भगवान बुद्धाने मन:शांतीला खूप महत्त्व दिलंय. तुमचं मन शांत असेल तर कितीही ताणतणाव आले, समस्या भेडसावल्या तरी तुम्ही त्यातून सहजपणे बाहेर येऊ शकता.
एक तरुण मुलगी, आयुष्यात येत असलेल्या अपयशाने थकून गेली होती.  भविष्यकाळच नव्हे तर तिचा वर्तमानकाळही निराशादायी वाटत होता तिला. एक समस्या सुटली नाही तर दुसरी हजर. त्रस्त झाली होती ती. शेवटी आईकडे आली, ‘आई, थकले मी आता. काय रोजच्या रोज फक्त संकटं संकटं आणि संकटं. कधी एक दिवस आनंदाने जात नाही. जगण्याचाच वीट आलाय.’ आई हसली आणि तिला शांतपणे स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिने तीन बर्नरच्या गॅसवर एकाच आकाराची तीन भांडी ठेवली. तिघांमध्ये समान पाणी ठेवून ते उकळवायला सुरुवात केली. पाणी उकळायला सुरुवात झाली. तेव्हा आईने एका भांडय़ात गाजर टाकलं, दुसऱ्या भांडय़ात अंडं टाकलं नि तिसऱ्या भांडय़ात कॉफी बिया टाकल्या. वीस मिनिटांनी आईने गॅस बंद केला आणि मुलीला म्हणाली, काय दिसतंय ते बघ. मुलीने पहिल्या भांडय़ातून गाजर काढलं, ते खूपच मऊ, गरीब बापडं होऊन गेलं होतं. दुसऱ्या भांडय़ातलं अंडं मात्र शिजून तयार झालं होतं. तर तिसऱ्या भांडय़ात कॉफीचा दरवळ पसरला होता, पाणीही कॉफीचं झालं होतं.. आई म्हणाली, ‘‘बघ. एकच प्रसंग, एकच आव्हान होतं प्रत्येकासमोर. विशिष्ट तापमानाला सामोरं जायचं. त्याचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम झालाय बघ. गाजर पूर्वी कसं होतं? कडक, चवीला गोड. पण गरम पाण्यात त्याचा लगदा झाला. त्यात कसलीच ताकद राहिली नाही.  अंडं आधी कसं होतं? अगदी नाजूक. पडलं तर फुटणारं. त्याचा हा नाजूकपणा त्याच्या बाहेरच्या कवचाने अलगद जपलेला. ते गरम पाण्यात कसं झालं एकदम कडक, जपावं न लागणारं. तर कॉफी बिया सुरुवातीला पाण्यात अलगद जाऊन बसल्या. पाणी जसजसं तापायला लागलं तसतसं आपला गंध त्यात सोडू लागल्या आणि पूर्ण पाणीच कॉफीचं झालं. तुला कोण व्हायचं आहे, ‘गाजर, अंडं की कॉफी बी?’ आईने मुलीला विचारलं. जेव्हा कठीण परिस्थिती किंवा अडचणी तुमच्या समोर  येतात तेव्हा स्वत:ला विचारायचं, मी कोण आहे? गाजर, अंडं की कॉफी बी? मी गाजर आहे का? जो कणखर भासतो पण जेव्हा दु:ख येतं तेव्हा कमकुवत होतो, स्वत:ची शक्ती हरवून बसतो? की मी अंडं आहे. जे नाजूक, तरल हृदयाचं आहे. पण जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा कवच नाजूक राहिलं तरी मी आतून घट्ट, कणखर बनतो? की मी कॉफी बियांसारखा आहे. ज्या गरम पाण्यासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देता देता आपला सुगंधच नव्हे तर चवही त्या पाण्याला देत पाण्याला स्वत:सारखं करवून घेतो..’’ आईचं उदाहरण मुलीला एकदम पटलं. म्हणाली, ‘खरंय तुझं म्हणणं. नुसतं रडत बसण्याने काही होणार नाही. त्या परिस्थितीला माझ्या सोयीनुसार वळवणं हे माझ्या हातात आहे. मी नक्कीच गाजर होणार नाहीए..’
 त्या तरुणीला मार्ग सापडला, परंतु मुळात असे प्रश्न का येतात हाही प्रश्न आहेच. आयुष्य खूप छान, साधंसोपं असताना आपणच ते कधी कधी कठीण करून ठेवतो का? कारण अनेकदा आयुष्याचा अर्थच आपल्याला नेमका समजलेला नसतो. खरंच आयुष्य कळलेलं असतं का आपल्याला की वेगळ्याच गोष्टी आपल्याला आकर्षित करतात आणि आपण दु:ख ओढवून घेतो? अशा वेळी जगण्याचं भान देणारा हात आपल्या मदतीला आला की आपलं की जगणं आनंददायी होतं वरच्या कथेतल्या आईसारखं. आणि पुढच्या कथेतल्या प्राध्यापकांसारखं.
 आयुष्यात स्थिरावलेल्या त्या मुलांचा तो कॉलेज री-युनियनचा अर्थात पुनर्भेटीचा दिवस. पार्टीसाठी सगळे जुने विद्यार्थी जमले होते. प्राध्यापकांशी गप्पा मारता मारता मुलांनाही आपले विद्याíथदशेतले दिवस आठवत होते. नंतर त्या गप्पांची गाडी घसरली ती कामातला ताणतणाव आणि व्यापांवर. प्रत्येक जण तक्रार करू लागला. प्राध्यापकांच्या लक्षात आलं, मुलांना मुक्त व्हायचंय. त्यांनी सांगितलं, ‘चला आपण हॉट चॉकलेटचा आस्वाद घेऊ.’ एका मोठय़ा भांडय़ातलं रसरशीत गरमागरम चॉकलेट सगळ्यांना मोहवत होतं. त्याचा कडवट गोड स्वाद दरवळत होता. प्राध्यापकांनी त्यांच्याकडे असलेले सगळे छोटे-मोठे कप काढले. काही खूप महाग, काही काचेचे, काही क्रिस्टलचे, काही छानशा डिझाइनचे तर काही अगदी साधे, स्वस्त रंग उडालेले. मुलांनी पटापट चांगले चांगले कप उचलले..
  प्राध्यापकांनी मुलांचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं. ते म्हणाले, ‘‘बघितलंत, महागडे, सुंदर कप तेवढे उचलले गेले आणि स्वस्त, साधे कप मागे राहिले. तुम्हाला तुमच्यासाठी चांगलं तेच हवं असतं, हे मी समजू शकतो परंतु ते तुमच्या तणावाचं कारण बनतं, ते तुमच्या लक्षातही येत नाही. तुम्ही ज्याचा आस्वाद घेता आहात त्या हॉट चॉकलेटच्या चवीचा कप चांगला-वाईट असण्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही महागडा कप घेतला काय किंवा स्वस्त, फुटका घेतला काय त्यातील चॉकलेटची चव तीच राहणार आहे. महत्त्वाचं काय तर हॉट चॉकलेट. पण त्याकडे न बघता तुम्ही कपांकडे धावलात इतकंच नाही तर प्रत्येकाची नजर दुसऱ्याला कुठला कप मिळालाय याकडे होती. लक्षात घ्या, आयुष्य हे हॉट चॉकलेटसारखं आहे आणि तुमची नोकरी, पैसा, तुमचं समाजातलं स्थान म्हणजे हे कप. ती फक्त साधनं आहेत तुमचं आयुष्य तोलून धरणारी, हे कप ना तुमचं आयुष्य बदलू शकत, ना आयुष्याला आकार देत पण अनेकदा काय होतं ना आपण कपांकडेच जास्त लक्ष देतो. आणि प्रत्यक्ष आयुष्याचा, चॉकलेटचा आस्वाद घेण्याकडे दुर्लक्ष करतो. आनंदी माणसांकडे सगळंच काही चांगलं असतं असं नाही पण सगळ्या काहींतून तो काही चांगलं निर्माण करायचा प्रयत्न करतो. साधेपणाने जगा, उदारपणे प्रेम करा, ममत्वाने बोला आणि हॉट चॉकलेट एन्जॉय करा.’’ सर बोलायचे थांबले.. मुलांच्या चेहऱ्यावर आता प्रसन्न हसू होतं.
 आयुष्य आपण आपल्या अपेक्षांनीच गुंतागुंतीचं करून ठेवत असतो; म्हणून त्यासाठी गरज असते ती मन:शांतीची. आपल्याकडे बौद्ध तत्त्वज्ञानातही हाच विचार खूप वेगळ्या पद्धतीने येतो. बुद्धाने मन:शांतीलाच खूप महत्त्व दिलंय. तुमचं मन शांत असेल तर कितीही ताणतणाव आले. समस्या भेडसावल्या तरी तुम्ही त्यातून सहजपणे बाहेर येऊ शकता. त्याबद्दलची ही कथा. अगदी सुरुवातीच्या काळात बुद्ध आपल्या शिष्यासह एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असे. अशाच एका प्रवासात त्यांना एक तळं लागलं. तळ्याकाठी झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावी म्हणून सारे थांबले. बुद्धाने आपल्या एका शिष्याला विचारलं, ‘ मला तहान लागलीय. जरा पाणी घेऊन येशील का?’  शिष्य उठला आणि तळ्यापाशी पोहोचला. त्याने पाहिलं तर तिथे काही बायका कपडे धूत होत्या. काही जण आपली गुरं धूत होती. त्यामुळे सगळं पाणी गढूळ झालं होतं. इतकं अस्वच्छ पाणी न्यायला तो शिष्य धजावला नाही. तो परतला. म्हणाला, ‘पाणी पिण्यालायक नसल्याने मी नाही आणलं.’ अर्धा तास गेला. बुद्धाने पुन्हा त्याच शिष्याला पाणी आणायला सांगितलं. शिष्याने पाहिलं, पाण्यात कुणीच नव्हतं. आणि पाणीही नितळ दिसत होतं. सगळा चिखल खाली बसला होता आणि वरती होतं ते स्वच्छ, गार पाणी. शिष्याने ते पाणी आणलं. तेव्हा बुद्ध म्हणाला, ‘‘बघितलंस. तुला काहीच करावं लागलं नाही. फक्त थोडा वेळ जाऊ दिलास. चिखल आपोआप अगदी स्वत:हून खाली बसला आणि उरलं ते तृप्त करणारं पाणी. आपल्या मनाचंदेखील असंच असतं, जेव्हा ते विस्कटलेलं असतं. त्याला काही काळ तसंच राहू द्यायचं असतं. ते मन स्वत:हूनच जागेवर येईल. त्याला शांत करण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागणार नाहीत.
 बुद्धाच्या म्हणण्यानुसार ही प्रयत्नांशिवायची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हा आपोआपच ती शांती तुम्हाला वेढून टाकते, तुमच्या अवतीभवती पसरते. आणि मग तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूच्यांनाही ती शांती जाणवू लागते. स्वत:ला स्थिर करा, थोडा वेळ जाऊ द्या.. मन आपोआप निर्णयक्षम होईल…