प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

जंगलात राहाणाऱ्या आदिवासी स्त्रिया, खेडेगावातील स्त्रिया आणि कलेचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या शहरातील स्त्रिया या तीन स्तरांवरच्या विविध चित्रकर्तीचा परिचय देणारं हे सदर. पारंपरिक चित्रकलेला नवतेच्या रूपांत सादर करत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं, त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करण्याचं काम या चित्रकार करीत आहेत. त्यांच्यावरची ही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपत असली तरी गेल्या वर्षभरात या सदरामुळे अनेक वाचक स्त्रियांनी आपली चित्रकलेची आवड पुन्हा नव्यानं जोपासायला सुरुवात केली याचा विशेष आनंद आहे.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

‘दृक् -कला’ अर्थात ‘डोळ्यांनी आस्वाद घेण्याची कला’. या कलेचं पारंपरिक स्वरूप काळ बदलल्यामुळे बदलत चाललं आहे, पण या कलेला त्याच पारंपरिक स्वरूपात जपण्याचं आणि काळानुसार नवनवीन प्रयोग करीत तिला पुढे नेण्याचं काम अनेक ‘चित्रकर्ती’ करीत आहेत. जंगलात राहाणाऱ्या आदिवासी स्त्रिया, खेडेगावातील स्त्रिया आणि कलेचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या शहरातील स्त्रिया या सर्वाचा यात मोठा वाटा आहे. ‘चित्रकर्ती’ या ‘चतुरंग’मध्ये गेलं वर्षभर सुरू असलेल्या लेखमालेचा उद्देश त्यांचा हा प्रवास, त्यांचे प्रयत्न वाचकांसमोर मांडणे हा होता.

सर्वसामान्य वाचकाचा चित्रकलेशी थेट संबंध येतोच असं नाही, पण ज्यांना कलेविषयी आवड आणि उत्सुकता आहे अशा वाचकांसाठी विशेषत: हा प्रयत्न होता आणि तो बऱ्याच अंशी सफल झाल्याचा प्रत्यय वाचकांनी पाठवलेल्या ई-मेल्समधून आला. फक्त ‘लेख आवडला’ असा प्रतिसाद नसे, तर लेखात ओळख करून दिलेल्या चित्रकर्तीशी थेट संवाद साधण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी, त्यांच्या कलाकृती विकत घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, अशा अनेक हेतूंनी माझ्याकडून अनेकांनी या चित्रकर्तीचे फोन नंबर आवर्जून मागून घेतले.

चित्रगंधा सुतार या डहाणूच्या आदिवासी चित्रकर्तीची निवड या वर्षीच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’करिता झाली, त्या वेळी चित्रगंधा यांच्यावरील लेख ‘चित्रकर्ती’ सदरात वाचल्याची आणि तो या लेखमालेतील पहिला लेख असल्याची आठवण एका वाचकानं दिली. वाचक किती आत्मीयतेनं वाचतात याचा प्रत्यय आला. या लेखमालेत उमरियामधील (मध्य प्रदेश) वयाच्या सत्तराव्या वर्षी चित्रनिर्मितीला प्रारंभ करून वयाची ऐंशी र्वष झाल्यावर पॅरिसमध्ये चित्रप्रदर्शन झालेल्या बैगा आदिवासी चित्रकर्ती जुधईयाबाई यांच्यावरील लेख आवडल्याचं अनेक वाचकांनी कळवलं होतं. या जुधईयाबाईंचं पद्मश्री पुरस्कारासाठी (२०२१) नामांकन झालं आहे याचा आनंद जास्त आहे.

बिहारच्या टिकुली कला, मंजूषा कला ही चित्रं पाहून काही स्त्री वाचकांनी त्यापासून प्रेरणा घेऊन तशी चित्रं काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि मला व्हॉट्सअ‍ॅपवर ती चित्रं पाठवली.  कांदिवली (मुंबई) येथील सुजाता निमकर यांनी अनेक सुंदर चित्रं काढली. गोंड चित्रकलेवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मुलाच्या विवाहाच्या वाढदिवशी भेट देण्यासाठीही त्यांनी गोंड चित्रकलेवरील सुंदर चित्र काढलं. कोल्हापूरच्या अस्मिता पोतदार यांच्या भरतकामावरील लेख वाचल्यावर त्यापासून स्फू र्ती घेऊन आपल्या पत्नीनं वीस वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भरतकाम करण्यास सुरुवात केल्याचं सिंधुदुर्गमधील कलमठ (कणकवली) या गावातून एका वाचकांनी कळवलं.

नाशिकच्या सुहास जोशी या चित्रकलेचे खास वर्ग घेतात. आपल्या सुंदर हस्ताक्षरात त्यांनी लेखाला प्रतिसाद दिला आहे. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘चित्रकर्ती’चा प्रत्येक लेख त्या वाचून दाखवीत आणि या लेखांची सुंदर फाइलही त्यांनी करून ठेवली आहे. हा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. ओडिशाच्या डॉ. अनिता सबत यांनी ‘लोकसत्ता’ ई-पेपरमधील काही लेख पाहिले. त्यांना मराठी येत नाही, पण पटचित्रं ही ओडिशाची पारंपरिक कला असून त्याविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही, त्याबद्दल लिहावं, असा त्यांनी वारंवार आग्रह धरला. त्यांनी फक्त उडिया भाषा जाणणाऱ्या चित्रकर्तीशी माझा संवाद साधून देण्यासाठी दुभाष्याची भूमिका उत्तम रीतीनं पार पाडली. ओडिशाची परंपरागत कला जपण्याची त्यांची तळमळ मला जाणवली.

भाषेचा प्रश्न बऱ्याचदा आला. त्या वेळी त्या परिसरातील एखादी स्थानिक व्यक्ती, जिला हिंदी आणि इंग्रजीही येत असे, त्यांची मदत घ्यावी लागे. कच्छला गुजराती जाणणारी माझी एक मैत्रीण बरोबर आली होती, तर मध्य प्रदेशात छत्तीसगडच्या मैत्रिणीनं मदत केली. या आदिवासी चित्रकर्तीपैकी काही जणी संपर्कात राहिल्या आहेत. नवीन चित्र केलं की त्याचा फोटो पाठवतात. आपली मुलं परीक्षेत पास झाल्याचं चंद्रकली या चित्रकर्तीनं कळवलं, तर िरकू बैगा या तरुण आदिवासी मुलीनं मुलाला जन्म दिल्यानंतर बाळाचा फोटो पाठवला.

या लेखमालेच्या निमित्तानं माझाही तपशीलवार अभ्यास झाला. शब्दमर्यादेचं बंधन सांभाळण्यासाठी सविस्तर लिहिण्याचा मोह टाळावा लागला, परंतु लेखाबाबतचा वाचकांचा प्रतिसाद नवीन ऊर्जा देत राहिला. अनेकांनी हे सारे लेख पुस्तकरूपात एकत्रित यावेत, अशी इच्छा प्रदर्शित केली. माझ्या लेखावर काही वाचक मनमोकळी चर्चाही करीत होते, पण विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ठाणे येथील रंजन जोशी यांचा. पाच दशकांहून अधिक काळ उपयोजित कलांमधील अध्यापनाचा अनुभव असलेले, सत्तरीच्या घरात असलेले, रंगशास्त्राचे ते संशोधक. व्यंगचित्रकला आणि त्या अनुषंगानं येणारी ‘पंचकला’ यात उत्तम कामगिरी असलेल्या जोशी यांना आजही विज्ञान आणि कला याबाबत जिज्ञासा आहे. माझ्या अनेक लेखांवर त्यांच्याशी सांगोपांग चर्चा झाल्यामुळे मला जागतिक स्तरावरील कलेतील कित्येक नव्या गोष्टी, मी न वाचलेल्या अनेक पुस्तकांची नावं समजली. माझ्या ज्ञानात भर पडून एक प्रकारची ऊर्जा मिळत गेली. त्याबद्दल जोशी यांना धन्यवाद!

गोधडी या विषयावरील लेखाला मिळालेल्या प्रतिसादात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं सांगितलं. गोरेगाव येथील विवेक कुलकर्णी यांनी ‘केशवसृष्टी’ प्रकल्पासाठी ग्रामविकास योजनेअंतर्गत पंचाहत्तर गावं दत्तक घेतली असून तेथील स्त्रियांना गोधडीसाठी प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबवण्याचा मानस त्यांनी कळवला. त्यांना उपयोगी संपर्क क्रमांकही दिले. याच गोधडीपासून प्रेरणा घेऊन वैशाली ओक या चित्रकर्ती समकालीन चित्रकलेत जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करीत आहेत. पर्यावरणासाठी ही परंपरा जपली जावी असा संदेश त्या आपल्या कलाकृतींमधून देत आहेत आणि याच कलाकृतींद्वारे अनेक समस्या, प्रश्न अतिशय कलात्मकतेनं त्या मांडत आहेत.

गोधडीवरचा लेख वाचल्यावर मुंबईच्या शरयू कमद यांनी एक अतिशय हृद्य अनुभव सांगितला. सर्वसाधारणपणे आजी नातवासाठी, आई मुलीसाठी, मुलासाठी गोधडी शिवते. शरयू यांनी आपल्या आईसाठी गोधडी शिवली ती सुंदर मोराचं ‘पॅचवर्क’ असलेल्या साडीचा उपयोग करून. गेली काही र्वष आई आजारपणानं अंथरुणावर आहेत. त्यांना ही गोधडी दिल्यावर त्यांचा आनंदी चेहरा पाहून शरयू कृतकृत्य झाल्या. हा अनुभव सांगत त्या म्हणाल्या, की गोधडीचा लेख वाचून आता नवीन गोधडी शिवण्याचा उत्साह आलाय.

निरनिराळ्या राज्यांतील कलावंतांचं काम पाहाता असं प्रकर्षांनं जाणवलं, की बऱ्याच राज्यांतील शासन कलांकरिता, दृक्  कलेतील लोकचित्रकला जिवंत ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवतात. त्यातून लोककलाकारांना उत्तेजन दिलं जातं. मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, ओडिशा, केरळ अशा अनेक राज्यांतील लोककलाकार तेथील शासनाचे आभार मानताना दिसले, कारण गावात उभारलेल्या केंद्रांमधून सातत्यानं प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. चित्रकारांना साहित्य मोफत देण्याची व्यवस्था शासन करतं आणि त्या साहित्यानं निर्माण केलेल्या कलाकृतींची विक्री करण्याची व्यवस्था शासनानंच करून कलावंतांना योग्य मोबदला मिळतो. कला उत्सव, कला शिबिरं याकरिता शासन त्यांना पाठवतं. विशेष म्हणजे अनेकांना ही संधी दिली जाते. विशेष कामगिरी करणाऱ्यांना शासनातर्फे परदेशातही पाठवलं जातं.

त्यामानानं आपल्या महाराष्ट्रात उदासीनता दिसते. याचा परिणाम म्हणून ‘चित्रकथी’ या पारंपरिक चित्रकलेत काम करणारे पिंगुळी (या कलेच्या गावाचं नाव) येथे कोणीही आढळत नाही. औपचारिक शिक्षण घेतलेले कलाकारही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. सावंतवाडीच्या ‘गंजिफा’ कलेसाठी प्रयत्न सुरू राहिले तरच ती जिवंत राहील, नाही तर केवळ संग्रहालयातच पाहावी लागेल.

या लेखमालेनं मला वैयक्तिक स्तरावर अनेक संस्मरणीय अनुभव दिले. वास्तविक मी व्यवसायानं चित्रकार, कला महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका. वर्षांतून दोन-तीन वेळा कलाविषयक लेख अलीकडेच लिहू लागले होते; पण मला वर्षभर लिहितं ठेवलं ते ‘चतुरंग’नं. मी नोकरी, घर, संसार, सारं सांभाळून अनेक चित्रप्रदर्शने केली, करते आहे. त्यामुळे माझ्या परिचितांकडून माझं नेहमीच कौतुक होत आलं आहे. अर्थात त्यामुळे मीही सुखावत असे. या ‘चित्रकर्ती’च्या निमित्तानं मी आदिवासी स्त्रियांना जंगलात खडतर आयुष्य जगत, नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता उत्कृष्ट कलानिर्मिती करताना पाहिलं, परंपरा जपण्याची धडपड आणि निर्मितीची तळमळ, आवड पाहिली आणि माझा सगळा अभिमान गळून पडला. या लेखमालेमुळे मला माझ्या खुजेपणाची जाणीव झाली आणि आयुष्यातील मोलाचा अनुभव मिळाला.

तो आयुष्यभर सोबत राहील याबद्दल या लेखमालेचे आभार!

(सदर समाप्त)