प्रेम ही प्रत्येकाची अनिवार्य संपदा आहे. ती सोबत घेऊन माणूस जन्माला येतो, ती त्याच्यापाशीच आहे. ती त्याची शिदोरी आहे, जी जन्माबरोबरच त्याला मिळाली आहे आणि जीवनभर ती त्याला साथ देऊ शकते.
प्रेम म्हणजे काय ते आपणा सर्वाना ठाऊक आहे असे आपण म्हणतो. पण हा भ्रम इतका विघातक आहे की, त्याची गणतीच करता येणार नाही. कारण जी गोष्ट आपल्याला माहिती आहे असं वाटतं तिच्या साधनेसाठी आपण काहीच प्रयास करीत नाही. मनुष्यजातीला जे मोठे-मोठे भ्रम झाले आहेत, त्यातला एक भ्रम हा आहे. प्रत्येक माणसाला हा भ्रम आहे की, तो प्रेम म्हणजे काय हे जाणतो.
परंतु आपल्याला हे ठाऊक नाही की, जो प्रेम जाणील तो त्याचबरोबर परमात्म्याला जाणण्याची क्षमताही मिळवील. पण असे आपल्या आयुष्यात होते का? म्हणूनच ज्या प्रेमाला आपण प्रेम समजतो ते प्रेम नव्हे, आपण दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला प्रेम समजतो आहोत. आपण दुसऱ्याच एका चित्तदशेला प्रेम हे नाव दिलं असावं. आणि जोपर्यंत हा भ्रम तुटून जात नाही तोपर्यंत खऱ्या प्रेमाचा शोध कसा करणार?
आपण सारे प्रेम मागतो आहोत आणि जो स्वत:च मागतो आहे तो प्रेम कसा देऊ शकेल? भिकारी सम्राट कसा होऊ शकेल? मागणारा हा देणारा कसा होऊ शकेल? आपण सारे एकमेकांकडून प्रेम मागतो. पत्नी पतीकडून प्रेम मागते, पती पत्नीकडून प्रेम मागतो. आई मुलांकडून प्रेम मागते, मुलं आईकडून प्रेम मागतात. आपण ज्याच्याकडून प्रेम मागतो आहोत तोही आपल्याकडून प्रेम मागतो आहे, हे न जाणून घेता आपण सारे एकमेकांकडून प्रेम मागत असतो, दोन भिकारी जणू एकमेकांसमोर झोळी पसरून उभे राहिले आहेत!
जोपर्यंत आपण काही मागतोय तोपर्यंत दुसऱ्याला देण्याची समर्थता आपल्यात कशी बरे येणार? आणि स्मरणात ठेवा की, जो प्रेम मागतो त्याला या जगात कधीच प्रेम मिळू शकणार नाही. जीवनाचे जे काही अपरिहार्य नियम आहेत, शाश्वत नियम आहेत त्यातला एक नियम हा आहे की, जो प्रेम मागतो, त्याला प्रेम कधी मिळत नाही; पण जो प्रेम वाटून टाकतो त्याला प्रेम मिळतं; पण त्याचं प्रेमाविषयी काहीच मागणं नसतं. जो प्रेम मागतो त्याला प्रेम मिळतही नाही.
प्रेम त्याच दारापाशी येतं, ज्या दारापाशी प्रेमाचं मागणं संपून गेलंय. जो मागणं बंद करतो, त्याच्या घरावर वर्षांव सुरू होतो आणि जो मागतच राहतो, त्याचं घर वर्षांवाशिवाय राहतं. कधी तरी येऊन प्रेमानं आपला दरवाजा ठोठावला आहे का? नाही, कारण आपण प्रेम देण्यात कधी समर्थ होऊ शकलेलो नाही.
आणि हेही स्मरणात ठेवा की आपण जे देतो, तेच फिरून परत आपल्याकडं येतं. जीवनाच्या आणखी काही शाश्वत नियमांमधला हा दुसरा नियम आहे की, जे आपण देतो, तेच आपल्याकडं परत येतं. सगळं जग म्हणजे एका प्रतिध्वनीपलीकडं अधिक काही नाही, आपण घृणा देतो आणि उलटून परत येते. आपण क्रोध देतो आणि क्रोध उलटून परत येतो. आपण शिव्या देतो आणि शिव्या उलटून परत येतात. आपण काटे फेकतो आणि काटे उलटून परत येतात. जे आपण फेकून दिलं होतं, तेच आपल्याला मिळतं. अनंतपटीने परत येतं.
फरीद नावाचा एक फकीर होता. गावातले लोक त्याला म्हणाले, ‘फरीद, अकबराला तुझ्याबद्दल फार आदर आहे. अकबराला विनंती करून इथं एक शाळा उघडायला सांग.’ लोकाग्रहास्तव फरीद अकबराला भेटायला गेला. सकाळी लवकर गेला. त्या वेळी अकबर नमाज पढत होता. तेवढय़ात फरीद त्याच्या मागं जाऊन उभा राहिला. अकबराचा नमाज पढून झाला. त्यानं दोन्ही हात उंचावले आणि तो म्हणाला, ‘हे परमात्मा, माझं धन वाढव. माझी संपत्ती वाढवं. माझं राज्य वाढव.’
फरीद परत जायला निघाला! अकबरानं उठून पाहिलं तर फरीद निघून चालला होता. अकबर पळत गेला, त्याला त्यानं रस्त्यातच अडवलं आणि म्हणाला, ‘आलास काय आणि परत चाललास काय?’
फरीद म्हणाला, ‘मला वाटलं की, तू सम्राट आहेस; पण मला आता समजलं की, तुही एक भिकारी आहेस! आमच्या गावासाठी एक शाळा मागायची असा आम्ही विचार केला होता; परंतु आणखी धन वाढावं. संपत्ती आणखी वाढावी म्हणून अजूनही तू मागणं मागतोस हे आम्हाला ठाऊक नव्हतं! एका भिकाऱ्यांकडं मागणं शोभादायक नाही! आम्हाला वाटलं होतं की, तू एक सम्राट आहेस; पण आता समजलं की, तूही एक भिकारी आहेस! म्हणून आम्ही परत चाललो आहोत.’
आपण सारे भिकारी आहोत! आणि आपण त्यांच्याकडे मागायला जातो आहोत, ज्यांच्यापाशी ते नाही! आणि जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण रडतो, दु:खी होतो आणि म्हणतो की, आम्हाला प्रेम मिळत नाही.
प्रेम ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही. प्रेम हे आपल्या आंतरिक जीवनातलं संगीत आहे. प्रेम कुणी तुम्हाला देऊ शकत नाही. प्रेम तुमच्यामध्ये जन्म घेऊ शकतं; पण तुम्हाला ते बाहेरून मिळू शकत नाही. याचं कुठं काही दुकान नाही. आणि कितीही किंमत दिलीत तरी ते विकत घेता येत नाही.
प्रेम ही प्रत्येक माणसाची अनिवार्य संपदा आहे. ती सोबत घेऊन माणूस जन्माला येतो, ती त्याच्यापाशीच आहे. ती त्याची शिदोरी आहे, जी जन्माबरोबरच त्याला मिळाली आहे आणि जीवनभर ती त्याला साथ देऊ शकते.
पण प्रेम आतमध्ये कुठं आहे आणि ते कसं शोधावं हे समजू शकणारी भाग्यवान माणसं फार थोडी आहेत. आपल्या संपत्तीचं गाठोडं बांधलेलंच राहतं, ते खुलं होतच नाही! आणि आपण दुसऱ्याच्या दारावर भीक मागत फिरतो, हात पसरून फिरतो की, आम्हाला प्रेम हवंय!
सगळ्या दुनियेचं मागणं एकच आहे की, आम्हाला प्रेम हवंय आणि सगळ्या दुनियेची तक्रार एकच आहे की, आम्हाला प्रेम मिळत नाही! मला प्रेम मिळत नाही याकरिता प्रत्येक जण दुसऱ्याला दोषी ठरवतो.
एकदा अंधाराने ईश्वराकडे जाऊन प्रार्थना केली, ‘सूर्य माझ्या मागे लागलाय, मला त्रास देतोय. सकाळपासून माझा पाठलाग करतो आणि संध्याकाळपर्यंत मला थकवून टाकतो. रात्री झोपून मी विश्रांती घेतो न घेतो तोच दुसऱ्या दिवसी परत सकाळी माझ्या मागे लागतो! मला काही समजत नाही की, मी कधी काही चूक केलीय की, मी कधी कुणाला दुखवलंय? मग हा उपद्रव का?’
ईश्वरानं सूर्याला बोलावलं आणि म्हटलं की, ‘बिचाऱ्या अंधाराच्या मागे तू का लागलास? तो असाच लपून छपून फिरतो, जागोजागी आसरा घेत फिरतो आणि त्याचा चोवीस तास पाठलाग करतोस?’
सूर्य म्हणाला, ‘कोण अंधार? आजपर्यंत त्याची माझी भेटच झालेली नाही! मी त्याला ओळखतही नाही. मी आजपर्यंत त्याला पाहिलेलंही नाही. माझं काही बोलणं झालं नाही. त्याच्याशी; पण नकळतच काही चूक झाली असेल तर आपण त्याला माझ्यासमोर बोलवा. कारण मी त्याची क्षमा मागायला अगदी तयार आहे. ओळख झाली की, मग दुसऱ्यांदा मी त्याचा पाठलाग करणार नाही.’
असं म्हणतात की, ही गोष्ट घडली त्याला कोटय़वधी, अब्जावधी र्वष होऊन गेली. परमेश्वराच्या फायलीत हा मामला तिथंच पडून आहे. अद्यापि परमेश्वर सूर्यासमोर अंधाराला आणू शकलेला नाही आणि आणू शकणारही नाही हे मी सांगून टाकतो! तो कितीही शक्तिमान असू दे; पण अंधाराला सूर्यासमोर आणण्याची शक्ती त्याच्यात नाही. कारण अंधार आणि सूर्य एकमेकांबरोबर उभे राहू शकत नाहीत. यालाही कारण आहे, कारण सूर्यासमोर उभं राहायचं तर अंधाराला स्वत:चं असं अस्तित्वच नाही. अंधार म्हणजे केवळ सूर्याची अनुपस्थिती. मग एकच गोष्ट एकदम उपस्थित आणि अनुपस्थित कशी असू शकेल? अंधार म्हणजे सूर्याची अनुपस्थिती. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचं नसणं. याचप्रमाणे प्रेम आणि अहंकार एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. अहंकारही अंधारासारखाच आहे. अहंकार म्हणजे प्रेमाची अनुपस्थिती, प्रेमाची गैरहजेरी. ती प्रेमाची उपस्थिती नव्हे. आपल्यात प्रेम अनुपस्थित आहे. म्हणूनच आपल्यामध्ये ‘मी’चा स्वर गोंगाट करीत असतो आणि आपण ‘मी’चा स्वर चढवून म्हणतो की, मला प्रेम करायचंय, मला प्रेम द्यायचंय, मला प्रेम हवंय!
(‘अंतर्यात्रा’ या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र