर्णय घेतला आणि माझं ब्युटिक सुरू केलं.

प्रश्न : फॅशनची ही जादूई वाटणारी चकचकीत दुनिया आणि मराठी माध्यमात शिकलेली मुलगी हे समीकरण कसं जुळलं?

सोनिया :  छान जुळलं! मी नेहमी म्हणते, की आपली ओळख निर्माण करायची असेल तर आपल्याला फार बोलावं नाही लागत. आपलं काम बोलतं. आज माझे अनेक भारतीय तसेच परदेशी ग्राहक आहेत. मी सहजपणे त्यांच्याशी संवाद साधू शकते. माझं ब्युटिक असलेल्या ठिकाणी अन्य भाषिक व्यावसायिक आहेत. ते परदेशी ग्राहकांशी व्यवहार करताना मला मदतीसाठी बोलावतात. मला फॅशन जगतातील स्पर्धामध्ये परीक्षक किंवा प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रणे येतात. मी लॅक्मे फॅशन वीकसारख्या कित्येक शोज्ना जाते, तेव्हा मी इतरांचं काम लक्षपूर्वक न्याहाळते, माझं काम बघून लोक स्वत:हून माझी चौकशी करत येतात. या पेशात मी आता स्थिरावले आहे. मला वाटतं, की मराठी माध्यमात शिकल्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. कारण प्राध्यापकबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यासावर भर दिला. इंग्रजी माध्यमात शिकले असते तर कदाचित माझ्यात फाजील आत्मविश्वास निर्माण झाला असता.

प्रश्न : ..पण फॅशनच्या क्षेत्रात त्याचा फायदा झाला असता असं नाही वाटत तुम्हाला?

सोनिया : अजिबात नाही. माझ्याबरोबरच्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या व आमच्या  यशात तफावत नाही. उलट त्या मुलांच्या घरी मराठी व शाळेत इंग्रजी असल्याने त्यांचा गोंधळ होत असे. आज मला जाणवतं की मातृभाषेतून शिकल्याने माझ्या डोक्यात संकल्पना पक्क्या बसलेल्या आहेत. पाया भक्कम झाला आहे. आणि पाया भक्कम असेल तर तुम्ही त्यावर ताजमहल, आयफेल टॉवर काय हवं ते बांधू शकता. माणसाचा विचार नेहमी मातृभाषेतून होत असतो. समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे हे एकदा समजलं की डोक्यात पक्कं होतं आणि मग ते सहजपणे प्रत्यक्षात आणता येतं. तुमच्यामध्ये आपोआप आत्मविश्वास निर्माण होतो. शिवाय कोणतीही भाषा आपण कधीही शिकू शकतो.

प्रश्न : मग आजचे पालक मुलांना मराठी माध्यमात घालण्यासाठी का बिचकतात असं तुम्हांला वाटतं?

सोनिया : मला असं वाटतं की इंग्रजी शाळांमधल्या जशा सोयी असतात तशा मराठी शाळेत आजच्या पालकांना आणि मुलांना हव्या आहेत. पालकांच्या शाळेबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काळानुरूप मराठी शाळांचा दर्जा वाढवण्याची गरज आहे.

प्रश्न : म्हणजे काय केलं पाहिजे?

सोनिया : मी तुम्हाला एक उदाहरण देते. आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांची एक ‘गुरुदक्षिणा’ नावाची संस्था  स्थापन केली आहे. आम्ही फक्त शाळेची रंगरंगोटी करून थांबलो नाही, तर अद्ययावत सुविधा पण दिल्या. प्रत्येक वर्गात व्हाईट बोर्डस्, प्रक्षेपक दिले. मुलांसाठी संगणक कक्ष बनवला. आम्ही शाळेत वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना बोलावून संवाद घडवून आणतो, कार्यशाळा आयोजित करतो. अशा विविध गोष्टी मराठी शाळेत आल्या तर लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल.

प्रश्न :  मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने काय कमावलं आणि काय गमावलं?

सोनिया : काहीच गमावलं नाही, उलट खूप कमावलं मी. मराठी  माध्यमातून शिकल्याचा मला फायदाच झाला. मी माझ्या संस्कृतीशी जोडलेली राहिले. त्यामुळे मला आपली पैठणी कळली. माझं पैठणीचं ‘इंडो वेस्टर्न फ्यूजन’ आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील लोकप्रिय आहे. मी आपली संस्कृती जागतिक पातळीवर नेऊ शकले. इंग्रजी माध्यमातून शिकले असते तर ही नाळ जोडलेली राहिली नसती. आज माझ्या आवडीच्या क्षेत्रात माझी स्वत:ची ओळख निर्माण झाली आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे.