राधिका गोडबोले
हल्ली जगभरात विविध ‘डे’ साजरे केले जातात. काही जण त्यावर नाकं मुरडतात, तर काही त्याकडे एक निमित्त म्हणून बघतात. त्यातलाच एक उद्याचा (२४ जुलै) ‘वल्र्ड कझिन्स डे’. सध्याच्या एक वा दोन मुलं असण्याच्या काळात जशी काका, मामा, आत्या, मावशी ही नाती संपुष्टात येत चालली आहेत, तशीच चुलत, मावस, मामे, आत्येभावंडंही कमी व्हायला लागली आहेत. जी आहेत, त्यातलीही आपापल्या कामांमुळे, अंतरांमुळे किंवा अन्य कारणांमुळे दूर गेली आहेत. मामाचं गाव कृत्रिमरीत्या तयार केलेलं पर्यटनस्थळ झालंय. अशा वेळी उद्या किंवा येत्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं का होईना, जे एकत्र येत नसतील अशा सगळय़ा भाऊ-बहिणींनी एकत्र यायला काहीच हरकत नसावी. तेव्हा साजरा करू या, नात्यांचा हा उत्सव!
‘‘दोन दिवस झाले तुम्हाला बरं नाही.. अजून आशीषभावजी आले नाहीत साधं बघायला!’’ सूनबाई जरा घुश्शातच म्हणाली. तिलाही मनातून थोडं तसं वाटतच होतं, एवढय़ा जवळ राहणारा आपला लाडका भाचा आला कसा नाही आपल्याला बरं नसताना बघायला, भेटायला? तितक्यात बाहेरून त्याची नेहमीची हाक आलीच- ‘‘मावशी, आलो गं मी!’’
दोन दिवस का नाही आलास, विचारल्यावर त्यानं सांगितलं, ‘‘अगं, परवा ऑफिसमधून आल्यावर जरा ताप वाटत होता. मुलांनाही प्रचंड सर्दी-खोकला. म्हणून मग आम्ही सगळय़ांची करोना टेस्ट करून घेतली. आता रिपोर्ट मिळाला. ‘निगेटिव्ह’ आहे. तापही नाहीये. म्हणून आलो तडक!’’ ते ऐकून दोघींनाही आपण त्याच्या न येण्याबद्दल जो विचार केला त्याचं वाईट वाटलं.
त्याच्या हातात आलं घातलेल्या गरमागरम चहाचा कप देत सूनबाई दिराचं कौतुक करत म्हणाली, ‘‘तरी म्हटलं, कुणाला बरं नाहीये हे कळून तुम्ही आला नाहीत असं कसं होईल!’’ ‘‘वहिनी, सख्खा नसलो तरी रोहितच्या सख्ख्या भावासारखाच आहे मी.’’ नेहमीसारखं खळखळून हसत आशीष म्हणाला.
‘‘हल्ली प्रत्येक घरी एक किंवा दोनच मुलं असतात. बहुतेक घरांत तर एकुलती एकच! आत्या, मावशी, मामा, काका अशी सख्खी नातीही कमी झाली आहेत. त्यामुळे भावंडं कमी झाली आहेत. त्यासाठी ‘कझिन्स डे’ हा प्रकार पाश्चात्त्यांचा असला तरी मला आवडतो बरं का मावशी!’’ आशीष सांगत होता. ‘‘आपल्या राखी पौर्णिमेच्या आसपास- म्हणजे २४ जुलैला साजरा करतात तिकडे हा ‘कझिन्स डे’. आपल्याकडे कसं राखी पौर्णिमेला किंवा भाऊबीजेला सख्खे भाऊ-बहीण नसतील तर आणि असले तरी चुलत, मावस, मामेभावंडं, आत्येभावंडं राखी बांधतात,ओवाळतात तसाच हा प्रकार. भावाबहिणींच्या एकत्र भेटण्याचं खरं तर एक निमित्त.
मागच्या पिढीतले सख्खे भाऊ-बहीण मोठेपणी नोकरी- संसारात गुरफटून जातात. चिमणीच्या दातांनी वाटून खाल्लेला खाऊ तरी आठवत राहतोच. भौगोलिक, आर्थिक कारणांमुळे, काही वेळा समज-गैरसमज झाल्यामुळे किंवा कुणी तरी गैरसमज करून दिल्यामुळे नात्यांत दुरावा येतो. या दिवसांच्या निमित्ताने तरी सगळे जण आपसांत भेटून, बोलून गैरसमज दूर होऊ शकतात. पुढच्या पिढीलाही हक्कानं संकटात मदतीचा हात मागता येईल, ज्यांच्याशी सुखदु:ख वाटता येईल अशी भावंडं- कझिन्स मिळू शकतात..’’ आशीष म्हणाला.
तिला पटलंच त्याचं म्हणणं. ती म्हणाली, ‘‘अरे, पूर्वी तर मुलांना दोन-दोन घरं असायची. बाबांचं घर आणि आईचं माहेर. आईच्या माहेरी ते आजी-आजोबा, मामा, मावशी त्यांचं कुटुंब तर बाबांच्या घरी काका, आत्या त्यांचं कुटुंब असे सगळे वेगवेगळय़ा कारणांनी एकत्र यायचे. मुलांसाठी बालपण म्हणजे धमाल असायची नुसती. हल्लीसारखी प्रत्येकाला ‘स्पेस’ हवी, चार पाहुणे आले तरी झोपायची व्यवस्था कशी करायची, अडचण होते, वगैरे काही नसायचं. सुट्टीत सगळे एकत्र जमले की घरातली आजी, काकू, मामी, आत्या, मावशी जे काही करेल ते खायचं, हुंदडायचं. पाणी भरणं, गाद्या घालणं, पाटपाणी घेणं अशी छोटी छोटी कामं करायची. पत्ते, कॅरम खेळायचं. हॉलमध्ये भरपूर गाद्या घालून किंवा अंगणात पांघरुणात गुरफटून भुतांच्या गोष्टी सांगायच्या, हे सगळं हल्लीची पिढी ‘मिस’ करतेय असं वाटतं रे! आम्ही भावंडं- चुलत वा चुलत चुलत म्हणजे तुमच्या भाषेत ‘फस्र्ट’च नव्हे ‘सेकंड’, ‘थर्ड’ कझिन्सही या सगळय़ांना भेटण्यामुळे मनानं जोडलेलो आहोत. नवीन पिढीला हे मिळतंच असं नाही.’’ मावशी तिच्या तरुणपणीच्या आठवणींत रमून सांगू लागली- ‘‘तीस-पस्तीस वर्षांपूर्वी पदोपदी फोन करण्याची सुविधा आणि सवय नव्हती, गावाला सहज येणंजाणं शक्य नव्हतं, तेव्हाची गोष्ट. ताई लग्न होऊन सासरी गेली. तिला दिवस गेले, हवं-नकोसं व्हायला लागलं. जावयाच्या नोकरीच्या गावी घरात कोणी मोठं माणूस नव्हतं. तिच्या चिंतेनं कासावीस झालेल्या आई-वडिलांनी मग लेकीच्याच गावात राहणाऱ्या भाची व पुतणीला पत्र लिहून लेकीकडे लक्ष द्यायला हक्कानं सांगितलं. नव्या गावात आमच्या चुलत आणि आत्ये बहिणीनं तिला त्या नाजूक अवस्थेत धीर दिला. आमचे भावंडांचे संबंध आणखी घट्ट झाले. आमच्यासाठी मामा, काका, आत्या, मावशी यांचं नातं औपचारिकतेच्या पलीकडलंच होतं..’’ मावशी चांगलीच ‘नॉस्टॅल्जिक’ झाली होती. ‘‘यांच्या नोकरीच्या गावी घरात आम्ही दोघंच. सासू-सासरे दुसऱ्या गावाला. आमचा मोठा- हिचा नवरा- तेव्हा होता तीन वर्षांचा. आणि दुसऱ्याची चाहूल लागलेली. घरात सांभाळायला मोठं कुणीच नाही. तशात यांना कामानिमित्त दोन-तीन दिवस गावाला जावं लागणार होतं. त्या नवख्या गावात मी एकटीच कशी राहणार असं उगाच वाटू लागलं! त्यात शेजारीही गावाला गेलेले. मग मी सरळ जवळच्या गावात राहणाऱ्या मामाला फोन केला. दोन दिवस राहायला येतेय म्हणून सांगितलं. मामेभाऊ-बहिणी, मामा-मामी यांच्यात मी सुरक्षित असणार आहे या जाणिवेनं फार बरं वाटायला लागलं. मलाही मामाला ‘मी येतेय राहायला’ हे सांगायला कसला संकोच वाटला नाही आणि त्या सगळय़ांनाही त्यात काही अडचण वाटली नाही..’’
आता सूनबाईही पुढे सरसावल्या. ‘‘आई, माझं लग्न झाल्यावरचीही एक आठवण खूप छान आहे की!’’ ती आशीषला सांगू लागली, ‘‘आम्ही दोघं आणि आई-बाबा भाऊजींकडे अमेरिकेत गेलो होतो. तिथे आईंच्या मावसभावाकडे वॉशिंग्टनला जायचं आई-बाबा दोघांच्याही मनात होतं. पण आम्हाला वाटत होतं असं कसं एकदम जायचं त्यांच्याकडे! हे आणि भाऊजी म्हणालेही, की ‘आई, रवीमामाला अनेक वर्षांत तू पाहिलंही नाहीयेस आणि त्यानं या म्हटलं म्हणून आपण लगेच त्यांच्याकडे जायचं? अगं, ही अमेरिका आहे! बिझी असतील ते. त्यांचं रुटीन..’ मुलांना थांबवत आई म्हणाल्या, ‘त्यात काय? माझा सख्खा मावसभाऊ आहे तो!’ नंतर खरंच नुसते भेटायला म्हणून गेलो आम्ही पाच जण. पण मामा-मामींच्या प्रेमळ, आग्रही स्वभावामुळे मुलांची त्यांच्याशी एवढी गट्टी जुळली की हॉटेलचं बुकिंग रद्द करून दोन दिवस त्यांच्याकडेच राहिलो. अजूनही सगळे छान संपर्कात आहेत!’’
आता मावशींचे पतीही गप्पांत सहभागी झाले होते. ‘‘पूर्वी अनेक घरांत उन्हाळय़ाच्या सुट्टीच्या आधी हमखास संवाद ऐकू यायचे, की ‘कधी एकदा परीक्षा संपतेय आणि आम्ही काका किंवा मामाकडे जातोय असं झालंय! परीक्षा संपेल त्याच दिवशी गाडीत बसवून द्या, असा हट्ट असायचा मुलांचा. आता चाळिशी-पन्नाशीत असलेल्यांनी हे अनुभवलंच असेल. भावंडांमधलं प्रेम आणि जिव्हाळा वय, अंतर, पैसा या कशाहीमुळे कमी होत नाही. अर्थात एखाद्याच्या स्वभावातच तुलना आणि त्यामुळे ईर्षां असेल तर तो माणूस आणि त्याचे कुटुंबीयही अशा निव्र्याज प्रेमाला पारखे होतात..’’
आशीष गंभीर होऊन म्हणाला, ‘‘लहानपणी सुट्टीत किंवा काही कार्याच्या निमित्तानं एकत्र जमून धमाल करणारी चुलत- मावस- आत्ते- मामेभावंडं मोठेपणी नोकरी-व्यवसायात व्यग्र होतात, एकमेकांपासून दूर जातात. पूर्वी घरात भावंडं असायचीच, पण काका, मामा, आत्या किंवा मावशीची मुलंमुलीही ‘गेस्ट’ नव्हे तर घरातलीच वाटायची! तीही घरातल्यासारखीच वागायची. आताही तुरळक घरांत असं वातावरण असतं, पण अनेक ठिकाणी एकुलतं एक मूल असतं आणि तेही प्रचंड लाडावलेलं! आई-वडिलांकडे वेळ नसेल आणि घरात कुणी दुसरं माणूस नसेल, तर मुलाला वेळ देऊ शकत नाही याची बोच त्याला हवं ते देऊन भरून काढली जाते. कुणाशी काही वाटून घ्यायची, ‘शेअिरग’ची सवयच नसते. शाळा आणि क्लासबरोबरच मोबाइल-टीव्हीमध्ये मुलं मग्न असतात. कुणाविषयी काही वाटून घ्यायला वेळ नसतो! भावनिक नातंच कमी झालेलं वाटतं, अशा परिस्थितीत राखी, भाऊबीज असे भावंडांना एकत्र आणणारे सण पारंपरिक पद्धतीनं साजरे करायला हवेत. त्यानिमित्तानं तरी ही भावंडं भेटतील, बोलतील.’’ सगळय़ांनाच त्याचं म्हणणं पटत होतं. आशीष सांगत होता, ‘‘परदेशातले कपडे, खाद्य-पेयं, त्यांच्या परंपरा याचं तरुण पिढीला आकर्षण वाटत असतं. पण घरातल्या मोठय़ा माणसांनी काही पारंपरिक, पारिवारिक प्रथा पाळायला सांगितल्या तर अनेक जण ‘का?’ असा बाणेदार प्रश्न करतात! त्यामागे काही सामाजिक कारण असो वा नसो, पण आपल्या पद्धती मागासलेल्याच वाटतात. ‘हॅलोविन’ किंवा आणखी वेगवेगळे ‘डे’ मात्र कौतुकानं साजरे केले जातात! अर्थात हे काही सरसकट सर्वाना लागू होईलच असं नाही. पण मला वाटतं की, पाश्चात्त्य संस्कृतीचं आकर्षण असलेल्या पिढीला ‘कझिन्स डे’च्या निमित्तानं मधाचं बोट लावून एकत्र आणलं तर?.. आजच्या एकलकोंडय़ा होत चाललेल्या मुलांसाठी ‘कझिन’ जवळचे मित्रमैत्रिणी होऊच शकतात.’’
आशीषची कल्पना सर्वानी उचलून धरली. ‘‘यश, प्रतिष्ठा, पद या कशाचीही आडकाठी न होता ही भावंडं ‘मैं हूँ ना’ म्हणतात. हे नातं एकदा घट्ट झालं की सतत संपर्कात नसलो, तरी अचानक त्यांच्याकडे जाऊन धडकायला काही ‘फॉर्मालिटी’ लागत नाही, संकोच वाटत नाही. त्यामुळे या दिवसाच्या निमित्तानं तरी कझिन्सशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडायला हवा! ‘स्टे कनेक्टेड’ हाच या दिवसाचा संदेश. पुढच्या पिढीला ‘फस्र्ट कझिन्स’च नव्हे, ‘सेकण्ड’, ‘थर्ड’- म्हणजे चुलत-चुलत वगैरे नात्यांचीही ओळख असायला हवी. हल्लीच्या आधुनिक संपर्क साधनांमुळे हे शक्य होईलच. व्हॉटस्अॅपवर असे विविध ग्रुप तयार होत आहेत, अनेक वर्ष नसलेला संपर्क होऊन नात्यांना उजाळा मिळतोय ही या माध्यमांची सकारात्मक बाजूच,’’ तो म्हणाला.
‘‘मग या ‘कझिन्स डे’ला तुम्ही सगळय़ांनी इकडे यायचं! मी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुपच तयार करते. सुधाआत्या आणि नितीनमामाच्या मुलांनाही याच वेळी बोलवू या. सगळे धमाल करू. आणि राखी पौर्णिमेला आम्ही येऊच तुमच्याकडे..’’ आशीषची लाडकी पुतणी उत्साहानं म्हणाली आणि सगळे एकमतानं ओरडले ‘‘मस्त आयडिया!’’
‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या निमित्ताने डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेल्या ‘अपत्य एक प्रश्न अनेक’ (९ जुलै) या लेखावर अनेक वाचकांनी आपली मते व्यक्त केली. विविध सामाजिक, आर्थिक कारणांमुळे एकुलत्या एक अपत्याला शेअिरगसाठी ‘आपले कुणी’ नसण्याबरोबरच काका, मावशी, मामा, आत्या ही नातीही पुढच्या पिढीत नाहीशी होतील का, असा मुद्दा या लेखात मांडला होता. या बाबी पटण्याजोग्या असल्या, तरी आताच्या स्थितीत एकाहून अधिक अपत्ये होऊ देणे बहुतेक जणांना व्यवहार्य वाटत नाही, असेच वाचकांच्या पत्रांवरून दिसून आले. त्यांच्यासाठी उद्याचा ‘वल्र्ड कझिन्स डे’ कदाचित एक उत्तर असू शकेल.
radhikargodbole@gmail.com