27 February 2021

News Flash

निरामय घरटं  : सामाजिक पालकत्वाच्या दिशेने

आपल्या पाखरांना निश्चिंत निरामय घरटं देणं आपलं कर्तव्य आहे, कसं ते जाणून घेऊ ‘निरामय घरटं’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.

(संग्रहित छायाचित्र)

उमा बापट

umaajitbapat@gmail.com

आजच्या जगण्याच्या धबडग्यातून लहान मुलंही सुटलेली नाहीत, हे समाज म्हणून निश्चितच चिंताजनक आहे. वाढती स्पर्धा म्हणा, मग ती गुण मिळवण्याची असो, आर्थिक सुबत्तेची तुलना करणारी असो मुलांमुलांमधला मैत्र भाव संपवतो आहे. आई- वडिलांच्या जगण्यातले, नात्यामधले ताण मुलांमध्ये झिरपायला लागले आहेत. त्यातून मुलांचं जगणंही तणावाचं होत चाललेलं आहे. आपल्याला हा प्रश्न फक्त स्वत:चा वाटला तरी साकल्याने तो समाजाचा होत चालला आहे,0 म्हणूनच मुलांच्या मानसिकतेकडे जाणीवपूर्वक पाहणे पालक म्हणून अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पाखरांना निश्चिंत निरामय घरटं देणं आपलं कर्तव्य आहे, कसं ते जाणून घेऊ ‘निरामय घरटं’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.

रोज नवनवीन आव्हानं घेऊन येणाऱ्या सध्याच्या गतिमान जीवनात, एका बाजूला भौतिक जगातील प्रगतीचा वेग वाढला तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यात सामान्य कुटुंबातही अस्थिरता, अशांतता, अनाठायी चिंता डोकावू लागल्या. अबाल-वृद्धांना अधीर मानसिकतेने तिच्या कवेत तर घेतलं नाही ना? कसं होणार आपल्या चिमुकल्याचं? तरुण-तरुणींचं? भावी पिढी घडवताना पालक, शिक्षक, कुटुंब, समाज बदलत्या आव्हानांना पुरे पडणार का..? यापूर्वीही त्या-त्या काळातल्या अडचणींना त्या त्या पिढीने संयमाने, साहसाने तोंड दिलं होतं ना? त्यातून आज काय घेण्यासारखं आहे? काय नवी कौशल्यं आत्मसात करावी लागतील? मानसशास्त्र यासाठी कसं मदतीचं ठरेल? शिक्षणातले प्रयोग काय सांगत आहेत? यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विधायकपणे कसं वापरायचं..? असे ना ना प्रश्न आज रोजच्या रोज सामोरे येत आहेत.

अनेक पालक, शिक्षकांना आपण सजग, सक्षम, समरस सांभाळकत्रे असावं असं वाटतं. अशा सुसंस्कृत पालक आणि शिक्षकांना समंजसपणे सुसंघटित होता यावं. निदान काही समविचारी लोकांनी मिळून, विचारपूर्वक एकेक पाऊल सातत्याने पुढे टाकत राहिलं तर सकारात्मक-ताकद वाढू शकते. अशी ताकद मानसिक ताण-तणाव पार करत पाय रोवून उभं राहायला पाठबळ देऊ शकते. अशा ताकदीनिशी वाटचाल चालू राहिली तर आजच्या पालकांनी त्यांचा वाटा उचलला असं म्हणता येईल. रेखीव रांगोळी सुबकपणे काढता यावी, ती उठून दिसावी, म्हणून जसं आधी जमीन सारवतात, गेरू लावतात, तसं ‘सुधारक-समृद्ध समाज’ या पार्श्वभूमीवर ‘संवेदनशील, सुशील, स्वस्थ भावी पिढीसाठी सहिष्णु-समाधानी कुटुंब’ साकारण्याचा प्रयत्न तरी आपण नक्की करू शकतो. निश्चिंत पाखरांचं-निरामय घरटं, असं आश्वासक जगणं समाजातील प्रत्येक मुलाला मिळावं, यासाठी आपण सारेच निष्ठेने निर्मळ नाते जोडू या ‘निरामय घरटं’ या सदरातून.

‘माणूस’ हा इतका बहुरंगी आणि गुंतागुंतीचा आहे, की मनुष्य घडणं, माणसाला समजून घेणं हा दीर्घ काळापासून विविध विद्याशाखांसाठी कुतूहलाचा, आव्हानात्मक आणि महत्त्वाचा अभ्यास विषय ठरलेला आहे. अभ्यासकांबरोबरच सामान्य माणूसही त्याच्या परीने ‘मनुष्य’ जाणून घेत राहतो. अगदी स्वत:पासून सुरुवात करत, आपल्या जवळच्या व्यक्ती समजून घेण्याची प्रक्रिया स्वाभाविक, सवयीची होऊन जाते. ‘माझं मूल आहे तरी कसं?’ हे कोडं न पडलेला, एकदा सुटलं असं वाटेपर्यंतच परत कोडय़ात न पडलेला, कोणी पालक भेटणं विरळा.. हे कोडं सोडवताना पालक, शिक्षक अनेक पद्धती वापरून पाहतात. विविध स्रोतांतून ज्ञानकण वेचत राहतात. ‘वर्तमानपत्र-वाचन-संस्कृती’ हा जणू अशा स्रोतांपैकी मराठी संस्कृतीला लाभलेला आणि आपण जपलेला वारसा आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एका क्षणात माहितीचा महापूर पुढय़ात कोसळतो. अशा काळातही वाचकांच्या बदलत्या गरजा वर्तमानपत्र लक्षात घेतं. त्या गरजांना प्रतिसादी व्यवहारात उतरवता येईल असं, वाचकांना सोबत करणारं आशयघन लेखन सर्वासमोर पोहचवतं. वर्तमानपत्रांची जनसामान्यांपर्यंत मोठय़ा संख्येने पोहोचण्याची ताकद यथार्थपणे वापरली जाते, हे अतिशय आशादायी चित्र आहे. आजच्या पालक, शिक्षक आणि जबाबदार समाजाला आपलं प्रतिबिंब या सदरात बघायला मिळेल. आपल्या छोटय़ामोठय़ा व्यथांना आपुलकीनं, अभ्यासपूर्वक समजून घेण्याचा, थेट भिडण्याचा प्रयत्न, या सदरातून करू या. पालकत्वातील विविधांगी प्रश्नांना एकच बरोबर उत्तर असेल का? सूत्र वापरलं तर समीकरण सुटेल, इतकी मुलांच्या मनातील विचार-प्रक्रिया सरधोपट असेल का? त्यांच्या भाव-भावनांचे तरंग निश्चल राहतील का? मुलांच्या अस्थिरतेवर ताबडतोब लागू पडणारी, गुणकारी, जालीम मात्रा, तयार मिळेल का? आपलं मूल त्याच्या कमतरतांसकट आपलं आहे, तर तो प्रश्नसुद्धा आपण सोडवायचा, असा आग्रह धरू या. जाणीवपूर्वक, सातत्याने प्रयत्न करूया, अशी प्रेरणा या सदरातून मिळेल.

तोडगा काढताना हतबल न होता आपला हुरूप या वाचनामुळे वाढेल, अशी आशा करू या. ‘नवं-पालकत्व ते चिर-पालकत्व’ अशा वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांच्या पालकांना सोबत करणारं हे लेखन असेल. तसेच शिक्षकांना व सामाजिक पालकत्व या नात्याने सर्वाना हे सदर साद घालेल. मुलांच्या निश्चिंत वाढीचं चित्र वाटतं तेवढं निराशाजनक नाही, हे तरी या सदरातून नक्कीच जाणवेल. मग ज्याचं त्याचं घरटं ज्याचं त्यानंच बांधायचं असतं, सावरायचं आणि सजवायचं असतं, हे जरूर पटेल. उंच आकाशी भराऱ्या घेतल्या किंवा स्वच्छंदी विहरावंसं वाटलं तरी घरटय़ाची ओढ मनात खोलवर रुजेल..

सध्या मुलांमध्ये अगदी लहान वयापासून असुरक्षितता दिसून येते का? मुलांमध्ये असणाऱ्या स्वाभाविक चलबिचलीपेक्षा चंचलता वाढलेली आहे का? असं का होत असावं? मुलांमध्ये बदल व्हावा म्हणून काय केलं पाहिजे, असं पालक विचारत असताना ‘बदल काय तो मुलांच्या वागण्यात व्हावा आणि तो मुलांनी करावा.’ अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते, जी काही अंशी रास्त आहे. मुलांचं वागणं आणि त्यांची मानसिकता समजून घ्यायची असेल तर त्यांच्या आजूबाजूचं वातावरण जाणून घेतल्याशिवाय त्यासाठीचे प्रयत्न अपुरे राहतील. मानसशास्त्रानुसार व्यक्तीच्या घडणीमध्ये वातावरणाचा वाटा महत्त्वाचा असतो.

बदलत्या कुटुंब रचनेत, वेगवेगळ्या कारणांनी पालकत्वाचा एकखांबी तंबू पेलून धरताना येणारा ताण आहे. वाढत्या नोकरीच्या वेळामध्ये घरगुती जगण्यात होणारी तारेवरची कसरत आहे. भांडवली बाजारपेठेने आपल्या निखळ जगण्यावर केलेली कुरघोडी आहे. समाजमाध्यमांनी आपल्या माजघरात केलेला शिरकाव आहे. शिशु वयापासूनच्या शिक्षणात अयोग्य स्पर्धेला टाळणं अवघड आहे. कोणत्याच भौतिक आणि मनोसामाजिक प्रदूषणांपासून पूर्ण बचाव होण्याचा पर्याय सापडत नाही. या सगळ्याचा कोणत्या ना कोणत्या प्रमाणात आपल्या आयुष्याला होणारा स्पर्श हा जीवनातला एक अविभाज्य भागच झाला आहे जणू.. या सगळ्यातून स्वस्थ क्षण टिपणंच जिथे दुर्मीळ, तिथे सुरुवात कोणी, कुठून आणि कशी करावी?

मुलांमधील असुरक्षितता कमी होऊन स्वास्थ्य, स्थिरता येण्यासाठी, मुलं ज्या वातावरणात वाढतात तिथे सकारात्मक बदल अर्थातच आवश्यक आहेत. सुरुवात स्वत:पासून आणि आपल्या घरापासून करता आली, तर व्यत्ययांना पार करू शकणाऱ्या निरोगी, निर्मळ कुटुंबांचा भक्कम पाया आपण रचू शकू एवढं मात्र नक्की!

उमा बापट या मानसतज्ज्ञ, फॅसिलिटेटर आणि मेन्टॉर असून बाल्यधून’, (‘चेरिशिंग चाइल्डहूड’) या केंद्राच्या संस्थापक-संचालिका आहेत. मुलांना समजून घेत त्यांच्याबरोबर पालक, शिक्षकांनी स्वत: मोठं होणं, या सूत्रानुरूप गेली वीस वर्ष विविध उपक्रमांची  निर्मिती व सातत्याने आयोजन, कार्यवाही त्यांनी केलेली आहे. मुलांमधील प्रज्ञा ओळखणं, जोपासणं यासाठी पालक, शिक्षकांचं प्रशिक्षण तसंच प्रज्ञावंत पालक आणि मुलांचं समुपदेशन त्या करतात. हसत खेळत बुद्धिविकासया पुस्तिकेच्या त्या सहलेखिका आहेत. गंमत मोठं होण्यातली’, ‘खेळ रोज नवा : चालना खेळ भाग १, व २’, ‘रुजवू पालकतत्वया पुस्तकांचें त्यांनी लेखन केलं असून त्या मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर स्तरावर अध्यापन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:10 am

Web Title: towards a social parenting niramay gharte chaturang abn 97
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : स्पेस म्हणजे काय रे भाऊ
2 यत्र तत्र सर्वत्र : माणूस कधी होणार माणूस?
3 गद्धे पंचविशी : भोग नव्हे त्याग
Just Now!
X