सिझेरियन प्रसूती

त्यावरून लोकांना साहजिकच ते विनाकारण किंवा पैशासाठी तर केले जात नाही ना अशी शंका येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिझेरियन सेक्शन हा सध्या लोकांसाठी वादग्रस्त, संवेदनशील आणि म्हणूनच बहुचर्चित असा विषय आहे. सिझेरियन करण्याबद्दल लोकांना आक्षेप नाही, पण ज्या प्रमाणात सध्या ‘सिझेरियन’ केले जातात

त्यावरून लोकांना साहजिकच ते विनाकारण किंवा पैशासाठी तर केले जात नाही ना अशी शंका येत आहे. गर्भवती स्त्रियांसाठी वरदान ठरलेल्या या शस्त्रक्रियेची अशी ‘अवस्था’ का झाली याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे.

‘‘डॉक्टर, माझं बाळंतपण नॉर्मलच होईल ना? का सिझेरियन करावं लागेल?’’, ‘‘मॅडम, माझ्या मुलीचं बाळंतपण नॉर्मलच करा बरं का! सिझेरियनची वेळ येऊ देऊ नका.’’, ‘‘अमुक एका हॉस्पिटलमध्ये गेलं की तिथं सिझेरियनच करतात, नॉर्मलची वाटच पाहात नाहीत. तुम्ही नॉर्मलच करता म्हणून समजलं म्हणून आम्ही मुद्दाम तुमच्याकडे आलो.’’, ‘‘आजकाल डॉक्टर पैसे जास्त मिळतात म्हणून सिझेरियन करतात. माझी तर पाच बाळंतपणं झाली आणि तीदेखील घरीच, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी काम करत होते, पण माझ्या मुलीवर आज सिझेरियनची वेळ का आली हे समजत नाही.’’, ‘‘आजकालच्या मुली! आई-बापाच्या लाडक्या! कळा सहन केल्या नाहीत, डॉक्टर तरी काय करणार? सिझेरियन करावंच लागलं.’’, ‘‘डॉक्टरकडे दर महिन्याला तपासण्यासाठी जावं पण त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या मात्र घेऊ नयेत, कारण गोळ्यांमुळे बाळाचं वजन वाढतं, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. सिझेरियनची वेळ यावी म्हणून डॉक्टर लोक मुद्दाम गोळ्या देऊन बाळाचं वजन वाढवतात.’’, ‘‘हमको तो बडम्ी जान और छोटी जान दोनों की फिकर है, लेकिन वैसा टाइम आया तो, छोटी जान की परवा मत करना और डिलिव्हरी नॉर्मलीच करना. हमको सिझेरियनकी नौबत नको लाओ.’’

एका बाजूला, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया आणि दुसऱ्या बाजूला, ‘‘माझी मुलगी किंवा पत्नी खूप नाजूक आहे, मला नाही वाटत ती बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेल, नॉर्मलची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही सिझेरियन करून टाका.’’, ‘‘माझ्या पतीचा वाढदिवस अमुक या तारखेला आहे त्या दिवशीच माझं बाळ जन्माला यावं, अशी माझी इच्छा आहे, त्या तारखेला माझं सिझेरियन करता येईल का?’’, ‘‘अमुक एका मुहूर्ताला सिझेरियन केलं तर मुलगा होईल असं आमच्या ‘गुरुजी’ने सांगितलं आहे, त्याच दिवशी आमचं सिझेरियन करा.’’, ‘‘आज अमुक पाडवा आहे- शुभ दिवस आहे त्या दिवशी आमचं सिझेरियन करून द्या’’ वगैरे सारख्या कारणांसाठी सिझेरियन करा म्हणून मागणी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

एका गर्भवती स्त्रीच्या नोकरीवर रुजू होण्याची आणि बाळंतपणाची अपेक्षित तारीख जवळपास एकच होती. त्याच दरम्यान नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ती जर नोकरीवर रुजू झाली नाही तर आम्हाला दुसऱ्या उमेदवाराला नोकरी देण्याचा विचार करावा लागेल असं त्या संस्थाचालकाने तिला सांगितलं. ‘‘माझी नोकरी धोक्यात आली आहे त्यामुळे समजा दोन आठवडे अगोदर सिझेरियन केलं तर चालेल का डॉक्टर? म्हणजे माझं बाळंतपण सुखरूप होईल आणि नोकरी गमावण्याची माझ्यावर वेळ येणार नाही.’’ अशा प्रकारच्या विविध परिस्थितीत देखील सिझेरियन करण्याचे निर्णय घेतले जात आहेत. या दोन्ही बाजू रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांच्या आहेत. त्यातील तफावत लक्षात येईल. आता या संदर्भात डॉक्टरांची परिस्थिती आणि मन:स्थिती काय आहे याचा विचार करू. डॉक्टरांना नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियन केल्यानंतर जास्त पैसे मिळतात हे खरं आहे, म्हणून काही कोणताही डॉक्टर, नैसर्गिक प्रसूती होत असलेल्या रुग्णाचं सिझेरियन करत नाही. सिझेरियनच काय कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करणं हा काही पोरखेळ नसतो, ती एक जबाबदारी असते. गर्भवती स्त्रीला ग्रामीण भागात ‘दोन जीवाची बाई’ असं म्हणतात. मला हा संबंध दोन जीवाचा नसून अडीच जीवाचा आहे असं वाटतं. अर्धा जीव डॉक्टरचा! आपल्या रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या स्त्रीचं बाळंतपण होऊन (नॉर्मल असो वा सिझेरियन), आई आणि बाळ सुखरूप घरी जाईपर्यंत, डॉक्टरचं मनदेखील दुसऱ्या कुठल्या कामात विशेष लागत नसतं हे फार कमी लोकांना माहिती असेल.

सिझेरियन सेक्शन या ऑपरेशनबद्दल लोक काय म्हणतात आणि डॉक्टरांची मन:स्थिती काय आहे याचा अंदाज घेतल्यानंतर, पुढे जाण्याअगोदर सिझेरियन या ऑपरेशनच्या इतिहासात जरा डोकावून पाहू. प्रसूतीदरम्यान ‘अडलेल्या स्त्रियांना मोकळं’ करण्यासाठी म्हणून सिझेरियन सेक्शन करून बाळ बाहेर काढण्याची पद्धत निर्माण झाली. तेव्हा गर्भाशयावर छेद घेऊन बाहेर काढणे एवढंच लक्षात आलेलं होतं, पण ऑपरेशन नंतर गर्भाशय शिवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे, अशा ऑपरेशननंतर बाळ बाहेर येत असे, पण अति रक्तस्रावामुळे आणि रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे, स्त्रिया मृत्युमुखी पडत असत. इटलीचा प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ ‘पोरो’ याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात, बाळ बाहेर काढल्यानंतर लगेच गर्भाशयदेखील कापून काढण्याचं ऑपरेशन निर्माण केलं. या ऑपरेशनमुळे तिचे प्राण वाचत असे, पण भविष्यात तिला मूल होत नसे. पण, सिझेरियननंतर माता मृत्यूचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी झालं. सिझेरियन सेक्शन केल्यानंतर गर्भाशय शिवता येतं हे जर्मनीच्या ‘मॅक्स संगर’ याने जगाला दाखवून दिलं. या कौशल्यामुळे स्त्रीचे प्राण वाचण्यास खूप मदत झाली आणि तिचं गर्भाशय वाचल्यामुळे भविष्यात अजून संतती होण्याची शक्यता टिकून राहिली.  या शस्त्रक्रियेमुळे त्या काळात इंग्लंडमध्ये माता मृत्युदर खूप कमी झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडच्या ‘कॅमरुन’ने त्याच्या कारकीर्दीत फक्त १४ सिझेरियन सेक्शन करून (आज एखाद्या छोटय़ा शहरातदेखील एका दिवसात १४ पेक्षा कितीतरी अधिक सिझेरियन ऑपरेशन्स होतात) जगाला दाखवून दिलं की, जनसामान्यांनी या ऑपरेशनची भीती बाळगू नये. त्यानंतर कॅमरुनचे मदतनीस म्हणून काम करणारे, इंग्लंडच्या ‘मन्रोकर’ या प्रसूतिशास्त्र तज्ज्ञाने आज ज्या पद्धतीने सिझेरियन केले जाते ती पद्धत विकसित केली.

अपत्यजन्म ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबात घडणारी घटना आहे. आजच्या परिस्थितीत, जिथे अपत्यजन्म तिथे सिझेरियन सेक्शनची शक्यता असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सिझेरियन सेक्शन हे एक नितांतसुंदर ऑपरेशन आहे. बाळंतपणात ‘अडलेल्या’ स्त्रियांची ‘सुटका’ करून त्यांचा जीव वाचवण्याची किमया या शस्त्रक्रियेमध्ये आहे. एवढंच नव्हे तर, या जगात ‘येणारं’ बाळ सुखरूप यावं याची व्यवस्थादेखील आहे. एका दृष्टीने या शस्त्रक्रियेची निर्मिती म्हणजे, जगातील तमाम गर्भवती स्त्री आणि नवजात अर्भकासाठी वरदान आहे. अशी ही शस्त्रक्रिया, प्रामुख्याने कुणी आणि कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत अनेक वर्षांपूर्वी निर्माण केली याची जाणीव संबंधित सर्वाना असली पाहिजे. त्यांच्या या कामगिरीची एक कृतज्ञ आठवण व्हावी या उद्देशाने इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना वाचकांसमोर ठेवल्या आहेत.

सिझेरियन सेक्शन ही शस्त्रक्रिया इतकी ‘उपकारक’ असेल तर मग आज समाजात बदनाम का आहे? असं म्हणतात की चांगल्या गोष्टीचादेखील अतिरेक झाला तर काही समस्या निर्माण होतात. सिझेरियन सेक्शनच्या बाबतीत असंच तर घडत नाही ना? हा या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी विचार करण्यास भाग पाडणारा प्रश्न आहे. रुग्ण आणि नातेवाईक यांचा नॉर्मल का सिझेरियन याबद्दलचा समज, डॉक्टरांची भूमिका यापैकी काय खरं आणि काय खोटं? खोटं काहीच नाही. दोन्ही बाजू योग्यच आहेत. मग नॉर्मल का सिझेरियन याबद्दल एवढा गोंधळ का? रुग्ण आणि तिच्या बाळाची एवढी काळजी, एवढी तळमळ जर डॉक्टरांना असेल तर मग एवढय़ा मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांबद्दल गैरसमज का? सिझेरियन सेक्शनसंबंधित अनेक अशा प्रश्नांची उकल करावयाची आहे, विविध पैलूंबाबत आलेले अनुभव वाचकांशी शेअर करत समाज आणि सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टर्समध्ये निर्माण झालेली दरी संपवता येईल का हे पाहायचं आहे.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about cesarean delivery awareness

ताज्या बातम्या