नीरजा

सामाजिक विषमतेमुळे वाटय़ाला आलेलं दास्य आणि त्यातून झालेलं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण म्हणजे काय असतं याची वेदना जो त्यातून जातो त्यालाच कळू शकते. पण ती वेदना समजून घेण्याची क्षमता असणारे धर्म, जात, वर्ण, वंश या पलीकडे जात माणसाला माणूस म्हणून वागवतात. नोबेल पुरस्कारप्राप्त नादिन गार्डिमर यांच्या ‘बर्गरस् डॉटर’मधल्या रोझामध्ये ही क्षमता असते. ती काळ्यांवरील अन्यायाविरुद्ध उभी राहाते पण उपरेपणाचा हा सल तिलाही वागवावा लागतोच..

तुम्ही कधी समुद्र पर्यटनाला गेला आहात का? चारही बाजूनं अथांग समुद्र आणि त्यातून निघालेलं आपलं जहाज. सभोवताली निळ्या रंगाच्या अनेक छटा असलेलं पाणी. क्वचित कधीतरी दूरवर दिसणारं एखादं हिरवं नाहीतर करडं बेट. समुद्राच्या लाटांवर हिंदकळताना त्या लाटांखालचा समुद्र पाहावासा वाटतोच, पण या समुद्राच्या तळाशी काय काय लपलेलं असेल याविषयी कुतूहलही वाटतंच.

समुद्राच्या आत एक वेगळाच प्रदेश वसलेला असतो. ज्याची कल्पनाही केलेली नसते अशा हजारो गोष्टी आणि जीवसृष्टी दिसते तिथं. अगदी लोभवणारीच असते ती. पण या पलीकडे आणखी अनेक गोष्टी असतीलच की तिथं. प्रवासी जहाजातून फेकल्या गेलेल्या गोष्टींचे डोंगर, एखाद्या हिमनगाला किंवा खडकाला आपटून फुटलेल्या गलबतांचे आणि त्यातील सामानाचे व माणसांचे अवशेष, भूतकाळात झालेल्या अनेक युद्धांत उद्ध्वस्त झालेल्या युद्धनौकांतील योद्धय़ांचे आत्मबळ, जिद्द आणि शौर्य यांचे विखुरलेले पुरावे, शत्रूवर मात करण्याआधीच संपल्याची वेदना, तुटलेल्या स्वप्नांच्या माळा, फुलता फुलता सुकून गेलेलं प्रेम, सुचता सुचता थिजून गेलेल्या कवितेच्या ओळी, जगता जगता थांबून गेलेल्या आयुष्याचे प्रतिबिंब. काय काय साचून राहिलं असेल या अथांग पाण्यात!

केवळ पर्यटक म्हणून पाहायला लागलो या तळाशी असलेल्या गोष्टींकडे तर अडकून पडतो आपण प्रवाळांच्या अन् मासोळ्यांच्या लयदार हालचालीत. पण सर्जनशील कवी अथवा माणूस म्हणून पाहायला लागलो तर मग या अशा क्षणार्धात संपलेल्या अन् विखरून गेलेल्या आयुष्याचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करतो आपण. ते शोधताना अनेक प्रश्न उमटत जातात मनात.

त्या दिवशी ‘केप ऑफ गुड होप’च्या किनाऱ्यावर उभी होते. ज्या भूशिराला वळसा घालून ‘वास्को द गामा’ भारतात आला त्या भूशिरावर क्षणभर टेकले. तिथल्या वेगवेगळ्या छटा असलेल्या पाण्यात उसळणाऱ्या लाटांकडे पाहताना मनात आलं, वास्को द गामा या वळणावरून भारतात येण्याआधी या लाटांवर स्वार होऊन युरोपातली अनेक गोरी गलबतं आली असतील इथं. त्या गलबतांनी आणलेली माणसं कुठं उतरली असतील? उतरल्यावर ती नेमकी कुठं गेली असतील आणि कुठं स्थिरावली असतील? त्या माणसांनी कशी केली असेल नांगरणी या करडय़ा कोरडय़ा मातीची आणि कसली बीजं रुजवली असतील त्यात? त्या गलबतातून उतरलेल्या गोऱ्यांनी वंशद्वेषाचं बीज रुजवून काढलेलं सत्तेचं अमाप पीक पाहून काय वाटलं असेल इथल्या काळ्यांना? हळूहळू दुबळे होत गेलेले इथले स्थानिक पाहून नेमकं काय वाटलं असेल या पाण्याला? गोऱ्यांनी आणलेल्या संपन्न सभ्यतेनं हुरळून गेलं असेल का हे निळं पाणी? की वंशद्वेषाची मुळं रुजत गेलेल्या जमिनीला स्पर्श करताना बावरलं असेल ते?

नेल्सन मंडेलांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं श्वासात भरून घेतला आहे स्वातंत्र्य आणि समतेचा वारा. आता कुठं स्वत:च्या पायावर उभे राहू पहाताहेत तिथले मूळ रहिवासी. गोरे तिथं पोचण्याआधीचा आपला इतिहास आज ते तपासत असतील तेव्हा काय सापडत असेल त्यांना? त्या निळ्या समुद्राच्या तळाशी सारलेल्या पण आजही त्यांच्या नाळेशी घट्ट बांधलेल्या संस्कृतीला पुन्हा एकदा बाहेर काढू पाहात असतील का ते? आणि हा शोध घेताना उपसत असतील आपल्या संस्कृतीचा ढिगारा, तळाशी पडून राहिलेला आपला आत्मसन्मान आणि तो मिळवण्यासाठी लढलेल्या लढाया!

या भूशिराला वळसा घालून व्यापारानिमित्तानं भारतात येण्याआधीच वेगवेगळ्या देशांतील लोक दक्षिण आफ्रिकेत आले होते. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश आणि कोण कोण. जे आले ते या भूमीचे राजे झाले. त्यांच्या वसाहती वेगवेगळ्या भागांत उभ्या राहिल्या. आजही या देशात फेरफटका मारला तर आसपासच्या काही शहरांतील मोक्याच्या जागा किंवा छोटे छोटे परगणे या लोकांनी व्यापलेले दिसतात. मला आठवतं, जेव्हा आम्ही जोहान्सबर्गहून ‘मोझेल बे’ला जायला निघालो होतो तेव्हा मोझेल बे नजिकच्या जॉर्ज विमानतळावर उतरलो होतो. विमानात चढतानाच लक्षात आलं की आमच्यासोबत जवळजवळ सगळेच उच्चवर्गीय गोरे होते. एका वेगळ्या जगात राहणारी ही माणसं हाताशी न लागणारी होती. तिथली काही शहरं फिरताना जाणवत होतं की या शहरांत राहणारे हे सारे ज्या जगात राहात होते ते जग आपल्या आवाक्यापलीकडचं जग होतं. डोंगरमळे, मोठमोठय़ा विनियार्डस, तिथली पांढरी करडी अभिजात घरं, हिरव्यागार गवताची लांबलचक मदानं, त्यात खेळले जाणारे गोल्फसारखे खेळ आणि ते खेळ खेळणारी गोरी माणसं पाहिल्यानंतर आपण दक्षिण आफ्रिकेत आहोत की स्कॉटलंड वगरेमधील एखाद्या दूर दऱ्याखोऱ्यातल्या परगण्यात, असा प्रश्न पडत होता. पण मग कधीतरी या प्रवासात उन्हातान्हात काम करणारे, थकल्याभागल्या चेहऱ्यानं रस्त्याच्या कडेला बसलेले कृष्णवर्णीय मजूर दिसले. तेव्हा जाणवलं हे आपल्या जगातले लोक आहेत. केपटाऊनला आल्यावर तर एकदम आपल्या माणसात आल्यासारखंच वाटलं. तिथं गर्दी होती ती गरिबीनं पिचलेल्या कृष्णवर्णीयांचीच. कुठंतरी रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर राहणारी, वेगवेगळ्या प्रकारची लोकनृत्य करत पोटासाठी पैसे कमवू पाहणारी आपल्यासारखीच पोरंबाळं, छोटय़ा छोटय़ा दुकानातून घासाघीस करत टुरिस्टना काहीतरी विकू पाहणारी कंगाल पण हिमतीनं उभी राहू पहाणारी माणसं दिसत होती. या शहरात तर आठवण म्हणून पूर्वीच्या गुलामांची घरं आजही रंगवून जपून ठेवली आहेत. हिरव्या, निळ्या, गुलाबी, पिवळ्या, लाल रंगांनी रंगवलेली ती घरं त्या पांढऱ्या अभिजात घरांपासून दूर उभी होती.

वंशभेदविरहित समाजव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून किती वर्ष वाट पाहावी लागली दक्षिण आफ्रिकेतील लोकांना. महात्मा गांधी तर अनेक वर्ष या अन्यायाविरोधात तिथं लढत होते. त्या वेळी हा माझा देश आहे की दुसऱ्या कोणाचा हा विचार त्यांनी केला नाही. भारतात वर्षांनुवर्ष दलितांना उच्चवर्णीयांकडून मिळालेल्या वागणुकीनं ते जेवढे अस्वस्थ झाले होते तेवढेच अस्वस्थ ते गोऱ्यांनी कृष्णवर्णीयांच्या बाबतीत दाखवलेल्या वंशद्वेषाच्या विखारामुळं झाले होते. हा असा भेद पाहात मोठी झालेली आणि आता संपून गेलेली दक्षिण आफ्रिकेतील काळ्या-गोऱ्या लेखकांची संवेदनशील पिढी या अन्यायाविरोधात वर्षांनुवर्ष लढत होती. संवेदनशील माणसं ही जात-वंश-धर्मापलीकडे जाऊन विचार करतात. म्हणूनच नोबेल पुरस्कारानं सन्मानित झालेल्या नादिन गार्डिमरसारख्या लेखिका या अन्यायाविरोधात उभ्या राहिल्या. नेल्सन मंडेला यांच्या अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सदस्या असलेल्या नादिन यांनी अनेक राजकीय कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची ‘बर्गरस् डॉटर’ ही राजकीय कादंबरी खूप गाजली. या कादंबरीवर या देशातच बंदी घातली गेली, कारण ती कादंबरी गोऱ्यांच्या बाजूनं बोलत नव्हती. ही लेखिका ज्याप्रमाणे स्वत: नेल्सन मंडेलांच्या सोबतीनं उभी राहिली तशीच या कादंबरीची नायिका रोझा सत्तरीच्या दशकात वंशद्वेषाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या चळवळीत भाग घेऊन कृष्णवर्णीयांच्या बाजूनं उभी राहाते. वंशानं गोरे असूनही गोऱ्यांच्या अन्याय्य राजवटीविरोधात लढणारे आपले वडील पाहातच मोठी झालेली ही मुलगी कृष्णवर्णीयांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या या सगळ्या प्रवासात अनेकदा उपरेपणाची भावना तीव्र होण्याचे क्षण तिच्या आयुष्यात येतात. गोऱ्यांना कृष्णवर्णीयांच्या दु:खाची काय कल्पना येणार अशा प्रकारचे बोल ऐकताना तिला त्रास होतोच. पण तरीही या चळवळीशी असलेली आपली नाळ ती तोडत नाही. ज्या लोकांसाठी आपण लढतो आहोत त्यांच्याकडून अशाप्रकारे हिणवलं गेल्यानंतरही वर्णभेदाविरोधात ठामपणे लढते आणि आपल्या वडिलांसारखीच एक राजकीय कैदी होऊन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवते.

रोझाची ही गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या चळवळीत लढताना हा उपरेपणा वाटय़ाला आलेल्या, जगातल्या साऱ्याच संवेदनशील माणसांची गोष्ट वाटते. आपल्याकडंही अशा गोष्टी घडल्या आणि घडताहेत. दक्षिण आफ्रिकेपेक्षा खूप लवकर स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. ते मिळवताना ब्रिटिश येण्याआधी ज्या ज्या धर्माचे आणि जातींचे लोक इथं होते ते सारे ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळ उभी करताना एकमेकांशी जोडले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय म्हणून लढणारे हे लोक आज जात, वर्ग आणि धर्मात विभागले गेले आहेत. स्वातंत्र्याआधी आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्था यावर आधारलेली जी विभागणी होती ती  स्वातंत्र्यानंतरही राहिलीच, पण त्यासोबत आरक्षण मिळणारे आणि न मिळणारे अशीही विभागणी झाली. पुढे तर काही दलित लेखकांनी दलितांचं जगणं हे उच्चवर्णीय लेखककवींना किंवा कार्यकर्त्यांना कळणं शक्यच नाही असा सूर लावला. केवळ त्यांनीच नाही तर सुरुवातीच्या काळात स्त्रीवादी चळवळीनेही पुरुषांच्या बाबतीत हा सूर लावला होताच. तो चुकीचा नव्हताच. सामाजिक विषमतेमुळे वाटय़ाला आलेलं दास्य आणि त्यातून झालेलं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण म्हणजे काय असतं याची वेदना जो त्या परिस्थितीतून जातो त्यालाच कळू शकते. पण ही इतरांच्या जगण्यातली वेदना समजून घेण्याची क्षमता ज्या माणसांत असते ती माणसं बुद्धाप्रमाणेच धर्म, जात, वर्ण, वंश,लिंग या पलीकडे जातात आणि माणसाला माणूस म्हणून वागवतात. अशा माणसांना उपरेपणाचं लेबल लावलं गेलेल्या जगात स्वत:ला शोधताना जो त्रास होतो तो ‘बर्गरस डॉटर’मधल्या रोझाला होताना दिसतो. माणूस म्हणून असलेली ओळख पुसली जाऊन केवळ जात-वंश-धर्माची ओळख मिळते तेव्हा होणाऱ्या वेदना या संवेदनशील नायिकेसारख्याच जगातील अनेक संवेदनशील माणसांना झाल्या असतील. स्वत:ची ओळख शोधताना ज्या मुलीला बहीण मानली त्या रोझाला आपलं उपरेपण जाणवून देणारे बेसी सारखे इथले मूळ रहिवासी आपल्या दु:खापलीकडे न जाता स्वत:भोवती एक भिंत उभी करतात तेव्हा कळत नकळत नव्या द्वेषांवर आधारलेली संस्कृती उभी करत असतात. आपली स्वत:ची ओळख शोधण्यासाठी संस्कृतीचा तळ उपसताना अशी आपल्यासारखीच संवेदनशील मनं त्या ढिगाऱ्याखाली काही विचार न करता आपण लोटून देतो तेव्हा त्या मनांना होणाऱ्या वेदनांचा विचार बेसीसारखेच आपणही अनेकदा करत नाही.

‘नादिन गार्डिमर’ आज नाहीत पण त्या भूशिराला वळसा घालून जाणाऱ्या त्या पाण्याच्या खोल तळाशी ही सल मनात ठेवलेली त्यांच्या या पुस्तकांतील पानं कदाचित फडफडत राहतील. पण त्याच वेळी ती पानं संस्कृतीच्या सभ्यतेची, माणसामाणसातील सुंदर नात्याचीही आठवण जपून ठेवतील. जात-धर्म-वंश-लिंगाच्या वेढय़ांनी बांधलेल्या मानवी मनाचे हे हजारो गुंते संस्कृतीच्या तळाशी कुठं कुठं विखरून पडले असतील. वेळ निघून जाण्याआधी  ते गुंते सोडवायला हवेत आपल्याला!

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com