चोर आणि त्याला सामोरी जाणारी स्त्री हा विनोदाचा विषय होऊ शकतो, हे जाणणारे व्यंगचित्रकार त्यातली गोडी, भाबडेपणा समोर ठेवत मानवी वृत्तीलाच अधोरेखित करत असतो.
एक विनोद वाचण्यात आला, एका लठ्ठ बाईच्या घरात चोर शिरला. बाईने त्याला पकडले, खाली पाडले आणि त्याच्या ‘उरावर’ ती बसली. तिने नोकराला आवाज दिला,
‘जा रे, पळ आणि पोलिसाला बोलाव जा!’
 नोकर इकडे-तिकडे रेंगाळत म्हणतो, ‘माझी चप्पल सापडत नाहीए..’
तर चोरच वैतागून त्याच्यावर ओरडतो, ‘मूर्खा! माझी चप्पल घाल, अन लवकर बोलाव जा!’
  त्या बाईचं त्याच्याच अंगावर बसणं सहन करण्यापेक्षा पोलिसांच्या तावडीत सापडणं कमी त्रासाचं, असं चोराला वाटण्यातली ही गंमत. खरं तर घरात चोर शिरणं ही घटना गंभीर असतेच; त्यापेक्षा गंभीर म्हणजे, आपल्याला ती बाब लक्षात येणं. आणि खरं म्हणजे, त्याहीपेक्षा गंभीर बाब असते, ती दोघांच्याही-म्हणजे, चोराच्याही अन् आपल्याही ते लक्षात येणं. आता, चोर शिताफीने चोरी न करताच निसटला, तर घरातल्या माणसाला बरीच र्वष फुशारकी मारायची संधी असते म्हणा; पण तावडीत जर तो चोर सापडला, तर नेमकं काय करायचं असतं- करावं लागतं? त्याची शक्ती, आपली शक्ती याचा अंदाज, शिवाय त्याच्याजवळ शस्त्र आहे का, ही आपली शंका आणि आपण तर असे नि:शस्त्र (अन झोपेतून खडबडून उठलेले!) अशा स्थितीत नेमकं कसं वागावं? अशा केवढय़ा समस्या असतात, खरं म्हणजे! अपरिचित(!) असा तो चोर तावडीत आल्यावर कोणत्या भाषेत बोलावं (की भांडावं?) हाच प्रश्न आधी पडत असावा!  चोर हा म्हणूनच अनेकांना आपल्या व्यंगचित्राचा, लेखाचा विषय वाटलेला आहे. द. मा. मिरासदार यांच्या एका कथेत चोराचीच हकिकत आहे. एका पहेलवानाच्या घरात चोर शिरतो आणि पहेलवानाला प्रचंड आनंद होतो! तो चोराला बुकलून चक्क खुंटीवर लटकवतो. मग पोलीस येतात, दार उघडायची पहेलवानाला विनंती करतात. पहेलवान काही बोलायच्या आता चोरच त्यांना आवाज देतो, ‘मला वाचवा सायब!’ त्या वेळेस बाहेरून पोलीस त्याला सांगतात, ‘हां, आमी आलोत, घाबरू नको!’
 पण हे सगळे संभ्रम-विभ्रम असतात घरातल्या पुरुषाच्या बाबतीत. अन स्त्री? कसल्याही परिस्थितीला सामोरी जाणारी ही घरातली मालकीण- चोरीच्या या घटनेला, किंबहुना चोर सापडल्यावर; ती गोंधळते, घाबरते का? छे, हो! इथे पाहू या काही व्यंगचित्रकारांनी अशा घटनांचे केलेले हे पंचनामे – ‘इंडिया टुडे’चं एक मासिक होतं, ‘टारगेट’. या मासिकात व्यंगचित्रकार अजित निनन यांचं ‘फनी वर्ल्ड’ नावाचं एक सदर गाजलं होतं. त्याच नावाने त्या चित्रांचा संग्रहही निघाला. किशोरवयीन मुलांसाठी हे मासिक आणि व्यंगचित्रं असली, तरी सगळ्यांनाच आनंद देणारी ही व्यंगचित्रं आहेत.
ch04या सदरातल्या एका चित्रात- चित्र क्र. १ – घरामध्ये चोर घुसला आहे; ते अशा मालकिणीचं घर, की तिला कमालीच्या स्वच्छतेची सवय आहे. एवढी सवय, की त्या सवयीपुढे चोरी वगैरे गोष्टी या बाबी दुय्यम आहेत! शिवाय भिंतीवर लावलेली पेंटिग्ज पाहा. अशा जागी चिखलाच्या पायांनी आलेला कोणीही कसा चालेल? त्याची चोरी तर तिने पकडली आहेच; पण खराब झालेली लादी कोण पुसणार? तिने त्यालाच लादी पुसायला लावली आहे.  
ch13तर चित्र क्र.२ मध्ये – चोरी करायच्या उद्देशाने दोन चोर आलेले आहेत. त्यांचं ठरलेलंही आहे, की एक जण खालून आधार देणार, दुसरा खिडकीच्या आधाराने वर चढणार अन् आत घुसणार. बाहेर अंधार आहे, पलीकडे कोपऱ्यात कुत्रं झोपलेलं आहे, कोणत्याही क्षणात ते उठेल अशी परिस्थिती- अशा स्थितीत एक भानगड झाली. अगदी अवचित, आकस्मित म्हणावी अशी. हा पठ्ठय़ा खिडकीत हात घालून आत शिरण्यासाठी जोर लावणार तितक्यात; घराच्या मालकिणीने खिडकीचं शटर खाटकन बंद केलं. डोक्याला अचानक  आणि जोरात चौकट लागली  अन् दारात बोट चिमटलं, की माणूस चटकन विव्हळतोच! इथेही तेच झालंय. मालकिणीला त्याचा पत्ता नाही; अन् इथे या दुसऱ्या चोराची पंचाईत पाहा, याचं विव्हळणं कुत्र्याला ऐकायला आलं तर? त्याच्याकडे एकच उपाय दुसऱ्या चोराचं तोंड बंद करणं..
 अवघड-बाका पेचप्रसंग हा तर उत्तम व्यंगचित्राचा खुराक असतो. ही दोन्ही व्यंगचित्रं ‘फनी वर्ल्ड’ या सदरातली अजित निनन यांची.
ch14चित्र क्र. ३ मध्ये तर चोर अद्याप घरात शिरायचाय. तो घरात घुसतानाच त्याला एक चोरी दिसते. गाफील नवरा झोपलेला आहे, त्याची बायको त्याच्या पँटीतून पैसे चोरते आहे, अन् हे पाहून हा सराईत चोर; त्याच्या तोंडून अगदी नकळत बाहेर पडलं आहे, ‘बाईसाहेब, मलाही राहू द्या थोडं!’ चोराचा हा विश्वास, त्या बाईला याने चांगलंच ‘ओळखलं’ असल्याचं दाखवितो.
घरात चोर घुसल्याचं कळताच आपला थरकाप उडतो. फक्त आपल्याला हे लक्षात येत नाही, की त्या चोराचीही घाबरगुंडी उडालेली आहे! इथे या ch03व्यंगचित्रात -चित्र क्र. ४- असंच झालेलं आहे. सुदैवाने घरमालकाच्या हातात पिस्तूल आहे, ते त्याने रोखलेलंही आहे, चोराने हँड्सअप केलेलंही आहेत. आता फक्त पिस्तूलच्या टोकाने त्याला बाजूला सारत सारत हाकलून लावायचं बस! पण गडबड झालीय पाहा. कारण भोळी मालकीण पिस्तुलाच्या गोळ्या त्याला आणून देते. काय होईल त्या मालकाचं, कल्पनाच केलेली बरी!
चोराची आर्थिक परिस्थिती खरंच कशी असते? नक्की माहीत नसतं ना? इथे पाहा, हंगेरियन व्यंगचित्रकार रेबरचे हे चित्र. (चित्र क्र. ५) हा चोर खरंच गरीबch15 आहे. त्याच्या बायकोने त्याच्याकडे कंठा चोरून आणायचा हट्ट धरला होता. तो याने आज पुरा केला आहे. चोर अगदी आत्ताच आला आहे, घरी. ‘गणवेश’सुद्धा नाही काढला त्याने. आल्या आल्या आपल्या लाडक्या बायकोला त्याने कंठा घातला आहे, बायकोसुद्धा घरातल्या फुटक्या आरशात पाहते आहे. रेबरच्या विनोदाला प्रत्येक वेळेस एक कारुण्याची झालर असते. शिवाय शब्दरहित असे हे व्यंगचित्र; साध्या रेषांतून बरेच काही सांगू पाहते.
आणखी एक व्यंगचित्र. कविता करणारा पुरुष वा स्त्री किंवा वाद्याशी झटापट करणारा पुरुष वा स्त्री यांच्यात एक साम्य असतं. आपली कला लोकांना ऐकवायची त्यांना कमालीची गरज भासते. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. फ्रेंच व्यंगचित्रकार सेम्पे याने अशा एका कलावंत स्त्रीची हकिकत मांडली आहे सोबतच्या चित्रमालिकेतून. या सहा चित्रांमध्ये या पियानोवादक स्त्रीचे अंतरग उलगडत नेले आहे. पहिल्या चित्रात तिच्या वादनाकडे लक्ष न देणाऱ्या पाहुण्यांविषयीचा राग तिच्या चेहऱ्यावर आहे. पण ती काही करू शकत नाही. म्हणूनच जेव्हा चोर येतो आणि सगळ्यांना बांधून ठेवतो तेव्हा स्वत:ची सुटका करण्यात यशस्वी ठरलेली ती नंतरही उरलेल्यांची सुटका करत नाही उलट त्या बांधलेल्या अवस्थेत ती त्यांना आपलं वादन ऐकायला भाग पाडते आहे.
व्यंगचित्रकार समाजातल्या मानवी प्रवृत्तींमधील उपहास, विरोधाभास, मिस्कीलपणा यांना समोर ठेवत असतो. चोर आणि त्याला सामोरी जाणारी स्त्री हासुद्धा विनोदाचा विषय होऊ शकतो, हे जाणणारे व्यंगचित्रकार त्यातली गोडी, भाबडेपणा समोर ठेवत मानवी वृत्तीला अधोरेखित करतो. हेच त्यांचं वैशिष्टय़ ठरतं.    

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन