06 August 2020

News Flash

अनपेक्षित वळण

नोकरीच्या मोहात अडकले असते तर एवढय़ा व्यापक कार्यकर्तृत्वाच्या विश्वाला मी मुकले असते.

| February 1, 2014 08:23 am

नोकरीच्या मोहात अडकले असते तर एवढय़ा व्यापक कार्यकर्तृत्वाच्या विश्वाला मी मुकले असते. तो टर्निग पॉइंट माझ्यासाठी आणि ज्यांच्यासाठी मला काही करता आलं त्यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरला.
मी एक सामान्य, तीही एक मुस्लीम  गृहिणी होते. माझ्यावर अनेक उघड, तर काही छुपे बंधनाचे पाश होते. माझे पती कोल्हापुरात सेंट्रल वेअरहाऊसला नोकरीला होते. माझे मोठे दीर मौलासाहेब मुल्ला हे वकील होते. ते मुस्लीम बोर्डिग व नेहरू हायस्कूलशी संबंधित होते. मुल्लांचे बाकी सगळे भाऊ, वहिनी, बहीण या शिक्षकी पेशात होत्या. घोसरवाडीची सासरची कोरडवाहू शेती-फारसं उत्पन्न न देणारी. मीही शिक्षिकेची नोकरी करावी, अशी सासऱ्यांची इच्छा. कारण लग्नामुळे कर्ज झालं होतं.
  माझ्या मोठय़ा दिराने मला इंटरव्हय़ूला नेहरूहायस्कूलला बोलावलं. महिन्याचं बाळ घेऊन मी इचलकरंजी ते कोल्हापूर बसने प्रवास केला. एक दिवस माझंच मूल सांभाळताना माझी अवघड स्थिती झाली. ‘एक मूल आपल्याला नीट सांभाळता येत नसेल तर आपण इतरांच्या मुलांना काय न्याय देणार, शिवाय मुलांची आबाळ होणार. कुणालाच न्याय देता येणार नाही’ या प्रबळ विचाराने मी या नोकरीला नकार दिला; शिक्षण क्षेत्राची आवड असतानाही.
मी फार भिडस्त स्वभावाची, पण सारं बळ एकवटून मी हा निर्णय घेतला. घरात गहजब झाला. पण हा निर्णय घेतला नसता तर आयुष्यभर एकाच चाकोरीतून जावं लागलं असतं.
इचलकरंजीत छोटंसं खताचं दुकान काढलं होतं. एकदा रस्त्यात आमदार बाबासाहेब खंजिरे व गावातील काँग्रेसची प्रमुख माणसं सभा संपवून चालत निघाली होती. माझे वडील स्वातंत्र्य चळवळीपासून राजकारणात होते. त्यामुळे या सर्वाशी कौटुंबिक संबंध होते. खंजिरे काका मला काँग्रेस भवनमध्ये घेऊन आले व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा फॉर्म भरायला लावला. ते म्हणाले, राजकारणात जर वाईट लोक आहेत, असा तुझा समज असेल तर चांगल्या घरच्या लोकांनी राजकारणात यायला हवं.’
हा राजकारणातला प्रवेश माझ्या आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’ होता. मला राजकारणाची अजिबात आवड नव्हती. ‘दिल्लीनंतर इचलकरंजीत राजकारण’ असा या गावाचा लौकिक! गट-तट, तीव्र स्पर्धा, कामगारांमुळे कम्युनिस्ट पक्ष तितकाच प्रबळ, इतरही पक्षांचं अस्तित्व. अशा वातावरणात माझी न.पा. शिक्षण मंडळात निवड झाली. मी चेअरपर्सनही झाले. आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व आनंद होता. ही पाच र्वष संपली यशस्वीपणे!
१९९१ ला मी नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून आले. बाबासाहेब खंजिरे यांच्या अचानक मृत्यूनंतर हा गट विस्कळीत झाला. खासदार बाळासाहेब माने गटाशी आम्ही काही लोक जोडले गेलो. लोकांची अनेक अडचणीची कामं करता आली.
नोकरीच्या मोहात अडकले असते तर एवढय़ा व्यापक कार्यकर्तृत्वाच्या विश्वाला मी मुकले असते. तो टर्निग पॉइंट माझ्यासाठी आणि ज्यांच्यासाठी मला काही करता आलं त्यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरला.     ल्ल                               
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2014 8:23 am

Web Title: unexpected turn
टॅग Chatu Rang
Next Stories
1 शहाणे करून सोडावे सकळ जन
2 गुडघ्यांना आराम
3 अन् मी बंगाली शिकले
Just Now!
X