‘पाच पिढय़ांपासूनचा संगीताचा वारसा आता माझी लेक आणि नातींपर्यंत झिरपलाय. खूप काही दिलंय व्हायोलिनवादनानं मला. ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’चा सन्मान, बनारस हिंदू विद्यापीठाचं ८ वर्षे डीनपद, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षपद, दिग्गज कलाकारांबरोबर संगीत साथ, कधी जुगलबंदी, जगभरात मैफिली.. या सगळ्यांनी जगणंही आता नादमय झालंय. आजही जेव्हा व्हायोलिन छेडते तेव्हा त्याच्या ध्वनिलहरी आणि सूर परस्परांशी तादात्म्य पावतात, तेव्हा अनुभूती येते ती फक्त ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची!’

तब्बल सात पिढय़ांचा संगीत वारसा लाभलेलं माझं माहेर. जन्म झाला तोच अखंड सूर बरसणाऱ्या घराण्यात. वडील अरुपथी नारायण अय्यर हे पट्टीचे वीणा आणि व्हायोलिनवादक. मी त्यांचे पाचवे अपत्य. घरात अहोरात्र संगीतसाधना सुरू असायची. माझा जन्म झाला तो दिवस रामनवमीचा. साहजिकच या दिवशी कुठेनाकुठे भजन गायन, कीर्तन सुरू असतंच. एर्नाकुलमला आमच्या घराजवळच कृष्णाचं मोठं मंदिर आहे. तिथं टाळ, मृदुंग, डमरू या वाद्यांसहित प्रात:कालीन नामस्मरण, भजन, कीर्तन दिवसभर सुरूच असतं. तेव्हापासूनच नकळत मनावर सुरांचे संस्कार होऊ लागले. घरात मोठमोठय़ा कलाकारांचा सततचा राबता. एकीकडे त्यांच्या तालमीत माझ्यातला शिष्य घडत असतानाच देवळातल्या त्या सुरांच्या दिव्य अनुभूतीत माझ्या बालमनावर सुरांचे संस्कार आपोआपच घडत होते.
बघता बघता मी तीन वर्षांची झाले आणि वडिलांनी हातात व्हायोलिन दिलं. माझ्यापेक्षा त्या व्हायोलिनचीच उंची जास्त होती. वाजवायला घेतलं की त्याचा अध्र्याहून अधिक भाग खांद्याच्या वर जायचा. पण वडिलांपुढे ‘ब्र’ काढण्याची प्राज्ञा नव्हती. त्यांच्या कडक शिस्तीच्या दररोजच्या रियाजाच्या बाळकडूनं स्वर, लय, ताल माझ्या नसानसांत भिनत होतं. शाळेतून घरी आलं की आईला कामात मदत, ती झाली की रियाज असा दिनक्रम होता. वडिलांना झोप कमी होती. कधीकधी रात्री १२ वाजता उठून तोंडात पान चघळतच ते मला रियाजाला बसवायचे. हळूहळू मैत्रिणींना घरी येण्यास मनाई, मलाही बाहेर जाण्यास बंदी झाली. त्यांची ही शिस्त अंगवळणी पाडून घेणं बालसुलभ वयात कठीणच होतं पण त्यावाचून गत्यंतरच नव्हतं. पण आज मिळालेल्या दिगंत कीर्तीला वडिलांची शिस्त, संस्कारांची जोड होती म्हणूनच अधिकच झळाळी मिळाल्यासारखं वाटतं. माझ्यासह सात भावंडांचा आमचा कुटुंबकबिल्याचा गाडा ओढायचा, तोही कोणा नोकरचाकरांशिवाय म्हणजे अवघडच. आईला मदत करणं अपरिहार्य असायचं. दाक्षिणात्य पदार्थासाठी लागणारे मसाले मी तिला पाटा-वरवंटय़ावर वाटून द्यायचे. त्याकाळी नोकरांनी बनवलेलं जेवण जेवण्याची ना प्रथा होती ना ते घरात रुचतही होतं.
आईबरोबर स्वयंपाकघरात लूडबूड करताना मी मात्र दोन डाव घेऊन व्हायोलिनवादनाची नक्कल करायची. सोबत वडिलांचे सूर असायचेच. अशा या सुरांच्या रम्य संगतीत बालपण सरत होते. वयाच्या ९व्या वर्षी मी आकाशवाणीची ऑडिशन दिली. मी उत्तीर्ण झाले आणि कोण आनंद झाला होता म्हणून सांगू त्याक्षणी. आयुष्यातलं ते पहिलं यश! खूप आनंद देऊन गेलं. यावेळी आकाशवाणीच्या परीक्षेसाठी वयाची अट नव्हती. केव्हाही देणं शक्य होतं. आकाशवाणीची ती परीक्षा उत्तीर्ण झाले आणि एक-दोन महिन्यांमध्येच माझी पहिली मैफल झाली. त्या कार्यक्रमाला दिग्गज कलाकारांची मांदियाळी उपस्थित होती.
भारतरत्न एम.एस. सुब्बालक्ष्मी यांची साथ करण्याचं भाग्य वयाच्या १२व्या वर्षीच लाभलं. आंध्र प्रदेश, केरळ, पंजाबात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना त्या मला बरोबर घेऊन जायच्या. त्याच काळात दुसऱ्याही अनेक दिग्गज कलाकारांची साथसंगत करण्याचं भाग्य मला लाभलं. परंतु सुब्बालक्ष्मी यांच्या सहवासात राहून कलाकाराच्या अंगी असलेली नम्रता, लीनता, लोकांना मदत करण्याची वृत्ती म्हणजे काय असते ते समजलं. ‘ ह्य़ुमिलीटी किसे कहते हैं! डाऊन टू अर्थ रहना क्या होता है’ हे आणि जीवन जगण्याची कला मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. त्या आपल्या मैफिलीची सांगता भैरवीने करायच्या, तेव्हा मला एकल वादनाची मोठी संधी द्यायच्या. त्यांच्याच बरोबरच्या एका कार्यक्रमात मी ‘दरबारी कानडा’ आणि ‘भैरवी’ राग वाजवले तेव्हाही रसिकांकडून भरभरून दाद तर मिळालीच शिवाय ‘भैरवी राजम’ हा सुंदर किताबही!
मॅट्रिकची परीक्षा पास झाली तेव्हा माझं वय १४ वर्षे तीन महिने होतं. महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी वयाची अट किमान १४ वर्षे ६ महिन्यांची होती. वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला होते. त्यांची बदली त्याच दरम्यान मुंबईला झाली. त्यांची बदली माझ्या कलेसाठी ‘टर्निग पॉइंट’ ठरली. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांशी वडिलांची ओळख होती. ते नेहमी घरी यायचे. महाविद्यालय प्रवेशाला काही महिन्यांचा अवधी होताच. दरम्यान, वडिलांनी १२वीसाठी माझा बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतलाच होता. बी.ए.ही गंधर्व महाविद्यालयातून मी संगीत विषय घेऊनच केलं. त्यानंतर अलाहाबादच्या प्रयाग संगीत समितीच्या माध्यमातून संगीतातून एम.ए. केलं. इतर विषयांची तयारी करताना मी कधीही प्रश्नोत्तरे पाठ केली नाहीत. अख्खंच्या अख्खं पुस्तकच पाठ असायचं. बी.ए. फायनलला विद्यापीठात पाचवी आले. तेव्हा माझ्याबरोबर विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकरही होते.
पुन्हा एकदा आकाशवाणी ऑडिशनची वेळ आली. त्यावेळी मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ऑडिशन देणार होते. या ऑडिशनच्यावेळी विद्यार्थी आणि परीक्षक यांच्यामध्ये पडदा असतो. श्रीकृष्ण रातनजनकर आणि पंडित गजाननबुवा जोशी त्यावेळी परीक्षक होते. एवढय़ा वर्षांच्या रियाजानं गायकी अंगानं व्हायोलिनवादनासाठी बोटे चांगलीच स्थिरावली होती. या शैलीने व्हायोलिन वाजवणारी ही विद्यार्थिनी कोण हे त्या दोघांनाही जाणून घ्यायचं होते. माझं वाजवणं संपलं तेव्हा ते मुद्दाम बाहेर आले, मला भेटले आणि खूप प्रशंसा केली. मला तेव्हा खरंच कळत नव्हतं की मी त्यांच्या प्रशंसेला पात्र होते का? पण त्यांना माझी वादनशैली मनापासून भावली होती हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी आकाशवाणीची ‘बी-हाय’ परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
‘इच्छा असेल तेथे मार्ग सापडतो’ हे वाक्य लहानपणापासून मनावर कोरून ठेवलं आहे. माहेरी जुनं वळण, आर्थिक परिस्थितीही बेताचीच त्यामुळे वडिलांकडून ग्रहण केलेल्या संगीतकलेच्या शिदोरीवर वयाच्या १३व्या वर्षांपासून संगीताच्या शिकवण्या घेणं सुरू केलं. शिवाय व्हायोलिनवादनाच्या अनेक संधी मिळत होत्याच. प्रत्येक संधी ही माझ्यासाठी एक आव्हान समजून त्या काळात मी दिवसातून दोनदोनदा रियाज करायचे.
वय सरत होतं आणि आपली मुलगी आता लग्नाच्या वयाची झाली हे आईवडिलांच्या लक्षात यायला लागलं. वयाच्या पंचविशीत टी.एस. सुब्रमणियम या चार्टर्ड अकौन्टन्टशी माझा विवाह झाला. माझ्या कलेला प्रोत्साहनं देणारं सासर मिळालं. पण मीही माझा विवाह एका व्यक्तीशी नाही तर संपूर्ण अय्यर कुटुंबाशीच झाला आहे ही खूणगाठच मनाशी बांधूनच संसार केला.
तत्पूर्वी, बनारस हिंदू विद्यापीठात बारावी शिकत असताना पं.ओंकारनाथ ठाकूर यांच्याशी ओळख झाली. एकदा मैत्रिणीने ग्रामोफोनची एक रेकॉर्ड घरी आणली होती ती पं. ओंकारनाथ ठाकूर यांची होती. त्यांचे भारदस्त आवाजातील तोडी, मालकंस, निलांबरी हे राग ऐकून इतकी प्रभावित झाले की काय सांगू? ते बनारसमध्येच असतात हे कळल्यावर तर आनंद गगनात मावेना. अखेर न राहवून एक दिवस त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा योग जुळवून आणला. मोठी दाढी वाढलेले, चेहऱ्यावर धीरगंभीर भाव असलेले गुरुजी घरातील बंगईवर बसले असताना मला एखाद्या साधूपुरुषाप्रमाणेच भासले. त्यांच्या भारदस्त गायकीचं मनावर इतकं गारुड होतं की, मी त्यांनीच गायलेली गाणी व्हायोलिनवर वाजवून दाखविली. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. त्यांचं शिष्यत्व मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते समजावण्यासाठी, एकलव्याची गोष्ट सांगायला ते विसरले नाहीत.
१९५९ मध्ये मी बनारस हिंदू विद्यापीठात लेक्चररशीप सुरू केली. जोडीला संगीतसाधना सुरूच होती. त्यानंतर ‘ए कम्पॅरिटिव्ह स्टडी ऑफ म्युझिकल सिस्टीम इन नॉर्दन अ‍ॅन्ड सदर्न इंडिया इन १९६५’ यावर संशोधन करून पीएच.डी. मिळवली. ते करताकरता अनेक शिष्य घडवले. त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. व्ही. बालाजी, सत्यप्रकाश मोहन्ती, माझी पुतणी कला रामनाथ, जगन राममूर्थी यांचा. याच काळात विख्यात बासरीवादक पन्नालाल घोष, सारंगीवादक उस्ताद बुंदु खान, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर जुगलबंदीची संधी मिळाली. देश-विदेशात कार्यक्रम झाले. लेक्चरर असतानाच मला बनारस हिंदू विद्यापीठाचं डीनपद मिळालं.
तब्बल ८ वर्षे डीनपदी त्याचबरोबर संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षपद तसेच यूजीसी आणि केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांवरही काम केलं. बनारस हिंदू विद्यापीठानं मला शिक्षण आणि संगीत क्षेत्रातील सेवेसाठी ‘इमिरिट्स प्रोफेसर’ हा किताब देऊन गौरवलं.
पं. ओंकारनाथ ठाकूरांकडे गुरुजी म्हणून गंडा बांधला. तब्बल १५ वर्षे मी त्यांच्याकडे शिकत होते. धृपद-धमारचा आलाप असो, नटखट आणि शृंगाररसपूर्ण ठुमरी असो, भक्तिरसाने ओथंबलेली भजने असो वा ठेका धरायला लावणारा टप्पा असो, कोणताही प्रकार मी गायकी अंगाने वाजवायला लागले. कर्नाटक शैलीच्या वादनात सुमारे एक तपाचा रियाज होताच. त्यादरम्यान ताल, स्वर आणि लयीवर बऱ्यापैकी पकड मिळविली होती. व्हायोलिनमधून केवळ स्वर काढणं निर्जीव वाटायचं म्हणून हिंदुस्थानी गायकीतील भाव शिकले. त्याकाळात सतार, सरोदही ‘गतकारी’ अंगाने वाजवायचे, पण मी माझी शैली बदलली आणि गायकी अंगाने वादन करायला शिकले. तेव्हापासून उत्तर भारतीय संगीताच्या
प्रांतात विशेषत: व्हायोलिनवादनात क्रांती झाली. बऱ्याच व्हायोलिनवादकांनी ‘गतकारी’ शैली सोडून देऊन ‘ख्याल गायकी’ अंगाने व्हायोलिनवादनाची शैली अंगीकारली.
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभाचा दिवस उजाडला. त्या दिवशी आपली कला इतर विद्यार्थ्यांसमोर सादर करावी लागे. माझ्या आधी परफॉर्म केलेल्या बहुतांशी विद्यार्थ्यांना ‘हूटआऊट’ करण्यात आलं. साहजिकच मीही धसका घेतला. मनावर दडपण आलं. होतं नव्हतं तेवढं बळ एकवटून गुरुजींना सांगितलं, ‘मी नाही वाजवणार. मला ‘हूटआऊट’ करवून घ्यायचं नाहीए.’ माझं हे वाक्य त्यांनी ऐकलं आणि ते चांगलेच संतापले. मी व्हायोलिन वाजवलंच पाहिजे अशी आज्ञाच केली. ती धुडकावण्याची माझी प्राज्ञा नव्हती. माझं नाव पुकारण्यात आलं आणि मला जावंच लागलं स्टेजवर. बसले वाजवायला. १५ मिनिटांचा परफॉर्मन्स दिला. गुरुजींच्या आशीर्वादानं क्षणोक्षणी माझी मैफल इतकी बहरत गेली की मला ‘वन्समोअर’ मिळाला. गुरुजींची आज्ञापालन आणि मिळालेला वन्समोअर यामुळे माझ्यातील आत्मविश्वास अधिकच दृढ झाला. आणि त्याचा प्रत्यय अनेक कार्यक्रमातून येत गेला. खूप अविस्मरणीय प्रसंग गाठीशी बांधले गेले.
पुण्याच्या सुप्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवात सुमारे २० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने बागेश्री कानडा वाजवत होते. अचानक वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे ४० मिनिटे मंडपात अंधार गुडूप होता. पण सगळे श्रोते शांतपणे, अगदी तन्मयतेने मैफल ऐकत होते. वीज आल्यावर पुन्हा तोच ख्याल वाजवण्याचा त्यांनी आग्रह धरला आणि बडा ख्यालाच्या आलापापासून वादन सुरू केले आणि काय सांगू, कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला..
जळगावसारख्या तुलनेने लहान शहरात फार पूर्वी एका सरकारी कार्यक्रमात वादन केले होते. पण लक्षात राहिला तो गेल्या जानेवारी महिन्यात झालेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचा बालगंधर्व संगीत महोत्सव! मी, माझी मुलगी संगीता शंकर आणि दोन नाती रागिणी आणि नंदिनी यांची ‘थ्री जनरेशन कॉन्सर्ट’ या महोत्सवात सादर केली. या शहरात मला संगीताची चांगली जाण असेलेले श्रोते भेटले. आमच्यासारख्या कलाकारांना आणखी काय हवं असतं? रसिकांनी पसंतीची पावती दिली नाही, तर एवढय़ा वर्षांची तपश्चर्या फळाला कशी येणार?
काही वर्षांपूर्वी पॅरिसला निर्मलामातांच्या आश्रमात कार्यक्रमासाठी गेले होते. भव्य पेंडॉल टाकला होता. मला आठवतं मी ‘बागेश्री’ वाजवत होते, अचानक सोसाटय़ाचा वारा सुटला, लगोलग पावसाला सुरुवात झाली आणि पेंडॉल कोसळण्याच्या अवस्थेला आला. माझ्या व्हायोलिनवरही पाणी पडायला लागलं. मी वादन थांबवलं. सुमारे अध्र्या तासानं पावसाचा जोर कमी होऊन अखेर तो थांबला. प्रेक्षकही तितक्याच संयमानं बसलेले होते. पुन्हा पूर्ण ख्याल सुरुवातीपासून वाजवला.
माझ्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात माझा एक शिष्य बालाजी याने मला, व्हायोलिन, व्हायोला, चेलो, सारंगी, सरोद, संतूर, दिलरुबा आणि बासरी या वाद्यांच्या स्वरांचा मिलाफ असलेलं आणि त्यावर माझं नाव असलेल्या एक वेगळ्याच वाद्याची ‘सरप्राईज गिफ्ट’ दिली. तो क्षण मी कसा विसरेन? एकदा दिल्लीत कॉन्सर्ट होती तेव्हा माझी विश्वविख्यात व्हायोलिनवादक येहुदी मेनन यांच्याशी भेट झाली तीसुद्धा अविस्मरणीय अशीच होती.
माझ्या व्हायोलिनमधून जेव्हा ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘पायोजी मैने राम रतन धन पायो’, ‘ठुमक चलत रामचंद्र’ या भक्तिसंगीतापासून ‘नरवर कृष्णा समान’, ‘मम आत्मा गमला का’, ‘घेई छंद मकरंद’ ते ‘नाथ हा माझा’ या नाटय़पदांचा निनाद घुमतो आणि रसिक श्रोते जेव्हा तन्मयतेने त्याचा आस्वाद घेतात, तेव्हा माझ्यातला कलाकार तृप्त होतो.
वडिलांच्या कडक शिस्तीत सरलेलं बालपण, स्वत:ची मेहनत आणि परिश्रमाने संगीतसाधनेसाठी वेचलेलं तरुणपण आणि आता मानसन्मान, प्रसिद्धीच्या झगझगाटात संगीतसाधनेतच व्यतित होत असलेलं प्रौढत्व. आयुष्याच्या या वळणवाटेवर आजही मी शिष्य घडवत आहे. त्यात माझ्या दोन नातींचा समावेश आहे. ‘काऊ-चिऊ’च्या गोष्टींऐवजी बालवयातच त्यांच्यावर सुरांचे संस्कार केलेत. त्यांच्याबरोबर नव्याने व्हायोलिनवादनाचे धडे गिरवले. रागिणी आणि नंदिनी तयार होताहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी ‘सोलो कॉन्सर्ट्स’ होतात. माझी मुलगी संगीता शंकर हीसुद्धा स्वत:ची अकादमी सुरू करण्याच्या तयारीत आहे. माझ्या उच्चविद्याविभूषित तिसऱ्या पिढीने जपलेल्या या सुरांच्या वारशातच माझ्या जीवनाची कृतार्थता सामावली आहे.
डॉ. एन. राजम
शब्दांकन : अमृता करकरे
amruta.karkare@expressindia.com