डॉ. आशीष  देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

काही काळापुरती का होईना, पण चिंता विसरायला लावणारे अनेक पदार्थ माणसाने पूर्वीपासून शोधले आणि वापरले. या पदार्थाचा अनुभव घेऊन पाहाताना त्याचं कधी व्यसनात रूपांतर झालं हेही अनेकांना कळलं नाही. मोबाइल आणि इंटरनेटचाही अशाच व्यसनाधीन करणाऱ्या गोष्टींमध्ये समावेश करता येईल. त्यावरचं अवलंबित्व ही अपरिहार्यता झाली. मात्र वेगवान जगण्याचा भाग असलेल्या या निसरडय़ा रस्त्यावरून प्रवास करताना मनाचा ब्रेकगरजेचा..

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

दहा दिवसांपूर्वी आमच्या शाळेचा शंभरावा वर्धापन दिन साजरा झाला. महाराष्ट्रातल्या नावलौकिक मिळवलेल्या शाळांपैकी एक अशी पार्ले टिळक विद्यालय. माझ्या शाळेचं मला वाटणारं वेगळेपण म्हणजे शाळा भरायच्या वेळी नि मधल्या सुट्टीनंतर शाळेत लावल्या जाणाऱ्या गाण्यांच्या रेकॉर्डस्. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर अशा दिगज्जांच्या सुरात सूर मिसळून मी शाळेत गायलो! सण, ऋतू, राष्ट्र दिवस यांचं औचित्य साधून कानावर सहज झालेले ते संस्कार. शाळेशी असलेल्या ऋणानुबंधाच्या कुठून तरी पडलेल्या गाठी आता जरी सैल झाल्या, तरी जेव्हा ते सूर दुरून येतात, तेव्हा आपसूक घट्ट होतात. त्यातलाच एक संत तुकाराम महाराजांचा सुमन कल्याणपूरांबरोबर मी गायलेला अभंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।

चालविसी हाती धरूनिया।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार।

चालीविसी भार सवे माझा।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट।

नेली लाज धीट केली देवा।।

अवघे जन मज झाले लोकपाळ।

सोइरे सकळ प्राणसखे।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके।

झाले तुझे सुख अंतर्बाही।।

आजच्या युगात हाच अभंग ‘मोबाइल फोनसाठी’ किती समर्पक आहे ना?

विश्वव्यापी माहितीजाल हाताच्या मुठीत घेऊन माहिती, संपर्क, व्यवसाय, मनोरंजन आणि सेवा पुरवणाऱ्या या तंत्रज्ञानानं एक क्रांतीच घडवली आहे. उगाच नाही जगात आणि भारतातही ‘हुशार नि अतिहुशार’ भ्रमणध्वनींचा खप प्रचंड वाढला आहे. या तंत्रज्ञानानं मनाला घातलेली भुरळ बघून नवनवे ‘भ्रमणध्वनी सेवासम्राट’ एकाहून एक युक्त्या-क्लृप्त्या-नुस्खे वापरून आपल्या ‘आकर्षण-कुतूहलाला’ त्यांच्या स्वार्थासाठी बांधून ठेवायच्या प्रयत्नांत आहेत. विविध ‘अ‍ॅडिक्टिव डिझाइन्स’चा वापर करून ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हा अभंग त्यांनी पुरेपूर खरा केला आहे.

या ‘व्यसनी-रचना’ माणसाला नवीन नाहीत. महाभारतात द्यूत, रामायणात रावणाला महातपश्चर्येतून मिळालेलं सामर्थ्य, हॅम्लेटमध्ये सूड, ग्रीक साम्राज्यात आणि त्याआधी नि नंतरच्या कित्येक साम्राज्यांत दारू, जुगार, लैंगिकता नि इतर व्यसनाधीन करणारे पदार्थ मनाचा संयम, जबाबदारी नि विवेक तोंडघशी पाडताना दिसतात. मध्य आशियात ४,००० वर्ष जुन्या धार्मिक विधींत देवादिकांच्या दर्शनासाठी वापरली जाणारी आळंबे (मशरुम) किंवा ‘स्वर्गीय’ अनुभवासाठी तेव्हापासून आणि अजूनही वापरला जाणारा चरस-गांजा किंवा वेदातला सुधारस/ सुरा, किंवा होमरच्या ‘ओडीसी’ या खंडकाव्यातली अफू, ईंका साम्राज्यातल्या कोकोआ बिया आणि अगदी अलीकडे दुसऱ्या महायुद्धात सैनिकांसाठी वापरलेली शौर्यवर्धक औषधे! पृथ्वीच्या पाठीवर विविध ठिकाणी, विविध काळात व्यवहार नि व्यभिचार, राज्यं नि साम्राज्यं, युद्धं नि तह, कलह नि मैत्री, कला नि क्रौर्य, सुख नि दु:ख या सगळ्यात या व्यसनी-रचनांचा वापर करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

पुलंच्या अजरामर असलेल्या ‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’त माणसाच्या मनातल्या कुतूहलाचंच शब्दांकन आहे. युगानुयुगं या ‘कुतूहलांचा’ अनुभव घेतल्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हे चुटकीसरशी अनुभवायची बऱ्यापैकी सवय माणसानं लावून घेतली आहे. सुखासीनतेचा हा तात्पुरता अनुभव घेतलेले ‘सारे प्रवासी घडीचे’ फक्त अडीअडचणीतच नाही, तर सणासमारंभात, श्रमपरिहारात नि मैत्रीनात्यांत (बर्र-रिश्ता-बरिश्ता!) या उत्तेजकांचे गोडवे गात राहातात. घराघरांत, जाहिरातींच्या फलकांवर, कामाच्या जागी, माध्यमांत होणारा हा उदोउदो नवीन पिढीला खुणावतो, भुरळ घालतो. असा हा उत्तेजकांचा नि माणसाचा घनिष्ठ संबंध अबाधित राहिलेला आहे. जात-धर्म-भाषा-देश-वंश यापलीकडे जाऊन माणसाच्या एकात्मतेचा उत्कट अनुभव देणाऱ्या मोजक्या (आजच्या जागतिक/ अगतिक परिस्थितीत कदाचित एकमेव) अनुभवातला हा संबंध म्हटला तर वावगं ठरणार नाही. अशा संबंधांमुळेच नैतिकता-अनैतिकता झुगारून या उत्तेजकांच्या बेकायदेशीर वापरालादेखील सहकार्य करणारे महाभाग किंवा वाढत्या मागणीला ‘अब्रम्हण्यम्-अब्रम्हण्यम्’ म्हणून स्वीकारणारे किंवा त्या सामाजिक मागणीकडे प्रागतिकता-वैविध्य-बदलती जीवनशैली अशा वेगवेगळ्या चष्म्यातनं पाहाणारी माणसं समाजात दिसतात. आणि हे ‘किमया-गार’ पदार्थ ‘एकच् प्याला/ झुरका/ फुरका’, ‘द्राक्षात जीच आहे, आहे मोहात ती तशीही, मनमंदिरात घुसता, व्यापून टाकते रे!’चा अनुभव देत, पिढय़ान्पिढय़ा अबाधित राहातात.

आता या ‘मनमंदिराला व्यापून’ टाकणाऱ्या अनुभवांत इंटरनेट/ माहिती-मनोरंजन महाजालाची भर पडली आहे. ‘करोना’च्या जागतिक महासाथीत कायदेशीर उत्तेजकांच्या पुरवठय़ावर जरी प्रभाव पडला असला, तरी बेकायदेशीर उत्तेजकं सराईतास आणि अनिर्बंध इंटरनेट ‘आहेरें’ना मुबलक मिळतंय. ‘न्यूरॉन’ या प्रतिष्ठित शास्त्रोक्त नियतकालिकात मेंदूला मिळणाऱ्या अनुभवांमुळे मेंदूच्या सूक्ष्मरचनेत होणाऱ्या बदलांवर ऊहापोह केला आहे. माहितीजालाच्या वापरानं काही अभागी लोकांमध्ये व्यसनाधीनतेसारखे बदल घडतात, याला दुजोरा मिळाला आहे. हे बदल तात्पुरते असतात का? या बदलांमुळे मेंदूच्या रचनेवर नि कामांवर काय परिणाम होऊ शकतो? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. पण आभासी जगातल्या मुक्त-अनिर्बंध संचारानं वागण्या-अनुभवातले हे बदल दूरचे वाटणार नाहीत.

माहितीजाल वापराधीनता व्याधी -(इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर) माहितीजालाचा सतत वाढता वापर, त्यासाठीच्या वेळाच्या अपव्ययाची तयारी, काम/ नाती/ स्वास्थ्याची हेळसांड, न मिळल्यास चिडचिड, बेचैनी, अधीरता, वापर कमी करण्याचे अयशस्वी प्रयत्न. (इंटरनॅशनल क्लासिफिके शन ऑफ डिसीज)

नेट-स्फोट- (डिव्होर्स)- नेटमुळे झालेली लग्नाची बोळवण. नेटच्या अनिर्बंध वापरानं लग्नसंबंधात आलेला दुरावा, अलिप्तता. समांतर जीवनाची स्थिती. एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष आणि आभासी जगातल्या नात्यांना प्राथमिकता.

 

आभासी ओळख गफलत- (ऑनलाइन आयडेंटिटी डिसऑर्डर)- वास्तव जगातल्या ओळखींची आभासी ओळखींशी झालेली गल्लत, त्यातून निर्माण होणारी अहमहमिका, भावनिक उद्रेक, त्यातून होणारे नात्यांतले दुरावे, वास्तव जगातल्या वावरावर होणारा परिणाम.

उत्तरोत्सुकता- पाठवलेल्या संदेशाला  उत्तर आलं की नाही हे बघण्याची उत्सुकता, सतत मेसेज टाकण्याची विचलितावस्था आणि तपासण्याची आंतरिक गरज. त्यामुळे होणारी, वाढणारी चिडचिड, वाढतं वैफल्य आणि उदासीनता.

डिंजिंग- (Dinging)- आभासी जगापासून कामानिमित्त किंवा कुठल्याही कारणानं थोडय़ा वेळासाठीसुद्धा दूर राहिल्यानंतर जागणारी आभासी जगाची प्रचंड इच्छा आणि अधाशी वापर. ती पूर्ण न झाल्यास वाढणारी घुसमट, चिडचिड, वाढतं वैफल्य नि उदासीनता.

सेल्फायटीस- (Selphitis)- ‘सेल्फी मोड’नं स्वत:चा फोटो काढण्याची, तो पाहाण्याची नि आभासी जगात प्रदर्शित करण्याची तीव्र इच्छा. फोटो काढताना सुरक्षिततेच्या बाबतीत संपूर्ण दुर्लक्ष, दिवसभरात भरपूर फोटो नि त्यांचं आभासी जगात दर्शन, त्यांवर कौतुकवर्षांवाची अपेक्षा.

माहितीजालांतर्गत खेळ आधीनता-

(इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर)- नेटवर इतर खेळाडूंबरोबर तासन्तास खेळ. दुसऱ्यावर मात करण्याचा किंवा स्वत:चा ‘स्कोर रेकॉर्ड’ तोडण्याचा प्रयत्न. खेळामुळे वेळाचा अपव्यय, काम/ नाती/ स्वास्थ्याची हेळसांड. न मिळाल्यास चिडचिड, बेचैनी, अधीरता. वापर कमी करण्याचे अयशस्वी प्रयत्न.

अतिलैंगिकता-(कम्पलसीव्ह सेक्स्युअल डिसऑर्डर)- लैंगिक सुखाची तीव्र इच्छा. विधिनिषेध न बाळगता त्याची केलेली पूर्तता. आभासी जगाचा त्यासाठी केलेला वापर.

महाराष्ट्रात कु ठल्याही महामार्गावर प्रवास करताना एक पाटी दिसते- ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’. गाडीचा चालक अपघात व्हावा म्हणून, साखर खाणारा मधुमेह व्हावा म्हणून नि  उत्तेजक पदार्थ घेणारा कधीही व्यसनाधीन होऊ या अपेक्षेनं तसा निर्णय घेत नसतो. नशेचं सामाजिक उदात्तीकरण करणाऱ्या समाजात आपण आणि आपली मुलं राहात आहोत का? किंवा माहिती महाजालाचा अपरिहार्य आणि अतिवापर अनाहूतपणे करोनामुळे करत आहोत का?, तर त्याचे परिणाम काय असतील?

हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात तम्ंत्रज्ञानाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या उपविभागाच्या ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात औदासिन्य आणि माहितीजालाचा अति/ गैरवापर यांतील परस्परसंबंध जोडला आहे. जवळजवळ       ६० टक्के  व्यसनाधीन व्यक्तींमध्ये बेचैनी/ औदासिन्याच्या आजाराची शक्यता असते. न्यूनगंड, मित्रपरिवारात स्वीकारलं न जाण्याची भीती, शाळांकडून अजूनही फक्त ‘अभ्यासाचाच’ अट्टहास आणि सर्वागीण विकासाबद्दल केलेला दुजाभाव आणि गरिबी नि अतिश्रीमंतीमुळे झालेली पालकत्वाच्या गरजांची हेळसांड, यामुळे आज आपल्या देशात फार छोटय़ा वयात (१२ ते १५ वर्ष) तंबाखू, दारू, इंटरनेट आणि इतर व्यसनाधीन करणारे पदार्थ मुलांच्या विश्वात येत आहेत. जितक्या कमी वयात हे अनुभव येतील तेवढी पुढच्या आयुष्यातील दुष्परिणामांची शक्यता जास्त. दारूमुळे (जवळपास १८ लाख मृत्यू) आणि तंबाखूमुळे (८० लाख मृत्यू) असे किमान १ कोटी लोक दरवर्षी मरतात, असं आपण मागच्या लेखातही पाहिलं होतं. अदमासे २०० शारीरिक आजारांसाठी हे दोन पदार्थ कारणीभूत आहेत. दर तीन आत्महत्यांमधील एक आत्महत्या, घरगुती अत्याचारांच्या दर तीन प्रकरणांपैकी दोन प्रकरणं, कामावरील ४० टक्के  विनाकारण सुट्टया, ७० टक्के  ‘पेटी क्राइम्स’ (किरकोळ/ भुरटय़ा चोऱ्यांसारखे गुन्हे), ८० टक्के  वैद्यकीय अत्यवस्थता/ अपघात, ४० टक्के  भावी मानसिक आजार हे या व्यसनाधीन करणाऱ्या पदार्थाच्या अनिर्बंध वापराच्या भस्मासुरानं होत आहेत. एका व्यसनाधीन व्यक्तीमुळे जवळजवळ ८ ते १५ जणांना कमालीचा मनस्ताप होत असतो. आभासी जगातल्या अतिरेकानं वाचन/ आकलन/ एकाग्रतेवर परिणाम होतोच, पण नको त्या वयात नको ते आभासी जगातले अनुभव वैयक्तिक, सामाजिक आणि स्त्री-पुरुष नात्यांवर नक्की काय परिणाम करणार हे केवळ काळच सांगू शकेल.

२६ जूनला ‘जागतिक व्यसनशील पदार्थ जागरूकता दिवस’ असतो. बेचैनी, औदासिन्य या आजारांशी नातं सांगणारा हा व्यसनाधीनतेचा आजार आणि हे व्यसनपूरक पदार्थ, याबद्दल साधक-बाधक चर्चा व्हावी या उद्देशानं तो पाळला जातो. या निमित्तानं मुलांच्या विश्वात ही ‘व्यसनं’ नि आभासी जगातली ‘भ्रमणं’ काय धुडगूस घालतायत नि तो कसा निस्तरायचा, याचा विचार जर जनमानसात झाला नाही, तर ‘हमको मनकी शक्ती देना’ हे एक फम्क्त शाळेत ऐकलेलं गाणं राहील, नि बाकी सगळं ‘भगवान भरोसे’!