मागच्या एका रशियाच्या फेरीमध्ये मला काही अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. तेथील प्रत्येक घरी ‘क्लीज्मा’ देण्यासाठी लागणारी साधनसामग्री होती. प्रत्येक घरात प्रत्येकानेच कधी ना कधी हा ‘क्लीज्मा’ घेतलेला असायचा. एवढेच नव्हे तर कोणाच्या पोटात दुखत असेल, पोट साफ होत नसेल, मलावष्टंभ झाला असेल तर ते सर्वजण घरच्या घरी गरम पाण्याचा ‘क्लीज्मा’ घ्यायचे. त्यांच्यासाठी ही त्यांची एक परंपरागत चिकित्सा पद्धतीच होती. मला या क्लीज्माबद्दल मात्र फार नवल वाटले होते. क्लीज्मा म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागली होती, पण गंमत म्हणजे त्यांची ही क्लीज्मा म्हणजेच आयुर्वेदात सांगितलेली ‘बस्ती’ ही चिकित्सा होय. त्याचे काय झाले की एका रुग्णाला आम्हाला बस्ती द्यायचा होता, पण बस्तीला रशियन भाषेत काय म्हणतात हे मला माहीत नव्हते म्हणून मी जमेल त्या प्रकारे त्यासाठी लागणारे साहित्य सांगून पद्धत सांगितली तर हे ऐकून ते सर्व जण आश्चर्यचकित झाले व म्हणाले की, ‘‘डॉक्टरसाहेब याला तर आम्ही क्लीज्मा असे म्हणतो. आमच्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला तुम्ही हे जे सांगत आहात ते साहित्य मिळेल व तुम्हीपण क्लीज्मा म्हणालात तर कोणाला काही समजून सांगायची पण गरज पडणार नाही. हा मात्र त्यात काय औषधी टाकायची ते तुमचे तुम्ही बघा.’’ म्हणजे आयुर्वेदशास्त्र किंवा एकूणच मानवजातीच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या गोष्टी किती वैश्विक असतात याचेच दर्शन यातून घडले. आमच्याकडे आलेला रुग्ण हा हृद्रोगाचा होता. त्याला ८० ते ९० टक्के ब्लॉक आहेत असे सांगितले गेले होते, तसे तो रिपोर्टपण घेऊन आला होता. त्याला सतत हृदयाच्या ठिकाणी बारीक दुखल्यासारखे होत असे, थकवा फार जाणवत असे, पूर्वीसारखा कामात उत्साह वाटत नव्हता. कधी कधी दरदरून घाम फुटायचा. पण त्याची काही ऑपरेशन करायची तयारी नव्हती म्हणून तो आयुर्वेदात यावर काही उपाय आहे का, हे जाणून घेण्यासाठी आला होता. तिथल्या डॉक्टरांची संमती घेऊन आम्ही त्यास आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध असा क्लीज्मा म्हणजेच बस्ती देण्याची परवानगी घेतली व त्याला चिकित्सा सुरू केली. १४ दिवसांतच त्याची लक्षणे कमी झाली, पुढे तीन महिने औषधे घेण्यास सांगून नंतर पुन्हा पुढील वेळेस १४ दिवसांचा बस्ती हा उपचार केला व तेथील डॉक्टरांना पुन्हा हृदयाची तपासणी करण्यास सांगितले. गंमत म्हणजे रुग्णाचा त्रास तर गेला होताच शिवाय त्याचे हृदयातील शिरांमधील ब्लॉकसुद्धा कमी झाले होते. मेंदू किंवा हृदयातील शिरांमधील गाठ ‘क्लीज्मा’ने जाऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण आयुर्वेदातील या चिकित्सा पद्धतीचा नक्की कसा परिणाम होतो ते त्यांनी मला स्पष्ट करायला सांगितले. मग काय मलाही हेच हवे होते, मी त्यांना सांगितले ते असे, ‘‘ज्याप्रमाणे सूर्योदय झाला की, सूर्याची किरणे क्षणार्धात पृथ्वीवरती सगळीकडे पोहोचतात, त्याचप्रमाणे बस्ती दिला की तो सर्व शरीरात क्षणार्धात पोहोचतो. असे आयुर्वेद ग्रंथात सांगितले आहे. म्हणजेच तुमच्या भाषेत सांगायचे तर जसे ०.८ सेकंदात एक ‘कार्डीयाक सायकल’ पूर्ण होते त्याचप्रमाणे बस्ती वाटे दिलेले औषध केमिस्ट्रीच्या नियमांप्रमाणे हायर कॉन्सेन्टरेशन टू लोअर कॉन्सेन्टरेशन असे आतडय़ांमध्ये शोषले जाते व एकदा का रक्तात मिसळले की हृदयावाटे सर्व शरीरात पसरते. मग आपण त्या ‘बस्ती’मध्ये ज्या प्रकारची औषधे टाकू त्या प्रकारची ती बस्ती काम करते.’’ हे ऐकून ते थक्कच झाले. खरे तर आयुर्वेदात प्रत्येक आजारानुसार वेगवेगळ्या बस्ती सांगितल्या आहेत. वजन कमी करण्यापासून ते हृदयातील, मेंदूतील गाठ विरघळविण्यापर्यंतचे सामथ्र्य यामध्ये आहे. गरज आहे ती फक्त या पद्धतीला शास्त्रोक्त पद्धतीने पाहण्याची. सध्या अगदी प्रसूतीपूर्वीसुद्धा हाच बस्ती ‘एनिमा’ म्हणून दिला जातो. तुम्ही यास काहीही नाव द्या हो पण आपण यांना ‘बस्ती’ या नावाने नाही अंगीकारले तर काही दिवसांनी हेच पाश्चिमात्य लोक आपणास ‘क्लीज्मा’, ‘एनिमा’ विकायला येतील व आपणही तो आनंदाने भरपूर पैसे मोजून घेऊ. मोठमोठय़ा हॉस्पिटलमध्ये ‘क्लीज्मा थेरपी सेंटर’ सुरू होतील. म्हणून तर आजकाल काही ठिकाणी हेच ‘डिटॉक्स ट्रीटमेंट’ म्हणून विकले जात आहे. लक्षात ठेवा ‘बस्ती’ ही आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा आहे. हेच शरीर शुद्धीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hridroga
First published on: 11-06-2016 at 01:07 IST