आधी पुत्रवियोगाच्या आणि नंतर पतीवियोगाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मला मदत झाली ती सुरांच्या टर्निग पॉइंटमुळे. सूर माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य सार्थकी लागलं.
जीवनात एखादं वळण असं येतं की, आयुष्याला कलाटणी मिळून तो एक सुखद टर्निग पॉइंट ठरतो. त्या वळणापूर्वीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य एकाच व्यक्तीची आहेत, यावर कदाचित विश्वासही बसू नये. माझ्या आयुष्यात आलेल्या संकटाच्या वेळी, संगीताच्या गुरूंनी जीवनाला जी दिशा दिली, त्यामुळे माझं पुढचं आयुष्य संगीतमय झालं.
माझ्या वयाच्या ४५व्या वर्षी आमच्या सुखी समाधानी संसाराला जणू दृष्ट लागली. लढाऊ वैमानिक बनण्याच्या ईर्षेने हवाईदलात गेलेला आमचा एकुलता एक तरुण मुलगा अपघातात गेला. आयुष्य जणू काही त्या घटनेपाशीच थिजले. नैराश्याने मनात आत्महत्येचे विचारही डोकावले. परंतु पतीने समजूत घालताना सांगितलं, ‘आता यापुढचं जगणं हेच एक आव्हान आहे. जसं जमेल तसं येणाऱ्या क्षणांना सामोरं जायचं. आपल्या धाडसी, जिद्दी मुलाचा हाच सन्मान ठरेल. त्याची आठवण मनात जागती ठेवून त्याचे विचारी आई-बाबा म्हणून जगलेलं त्यालाही आवडलं असतं!’
याप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच, नियती पुन्हा क्रूर खेळ खेळली. मनाला उमेद देणाऱ्या पतीचा साथ सुटली. दु:खानं पुन्हा काळोखी दाटून आली. हितचिंतक-नातेवाईकांची मदत होती, पण खरा प्रकाशकिरण बनून आल्या गुरू प्रतिभा परांजपे. मनाच्या विकल अवस्थेत काहीही करावसं वाटत नव्हतं. प्रतिभाताईंनी वरचेवर भेटायला येऊन प्रेमाने समजूत घातली. ‘तुझी खरी आवड गाणं आहे. ते पुन्हा सुरू कर. सध्या क्लासमध्ये फक्त ऐकायला ये!’ हे त्यांचं म्हणणं, मी फार काळ टाळू शकले नाही, कारण त्यांनी ही पुत्रवियोग व पतीवियोगाचं दु:ख, बहुधा सुरांच्या साथीनेच सुसह्य़ केलं होतं. माझी मैत्रीण मला त्यांच्याकडे घेऊन जात होती. कालांतराने मैत्रिणींचं गाणं ऐकताना, अचानक माझ्या गळ्यातून केव्हा सूर मिसळू लागले कळलंच नाही प्रतिभाताईंच्या प्रोत्साहनाने, खंडित झालेलं संगीतशिक्षण काही वर्षांनी सुरू झालं व मी संगीत विशारद झाले. नुसतं शिकणंच नव्हे तर इतरांना शिकवण्यास त्यांनी प्रवृत्त केलं.
‘तू शिकवायला सुरुवात कर. तुला नक्की जमेल,’ असं सतत उत्तेजन देत राहिल्या. हळूहळू माझ्यात आत्मविश्वास जागवला. मग मी मैत्रिणीस भक्तिगीते शिकवण्याचा प्रयत्न केला. बघता बघता या शिकण्या-शिकवण्याला क्लासचं रूप आलं. गुरुपौर्णिमेस, प्रतिभाताईंसमोर माझ्या विद्यार्थिनींसमवेत, गुरुवंदना सादर केली. त्यांनीही कौतुकाने शाबासकी दिली. सुरांच्या संगतीने, माझ्या मनाचा एकटेपणा कमी होण्यास मदत झाली. आज प्रतिभाताई नाहीत, पण तीव्रतेने त्यांची आठवण येते. त्यांच्या उपस्थितीत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून संगीतातील वाटचाल, थोडी फार चालले याचं समाधान आहे. त्यांनी, माझ्या आयुष्याला जे सुरेल वळण दिलं ते माझ्यासाठी अनमोल आहे. किती व काय दिलं त्यांनी, याची जाणीव होत असते. म्हणून त्यांच्या ऋणात राहून म्हणावसं वाटतं..
‘एकाच या जन्मी, फिरुनी नवी जन्मले
स्वरप्रतिभेच्या स्पर्शाने स्वरमयी झाले!’

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता