डॉ. शुभा थत्ते thatteshubha@gmailcom

आजच्या करोना काळात आई नावाच्या बाईचा क स लागतो आहे. कसोटीचे प्रसंग रोजच येत आहेत. त्यातूनही सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न ती करते आहे. कधी एकाच वेळी अनेक व्यवधानं सांभाळत तर कधी घर आणि ऑफिस यांच्यात सुवर्णमध्य साधत. कधी थकू न, निराश होत, तर कधी कधी प्रचंड ऊर्जेनं, उत्साहानं. करोना आपल्या माणसांपर्यंत येऊ नये म्हणून शर्थीनं प्रयत्न करत आहे. घरात आणि प्रत्यक्ष आरोग्यसेवक बनूनही.. उद्याच्या (९ मे) जागतिक ‘मदर्स डे’च्या निमित्तानं खास लेख.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

करोना आटोक्यात येतोय.. लवकरच सगळं सुरळीत होईल.. असं वाटत असतानाच करोना साथीची दुसरी लाट आली आणि टाळेबंदीच्या काळातली परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. यात आधीच्या काय किं वा या दुसऱ्या टप्प्यात काय, सर्वात जास्त त्रास भोगला, भोगते आहे ती आई नावाची बाई! आणि त्यातच जर ती नोकरी करणारी असेल- प्रत्यक्ष कामाला जाणारी किं वा अगदी घरून काम करणारी असेल, तर तिच्या कष्टात, मानसिक ताणात भरच पडत गेली. त्यात कहर म्हणजे करोना रुग्ण वाढू लागले. घराबाहेर असलेला करोना अगदी उंबरठय़ावर येऊन पोहोचला. कधी काय होईल, काय ऐकायला मिळेल याची कल्पना नसल्यानं भीतीच्या सावटाखाली आणि आपल्या कु टुंबापर्यंत तो येऊ नये म्हणून दक्षता घेण्यात तिची सारी ऊर्जा खर्ची व्हायला लागली आहे. त्यातूनही ही आई मार्ग काढते आहे. फक्त आपल्या मुलांचीच नव्हे, घरातल्या वृद्धांची, जोडीदाराची काळजी घेत आहे, त्याच बरोबरीनं अगदी शेजाऱ्यांच्या, नातेवाईक, मित्रमंडळीच्या करोनानं धास्तावलेल्या घरात मदतीचा हात देते आहे. ही आजच्या काळातली आई नावाची बाई आहे. आतापर्यंत ती वेगवेगळ्या भूमिका करतच होती, आता करोना काळानं जणू तिला आणखी शक्तिमान के लं आहे.

पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत एक चांगली गोष्ट घडलीय, ती म्हणजे घराघरांत या आईमंडळींचा उजवा हात ठरलेल्या मावशी कामाला येत आहेत. (काही जणांकडे अद्याप तशी परवानगी नाही) त्यामुळे कपडे धुणं, भांडी घासणं, लादी पुसणं यांसारख्या अति शारीरिक कष्टांची सवयच गेलेल्या तिला त्यातून सुटका मिळालीय आणि मावशी नावाच्या आईच्या पैशांवर अवलंबून असलेल्या घराचीही आर्थिक टंचाईपासून सुटका झालीय. अर्थात सुरुवातीला त्यांनाही बिनकामाचा पगार मिळत होता, पण काही काळानंतर नोकरदारांची परिस्थिती कठीण होत गेली. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे पगार कमी झाले. यामुळे धास्तावलेल्या दोन्ही आई मंडळीची परिस्थिती आता पुन्हा नियंत्रणात येऊ लागली आहे. काहींची मात्र अद्याप कसरत सुरूच आहे.

शहरी भागाचा आणि मध्यमवर्गीयांचा विचार करता खरी कसरत ठरते आहे ती अगदी लहान मुलं असणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्या आईची. गेल्या वर्षभरात घरून काम करण्याची सवय झाली असली तरी घरातल्या जबाबदारीच्या आघाडीवर फारसा फरक पडलेला नाही. लहान मुलांसाठी आई घरात असणं हाच मोठा आनंदाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टीत व्यग्र करणं हे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सर्वात मोठी कसरत आहे ती मुलांना पौष्टिक, घरचंच खायला घालणं, त्यांच्या नेहमीच्या गोष्टी सांभाळणं, म्हणजे एका बाजूला घर सांभाळणं, दुसऱ्या बाजूला ऑफिसच्या कामाच्या वेळा सांभाळणं आणि मुख्य म्हणजे या दोहोंमधला तोल सांभाळणं. मनाचा स्विच ऑफ आणि ऑन करणं हे तिला जमणं गरजेचं ठरलं आहे. काही जणींना तो स्विच मिळाला आहे. नवरा नामक व्यक्तीची तिला काही घरांत, काही प्रमाणात मदत मिळते आहे हे मान्य के लं तरी ती मदतच असते. खरी जबाबदारी तिलाच घ्यावी लागते, हे आजचंही दारुण सत्य आहे. त्याचे फारच कमी अपवाद आहेत, तेही बहुतांश परिस्थितीमुळे उद्भवलेले.

यावर नीलमनं एक मार्ग शोधलाय. तिची मुलं जरा जाणत्या वयातली आहेत. तिनं मुलांना स्पष्टपणे सांगितलंय, ‘‘ मी सकाळी एकदाच दोन्ही वेळेस पुरेल इतका स्वयंपाक करून ठेवणार. त्याव्यतिरिक्त ज्याला जे हवं ते त्यानं बनवावं आणि इतरांना विचारून त्यांनाही खिलवावं.’’ नोकरीवर जावंच लागणार आहे आणि घरात लहान मुलांना सांभाळायला कु णीही नाही, अशा परिस्थितीतल्या मेघना, सुनीलानं तर चक्क प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅ मेरा लावून ठेवलाय. न  जाणो, मुलांनी काही गोंधळ घातला तर निदान तो ऑफिसमधेच कळेल तरी.

सध्या आईचा कस आणखी एका गोष्टीसाठी लागतोय तो म्हणजे मुलांचं शिक्षण! गेल्या वर्षभरात ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षांचे जे काही तीनतेरा वाजले ते लक्षात घेता मुलं शिकत आहेत, वरच्या वर्गात जात आहेत, म्हणजे नेमकं  काय याचा अर्थ तिला लागलेला नाही. त्याचा एक वेगळाच ताण तिच्या मनावर आहे. त्यातच चिंतातूर पालकांनी मुलांचे ऑनलाइन क्लासेस सुरु केलेत. परवाच निमा सांगत होती,  ‘‘अगं काय सांगू, मोठी मुलगी दहावीत गेलीय. त्यामुळे तिचे शाळेचे क्लास सकाळी साडेआठ ते दुपारी २ असे चालतात, सगळं घरातूनच होत असल्यानं बाईसाहेब उठणार सव्वाआठपर्यंत नंतर आंघोळीशिवायच ‘लॉग इन’ करणार. तोपर्यंत  पाचवीतली छोटी क्लाससाठी माझ्या फोनवर ‘लॉग इन’ करून मागणार. मुलींच्या बाबाचं ऑफिस जेवणाच्या टेबलावर मांडलेलं आणि त्याला त्या एरियात अजिबात आवाज झालेला चालत नाही.  हे सर्व आमच्या ‘वन बीएचके ’मध्ये कसं सांभाळायचं?’’ हा तिचा प्रश्न अनेकांच्या घरातला आहे. ज्यांच्या घरात दहावी आणि बारावीला बसणारी मुलं आहेत त्यांचं टेन्शन वेगळंच. यंदाच्याच दहावी, बारावीच्या मुलांच्या परीक्षांचं घोंगडं भिजत पडलंय त्यात या नव्या मुलांचं काय होणार याचा घोर त्यांच्या आईच्या जीवाला लागला नाही तरच नवल.  मुलांच्या शिक्षणाबाबत सर्वात मोठी कसोटी या आईमंडळींचीच लागणार आहे. के व्हा ना के व्हा तरी शाळा रीतसर सुरू होणारच आहेत. तेवढय़ा काळात मुलांची नियमित शाळेत जायची सवय मोडलेली आहे. वेळेत उठणं, नियमित शाळेत जाणं, मित्रमंडळींबरोबर एकत्र अभ्यास करणं, डबा खाणं, खेळणं, घरी येऊन गृहपाठ करणं याची तयारी, सवय पुन्हा करून घ्यावी लागणार आहे. मुळात एका वर्गात सलग ३५ ते ४० मिनिटं बाई-सरांचं ऐकत शांतपणे दिवसभर बसणं याचीही सवय नव्यानं करून घ्यावी लागणार आहे. त्यात आईची आणि शिक्षकांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे काही हुशार आणि मुख्यत: आर्थिकदृष्टय़ा सधन असणाऱ्या आई मंडळींनी आत्तापासूनच तास-तास चालणारे छंद वर्ग, योगा क्लास यांची सवय लावून ठेवली आहे.

या घोर लागण्यात आणखी एका गोष्टीनं भरच पडली आहे. ती आहे कुमारवयीन मुलांची. सल्लय़ासाठी येणाऱ्या फोनमध्ये चिंतातुर आई मंडळींचे फोन जास्त असतात. नीता सांगत होती, ‘‘गेलं वर्ष काढलं गं कसं तरी, पण आता पुन्हा टाळेबंदी सुरू झालीय. कधी संपणार हे सगळं याबद्दल कु णालाच काही सांगता येत नाहीये आणि माझा लेक दिवस-रात्र फोन किंवा आयपॅडला चिकटून असतो. तो नेट अ‍ॅडिक्ट नाही ना होणार? हा असा, तर दुसरी माझी लेक तिच्या बॉयफ्रें डशी सतत गुलुगुलु गप्पा मारत असते, तर कधी कधी त्यांची जोरजोरात भांडणं सुरू असतात. ते ऐकताना माझंच टेन्शन वाढतं. शिवाय त्यांच्या आजी-आजोबांसमोर हे सारं होत असल्यानं तेही काय चाललंय हे विचारत राहातात. एकीकडे त्यांच्याजवळ सारवासारवी करायची, दुसरीकडे मुलांना समजावून सांगायचं, कधी रागवायचं आणि तिसरीकडे आपला ताण वाढू नये म्हणून स्वत:ला सांभाळायचं. कसं होणार माझं कळत नाहीये.’’ वेगवेगळ्या वयाची आणि वृत्तीची माणसं एकत्र आल्यानं आणि नाइलाजानं त्यांना सगळा वेळ तेवढय़ाच अवकाशात बरोबर घालवावा लागत असल्यानं सर्वाना सांभाळून घेणं, चुचकारून घेणं, त्यांच्या कलेनं  घेण्याचं महाकठीण काम हे घरातील आईची भूमिका बजावणाऱ्या बाईला करावं लागत आहे.

त्यात असेही अनुभव येतात. काल एका मैत्रिणीचा फोन ( घरचाच समुपदेशक म्हणून असे कॉल तर नेहमीच येतात), ‘‘अगं , काय करू दोन-तीन दिवस जीव खूप घाबराघुबरा होतोय गं! समीरचं सध्या पोस्टिंग दिल्लीला आहे ना, सारखी काळजी वाटत राहाते. तिथली परिस्थिती फारच वाईट आणि हा आयटीत असल्यानं कंपल्सरी डय़ुटी आहे. परवा  सकाळपासून फोन उचलत नव्हता, नको नको ते विचार येत होते. आणि मी पण अशी आहे ना, की त्यानं फोन केला की परत परत तेच सांगत राहाते, मास्कशिवाय जाऊ नको, बाहेरचं काही खाऊ नको. त्याचा त्याला राग येतो. मग तो फोनच करत नाही. पण माझा मेलीचा आईचा जीव राहात नाही!’’ शारीरिक कष्टांनी माणूस जितका दमतो, त्यापेक्षा अधिक भावनांच्या ओझ्याखाली दबतो. त्याने दमछाक होते ती अशी.

त्यातच काही जणींमधलं ‘आईपण’ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. जात्याच इतरांना मदत करण्याची, कामवाल्या बाईच्या अडचणी समजून घेण्याची, नवीन आलेल्या शेजाऱ्यांची घडी बसवून देण्याची प्रवृत्ती असलेल्या बाईला आपली बहीणभावंडं, इतर नातीगोती यांना गरज असतानाही मदत करता येत नाही याचीही चुटपुट असते. मोठमोठय़ा गृहसंकुलांमध्ये राहाणारे लोक एखाद्याला संसर्ग झाल्यास त्याला एका खोलीत ठेवून त्याची काळजी घेऊ शकतात आणि एकटी राहाणारी मंडळी बाहेरून जेवण मागवू शकतात, पण दाट लोकवस्तीत राहाणाऱ्या लोकांना हे कुठलेच पर्याय नसतात तेव्हा आजूबाजूला राहाणाऱ्या बायाबापडय़ा आपल्या तुटपुंज्या किराणा सामानातून पोळीभाजी, डाळभात गरजू शेजाऱ्यांच्या दरवाजाशी ठेवून येतात. माझ्या माहितीतल्या अशा कित्येक अनाम आईंची त्यामध्ये काहीही अपेक्षा नसते. त्यांना त्यांच्या अनंत अडचणी सांगायलाही जागा नसते, कारण आजूबाजूचे सगळेच जण सुपात किंवा जात्यात!

या पार्श्वभूमीवर एकीनं आपल्या घरासाठी शोधलेला मार्ग महत्त्वाचा आहे. गेली २१ वर्ष माझ्याकडे काम करायला येणारी वसुमती. मला मदत लागते तेव्हा आईच्या मायेनं सेवा करणारी! ऑगस्टच्या अखेरीस करोनाचा प्रपात कमी होताना तिचा २-३ वेळा फोन आला, ‘‘आई, येऊ का कामाला? तुमच्याच्यानी होत नसेल ना! ’’( हे पैशांसाठी नव्हतं, कारण ते तिला पोहोचवले जातच होते, पण माझ्यावरच्या मायेपोटी! ) माझ्याकडे यायला लागल्यावर एकदा मी तिला बजावलं, ‘‘नातवंडांना खेळायला बाहेर पाठवू  नकोस. कारण ४ ते ७ वयातील ३ नातवंडं होती तिची. ती म्हणाली, ‘‘नाही पाठवत, पण छोटय़ा खोलीत बिचारी काय करणार, म्हणून ४-५ छोटी कोंबडीची पिल्लं आणलीत, त्यांच्याशी खेळतात, त्यांना दाणापाणी देतात.’’ मी थक्क झाले, उच्चभ्रू घरातील मुलांना ढीगभर खेळणी, इंटरनेट, मोबाईल खेळायला असतात, पण गरिबांनी आपल्या मुलांचं मन कसं रमवायचं! पण इच्छा तिथे मार्ग.. त्यांना मार्ग सुचत जातात.  मात्र अशीही काही घरं आहेत, ज्यांच्या घरावर मृत्यूचं सावट आलं आहे. त्या घरातील वातावरण तर खूपच बिघडून गेलंय, जातंय. कालपर्यंत घरात असलेले आणि जाताना आपल्याला ‘बाय-बाय’ करून गेलेले आजी-आजोबा आता परतच येणार नाहीत, ही गोष्ट एकीकडे आपलं दु:ख सावरत त्या लहानग्यांना समजावून सांगण्याची वेळ काही घरांत आली आहे. काही घरांत परदेशी असलेली मुलं आईवडिलांच्या संसर्गाची बातमी कळताच अनेक अडथळे पार करून इथे आली आहेत. आमच्या सुलभाताईंचीच गोष्ट पाहा, त्यांचे यजमान सुरेशदादा. अर्धागवायूमुळे गेली १० वर्ष एकाच जागेवर त्यांचा सारा कारभार. इतक्या वर्षांत सुलभाताई ठाणे सोडून कुठे गेलेल्या नाहीत. दोघांनाही करोनाचा संसर्ग झाला. एकुलता एक मुलगा अमेरिकेत. हे समजल्यावर तो लगेच आला, पण आल्यावर त्याला भेटायची परवानगी नव्हती. त्यात सुरेशदादांचा मृत्यू झाला व सुलभाताई घरी आल्या. मुलगा फार दिवस थांबू शकत नसल्यानं अनेक लटपटी करून त्यांना बरोबर घेऊनच अमेरिकेला गेला. त्या कधी सुनेबरोबर राहिलेल्या नाहीत, तिथे अपरिचित व करोनामुळे बंदिस्त वातावरण, येथील परिचितां-बरोबरचा संपर्क सुटला आणि या दुसऱ्या लाटेमुळे परत यायची शक्यताही संपलीय.  मुलगा, सून, नातवंडं असूनही या वयात त्या एकाकी जीवन जगताहेत. एका आईची अशी परवड होतेय.

आपल्या इतिहासात मुलाला शेल्यानं पाठीवर बांधून किल्लय़ाच्या तटावरून घोडा फेकणारी १९ व्या शतकातील झाशीची राणी आहे आणि लष्करातील नवरा शहीद झाल्यानंतर आपल्या मुलीला सांभाळून नव्यानं  सुरुवात करून लष्करात पराक्रम गाजवणारी विसाव्या शतकातील प्रिया सेमवालही आहे. त्यामुळे आईची भूमिका ही जननीची आहे, तशीच तारिणीचीही आहे. आपल्या भोवती दिसणाऱ्या अनेक आई आपापल्या परीनं या संकटाशी सामना करायला कटिबद्ध आहेत. त्यातल्या काही घरी राहून घरातील माणसांचा सांभाळ करत आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, तर इतर अनेक आई मंडळी डॉक्टर, परिचारिका, औषधी उत्पादनात काम करणाऱ्या, घरोघरी जाऊन पाहाणी करणाऱ्या, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्यां, आशा वर्क र, काही सरकारी-पालिका कर्मचारी असल्यानं प्रत्यक्ष आजाराच्या क्षेत्रात धोका पत्करून काम करीत आहेत. त्यांना तर सलामच.

प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, की करोना आपला शत्रू नाही. शत्रू म्हटलं की लढाई आली आणि लढाई करण्यासाठी ज्या तीव्र व टोकाच्या भावना आहेत त्यांची इथे गरज नाही. आपल्याला त्याच्या सध्याच्या अस्तित्वाशी जुळवून घ्यायचं आहे व त्याला माघार घ्यायला लावायचं आहे. परतवून लावायचं आहे. त्यासाठी सावधगिरी, सामंजस्य व सहकार्य ही आपल्याजवळची आयुधं आहेत, शस्त्र नव्हेत.

आपण आत्तापर्यंत घरातल्या आईच्या त्रासाबद्दल, समस्यांबद्दल बोललो. पण त्याला तोंड देण्यासाठी लागणारी शक्तीही तिच्यात आहे. करोनापूर्वीच्या अनेक संकटांमध्ये या शक्तीची चुणूक आपल्याला दिसली आहे. संकटाचं स्वरूप बदललं तरी त्याच्याशी चार हात करायला लागणारी जिद्द तिच्यात आहे. सावधगिरी तर आपण सर्व जण बाळगतच आहोत. खासकरून दुसऱ्या लाटेत त्या सावधगिरीचं महत्त्व आपल्याला जास्त समजलेलंआहे. अशा परिस्थितीत घरात गरजेचं असलेलं सामंजस्य म्हणजे आपसातले पूर्वग्रह बाजूला ठेवून आताच्या परिस्थितीत सर्वाचा गुणदोषांसह स्वीकार करणं, एकमेकांच्या चुका  उगाळत न बसणं. प्रत्येक दिवस नवनवीन आव्हानं घेऊन येतो आहे, हे ध्यानात ठेवून त्या दिवसाला सामोरं जाणं हा सामंजस्याचा गाभा आहे. या सामंजस्यासाठी सहकार्याची गरज आहे. घरातल्या सर्वानीच मिळून हे करायचं आहे. घरातील खेळीमेळीचं वातावरण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पुढे होऊन आई नावाच्या बाईचा कामाचा भार हलका केला, वैयक्तिक आवडीनिवडी या काळापुरत्या तरी बाजूला ठेवून एकमेकांच्या भावना समजून जपल्या तर तेच सामंजस्य होईल.

माझ्या या सर्व मैत्रिणींना एक मात्र जरूर विचारावंसं वाटतं, की स्वत:चा आनंद जपण्यासाठी तुम्ही या संपूर्ण काळात काय के लंत किं वा काय करणार आहात? कारण  तुमची ऊर्जा पूर्ण घराला उजळेल. तो आनंद जपण्याची कोणतीच गुरुकिल्ली नाही, कारण त्याचं समीकरण प्रत्येकाचं वेगळं असेल. कोणाला मनन, चिंतनामध्ये बरं वाटेल, कोणाला पोथी वाचून, नामस्मरण करून, कोणाला शास्त्रीय संगीत ऐकून, तर कोणाला व्यायाम करून. पण स्वत:च्या आनंदासाठी मी काहीतरी करत आहे हा विचार आणि ‘हा वेळ फक्त आणि फक्त माझ्यासाठी’ ही त्यामागची सुखावणारी भावना महत्त्वाची. प्रत्येकीच्या घरात ‘चौथा कमरा’ नसणार आहे, पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात ही जागा असणं सुखदायी आहे. दिवसातील सोयीची वेळ पाहून एकटय़ा बाहेर पडा, बिल्डिंगच्या किंवा घराच्या  परिसरात डबल मास्क घालून, कानात आवडत्या संगीताचे सूर पोहोचवणारी बुचं घालून आणि कोणी ओळखीचे दिसले तरी न थांबता स्वत:च्याच धुंदीत ३० ते ३५ मिनिटे, मुक्काम न ठरवता चालत राहा. बघा परत आल्यावर ताजंतवानं वाटतं की नाही! दिवसभरात निदान दोन तरी फोन अशा माणसांना करा, ज्यांना तुमच्याशी बोलून छान वाटेल. हे सर्व आपले ‘स्ट्रेस बस्टर्स’ आहेत. हे केल्यावर म्हणाल, या करोनाची काय शामत आहे घाबरवून सोडायची!