सिद्धी महाजन – snmhjn33@gmail.com

ती एक सर्वसामान्य व्यक्ती. शाळेत रीतसर शिक्षण घेणारी. पण हळूहळू तिला माणसांच्या चुकीमुळे पर्यावरणाचा नाश होतो आहे हे लक्षात आलं. त्यातही तिच्या आवडीचा स्लॉथ हा प्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहे हे कळलं आणि तिने मुळापासून अभ्यास करायला सुरुवात के ला. त्यातूनच तिचा परिचय नोबेल पुरस्कार विजेते अल गोर यांच्या ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’शी झाला आणि तिने आपल्याला जे म्हणायचं आहे ते अभिव्यक्त करायला सुरुवात के ली. मैत्रिणींबरोबर ‘यू. एस. क्लायमेट स्ट्राईक’ची स्थापना केली. जी थोडय़ाच दिवसांत पन्नास राज्यांत पोहोचली. इतकं च नाही तर दर शुक्रवारी डेनव्हर येथे धरणे आंदोलनाला सुरुवात केली. विरोध सहन करूनही तिने आता पुढे जायचा चंग बांधला आहे, ती वसुंधरेची लेक, हेवन कोलमन..

स्लॉथ. अत्यंत सावकाश हालचाल करणारा, जणू अजिबात घाई नसलेला हा एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण प्राणी. झाडाच्या शेंडय़ावर आणि फांद्यांवर उलटं लटकू न इकडून तिकडे जाणारा हा प्राणी दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील सदाहरित जंगलांत आढळून येतो. सतत मिश्कील हसत असल्याप्रमाणे चेहऱ्याची ठेवण असलेला हा स्लॉथ. ना चित्त्याप्रमाणे चपळ, ना तो मोराप्रमाणे रुबाबदार! तरीही या प्राण्यापासून कु णीतरी प्रेरणा घेतली आहे. कुणालातरी तो अप्रत्यक्षपणे स्फूर्ती देऊन गेला आहे. ऐकू न विश्वास बसत नाही ना?

ही कथा आहे या स्लॉथवर, इतर प्राण्यांवर, वनस्पतींवर, मातीवर आणि पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या हेवन कोलमनची. अमेरिकेतील डेनव्हर, कोलोरॅडो इथे राहाणारी ही शाळकरी मुलगी. ती दहा वर्षांची असताना तिच्या नागरिकशास्त्राच्या शिक्षिकांनी शाळेत एक नवीन उपक्रम राबवला होता. त्यांनी मुलांमध्ये सामाजिक जाणीव रुजावी म्हणून विशेष कष्ट घ्यायला सुरुवात केली. मुलांना आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव करून द्यायला सुरुवात केली. सध्या जगाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची विविध प्रकारे तोंडओळख करून दिली. बेसुमार वृक्षतोडीमुळे बेघर होणाऱ्या, जीव गमावणाऱ्या प्राणीपक्ष्यांच्या प्रजातींची माहिती दिली. याच दुर्मीळ प्रजातींच्या यादीत एक नाव होतं, हेवनच्या लाडक्या ‘स्लॉथ’ या प्राण्याचं.

आपल्या लाडक्या स्लॉथवर आणि इतर अनेक प्राण्यांवर केवळ मानवाच्या चुकांमुळे हे संकट गुदरते आहे, ते नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे पाहून तिच्या कोवळ्या मनाला खूप वेदना झाल्या. माणसाच्या चुकांमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले गेले आहेत, ही गोष्ट तिच्या मनाला वेदना देत होती. ही अनिर्बंध वृक्षतोड थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल माहिती मिळवण्याचा तिनं आटापिटा चालवला. हे जग सुंदर आहे, अन् इथे सगळे प्राणी-पक्षी आनंदात राहाताहेत ही बालपणीची समजूत मनात धरून वावरणारी तिच्यातली छोटी मुलगी कोसळून पडली होती. त्यातच भर पडली कोलोरॅडोमध्ये वनांमध्ये सतत लागणाऱ्या वणव्यांची. या वणव्यांतून उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे तिथली हवा कमालीची प्रदूषित होत होती. त्यामुळे तिच्या दम्यानं पुन्हा डोकं वर काढलं. तिच्या भागातील जंगलं बेचिराख होताना ती पाहात होती. यातून सावरताना तिच्या हाती एक लेख लागला. त्यात वेगवेगळया पर्यावरणविषयक प्रश्नांची सोप्या आणि मुलांना कळेल अशा शब्दांत माहिती दिली होती. हवामानबदल आणि त्याचे दुष्परिणाम या मुद्यांचाही ऊहापोह या लेखात केला होता. अशी रोचक माहिती देणारा लेख वाचल्यावर हेवनचं आयुष्यच बदलून गेलं.

त्या शब्दांचा तिच्यावर फार मोठा परिणाम झाला. तिचा पर्यावरणविषयक समस्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. तिला कळून चुकलं, की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी तिनं स्वत:च्या जीवनशैलीत जाणीवपूर्वक काही पर्यावरणपूरक बदल केले. काही जुन्या सवयी सोडल्या, नव्या सवयी लावून घेतल्या. अल गोर यांच्या ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’मध्ये तिनं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, आणि सुरू झाला एका व्यक्तीचा अभिव्यक्तीकडे एक नवा प्रवास!

हा ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’ म्हणजे नक्की काय? याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला त्याची थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. २००६ मध्ये पर्यावरण चळवळीचे खंदे समर्थक असलेले अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांनी एक खुलासा केला, त्यात संपूर्ण मानवजातीला खडबडून जागं करण्याची क्षमता होती. त्यांच्या ‘ऑस्कर’विजेत्या, ‘अ‍ॅन इनकन्व्हिनियंट ट्रूथ’ या माहितीपटाच्या माध्यमातून त्यांनी हवामानबदलासंदर्भात सर्वप्रथम काळजी व्यक्त केली. ही एका क्रांतीची सुरुवात होती. याद्वारे लोक आपल्या सभोवतालच्या वास्तवाकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकणार होते. आपल्या रोजच्या जीवनशैलीत पर्यावरणाला प्राधान्य द्यायचा विचार करणार होते.

त्या वर्षांच्या शेवटी याबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी अल गोर यांनी ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’ या संस्थेची स्थापना केली. यामुळे १५० हून अधिक देशांमधून २०,००० हून अधिक पर्यावरणप्रेमी एकत्र जोडले गेले. या त्यांच्या कार्यासाठी अल गोर यांना २००७ मध्ये शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला. जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांकडे जबाबदारीची समज होती, काही ठोस कार्यक्रम आयोजित करण्याची धमकही होती. पण त्यासाठी लागणारं प्रशिक्षण कुठून मिळवायचं? ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’नं हे काम हाती घेतलं. त्यांनी या कार्यकर्त्यांना सत्य परिस्थितीचं भान दिलं. वेगवेगळ्या आपत्ती आणि अडचणींना सामोरं जाताना लागणारं आवश्यक ज्ञान पुरवलं. हवामानशास्त्र, हवामानबदलामागचं विज्ञान आणि ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारं आवश्यक कौशल्य यांचा एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला. अगदी आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये हा विषय मांडण्यापासून, ते घरगुती संभाषणात हा विषय काढण्यासाठी लागणारी सगळी कौशल्यं त्यांना शिकवली.

छोटय़ा हेवनचा प्रवास इथूनच सुरू झाला. ‘क्लायमेट रिअ‍ॅलिटी प्रोजेक्ट’मधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर जवळपास तिच्याच वयाच्या दोन कार्यकर्त्यां इसरा हिरसी आणि अलेक्झांड्रिया विलासेनोर यांच्या सहकार्यानं तिनं ‘यू. एस. क्लायमेट स्ट्राईक’ची स्थापना केली. केवळ लहान मुलींनी स्थापन केलेली ही वैशिष्टय़पूर्ण संघटना. दर शुक्रवारी डेनव्हर इथल्या कॅपिटॉल् बिल्डिंग इथं केवळ एका फलकाच्या आधारावर तिनं धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अगदी थोडय़ाच दिवसांत पन्नास राज्यांमध्ये ‘यू. एस. क्लायमेट स्ट्राईक’ची मुहूर्तमेढ रोवली.

भविष्य म्हणजे काय? कोणत्या बिंदूपर्यंतच्या अनिश्चित काळाला भविष्य म्हटलं जात असावं? भविष्याचं नियोजन करण्यासाठी कोणती नियमावली ठरवून दिलेली असते? भविष्याबद्दल हे सगळे प्रश्न या मुलांना पडले. त्यांची उत्तरं त्यांना मोठे देत नव्हते. उत्तरं मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या खटाटोपाला होणारा विरोध त्यांना समजत नव्हता. ज्या जगाची आपण काळजी करतोय त्याच जगाकडून हा विरोध का असावा? सतत विचार करणारी ही मुलं. अनिश्चित भविष्याच्या काळजीनं व्यथित होणारी. आपल्या आईवडिलांना, आजूबाजूच्या समाजाला सतत समजावणारी. योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तरी हिम्मत न हरणारी. फक्त माणसासाठीच नव्हे, तर पृथ्वीवरच्या सर्व प्राणीमात्रांसाठी लढा देणारी. अजून जन्मालाही न आलेल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची काळजी करणारी.

आपण हे बदल घडवू शकतो हा विश्वास त्यांच्यात कुठून येतो? हेवन सांगते, की सुदैवानं आपल्याकडे अनेक अपारंपरिक ऊर्जास्रोत उपलब्ध आहेत. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा हे काही अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत, जे अगदी कोणतीही किंमत न मोजता आपण वर्षांनुवर्षं वापरू शकतो. इतके, की भूगर्भातील कोळसा किंवा नैसर्गिक वायूच्या साठय़ांना वर्षांनुवर्षं हातही न लावता माणूस जगू शकतो. आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत खूप प्रगती केली. लोकांची मानसिकता आम्ही थोडय़ाफार प्रमाणात बदलू शकलो. सत्याचाच नेहमी विजय होतो, हा आत्मविश्वास थोडय़ाफार प्रमाणात त्यांना देऊ शकलो. बदल घडवण्यासाठी पावलं उचलावी लागतात आणि ही पावलं कितीही लहान असली तरीही ती आपला ठसा उमटवून जातात हे नक्की.

राजकीय इच्छाशक्तीचा अंदाज घेताना या मुलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. ती प्रौढांचं लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न करीत आहेत. पण आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांना सत्तेत असणाऱ्या लोकांकडून पाठिंबा मिळवणं गरजेचं आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि सरकार जर हवामानबदलाच्या प्रश्नाबाबत योग्य निर्णय घेत असतील, तर काहीच समस्या येणार नाही. पण तेच जर आडमुठेपणा दाखवत असतील तर त्यांना अजून शक्ती लावावी लागेल.

टाऊन हॉलमधील सार्वजनिक व्यासपीठावर कार्बन प्रदूषकांविषयी सिनेटर कोरी गार्डनर यांच्याशी झालेली हेवनची चर्चा ‘व्हायरल’ झाली.  तिनं त्यांना आवश्यक कृती करण्यास सांगत चळवळ आयोजित करण्याची कल्पना सुचवली, मात्र गार्डनर यांनी नकार दिला.

मात्र, एका नकारानं खचून जाणं या मुलींना मान्य नाही. त्या करतात त्या कामावर त्यांचा विश्वास आहे. त्यासाठी वेगवेगळी आव्हानं त्या पेलतात. ही आव्हानं सोपी नसतील, पण ती पेलण्याला काहीतरी अर्थ आहे.