28 February 2021

News Flash

हॅपी व्हॅलेंटाइन्स डे टू मी!

उद्याच्या ‘व्हॅलेंटाइन दिना’निमित्तानं स्वत:ला सांगून तर पाहू, हॅपी व्हॅलेंटाइन्स डे टू मी!

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

जगण्यात सर्वात दु:खदायक काय असतं? तर आपल्याच माणसाचं आपल्या मनाविरुद्ध वागणं. नात्यातले सगळे प्रश्न समोरचा कसा वागतो त्यावर, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून. त्यापेक्षा आधी स्वत:वरच प्रेम   के लं तर? आपण स्वत:शी आनंदी असलो, समाधानी असलो की आपोआपच ते आपल्या वागण्यात उतरतं आणि साहजिकच मग आपलं जगणंही तसंच होऊन जातं म्हणतात. मग उद्याच्या ‘व्हॅलेंटाइन दिना’निमित्तानं स्वत:ला सांगून तर पाहू, हॅपी व्हॅलेंटाइन्स डे टू मी!

प्रेमाविषयी कायमच साधं-सोपं  लिहिलं

गेलंय, तरीही त्या प्रेमासाठी आपण सगळेच

कायम आशा लावून ताटकळत बसलेलो

का असतो?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्नय का?  प्रेमाइतकी सुंदर आणि सुरेख बाब अस्तित्वातच नाही. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम नाही, त्या व्यक्तीचं जगणं भकास, वाळवंटच! आणि म्हणूनच त्या प्रेमाची वाट बघणं, त्या विचारात अडकून राहाणं येतंच!  शिवाय हे प्रेम कथा-कादंबऱ्या, चित्रपट यात म्हटल्यासारखं उदात्त वगैरे प्रकारात मोडणारं हवंच, अशीही आपली एक अट असतेच की! म्हणजे त्यात एकनिष्ठता हवी, त्यागाची तयारी आणि यंव आणि त्यंव. बापरे नुसता विचार करूनच, भुताची वाटणार नाही इतकी प्रेमाची भीती वाटेल, कारण या ‘अनकंडिशनल लव्ह’साठी वास्तविक किती तरी ‘कंडिशन्स’ आहेत..

आपण सगळेच त्या कोण्या एका ‘खास’ व्यक्तीची वाट पाहात थांबलेले असतो. आयुष्यभर.. कायम!  की जी अशी अचानक स्वप्नातून सत्यात अवतीर्ण होऊन, आपल्याला आपलंसं करेल, आपल्या हक्काची असेल आणि आपल्या प्रेमात आकंठ बुडालेली राहील, कायमच. आपणही तसेच प्रेमाच्या शिगोशीग भरलेल्या त्या सरोवरात कायमचे डुंबत राहू वगैरे वगैरे!  समजा, या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘ ऐका हो ऐका, तुम्हाला हवं तसं, प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल असं, शंभर टक्के  विनाभेसळ आणि अगदी नवीन कोरं चकचकीत प्रेम मिळेल हो..!’ अशी दवंडी पिटली गेलीये, हे लक्षात आलं तर सगळ्यांच्याच परिकथांची परिणती सुखान्तात होईल. किमान तशी शक्यता तयार होईल.  कुठंय, कुठंय  हा सुखान्त? म्हणत वयाच्या कोणत्याही टप्प्यावरच्या सगळ्यांच्याच त्यावर उडय़ा पडतील. आपल्या या ‘व्हॅलेंटाइन बाबा’च्या त्या विशिष्ट देवदूताच्या बाणानं घायाळ व्हायला नाही तरी आपण उतावीळ असतोच. राहिलं! परदेशी देवदूत नको, तरी मन्मथाचे, मदनाचे बाण आहेचेत की!.. आणि नको नको म्हणत, प्रत्येकालाच त्यानं आपल्यालाही ती गोड वेदना द्यावी, अशी अतीव इच्छासुद्धा असतेच..

आणि हे सगळं अगदी हाकेच्या अंतरावर बरं का! म्हणजे असं, की पट्कन स्वत:ला गोड, लाडिक, लडिवाळ आवाजात हाक मारायची, डोळे बंद करायचे आणि आपलीच प्रतिमा आपल्यासमोर आलेली पाहायची. हं! थांबा, पण प्रतिमा, अंतर्बाह्य़ बरं का! म्हणजे उभं राहून, झोपून, उठून, बसून, ती कशीही आली, तरीही तिचं अंतरंग मात्र प्रत्येक वेळेस तेच असेल. हो- बरोब्बर ओळखलंत, आज आपणच आपले व्हॅलेंटाइन!

किती कंटाळवाणी, रटाळ कल्पना आहे ही, असं म्हणून, लगेच या वास्तवाला खोडून नाही काढलं तरीही चालेल. कल्पना म्हणून पाहिलं तर कंटाळवाणी आणि रटाळच, पण वास्तव म्हणून पाहिलं तर मात्र हे फारच ‘सीरिअस अफेअर’ आहे. चुकूनही ‘ब्रेक-अप’ वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, कारण स्वत:लाच टाळणार तरी कसं आणि किती!

प्रेम म्हणजे नेमकं आपल्याला काय हवं असतं?  खरं तर ते दुसऱ्याकडून नाहीच, आपल्याचकडून हवं असतं.  म्हणजे स्वत:विषयी खूप खूप आणि सतत छान वाटणं, ते न संपणं. आपल्या सर्व गुणदोषांची उजळणी होण्यापेक्षा, त्यातल्या चांगुलपणाला अधोरेखित करत आपलं सहजगत्या पुढे जाणं, त्याचा कोणाला तरी खूप अभिमान वाटणं, आपल्याबरोबर सदोदित असण्याची प्रबळ इच्छा असणं, जिथे अडकल्यासारखं वाटेल तिथे वाटाडय़ा दिसणं, आत्मविश्वास, स्वत:ची अस्मिता, यांचं उदात्तीकरण आणि हे सगळं कोणत्याही अभिनिवेशाशिवाय, अगदी सहज. ढग भरून आले की पावसाचं बरसणं जितकं सहज, तितकंच. हे सगळंच्या सगळं ‘पॅकेज’ आपल्याला स्वत:तच सापडतं की! मग स्वत:कडे पाठ का फिरवायची? अं हं! इतर कोणावर असं गुलाबी किंवा आपल्याला हवं तसं प्रेम करू नये असं यातून मुळीच म्हणायचं नाहीये; पण ते करत असताना, जी व्यक्ती त्या प्रेमाचा प्याला हवा तसा पिता यावा म्हणून अपार कष्ट सोसते, त्या आपल्यातल्या स्वत:वरही तसंच आणि त्याच वेळेस, तितकंच प्रेम करायला हवंच की!  म्हणजे एखाद्या ‘डेट’वर जायचंय तर तो संपूर्ण दिवस कसा भिरभिरलेला असतो. आज काय घालू या, कसं बोलू या, कुठे फिरायला जाऊ या, भेट काय देऊ या आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कोण्या एका व्यक्तीला, आपल्याशी परत बोलावंसं, भेटावंसं वाटेल असं काय करू या? कितीही मैत्रीपूर्ण नातं असेल, वागण्या-बोलण्यात सहजता असेल, एकमेकांना खूपसं ओळखत खूप वाटा तुडवून झालेल्या असतील, तरीही ही अशी गोड अंधूकसर धाकधूक असतेच की! आणि म्हणून खाली वर्णन केलेलं असं काहीबाही आपल्या कानावर येत राहातंच किं वा आपण पाहात राहातोच.

‘माझंच त्याच्यावर जास्त प्रेम आहे. मी कधीही भेटण्याची ठरलेली वेळ मोडत नाही. तो मात्र कायमच उशिरा येतो. मला किती, काय काय थापा मारून निघावं लागतं. आता चिडचिड होते माझी.’

‘मला आठवतंच नाही, की केवळ माझ्या म्हणवणाऱ्या मित्रमैत्रिणींशी, माझी शेवटची भेट कधी झाली ते. जेव्हापासून प्रेमात दोघं सोबत आहोत, तेव्हापासून सगळंच अगदी ‘जॉइंट-अकाऊंट’सारखं! एकदा प्रेमात पडलं की, आपलं व्यक्तिगत असं काही उरतच नाही म्हणा. असंच हवं ना!’

‘मला चुकूनही निळा रंग आवडत नाही, पण प्रेमासाठी वाट्टेल ते! तरीही आता प्रत्येक वेळेला त्या निळ्या भिंतींच्या हॉटेलमध्ये जाणं जिवावर येतं यार. कसं सांगायचं, उगीच माझं पिल्लू दुखावलं तर!’

‘मला चित्रपट महोत्सवातले चित्रपट पाहायला खूप आवडतात. शेवटचा चित्रपट दोन वर्षांपूर्वी पाहिला, कारण प्रेमात दोन वर्ष कशी गेली कळलंच नाही.’

‘माझं ब्रेक-अप झाल्यापासून मला जगावंसं वाटत नाहीये. काहीच इंटरेस्टिंग वाटत नाही, कारण या एका रिलेशनशिपमध्ये मी माझं सगळं दिलेलं. त्याच्याआधी मला काय आवडायचं, दिवस कसा असायचा, काय केलं जायचं, हे अक्षरश: समजत नाहीये. त्यामुळेच एक पोकळी आलीये.’

अशी अनेक उदाहरणं पाहिली की वाटतंच, प्रेम इतकं सुंदर असेल तर त्यात इतका त्रास नको किंवा मनावर इतकं दडपण, ताण नको आणि मुळात स्वत:चं व्यक्तिमत्त्व पार पुसून जाईल किंवा विस्मरणातच जाईल, तरीही खूप समाधान आहे, अशी भलावणही नको. याची गंमत अशी, की हे सगळं करताना, घडताना ते असं होत जातं, सहज. सुरुवातीला निरपेक्ष, आपल्याला आवडतं म्हणून. मग, आपण आत्तापर्यंत करतोय म्हणून. मग येतो तो हिशोब! मी इतकं केलं, असं केलं, तसं केलं आणि मग येते ती प्रेमात असूनही जाणवणारी पोकळी, अर्थहीनता आणि कधी कधी चक्क कंटाळा. नातं पुढे सरकतं तशा काही बाबी अटळच की. तरीही त्या याच मार्गाने जाव्यात हे गरजेचं नाही.

आता ही खाली वर्णन केलेली प्रेमाची दुसरी बाजू-

‘मला इंग्रजी चित्रपट आवडतात आणि याला नव्वदच्या दशकातले. अनेकदा आम्ही एकाच थेटरात वेगवेगळे चित्रपट पाहातो. कधी एकेकटे, तर कधी आपापले मित्र-मैत्रिणी घेऊन!’

‘आम्ही चार वर्ष सोबत आहोत, कॉलेज सुरू झालं तेव्हापासून; पण आमचे कित्येक मित्रमैत्रिणी वेगवेगळे आहेत. आम्ही तशाच पाटर्य़ा करतो आणि एकमेकांना गमतीजमती सांगतो!’

‘मला पहिल्यापासूनच खगोलशास्त्रात पीएच.डी. करायची होती; पण त्यासाठी आम्हाला एकमेकांपासून लांब राहाणं क्रमप्राप्त होतं. मग मीही ठरवलं, प्रेम आहे म्हणून एकमेकांच्या आवडीनिवडी गळा दाबून मारून टाकायच्या नाहीत. करिअर तर चुकूनही नाही. आता मी इथे बंगळूरुमध्ये आणि तो ऑस्ट्रेलियात आहे. आठवण तर येतेच. भेटावंसं वाटतंच; पण म्हणून आम्ही बाकी गोष्टींवर पाणी नाही सोडलंय.’ आता ही म्हटलं तसं दुसऱ्या प्रकारची बोलकी उदाहरणं.

‘प्रेमाची दुसरी व्याख्या त्याग!’ असं म्हणणारे आता लगेच तलवार उपसतील; पण त्यांना नम्र वंदन करून, त्यांचं बरोबरच आहे हेच सांगावंसं वाटेल, कारण स्वत:वर प्रेम करायचं म्हणजे ‘आपलं दोघांचं’ म्हणून असणारं जे काही आहे, त्यातल्या काही गोष्टींचा त्याग आपसूक आलाच! तसा ‘त्याग’ करण्यात काही चूक नाहीये, हे त्याच वेळेस मनात कोरलं जाईल, जेव्हा आपलं सर्वात आधी आपल्या स्वत:वर उत्कट प्रेम असेल. शिवाय यातून आपण केवळ स्वत:चाच स्वार्थीपणानं विचार करतोय का, वगैरे भंपक प्रश्नही समोर येणार नाहीत. आपल्या आसपासच्या कुणीही उगाचच आपली शाळा घेत, ‘तुला प्रेमच करता येत नाही! तू प्रचंड स्वार्थी आहेस!’ असलं काही भलतंसलतं डोक्यात भरवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला तरीही आपण स्वत:शी प्रामाणिक असू, आश्वस्त असू तर याकडे सहजच दुर्लक्ष करता येतं.

मंडळी सावध! स्वत:वर प्रेम करणं आणि आत्मकेंद्री, स्वार्थी, अप्पलपोटी असणं यात प्रचंड फरक आहे बरं का! या सगळ्या स्वकेंद्रित असण्याची बाधा झालेली माणसं प्रेमात काय किंवा त्याशिवाय काय, तशीच कोरडी ठणठणीत आणि त्यांना मिळणाऱ्या क्षणिक सुखाचाच विचार करत राहतात. आपल्याला वाटेल की त्यांचं स्वत:वर निरतिशय प्रेम आहे. छे! याच्या अगदी उलट! ते स्वत:त अनेक न्यूनगंड बाळगून जगू पाहतात. त्याची भरपाई, अशी सगळाच स्वकेंद्री विचार करत जगण्यातून करतात. दुसरं, स्वत:वर प्रेम करणं, म्हणजे स्वत:च्या दिसण्यावर, बाह्य़ दर्शनावर वारेमाप खर्च करत सुटणं असंही मुळीच नाही. स्वत:वर प्रेम करण्यासाठी हे काहीच लागत नाही. उलट आपण जसे आहोत, जसे दिसतो, हसतो, रडतो, नाचतो, गातो, असं आपलं ‘असणंच’ आवडायला लागतं. तिथे त्याची इतर कुणी पावती द्यावी याची अजिबातच गरज उरत नाही, त्यामुळे ती मिळाली तरी तो मस्त ‘बोनस’.

आता या स्वत:वर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तींची सर्वात मोठी खूण अशी, की या सर्वानाच सर्वोत्तमाची ओढ असते. म्हणजे स्वत:साठी जे उत्तम ते स्वीकारणं. तिथे वैचारिक, मानसिक, भावनिक अशी प्रगल्भता येत राहते. इतरांमधलंही चांगलंच दिसत राहातं. आनंदी असणं, राहाणं हे काही ठरावीक गोष्टींशी निगडित न असता, ते असं रोजच्या व्यवहारातलं, आचारातलं होऊन जातं, यासाठी काहीच कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि मग अशा व्यक्तीच्या प्रेमात पडल्याशिवाय इतरांना राहावतंच नाही. त्यामुळे आज-उद्या अगदी ‘त्या’ विशिष्ट कोणा एकाला आपल्या प्रेमात पाडायचंच असा हिय्या केला असेल, तर आधी, स्वत:ला ते ‘तीन शब्द’ वगैरे नुसते म्हणायचे नाहीत, तर स्वत:शी तसं वागायचं, खरं तर आजपासून रोज, प्रत्येक क्षणी!

w urjita.kulkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 1:06 am

Web Title: valentine s day article 01 zws 70
Next Stories
1 ज्येष्ठांचे लिव्ह इन : आक्रसलेला नात्यांचा परीघ
2 व्यर्थ चिंता नको रे :  विचारी मना ‘तऱ्हा’ तुची शोधून पाहे..
3 मी, रोहिणी.. : अविस्मरणीय
Just Now!
X