|| सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

आयुष्य जगत असताना अनेक माणसं भेटतात, अनेक अनुभव येतात आणि गुन्हा, नीती, नाती, अभिव्यक्ती, बंधन आणि मुक्ती सगळ्यांचेच ओळखीचे, नेहमीचे आडाखे गळून पडतात. हे खरं की ते? विचार करायला लावणारे असे अनुभव चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या क्षणी, वेगवेगळ्या वाटेवर येत गेले.. हेच अनुभव लघुकथा बनून आयुष्याकडे बघणारे झरोके झाले..

कॅमेऱ्याने मला माझ्या अनुभवाला चौकट द्यायला शिकवलंय. चौकट दिली की अनुभवांच्या लघुकथा होतात. ‘वेलकम होम’ या मराठी चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण माझ्या घरातच झालं. चित्रीकरण म्हणजे अर्थातच घरात बरीच ये-जा चालू होती. माझा एक नवा  छोटा व्हिडीओ कॅमेरा टेबलावर ठेवलेला होता. आवराआवरी करून सगळे गेल्यावर मी अवेळी झाडून-पुसून स्वच्छ केलेल्या, बैठकीच्या खोलीत निवांत श्वास घ्यावा म्हणून खुर्चीत बसले. समोर लक्ष गेलं तर टेबलावरचा कॅमेरा नाहीसा झालेला. मी तरी उचललेला नव्हता. मग कोणी उचलला? सगळ्यांना फोन करून झाले. पण कोणालाच कॅमेऱ्याची काहीच आठवण नव्हती. म्हणजे गेला कॅमेरा! पहिल्यांदा माझ्या पोटात मोठा खड्डा पडला. कॅमेऱ्यापेक्षा त्यातल्या मेमरी कार्डवर जे होतं ते सगळं गेलं म्हणून.

अस्वस्थतेनं दोन शांत श्वास घेतल्यावर मी म्हटलं ‘बरं!’ ‘बरं’ म्हटल्यावर पोटातला खड्डा भरून आला आणि वेगळीच आठवण झाली. चोर म्हणजे कोण? कशी करतात चोरी? चोरी यशस्वी झाल्यावर आनंद चोरलेल्या वस्तूचा असतो की मिळालेल्या यशाचा असतो? चित्रपट बनवण्याच्या खूप वर्ष आधी मी गुन्हेगार स्त्रियांच्या अभ्यास प्रकल्पात संशोधन अधिकारी म्हणून काम केलं होतं. एके दिवशी तुरुंगामधल्या जेलर बाई मला म्हणाल्या, ‘‘गंमत बघायचीय का?’’ मी म्हणाले, ‘‘दाखवा.’’ त्यांनी एका बाईला बोलावणं पाठवलं. बाई कसली मुलगीच – अगदी साधी पण स्मार्ट डोळ्यांची. त्या तिला म्हणाल्या, ‘‘पैज मारून, या बाईंचे पैसे चोरून दाखव.’’ तिनं विचारलं, ‘‘हितंच?’’ त्या म्हणाल्या, ‘‘हो, आत्ता, इथेच.’’ काहीतरी गडबडगुंडा करून ती मुलगी जोरात मागे वळली. ती वळली म्हणून मीही वळले. माझी पर्स खाली पडली. जेलर बाईंनीच ती उचलून ठेवली. ती म्हणाली, ‘‘मी निघू का?’’ बाई अर्थपूर्ण चेहऱ्याने म्हणाल्या, ‘‘निघ.’’ मीच गोंधळले. ती गेल्यावर जेलर बाई म्हणाल्या, ‘‘ पर्स बघा उघडून.’’ तर पैसे गायब! काय हातचलाखी केली तिने. कसे गेले पैसे, काही कळलंच नाही.

आणखी एक ‘चोरांचा’ अनुभव, वेगळ्याच दमाचा! पहिल्या चित्रपटापासूनच माझा आग्रह असे की कलाकारांच्या बरोबरीने चित्रपटात ‘खरीखरी’ माणसं घेऊया. आमच्या ‘जिंदगीजिंदाबाद’ चित्रपटात अशी रस्त्यावर कचरा गोळा करणारी काही मुलं आम्हाला हवी होती. त्या मुलांना भेटण्यासाठी वडाळ्याला एका नाइट शेल्टरमध्ये आम्ही गेलो. चार मुलं आम्ही निवडली, आठ ते पंधरा वर्षांची. चित्रीकरण पुण्याला होणार होतं. तिथले फादर म्हणाले, ‘‘चिंता करू नका. मुलं पुण्याला येतील.’’ ते म्हणाले, ‘‘ही रस्त्यावरची गरीब मुलं, तुमचं लक्ष असू दे. त्यांना इकडचं-तिकडचं उचलण्याची खोड असते.’’ मी विचारलं, ‘‘त्यांना तिकिटाचे पैसे देऊन ठेवू का?’’ तर मुलं म्हणाली, ‘‘नको नको. आम्ही नेहमीच बिनतिकिटाचा प्रवास करतो. पत्ता द्या. बरोबर येऊन पोचतो.’’ आम्ही विचारात पडलो की चित्रीकरणाचे चार-पाच दिवस या मुलांना कुठे ठेवायचं? मुंबईहून ओम पुरी, मीता वसिष्ठ, अंजन श्रीवास्तव, मिलिंद गुणाजी, सुलभा देशपांडे असे कलाकार येणार होते. त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती. या मुलांना कुठे ठेवायचं? माझ्या भावाचा मुलगा पार्थ (जो आज आमच्या ‘वेलकम होम’ आणि ‘दिठी’ या दोन्ही चित्रपटांचा संगीत दिग्दर्शक आहे) यालाही या मुलांबरोबर चित्रपटात छोटी भूमिका होती – तो त्यांच्याच वयाचा. माझा भाऊ श्रीरंग म्हणाला, ‘‘ही मुलं माझ्याच घरी राहतील.’’ मी गोंधळले. म्हटलं, ‘‘अरे, ही मुलं रस्त्यावर कचरा गोळा करणारी. त्यांना कसले आजार असतील कोण जाणे! शिवाय फादर म्हणालेयत की त्यांना चोऱ्या करायचीही सवय असते.’’ श्रीरंग म्हणाला, ‘‘असू दे. आपल्या अनेक प्रयोगांत हा एक प्रयोग! राहतील माझ्या घरी.’’ पण या मुलांनी त्यांच्या वागण्यानं आम्हाला सुखद धक्का दिला. घराची स्वच्छता, स्वत:ची स्वच्छता, इतरांना कामात मदत, बोलणं-चालणं, त्यांनी सगळंच इतकं नेटकं केलं की त्या ‘अनाथ’ मुलांना निरोप देताना आम्हा सगळ्यांनाच गलबलून आलं. आणि या मुलांना जग चोर समजत होतं!

श्रीरंगाच्या घरातली एक काडीही इकडची तिकडे झाली नाही. पुढे तीन-चार महिन्यांनी ‘दोघी’ चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारासाठी आम्ही दिल्लीला निघालो होतो. मुंबईहून ‘राजधानी एक्स्प्रेस’ने निघणार होतो. सहज मुलांची चौकशी करायला नाइट शेल्टरच्या फादरना फोन केला. फादर म्हणाले, ‘‘मुलं तुम्हाला भेटायचं म्हणत होती. ती स्टेशनवर येऊन तुम्हाला भेटू शकतील.’’ मुलं स्टेशनवर आली. आम्हाला भेटली. सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांच्यासाठी खास कॅडबरी घेऊन आली. म्हणाली, ‘‘तुम्हाला कुठली चॉकलेटं आवडतात ते आम्हाला माहितीय. म्हणून ही आणली.’’ मग ज्यांना चोर समजलं जात होतं त्या या मुलांचं मन कसं आणि माझ्या घरात ज्याने कॅमेरा उचलला असेल त्याचं मन कसं? तर, मी म्हटलं – ‘बरं!’

आम्ही व्यसनग्रस्तांवर ‘मुक्ती’ हा चित्रपट बनवत होतो. बरेच व्यसनग्रस्त, म्हणजे ज्यांना ‘बऱ्या घरातली मुलं’ म्हटलं जातं – तशी मुलं होती. रिहर्सलसाठी ते आमच्या घरी येत असत. त्यातल्या एकानं मला खालच्या आवाजात पण विश्वासानं सांगितलं की, ‘‘मॅडम, आम्हाला ड्रग्ज मिळवण्यासाठी चोऱ्या करायची सवय लागलेली असते. म्हणजे तलफ आली की काही कळायच्या आधीच हाताने चोरी होते. तुमच्या घरातलं काही गेलं तर तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका. आम्ही परत आणून देऊ.’’ स्वत:विषयी जाण असलेले आणि नात्याची नीती समजलेले हे कसले चोर?

‘जिंदगीजिंदाबाद’ (‘झेड झेड’) चित्रपटाच्या मुलांना ना शिक्षण ना ‘सो कॉल्ड’ संस्कार. ही तर ‘अनाथ’ मुलं. म्हणजे माणसाच्या मनात खरंतर दुसऱ्याशी चांगलं वागण्याचीच इच्छा असते का? ‘कासव’ चित्रपट बनवताना मला हा प्रश्न पडला होता. मग विकृती, वर्तणुकीची म्हणा किंवा नात्यांची म्हणा, कशी तयार होते? दु:खी माणसं लालची होऊ शकतात. मोहानं दुसऱ्याला आणि स्वत:लाही दु:ख देऊ शकतात. काही गुन्हेगारीकडे वळतात. काही मनानं आजारी पडतात. काही मात्र याही परिस्थितीत दुसऱ्याला सुख देण्यासाठी झटतात आणि स्वत:चं दु:ख कमी करतात. हे म्हणताना असाच एक वेगळा प्रश्न आणि त्याचं वेगळं उत्तर मला आठवतंय. आमच्या ‘बाई’ या पहिल्याच चित्रपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या तीन निरक्षर बायकांनी अभिनय केला. चित्रपट पूर्ण झाला होता आणि ‘क्रेडिट्स’मध्ये शेवटी कुणाचं नाव नेमकं काय लिहायचं, हे विचारत मी वस्तीत हिंडत होते. आदिकाबाई म्हणाल्या, ‘‘आधिका खंडू शिंदे लिवा.’’  म्हणाल्या, ‘‘खंडुबा ग्येला दारू पिऊन बाराच्या भावात. पन त्येला नावाच्या मंदी बशिवला की बरं वाटतंय सरकारला. दमडी ना का कमवेना. राशन कार्डावरही त्येचंच नाव. माजी पाच ल्येकरं ग्येली. पन त्येच्या काळजात दुकलं का कदी?’’ मग हसून म्हणाल्या, ‘‘जगाचं ऐकावं, मदलं नाव घालावं, आन करावं मनचंच.’’ शकुंतलाबाई म्हणाल्या, ‘‘लिवा – शकुंतलाबाई गायकवाड.’’ म्हटलं, ‘‘मधलं नाव?’’ त्या म्हणाल्या, ‘‘तरूनपनी लय मार खाल्ला त्येचा. तवा ल्येकरं ल्हान व्हती. ल्योक मोटा जाला आणि योकदा बाप मारायला आल्यावर त्येनं बापाचा हात धरला न म्हनला, खबरदार आईवर हात उगारला तं! तवा म्या त्येला म्हनलं, तू मोटा जालास, आता न्हाई म्या मार खायची आन त्येचं नाव बी लावायची न्हाई. तुमी मोटं व्हण्याचीच वाट बघत व्हते.’’ मग सारजाबाईंकडे गेले. त्या म्हणाल्या, ‘‘सारजाबाई गायकवाड.’’ मी म्हटलं, ‘‘मधलं नाव?’’ तर हसून म्हणाल्या, ‘‘लगीन जालं तेराव्या वर्षी. येका वर्सात त्येनं टाकून दिली-सडक्या भाजीवानी. तवापासून मजुरी करून सोताचं प्वाट भरतेय. कवाच इसरून गेले त्येचं नाव. आता सिनेमासाठी कशाला आठवा?’’ सगळे तर म्हणत होते की निरक्षर, गरीब वर्गातल्या स्त्रिया या स्त्रीमुक्तीच्या आधुनिक संकल्पनेपासून कित्येक योजनं लांब आहेत. पण या संभाषणांना स्त्रीमुक्तीचे आविष्कारच म्हणता येणार नाही का?

‘बाधा’ या चित्रपटाच्या शेवटाचं चित्रीकरण सुरू होतं. फलटणच्या पुढे एका धनगर वस्तीवर. सत्तर-ऐंशीच्या दशकात सोनथायमर नावाचे एक जर्मन अँथ्रोपोलॉजिस्ट धनगरांचा अभ्यास करायला महाराष्ट्रात आले होते. धनगर ही आपल्या शेळ्या-मेंढय़ांवर प्रेम करणारी, भटकी, कौशल्यानं घोंगडी विणणारी, तगडी, देखणी आणि स्वाभिमानी जमात. या सोनथायमरना त्यांच्या अभ्यासात सखाराम भाऊ यांनी मदत केली. आम्ही ‘बाधा’ करताना सखाराम भाऊंचा पत्ता काढला आणि त्यांच्याच वस्तीवर शूटिंग केलं. चित्रपट बनवणं किंवा त्याची संहिता लिहिणं यात मला एकाधिकारशाहीपेक्षा सहभागी संवाद असावेत असं वाटतं. ‘बाधा’ या कथानकात एक धनगर पुरुष मेंढय़ांच्या मागं जाणं सोडून दगडांच्या खाणीवर मुकादमगिरी करतोय. तो पुढारला पण घरची बाया-माणसं अजून मागासच राहिलेली. स्वत:च्या बायकोकडे दुर्लक्ष करून खाणीवर त्याने नवा संबंध प्रस्थापित केलाय. यात घरच्या बाईचा छळ होतो हे माहीत असूनही आपला नाइलाज आहे असंच त्याला वाटतंय. खाणीवरची बाई शहाणी आहे. तिला कळतंय की यात दोन्ही बायकांचा सन्मान कमी होतोय. ती त्याची कानउघडणी करते. आणि त्याच्याही मनात अपराधाची भावना आहेच. तो बायकोकडे परत येतो. परत आल्यावर तो काय करेल हे ठरवताना, मी आणि आमचं युनिट, कॅमेरामन संजय मेमाणे आणि इतर सहकारी यांच्याशी माझा मतभेद झाला. सणाचा दिवस आहे. बायको अगदी आजारलेली आहे. प्रथेनुसार नवं लुगडं नेसून, कपाळभर लांबडी चिरी लावते आहे. नवरा आलेला ती बघते. धडपडत उभी राहते. तो काहीच बोलत नाही. त्याचे डोळे मऊ झालेयत. तिचे डोळे खूप दिवस रडल्याने कोरडे. तो तिच्या जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तिच्या तोंडून एकच शब्द फुटतो, ‘‘आलासा?’’ (अमृता सुभाषने हा क्षण फार सुंदर दिलेला आहे.) तो नि:शब्द ! इथे मतभेद सुरू झाला. संजय म्हणाला, ‘‘आपल्या चित्रपटात त्यानं असं डोक्यावरून हात फिरवणं बरं नाही दिसायचं. हा माणूस असं कसं करेल ?’’ मी म्हटलं, ‘‘तिच्या डोक्यावर हात ठेवून तो तिला शांतही करेल आणि नव्या विश्वासाच्या नात्याचं आश्वासनही देईल.’’ एकमत झाल्याशिवाय पुढे सरकणं मला पटेना. म्हटलं, सखाराम भाऊंना विचारू. सखाराम भाऊ, त्यांची बायको, मेहुणी, सगळेच आले. सखाराम भाऊ म्हणाले, ‘‘ही तुमची अमृता मला माझ्या लेकीसारखीच वाटतेय. हा तिचा नवरा तिला किती छळत असतो ते मी बाहेर बसून रोज ऐकतोय. मानसाचं काळीज असंल तर कवा तरी पाझरायलाच लागंल की आपल्या मानसासाठी. आणि एकदा का पाझरायला लागलं की त्याला माया फुटलच आणि आपसूक डोक्यावर हात जाईल, येऊ दे डोक्यावर हात.’’ त्यांच्यातल्या बायकांनाही ते पटलं होतं. मग ते दृश्य तसंच चित्रित केलं. आता निरक्षर सखाराम भाऊंची ही समज, त्यांना सापडलेलं माणूसपणाचं व्यवच्छेदक लक्षण याची आठवण, ‘झेड झेड’ मधल्या मुलांचा विचार करताना मला झाली, साहजिकच नाही का?

जगताना आयुष्यात सतत अशा लघुकथा घडत असतात. त्यांच्याकडे, ‘व्ह्य़िू फाइन्डर’कडे एकाग्रतेने बघितल्यासारखं बघितलं की गुन्हा, नीती, नाती, अभिव्यक्ती, बंधन आणि मुक्ती सगळ्यांचेच ओळखीचे, नेहमीचे आडाखे गळून पडतात. आपण एवढंच करायचं. मन हलकं, हळवं आणि निर्भय असू द्यायचं. म्हणजे या लघुकथा हायकूसारख्या छोटय़ा असल्या तरी आपल्यासाठी मनाच्या किल्ल्यातून सुंदर जग बघायला झरोके पुरवतात.

sumitrabhavefilms@gmail.com