सुकेशा सातवळेकर

भारतात दरवर्षी ७ लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये कर्करोगाचे निदान होते. २०२६ पर्यंत हेच प्रमाण १४ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगात १ अब्जापेक्षा जास्त रुग्ण कर्करोगग्रस्त आहेत. तुम्ही काय आणि किती खाता, यावर कर्करोगाचा धोका अवलंबून आहे, म्हणूनच कर्करोगाच्या प्रतिबंधामध्ये आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

जागतिक कर्करोग दिन म्हणून ४ फेब्रुवारी हा दिवस पाळला जातो. या कर्करोगाच्या प्रतिबंधामध्ये आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कर्करोग म्हणजे शरीरपेशींचे अनैसर्गिक, विकृत विभाजन आणि अतिरिक्त वाढ. या वाढीचा फैलाव शरीरात कुठेही होऊ शकतो. नैसर्गिक पेशींच्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणात कर्करोगाच्या पेशी वाढू शकतात.

अयोग्य जीवनशैली, अनिष्ट आहार-विहार, आत्यंतिक ताणतणाव, मानसिक अनारोग्य यामुळे शरीरघटकांत विकृती निर्माण होऊन व्याधी, विकार तयार होतात आणि बळावतात, कर्करोग त्यापैकीच एक गंभीर विकार. कर्करोगावर अतिशय व्यापक, सखोल शास्त्रीय संशोधन, संपूर्ण जगात युद्धपातळीवर सुरू आहे. आधुनिक उपचारांना काही प्रमाणात यशही मिळतंय. आधुनिक तंत्रवैज्ञानिक प्रगती, नवनवीन परिणामकारक औषधांचा शोध, प्रगत उपकरणांद्वारे व्याधींचे निदान करण्याच्या पद्धती वापरूनही, कर्करोगासारख्या दुर्धर विकारावर पूर्णपणे मात करणे वैद्यकीय विश्वाला अजून साध्य झालेले नाही.

भारतात दरवर्षी ७ लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये कर्करोगाचे निदान होते. २०२६ पर्यंत हेच प्रमाण १४ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगात १ अब्जापेक्षा जास्त रुग्ण कर्करोगग्रस्त आहेत. २०१०-२०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ३९.६ टक्के पुरुष आणि स्त्रियांमध्ये आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर कर्करोगाचे निदान होण्याची शक्यता आहे.

म्हणूनच, कर्करोगाला बळी पडण्या आधीच, प्रतिबंधात्मक प्रयत्न करणे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही काय आणि किती खाता, यावर कर्करोगाचा धोका अवलंबून आहे. आहार आणि कर्करोगाचा संबंध खूप पूर्वी म्हणजेच

१८ व्या शतकात मांडला गेला होता. पण मधल्या काळात हा विचार नाकारला गेला होता. पण आधुनिक, वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झालंय की, कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एकतृतीयांश मृत्यूंचा संबंध, पोषण आणि जीवनशैलीशी; म्हणजेच अयोग्य आहार, शारीरिक हालचालींची कमतरता, स्थूलता आणि मद्यपानाशी आहे. दोनतृतीयांश मृत्यूंचा संबंध तंबाखू आणि सिगारेटच्या व्यसनाशी आहे.

कर्करोग टाळण्यासाठी आणि धोका कमी करण्यासाठी अपथ्यकारक पदार्थ टाळून, पथ्यकर आहार घेणे आवश्यक आहे. सुयोग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे, कर्करोगाच्या प्रतिबंधाची खात्री नाही देता येणार, पण धोका नक्कीच कमी करता येईल. कर्करोग एका रात्रीत होत नाही आणि त्याला प्रतिबंधही थोडय़ा काळापुरते बदल करून होऊ शकत नाही. हे सर्व बदल शास्त्रीय संशोधनावर आधारित असले तरी, ते सर्वसाधारण नियम आहेत. प्रत्येकाची जनुकीय रचना, तब्येत, जीवनशैली वेगवेगळी असते, त्यामुळे गंभीर समस्या असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा व्यक्तिगत सल्ला घेऊनच बदल करावेत. कर्करोगावर आजही सातत्याने संशोधन चालू आहे, त्यामुळे काही नियम वेळोवेळी बदलू शकतात.

आहार पद्धती

संतुलित आणि नियंत्रित आहारामुळे इतर विकारांबरोबरच कर्करोगाचा धोका कमी होतो. आहाराचं संतुलन साधण्यासाठी दिवसभराच्या आहारात सर्वसाधारणपणे भाज्या, सलाड आणि फळं मिळून ५-७ वाटय़ा हव्यात; ४-५ वाटय़ा धान्याचे प्रकार हवेत; २ वाटय़ा डाळी आणि कडधान्य किंवा मांसाहारी पदार्थ हवेत आणि २ कप दूध आणि दुधाचे पदार्थ हवेत. अशा आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी अत्यावश्यक असलेले अन्नघटक मिळतात. त्यामुळे कर्करोगाला कारणीभूत घटकांपासून संरक्षण मिळते.

अख्खी सालासकट धान्ये आणि कडधान्ये, भरपूर भाज्या आणि फळं अशा वनस्पतीजन्य पदार्थामधून विविध शक्तिशाली सूक्ष्म अन्नघटक – फ्लेवोनाइड्स, कॅरोटीनोइड्स, फायटोकेमिकल्स मिळतात. अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स – व्हिटामिन सी, ई आणि सेलेनियम मिळतं. शास्त्रीय अभ्यासशोधांमुळे सिद्ध झालंय की, या घटकांमुळे शरीरातील घातक प्रमाणातील ऑक्सिडेशन क्रियांना अटकाव केला जातो. कर्करोगकारक दाह (इन्फ्लमेशन) कमी होऊ शकतं. काही वेळा कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात.

हे पदार्थ आहारात आवर्जून हवेत

कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या क्रुसिफेरस भाज्या. यांमध्ये असलेल्या बायोफ्लेवोनोइड्स आणि इतर वनस्पतीजन्य रसायनांमुळे शरीरपेशींचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं; टय़ुमरची वाढ रोखली जाते. स्तनांच्या कर्करोगाचा धोका ४५ टक्क्यांनी कमी होतो.

हिरव्या पालेभाज्यांमधील इंडॉल्स हे कर्करोग प्रतिबंधक घटक, बायोफ्लेवोनॉइड्स, कॅरॅटीनोइड्समुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

आंबट फळं – ऑस्ट्रेलियातील संशोधनानुसार, रोज आवळा, लिंबू किंवा इतर आंबट फळं आहारात वापरली तर काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका निम्म्याने कमी होऊ शकतो.

सोयाबिन – यातल्या फायटोइस्ट्रोजेन्समुळे स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्याची शक्यता वाढते. संशोधकांच्या मते, विशेषत: लहान मुलींच्या आहारातील सोयाचा अधिक वापर; कर्करोग टाळण्यासाठी अधिक फायदेशीर असतो.

लसूण- यामध्ये असलेल्या सल्फर संयुगामुळे कर्करोगाविरुद्ध नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कार्यान्वित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टय़ुमरची वाढ रोखली जाऊ शकते. काही अभ्यासशोधांवरून सिद्ध झालंय की आहारात लसूण जास्त प्रमाणात वापरला तर पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

खजूर- अमेरिकन डायेटेटिक असोसिएशनच्या मते खजुरांमध्ये, भाज्या आणि फळांच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पॉलीफेनोल्स असतात. शिवाय व्हिटामिन ‘बी ६’ आणि फायबर्स असतात. त्यामुळे काही प्रकारचे कर्करोग टाळण्यास मदत होते.

आलं – अनेक अभ्यासशोधांनुसार आल्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक बीटाआयोनोन संयुग असतं.

गाजर – यातील बीटाकॅरोटीन, अल्फाकॅरोटीन आणि बायोफ्लेवोनोइड्स मुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

मक्याचे दाणे – यातील फेऱ्यूलिक अ‍ॅसिडमुळे कर्करोगकारक घटकांना अटकाव होऊ शकतो.

फायबर – फायबर किंवा चघळ चोथ्याचं शरीरात अतिशय उपयुक्त कार्य आहे. आतडय़ांतील प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सच्या पोषणाला मदत होते. त्यांच्यामध्ये विपुल प्रमाणात अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकार संस्था कार्यान्वित होते. लहान आणि मोठय़ा आतडय़ांतील स्नायूंना चालना मिळते, अन्न पुढे ढकलले जाते. आहारातील दूषित/विषारी घटक आणि जास्तीचं इस्ट्रोजेन निष्प्रभ होतं, बांधले जाऊन शरीराबाहेर टाकलं जातं.

किवी – यामध्ये कर्करोगाला प्रतिबंधक व्हिटामिन सी, ई आणि ल्युटीन, कॉपर असतं.

या गोष्टी टाळायला हव्यात

वजनवाढ – वजन आयुष्यभर आटोक्यात ठेवायला हवं. कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्या ५ व्यक्तींपैकी एक व्यक्ती स्थूल असते असं अभ्यासाने सिद्ध झालंय. स्थूल व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो. पोटाचा घेर आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा जवळचा संबंध आहे. स्थूल स्त्रियांमधील अतिरिक्त मेदपेशींमुळे इस्ट्रोजेन प्रमाणाबाहेर वाढतं आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रमाणाबाहेर वजनवाढ झाली तर कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणूनच आहारातील बदलांबरोबरच हालचालींचं प्रमाण वाढवायला हवं. रोज ३० मिनिटे किंवा आठवडय़ात किमान १५० मिनिटे चलपद्धतीचा व्यायाम करायला हवा.

भरपूर कॅलरीजयुक्त, पोषक घटकांची कमतरता असलेले पदार्थ टाळायला हवेत.

अति मेदयुक्त आहार – आहारातील स्निग्ध पदार्थाचं प्रमाण आणि कर्करोगाचा संबंध संशोधनाने सिद्ध झालाय. रेड मीट, अति मेदयुक्त दुग्धजन्य पदार्थ टाळायला हवेत. ओमेगा ३ मेदाम्लांचं प्रमाण वाढवून ओमेगा ६ चं प्रमाण कमी केलं तर कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

 साखरयुक्त गोड पदार्थाचं अतिप्रमाण – टेक्सास विद्यापीठातील कॅन्सर सेंटरमध्ये झालेल्या संशोधनानुसार साखरेच्या आणि साखरयुक्त पेयांच्या अति वापरामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. साखरेऐवजी फळातील नैसर्गिक गोडीचा वापर करावा.

 अति प्रक्रियायुक्त मांसाहारी पदार्थ – हे पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी क्युअर, स्मोक केले जातात, खारवले जातात. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजन्सीनुसार अशा पदार्थात कर्करोगजन्य घटक तयार होऊ शकतात.

 प्रोसेस्ड, रिफाइंड पदार्थ – यांमध्ये भरपूर स्निग्ध पदार्थ, मीठ, साखर, प्रीझर्वेटिव्ह्ज असल्यामुळे, शरीरात दूषित द्रव्यांचं प्रमाण वाढतं आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

 अल्कोहोल – राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या संशोधनानुसार अल्कोहोलमुळे पचनसंस्थेत विषारी, दूषित द्रव्यं तयार होतात. ‘डीएनए’चं नुकसान होऊन ऱ्हास होतो. अन्नघटकांचं अभिशोषण कमी प्रमाणात होतं. इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं. कर्करोगाचा धोका वाढतो.

तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. पॅसिव्ह स्मोकिंगही टाळायला हवं.

 अति गरम पेयपदार्थ – इंटरनॅशनल कॅन्सर जर्नलनुसार अति उष्ण पेयांमुळे घशातील नाजूक आवरणावर घातक परिणाम होऊन कर्करोगाचा धोका वाढतो.

अति मानसिक ताणतणावांमुळे काही विशिष्ट रसायनं तयार होतात आणि शरीरातील कर्करोग प्रतिबंधक यंत्रणेवर घातक परिणाम होतो.

थोडक्यात, कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपला आहार, जीवनशैली, मन:शांती सांभाळून शरीरातील दूषित पदार्थाचं प्रमाण आटोक्यात ठेवायला हवं.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com