07 December 2019

News Flash

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व

सुमनताई आणि रमेशजी तुलसियांनी या दाम्पत्याने निरपेक्ष मानवसेवा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन स्थापना केलेल्या ‘सुमन रमेश तुलसियांनी ट्रस्ट’ला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली.

| June 6, 2015 01:01 am

ch12सुमनताई आणि रमेशजी तुलसियांनी या दाम्पत्याने निरपेक्ष मानवसेवा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन स्थापना केलेल्या ‘सुमन रमेश तुलसियांनी ट्रस्ट’ला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या काळात प्रामुख्याने शिक्षण व आरोग्यक्षेत्रात केलेल्या त्यांच्या सत्पात्री दानाने कोट्यवधी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. त्यांच्या निष्काम सेवेविषयी..
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आलेत,
त्यांनी दोन गाणी द्यावीत
आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना थोडे उचलून घ्यावे
दत्ता हलसगीकर यांची ही कविता प्रत्यक्ष जगणाऱ्या सुमनताई आणि रमेशजी यांच्या भेटीचा योग अलीकडेच आला. या सत्त्वशील दाम्पत्याने निरपेक्ष मानवसेवा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन स्थापना केलेल्या ‘सुमन रमेश तुलसियांनी ट्रस्ट’ला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या काळात शिक्षण व आरोग्यक्षेत्रात (प्रामुख्याने) केलेल्या त्यांच्या सत्पात्री दानाने कोटय़वधी रुपयांचा टप्पा ओलांडलाय.
दानशूरपणात कर्णाला आदर्श मानणाऱ्या या जोडप्याची अत्यंत विनम्र देहबोली पाहून ‘या देवी सर्व भुतेषू मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:’ हा श्लोक मनात निनादत राहिला. ‘या अलौकिक दानासाठी प्रेरणा..’ माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच सुमनताईंचं उत्तर होतं, ‘अर्थात आईवडिलांचे संस्कार. एकच उदाहरण सांगते, गणपतीच्या दिवशी संपूर्ण गावाला जेवण दिल्याशिवाय आमच्या घरातली एकही व्यक्ती तोंडात घास घालत नसे. गोव्यातील मडगावजवळील राय हे सुमनताईंचे माहेरचं गाव आणि सुमन मुकुंद कुवेलकर हे त्याचं लग्नाआधीचं नाव. शांतादुर्गेचा वरदहस्त लाभलेलं कुवेलकर कुटुंब तसं सधनच म्हणायला हवं. भरपूर शेती होती. घराच्या पुढे-मागे आंब्याची कलमं, नारळी-पोफळीची झाडं डोलत होती. या ताडामाडाच्या छायेत ही एकूण दहा भावंडं वाढली. सुमनताई शेंडेफळ. सगळीच एकापेक्षा एक हुशार. मोठा भाऊ सदाशिव गोवा मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम, धाकटा भाऊ सुरेश सी.ए.ला सुवर्णपदकविजेता, सुमनताई बी.ए.(फ्रेंच)च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात अव्वल.. या प्रकारे सुमनताईंचं नववीनंतरचं शिक्षण मुंबईत गिरगावच्या चिकित्सक समूहाच्या शाळेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण सोफियामध्ये पार पडलं. विद्यापीठात सर्वप्रथम आल्याने पुढील शिक्षणासाठी फ्रेंच सरकारचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले, पण त्याच वेळी शेजारीच राहणाऱ्या तुलसियानींच्या रमेशमध्ये मन गुंतल्याने त्यांनी या संधीकडे पाठ फिरवली. ही श्रींची इच्छा असणार, म्हणून तर शुद्ध, सात्त्विक आचारविचारांची ही दोन व्यक्तिमत्त्वे एकत्र आली आणि (दानाचा) इतिहास घडला.
कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे रमेशजी. त्यांचा वडिलोपार्जित टेक्सटाइलचा व्यवसाय होता. लग्नानंतर म्हणजे १९५९ मध्ये त्यांनी आणखी एका क्षेत्रात, बांधकाम व्यवसायात पाऊल टाकलं आणि सचोटी व मेहनत या मुद्दलावर इथेही यशाची नवी नवी शिखरं सर करायला सुरुवात केली. लक्ष्मी आणि सरस्वती घरात हातात हात घालून नांदू लागल्या तसं दोघांच्याही मनात एक विचार स्थिरावला आणि मिळालेल्या संपत्तीचा जास्तीत जास्त भाग देशातील दीन-अनाथांसाठी समर्पित करायचं ठरलं. निर्णय पक्का झाल्यावर या दाम्पत्याने सुमनताईंचे निस्पृह बंधू सुरेशजी कुवेलकर यांना बरोबर घेऊन ‘सुमन रमेश तुलसियांनी चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. तो दिवस होता ६ फ्रेब्रुवारी १९८९.
सोफिया कॉलेजमधून शिकल्याने या संस्थेबद्दल सुमनताईंना विशेष प्रेम. साहजिकच इथल्या अनेक गरीब पण हुशार मुलांना त्यांनी शिष्यवृत्त्या दिल्या आहेत, देत आहेत. याशिवाय तुलसियांनी ट्रस्टच्या ८० लाख रुपयांच्या देणगीतून बांधलेलं प्रशस्त सभागृह हे या कॉलेजचं भूषण आहे.
बांदोडे (गोवा) येथील ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ने उभारलेला स्नेहमंदिर हा वृद्धाश्रम म्हणजे निसर्गरम्य परिसरात वसलेलं वृद्धांचं माहेरघरच. येथील दोन वास्तू बांधण्यासाठी ट्रस्टकडून ५० लाख रुपयांची देणगी दिली गेली. शिवाय दैनंदिन खर्चासाठी वेळोवेळी मदत दिली जाते ती वेगळी. सुरेशजी कुवेलकर यांनीही स्वतंत्रपणे २५ लाख रुपयांची देणगी दिली आणि या ठिकाणी ‘विष्णू कुवेलकर नर्सिग होम’ आकाराला आलं. जिथे रुग्णांच्या घरी जाऊन सुश्रूषा करण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. पालीजवळील कानसळ गावातील स्नेहबंधन ट्रस्टच्या कर्जबाजारी वृद्धाश्रमालाही ३५ लाख रुपयांची मदत देऊन तुलसियानी ट्रस्टने त्या वृद्धांना आपल्या मायेच्या पांघरुणात घेतलंय.
चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी हे शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव. या संस्थेच्या इंजिनीअरिंग विभागाच्या देखण्या इमारतीचा खर्च तुलसियानी ट्रस्टने दिलेल्या १ कोटी ३० लाख रुपयांच्या देणगीतून करण्यात आलाय. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून जाताना कामशेतजवळ ‘सुमन रमेश तुलसियानी इंजिनीअरिंग कॉलेज’ची देखणी वास्तू दृष्टीस पडते. मावळ भागातील युवा पिढीसाठी २०११ मध्ये २५ एकर जागेवर सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी ट्रस्टने ७५ कोटी रुपये खर्च केलेत. २०१५-१६ मध्ये या कॉलेजमधून पदवीधरांची पहिली तुकडी बाहेर पडेल. त्यानंतर १ली ते १०वीपर्यंतची शाळा आणि पाठोपाठ आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेजची निर्मिती हा ट्रस्टचा भावी संकल्प आहे. एवढंच नव्हे तर मुलींच्या शिक्षणावर सुमनताईंचा विशेष कटाक्ष असल्यामुळे पुण्यात निगडीमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शाळेसाठी सुसज्ज अशा चार इमारती उभ्या करण्याकरता ८ कोटी रुपयांची देणगी मंजूर झालीय.
तुलसियानी ट्रस्टला शिक्षणाइतकंच आरोग्य क्षेत्राचंही ममत्व आहे. ‘शांती-आवेदन’ ही संस्था कोणतेच उपचार न उरलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांचे अखेरचे दिवस शांतपणे जावेत यासाठी मुंबई व गोव्यात कार्यरत आहे. या सेवाभावी संस्थेला ५० लाख रुपयांची देणगी देऊन ट्रस्टने या पवित्र कार्यात आपला मोलाचा हातभार लावलाय. तसेच एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या गरीब बालकांच्या खर्चाची जबाबदारी आपली मानून त्यासाठी आत्तापर्यंत २५ लाख रुपये देण्यात आलेत.
‘नाना पालकर स्मृती समिती’ ४० लाख रुपये आणि औरंगाबादच्या डॉ. हेगडेवार हॉस्पिटलला ५० लाख रुपये या देणग्याही आरोग्याच्या कामी वाहिलेल्या. त्याशिवाय संपूर्णपणे सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दादरच्या सुश्रूषा हॉस्पिटलच्या विक्रोळी येथील शाखेच्या सातमजली नियोजित इमारतीसाठी तुलसियानी ट्रस्टतर्फे २५ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आलंय.
महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी सकस आहार दिला गेला पाहिजे या सुमनताईंच्या आग्रहातून गेल्या ७-८ महिन्यांपासून दहा हजार मुलांना दररोज दुपारचं जेवण दिलं जातंय. ताडदेवच्या ‘इस्कॉन’ या संस्थेतर्फे पौष्टिक, ताजे अन्नपदार्थ बनवून ते हवाबंद डबे ए.सी. गाडीतून मुलांपर्यंत पोहोचवले जातात. ट्रस्टच्या कृपाकटाक्षाचा लाभ पंढरीच्या वारकऱ्यांनाही होतोय. गेल्या ५ वर्षांपासून वारीच्या दिवसांत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ट्रस्टने मीरारोडच्या ‘भक्तीवेदांत’ हॉस्पिटलला संपूर्ण प्रायोजकत्व दिलंय. याशिवाय अ‍ॅम्ब्युलन्स, स्कूल बस,अशा छोटय़ा छोटय़ा (!) देणग्यांची तर गणतीच नाही.
दाता भवति वानवा.. याचा प्रत्यंतर देणारे हे कोटींचे आकडे. रमेशजी म्हणाले, ‘नदीचं पाणी जसं माणसांसाठी असतं तसंच ते शेळ्या-मेंढय़ांसाठी, गाई-म्हशींसाठी, पक्ष्यांसाठी आणि वाघ-सिंहांसाठीसुद्धा असतं. मग आपल्याला लाभलेल्या धनसंपदेत आपलं पोट भरल्यानंतर अनेकांचा भाग असायला हवा ना?’
सुमनताई, रमेशजी, सुरेशजी तिघंही आज ऐंशीच्या तळ्यात-मळ्यात आहेत, तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा. जावयाच्या रूपाने दुसरी पिढीच नव्हे तर नातींच्या माध्यमातून तिसरी पिढीही आता हाताशी आलीय. सुमनताई म्हणाल्या, ‘आम्ही रोज ५ वाजता उठतो. एक तास चालून आल्यावर योगासनं आणि ध्यान. त्यानंतर माझी घरातली कामं. मात्र दुपारचा २ ते संध्याकाळ ६ हा वेळ ट्रस्टसाठी. माझ्याशी बोलत असतानाही त्याचं काम चालूच होतं. सराईत नजरेने टेबलावरील अर्ज पडताळणं, चेकवर सह्य़ा करणं, फोनवरून सूचना देणं सुरू होतं. त्याची ती कार्यमग्न मूर्ती मी डोळ्यात साठवूनच मी बाहेर पडले. मला देवमाणसांचं दर्शन घडलं होतं.. तेही अगदी जवळून. 
सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्ट
११०३, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई-२१
संपर्क- ०२२ २२८५७५०५ www.tulslanitrust.com, srtct@tulsiani.com
संपदा वागळे – waglesampada@gmail.com

First Published on June 6, 2015 1:01 am

Web Title: suman ramesh tulsiani charitable trust
Just Now!
X