प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

‘पपेट्स’चा अर्थात बाहुल्यांचा खेळ आबालवृद्धांना आवडणाराच. पण चामडय़ाच्या सपाट बाहुल्या वापरून प्रकाश आणि सावल्यांनी रंगणारी ‘थोलापावाकु थ्थु’ ही पारंपरिक बाहुलीनाटय़ कला मात्र आपल्यासाठी अपरिचित असते. केरळमधील पुलावर  कुटुंबातील तेराव्या पिढीतल्या रेजिता या चित्रकर्तीनं या कलेचा वारसा जपला. त्यात राज्यस्तरीय पुरस्कारही मिळवले आणि त्यात नवीन प्रयोग करत इतर स्त्रियांनाही त्याचं प्रशिक्षण दिलं. तर मुंबईच्या प्रिया पाटील यांनी बाहुलीनाटय़ातील आकृती कॅ नव्हासबरोबरच चामडय़ावर साकारत त्या चित्रप्रदर्शनातून समोर आणल्या.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

प्राचीन काळात मानवानं सूर्यप्रकाशात नाचताना जमिनीवर आपल्याबरोबर नाचणारी आपली सावली पाहिली आणि तीच ‘शॅडो पपेट’ची नांदी ठरली. मल्याळममध्ये याला ‘थोलापावाकु थ्थु’ म्हणतात. ‘थोला’ म्हणजे चामडं, ‘पावा’ म्हणजे बाहुली आणि ‘कुथ्थु’ म्हणजे खेळ. अर्थात चर्मबाहुल्यांचा खेळ. या खेळाची परंपरा बाराशे र्वष जुनी आहे असं म्हणतात. के रळबरोबरच ही परंपरा ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात आढळते. ‘चर्म बाहुलीनाटय़’ या नावानं, तसंच संस्कृत साहित्यात ‘छाया नाटक’ असा उल्लेख  आढळतो. प्रत्येक प्रदेशात नावं वेगळी असली तरी चर्मबाहुल्या तयार करण्याची पद्धत मात्र सारखीच दिसते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वीसपेक्षा अधिक देशांत आबालवृद्धांना आवडणारा हा खेळ आहे.

दूरचित्रवाणी आणि चित्रपटासारखी करमणुकीची साधनं आल्यामुळे या पारंपरिक कलेला  टिकवून ठेवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, थायलँड, चीन, इराण, नेपाळ, इजिप्त, टर्की, सीरिया, ग्रीस, जर्मनी, फ्रान्स अशा विविध देशांमध्ये हा खेळ सादर होतो. त्याचे मोठमोठे उत्सवही आयोजित केले जातात. ही दृक् श्राव्य कला आहे. वाद्य, संगीत, गीत, कथाकथन यांमुळे हा खेळ अधिकाधिक रंगत जातो. केरळमध्ये या बाहुल्यांच्या खेळात ४२ फूट लांबीच्या व्यासपीठावर एक पडदा लावला जातो. पडद्यामागे थोडं अंतर सोडून, एक आडवी तुळई (बीम) जमिनीपासून पाच फुटांवर घट्ट बसवतात. त्यावर करवंटीचे किंवा मातीचे असे २१ दिवे खोबरेल तेल आणि कापडाच्या वातीनं पेटवतात. चर्मबाहुल्यांना लावलेल्या काठय़ांच्या साहाय्यानं पडद्याच्या मागील बाजूस त्यांच्या हालचाली घडवल्या जातात. दिव्यांच्या प्रकाशामुळे बाहुल्यांच्या रंगीत सावल्या पडद्यावर पडतात आणि विलोभनीय दृश्य दिसतं. हा खेळ रात्रीच्या अंधारात देवळात सादर करतात.

चर्मबाहुल्या तयार करण्याचं काम अत्यंत अवघड आणि कौशल्यपूर्ण आहे. पूर्वी यात हरणाचं कातडं वापरत. आता बंदी आल्यामुळे फक्त मृत बकरे आणि म्हशींचं कातडं वापरतात. बाहुल्यांची उंची एक फुटापासून सहा फुटांपर्यंत असते. हा खेळ निव्वळ करमणुकीसाठी सादर केला जात नाही. गावात दुष्काळ पडला तर पाऊस पडावा, चांगलं पीक यावं, धंद्यात बरकत यावी, गावाला दुष्ट शक्तीपासून वाचवता यावं, गुरांवर आलेला रोग बरा व्हावा, अपत्य लाभ, असे विविध उद्देश मनात धरून लोक आजही हे खेळ आयोजित करतात.  चामडय़ावर दोन पद्धतीनं रेखाटन करतात. जुन्या बाहुलीचा आकार नव्या चामडय़ावर ठेवून अणकुचीदार सुईनं आकार रेखांकित करून घेतात आणि मोठय़ा कात्रीनं कापून घेतात. अलंकरणासाठी खिळ्यांच्या साहाय्यानं ठोकून छिद्रं बनवतात. छिद्रांमधून प्रकाश आरपार गेल्यावर सावलीमधून अलंकारांचा परिणाम साधता येतो. बाहुल्या दोन्ही बाजूंनी रंगवतात, कारण खेळासाठी दोन्ही बाजू लागतात. खारीचे केस, डुक्कर, गाढव यांच्या शेपटीच्या के सांच्या साहाय्यानं कुं चले बनवतात. यासाठी नैसर्गिक रंग वापरतात. पानांपासून बनवलेला हिरवा रंग, हळदीपासून पिवळा, काजळीपासून काळा इत्यादी. बाहुली तयार झाली की बांबूच्या काठीला मध्ये पेच देऊन त्यात ती बाहुली बसवून दोऱ्यानं बांधतात. खांदा ते मनगट असा एक पूर्ण आकार न  घेता खांद्यापासून कोपरापर्यंत, कोपरापासून मनगटापर्यंत, मनगटापासून हाताच्या पंजापर्यंत असे स्वतंत्र भाग दोऱ्याच्या साहाय्यानं सैलसर बांधतात, जेणेकरून पडद्यावर त्यांच्या सावलीच्या हालचाली दाखवता येतात.

चर्मबाहुल्यामधील विविध वर्गातल्या व्यक्ती त्यांच्या वेशभूषेमुळे ओळखता येतात. पुरुषांना अर्धी चड्डी, धोतर, कुर्ता-पायजमा असा  वेश असतो. राजा, राणी, ब्राह्मण, सेवक, शेतकरी प्रत्येक व्यक्तिरेखा वैशिष्टय़पूर्ण असते. धनुष्य-बाण, तलवारी , देवांची वाहनं, दैवी प्राणी, दैवी व्यक्ती, सर्वसामान्य लोक, झाडं, वेली, पक्षी अशी विविधता असते. पुण्याच्या ‘राजा दिनकर केळकर कलासंग्रहालया’च्या संग्रहात  ३,०३८ चर्मबाहुल्या आहेत. जागेअभावी त्या सर्व प्रदर्शित करता येत नाहीत. म्हणून त्यातल्या ६० बाहुल्यांचा एक कॅ टलॉग म्युझियमनं छापला आहे. त्याचं संपादन करण्याची संधी मला मिळाली. त्यावरून या कलेची ओळख होते. केरळमधील पालकडू जिल्ह्य़ातील (ढं’ं‘‘ं)ि पुलावर कुटुंबाकडून ही परंपरा जपली जात आहे. या कलेची जपणूक करणारं हे एकच कुटुंब आहे.

‘थोलापावाकुथ्थु’ हा पारंपरिक कलाप्रकार भद्रकाली या मातृदेवतेला अर्पण करण्यासाठी सादर करतात. राम-रावण युद्धाच्या वेळी भद्रकाली देवी राक्षसांच्या निर्दालनात व्यग्र होती. त्यामुळे तिला युद्ध पाहाता आलं नाही. तिला ते बघता यावं यासाठी मंदिरासमोर ‘कुतूमाडम’ नावाचं नाटय़गृह जानेवारी ते मे या काळात बांधलं जातं आणि तिथे सादरीकरण के लं जातं. एकशेऐंशी ते २०० बाहुल्या आणि ४० कलावंत रोज नऊ तास असे २१ दिवस सहभागी होतात. १०० देवळांमध्ये हे थोलापावाकुथ्थु सुरू असतं. त्या त्या देवळाच्या परंपरेप्रमाणे सात, १४, २१, ४१, ७१ दिवस हे सादरीकरण सुरू असतं.

थोलापावाकुथ्थुमधील मुख्य सूत्रधाराला (‘पपेटिअर’) पुलावर म्हणतात. त्याला आयुर्वेद, शास्त्रीय संगीत, तमिळ आणि संस्कृत भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असतं. कृष्णन कुट्टी पुलावर यांनी ही कला देवळाबाहेर आणली आणि परदेशात निरनिराळ्या महोत्सवांमध्ये सादर केली. इतकंच नाही, तर पूर्वी फक्त रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक कथा सांगितल्या जात. पण त्यांनी पंचतंत्र, महात्मा गांधी, सामाजिक जागृतीविषयीच्या गोष्टी, अशा नव्या विषयांची भर घातली. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले पुलावर यांचे पुत्र के. के. रामचंद्र यांनी या कलेच्या संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी केरळमधील शोरणपूर येथे एक संस्था स्थापन केली आहे. तिचं नाव ‘कृष्णन कुट्टी पुलावर मेमोरियल थोलापावाकुथ्थु पपेट सेंटर’. पूर्वी पुरुषांपुरती मर्यादित असलेली ही कला रामचंद्र यांनी स्त्रियांकरताही खुली केली. त्यांचे पुत्र राजीव आणि राहुल ही कला पुढे नेत आहेत. रामचंद्र यांची कन्या रेजिता विवाहित असून याच क्षेत्रात कार्यरत आहे. राजीव यांनी इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी घेतली आहे, तर रेजिता इतिहासात पदवीधर आहे. विवाहित असूनही रेजिता अभिमानानं वडिलांचंच नाव लावतात, याचं कारण ‘पुलावर’  हे चर्मबाहुल्या सूत्रधाराचं मानाचं नाव आहे. २०१८ मध्ये रेजिता यांना ‘पहिली स्त्री चर्मबाहुली सूत्रधार’ हा राज्य पुस्कार मिळाला. त्यांची पिढी ही तेरावी पिढी आहे. त्या सांगतात, ‘‘माझे पहिले गुरू हे माझे आजोबा. मी सहा वर्षांची असताना त्यांनी मला अर्थासहित श्लोक शिकवले. जवळच्या देवळात सादरीकरण करायला उत्तेजन दिलं. माझ्या वडिलांनी घरी चर्मबाहुल्यांचं कलासंग्रहालय केलं होते. आई राजलक्ष्मीसुद्धा या सगळ्यात अजूनही सक्रिय असते.’’

रामचंद्र यांनी २००६ मध्ये सादरीकरणात खूप मोठे बदल आणले. थोलापावाकुथ्थुमध्ये २० अथवा अधिक व्यक्तींचा समावेश असतो. मात्र एका व्यक्तीनं केलेलं सादरीकरण हे ‘चांडाळ बीशुकी’ या नव्या एकपात्री सादरीकरणानं सुरू झालं. रेजिता यांनी सर्वप्रथम हे सादरीकरण केलं आणि त्यांच्या आयुष्यातलं ते महत्त्वाचं वळण ठरलं. २०११ मध्ये थायलँड आणि २०१४ मध्ये सिंगापूर कला उत्सवात त्यांना या सादरीकरणासाठी आमंत्रण मिळालं. २०१६ मध्ये बंगळूरुच्या दातू आंतरराष्ट्रीय बाहुली उत्सवातही त्या आमंत्रित होत्या.

तमिळ कवी कं बा रचित रामायण (कंबा रामायणम्) हा सर्वसाधारणपणे बाहुलीनाटय़ाचा विषय असतो. पण रेजिता आणि त्यांचे भाऊ आता नवनवीन मध्यवर्ती कल्पनांवर आधारित कार्यक्रम करतात. रेजिता यांच्या मते, यात प्रशिक्षण घेण्याची संधी असूनही पैसे कमी मिळत असल्यामुळे तरुण पिढी या कलेकडे पाठ फिरवते. रेजिता सध्या ‘करोना’ या विषयावर थोलापावाकुथ्थु सादर करतात. त्यांच्या पुढच्या प्रकल्पाची तयारी सुरू आहे. प्रशिक्षित स्त्रियांचा एक गट त्यांनी तयार केला आहे. त्यांच्यामार्फ त स्त्रियांच्या आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी गर्भधारणा, स्तन्यपान अशा विषयांवर त्या चर्मबाहुली नाटय़ सादर करणार आहेत.

रेजिता पुलावर घराण्यातील असल्यामुळे त्यांना या कलेचं आकर्षण असणं साहजिक आहे. पण मुंबईच्या प्रिया पाटील या चित्रकर्तीलाही या कलात्मक आकारांनी भुरळ घातली आहे. या चर्मबाहुल्यांची केशभूषा, वेशभूषा, अलंकरण यांनी आकर्षित होऊन प्रिया यांनी या मध्यवर्ती कल्पनेवर ‘दक्षिणी’ या शीर्षकाखाली ३० कलाकृतींचं एक सुंदर प्रदर्शन २०१९ मध्ये मुंबईच्या नेहरू कलादालनात भरवलं आणि कॅ नव्हासबरोबरच चामडय़ावरही या कलाकृती रंगवल्या. लहानपणी आईनं दिलेल्या प्रोत्साहनातून आणि ‘रेषा आणि रंगकला’ या विषयाचा पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण करून प्रिया यांनी १५ र्वष ‘टेक्सटाइल डिझायनिंग’मधील नोकरी केली. २००९ मध्ये एका अपघातात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. शस्त्रक्रियेनंतर वर्षभराची अत्यावश्यक विश्रांती घेण्यासाठी त्यांना घरी थांबणं भाग पडलं. या काळात प्रिया यांनी सातत्यानं कागद आणि कॅनव्हासवर चित्रनिर्मिती केली आणि नव्या कलाप्रवासाला प्रारंभ केला. आपलं पहिलं एकल प्रदर्शन ‘बोधी’ या शीर्षकाखाली त्यांनी २०१७ मध्ये नेहरू कलादालनात भरवलं. त्यात त्यांनी अभ्यासपूर्ण तयारी करून गौतम बुद्धांचं अस्तित्व प्रतीकांमधून सादर केलं. ‘संस्कृती’ या २०१८ मध्ये जहांगीर कलादालनात भरवलेल्या प्रदर्शनात भारतातील विविध राज्यांतील लोककला आणि पारंपरिक कलांचे दर्शन घडविलं. आतापर्यंत प्रिया यांनी मिळवलेल्या पाच पुरस्कारांमध्ये ‘पाँडेचरी कला अकादमी’च्या राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. स्वत:ची चित्रं प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक चित्रकार प्रयत्नशील असतो, पण प्रिया या दर वर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्तानं एका आठवडय़ासाठी ‘चित्रांगना’ प्रदर्शनाचे आयोजन करतात. महाराष्ट्रासहित १५ राज्यांतील ४० ते ५० स्त्रिया गेली चार र्वष सातत्यानं या प्रदर्शनात सहभागी होतात. यासाठी एकच अट असते ती म्हणजे तुम्हाला चांगलं चित्र काढता यायला हवं. यात व्यवसाय वा नोकरी करणाऱ्या स्त्रियांपासून गृहिणींपर्यंतच्या विविध वयोगटांतील स्त्रिया असतात. अडचणींवर मात करू पाहाणाऱ्या अनेक चित्रकर्तीना त्यातून प्रेरणा मिळते आहे. प्रिया काही चित्रकर्तीचे अनुभव सांगतात. एक कर्क रोगपीडित चित्रकर्ती प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी चित्रं कलादालनाच्या भिंतीवरून उतरवल्यावर तिथे पोहोचली. प्रिया यांनी तिची चित्रं पुन्हा भिंतीवर लावली तेव्हा त्या चित्रकर्तीला आनंदाश्रू आवरेनात. तिनं चित्रांसह स्वत:चे फोटो काढून घेतले. कल्याणच्या भारती दमणकर जे. जे. स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि पस्तीस र्वष कलाशिक्षिका म्हणून शाळेत नोकरी करूनही आपली चित्रं प्रदर्शित करण्याची संधी न मिळालेल्या एका चित्रकर्तीला ‘चित्रांगना’ व्यासपीठामुळे ती संधी मिळाली. सांधेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका चित्रकर्तीनं प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कष्टानं प्रवास केला. या प्रदर्शनानंतर त्या उत्साहानं आणि सातत्यानं पुन्हा कलानिर्मिती करू लागल्या.

कलेचं सामथ्र्य जाणणाऱ्या प्रिया यांनी एका कलासंकुलाच्या निर्मितीची योजना आखली आहे. सामान्य माणसाला आवडत्या कलांचा आस्वाद घेता येईल अशी व्यवस्था तिथे असावी अशी त्यांची इच्छा आहे. वाद्यवादन, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, कुं भारकाम, सिरॅमिक्स ज्याचा आनंद घ्यावासा वाटेल ते साहित्य आणि शांत जागा या संकुलात असेल. आबालवृद्धांसाठी ते खुले असेल. प्रिया यांचे पती प्रमोद पाटील म्हणतात, ‘‘प्रिया एकलव्याप्रमाणे कलासाधना करत असते!’’

प्रिया यांचं कलासंकु लाचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच शुभेच्छा.

विशेष आभार- राजीव पुलावर (केरळ) / सिद्धेश शिरसेकर