शमसुद्दीन तांबोळी

समाजातील स्त्री-पुरुषांनी आपल्या समाजवर्तनाचं, स्त्री-पुरुष नातेसंबंधाचं एक रिंगण तयार केलं आहे. बहुतांश लोक या रिंगणातच वावरत राहातात.. आपल्या समाजात स्त्री आणि पुरुषांच्या प्रतिमा पारंपरिक संकेत आणि प्रतीकांच्या साखळदंडांनी घट्ट बांधल्या गेल्या आहेत. त्यामागे पारंपरिक विचारसरणी, न बदलण्याची मानसिकता खूप मोठय़ा प्रमाणावर आहे का? आजही पुरुषप्रधान विचारसरणीतून बाहेर यायला पुरुष का तयार नाहीत? प्रत्येकाचा फक्त माणूस म्हणून कधी विचार के ला जाणार?

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

जगविख्यात तत्त्वज्ञ रुसो यांनी त्यांच्या ‘सामाजिक करार’ या ग्रंथाची सुरुवात ‘मॅन इज बॉर्न फ्री, अँड एव्हरीव्हेअर ही इज इन चेन्स’ या वाक्यानं केली आहे. १७६२ च्या सुमारास प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ त्या काळी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तसा अनेकांसाठी तो आजही वादाचा विषय ठरत असतो. आपल्या समाजात स्त्री आणि पुरुषांच्या प्रतिमा अशाच पारंपरिक संकेत आणि प्रतीकांच्या साखळदंडांनी घट्ट बांधल्या गेल्या आहेत.

समाजमनानं निर्माण केलेल्या स्वप्रतिमा जपण्याचा अट्टहास प्रत्येक जण करत असतो. या लादलेल्या बेडय़ा तोडून बाहेर पडणाऱ्याला स्वत: आणि स्वजनांविरोधात एकाकी लढा द्यावा लागतो. पुरुष म्हणजे शौर्य, क्रौर्य, दमदार, कणखर, रांगडा, भिडणारा अशाच विशेषणांनी रंगवलेली प्रतिमा समाजमनावर कोरली गेली आहे. मात्र व्यवहारात किती तरी स्त्रिया माया, ममता, जिव्हाळा यांबरोबरच कठोर, हिंसक, भ्रष्टाचारी, सत्तापीपासूही असतात हे आपणांस आजूबाजूचं वास्तव पाहून स्वीकारावं लागतं. स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावातील सरलता, जटिलता आणि यातील धूसरता ही व्यक्तिसापेक्ष असते, हे समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक अनुभवाचं क्षितिज विस्तारत राहायला हवं.

मानवी स्वभाव, त्यावर झालेले संस्कार आणि त्यातील संमिश्रता हा जसा बिघडलेला, गमतीचा आणि समजून घेण्याचा विषय आहे तसाच तो नातेसंबंध निकोप करण्याचा खटाटोपही आहे. हेही खरं आहे, की स्त्रियांवर पुरुषवर्चस्ववादी संस्कृतीनं जसे प्रहार केले, तसंच पुरुषांनीच स्त्रियांना पारंपरिक आणि लोकप्रिय, परंतु विषम समाजव्यवहारांतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे. बाईची बाजू घेऊन काम करणारा पुरुष ‘बाईहृदयी’ असावा लागतो, हे सांगताना आपण बाई आणि पुरुषाला वेगळं पाडतो का, असा प्रश्न पडतो. मात्र काही रूढ वास्तवाचा आधार घेतल्याशिवाय आपण आदर्शाची कल्पना मांडू शकत नाही. ‘पुरुष खाऊन पारावर उघडा पडेल, पण बाईला आडोसा हवाच,’ असा स्वजनांच्या मेंदूतून बाहेर पडलेला व्यावहारिक शहाणपणा समाजावर असलेल्या पुरुषप्रधानतेची गडद छाया अधोरेखित करतो आणि स्त्रियांच्या अबला असण्याच्या आणि पराधीनतेच्या तथाकथित संस्कृतीला बळकटी देतो. माणसाची मानसिकता, विचार करण्याची किंवा जगण्याची पद्धत तो ज्या संस्कृतीचा वारसा घेऊन जगतो त्यावर अवलंबून असते. सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक संस्कृती त्या माणसाला त्याला साजेशा मूल्यव्यवस्थेचा चष्मा देते. त्यातून स्वत:चा एक ‘आदर्शवाद’ निर्माण होतो. या आदर्शाचं आज्ञापालन करण्यातच नाही, तर ते इतरांवर लादण्यातही त्याला जीवनमूल्यं सापडल्याचा साक्षात्कार होतो. या तथाकथित झापडबंद संस्कृतीमुळे अनेकांना नवविचाराला स्वीकारण्यात पाप किंवा अधर्म असल्याचं वाटत असतं. परिणामी अशा माणसाला चाकोरीबाहेरचं वास्तव भयावह दिसतं. ‘बेटी बापाची, जमीन बादशहाची’ अशा म्हणीतून आपण मुलीवर बापाचा अधिकार असल्याचा एक प्रकारे शिक्का मारतो. मुलीला कोणतं आणि किती शिक्षण द्यायचं, तिचा विवाह कोणाबरोबर कधी करायचा, हा अधिकार आजही पुरुषानं स्वत:कडे राखला आहे.

मुस्लीम समाजात तर पुरुषाला आपल्या वेगळेपणाची जाणीव लहानपणीच होते. काही भौगोलिक किंवा सांस्कृतिक प्रथांना धार्मिक आधार देण्यात येतात. यातील सर्वाधिकपणे पाळण्यात येणारी प्रथा म्हणजे ‘खतना’, त्यालाच मराठी भाषक ‘सुंता’ असं म्हणतात. ज्यांनी खतना केली नाही, तो मुसलमान नाही आणि ज्यांनी केली तो मुसलमान! असा भक्कम पुरावाच समाजाला सापडलेला असतो. मला लहानपणापासूनच ही प्रथा अवघडून टाकणारी, अलगपणाची जाणीव करून देणारी आणि निर्थक वाटत राहिली. मात्र काही ‘शिकलेले’ या प्रथेला वैज्ञानिकतेचा मुलामा देतात. त्याची शास्त्रीय महती सांगतात. या संदर्भात मला काही प्रश्न पडतात. भारतातील ८०-८५ टक्के  पुरुष लोकसंख्या यावाचून कोणतीही अडचण न येता निरामय पद्धतीनं आनंदी राहातेच ना? या विषयाला घेऊन बिगरमुस्लीम समाजात अनेक अशास्त्रीय अपसमज आहेत. ते थेट हा विषय पुरुषांच्या बहुपत्नीत्वाच्या क्षमतेशी जोडतात. या संदर्भातील दुसरी बाजू अनेकांना कदाचित माहीत नसेल. पुरुषप्रधान सर्जनक्षमता कशाकशाचा शोध लावून तो आयाबहिणींच्या माथ्यावर लादेल हे सांगता येत नाही. बोहरा समाजात अनेक मुलींना ‘खतना’ पद्धतीचं पालन करावं लागतं. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र बोहरा समाजातील अनेक मुलींना या जाचक, वेदनादायी प्रथेचं पालन जबरदस्तीनं करावं लागतं. धारदार शस्त्रानं मुलींच्या नैसर्गिक लैंगिक इच्छेचं दमन करणारी ही तशी अघोरी अन् अन्यायी प्रथा आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रथेचा विरोध करण्यास शिकलेल्या बोहरा मुली संघटितपणे संघर्ष करत आहेत. मानवता आणि  मानवाधिकाराच्या कक्षेत येणारा हा विषय आहे. माझी मैत्रीण शबनम पूनावाला याविषयी चालवल्या जात असणाऱ्या आंदोलनाचं नेतृत्व करीत आहे.  खरं तर खतना प्रथेत कोणताही  पुरुषार्थ नाही, तरीही हा तथाकथीत पुरुषार्थ जेव्हा मुलींना या अमानुष आणि अवैज्ञानिक यातनेतून  जायला लावतो तेथेच ‘तो’ पुरुषार्थ गळून पडलेला असतो.

आपल्या समाजात दांभिकता खच्चून भरलेली आहे. प्राचीन इतिहास सांगतो की, शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. मात्र परंपरेनं शेतीची मालकी ही ‘बलवान’ पुरुषाकडे दिली. स्त्रिया या पुरुषांपेक्षा जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून कमजोर असतात असा जावईशोधही लावला. मात्र ‘लग्नात हुंडा कमी दिला, आता शेतासाठी बैलजोडी द्या,’ अशी मागणी करणारा माझ्या सख्ख्या बहिणीला सोडून देतो, सवत आणतो. पुन्हा बहिणीला घेऊन जातो आणि आपल्या दोन बायकांना बैलाप्रमाणे नांगराला जुंपून शेतीची कामं करतो. तरीही या स्त्रियांसाठी ‘शोहर आधा खुदा होता हैं!’ ही धारणा स्त्रियांमध्ये रुजवण्यासाठी प्रथा, परंपरा, नीतिनियम, म्हणी, लोककथा निर्माण केल्या गेल्या. स्त्रियांनाही  वडील, भाऊ, नवरा आणि मुलगा यांच्या आज्ञापालनात सुरक्षिततेची जाणीव होते. मध्यंतरी मुस्लीम समाजातील तशा प्रभावहीन झालेल्या एका पीठानं फतवा काढला होता, मुस्लीम स्त्रीनं घराबाहेर एकटीनं जायचं नाही. घराबाहेर पडताना सोबत पाच-सहा वर्षांचा मुलगा तरी असावा.. अशा हास्यास्पद फतव्यांचा ‘मुस्लीम सत्यशोधक’नं निषेध तर केलाच, तसंच स्त्रियांनीसुद्धा त्याला केराची टोपली दाखवली. तसंच शाहीनबाग आंदोलनात ठिकठिकाणी मुस्लीम स्त्रिया मोठय़ा प्रमाणात एकवटलेल्या दिसल्या. या आंदोलनाच्या निमित्तानं मुस्लीम स्त्रिया घराबाहेर पडल्या हे नक्कीच स्वागतार्ह आहेच! मात्र ‘हमे चाहिए आझादी’ अशा घोषणा देणाऱ्या स्त्रिया बुरख्यातच होत्या. ही स्त्रियांची मानसिकता बदलणं आव्हानात्मक आहे. एका उर्दू भाषक मुस्लीम शिक्षिकेनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं चरित्र अनुवादित केलं म्हणून मुस्लीम सत्यशोधक मंडळानं हमीद दलवाईंच्या स्मृतिदिनी त्यांचा सत्कार केला. या सत्कारप्रसंगी त्या बुरखा घालून आल्या होत्या. आमच्या एका कार्यकर्तीनं बुरख्यावरून छेडलं, तेव्हा त्या सत्कारमूर्ती म्हणाल्या, ‘‘मैं बुरखा पहनकर ‘एमएससी झुऑलॉजी’ करी, अब ‘पीएच.डी.’ कर रही हूँ. यह तालीम हासिल करते समय मेरा बुरखा आडे नही आया. आपको क्या ऐतराज हैं?’’ एका बाजूला या स्त्रिया अशा सगळ्या गोष्टींना व्यक्तिस्वातंत्र्य मानतात तर दुसरीकडे सुधारकाच्या चष्म्याला बुरखा हा पुरुषप्रधानता आणि महिलांवर लादलेल्या मानसिक गुलामगिरीचं प्रतीक वाटतं. सध्या तर तीन-चार वर्षांच्या मुलींपासून ते ऐंशी-पंच्याऐंशीतील स्त्रियाही बुरख्यात दिसतात.

अर्थात एका बाजूला हे चित्र असलं तरी आज कित्येक मुस्लीम मुली रेल्वे-ट्रेन चालवतात, पायलट होतात, क्रीडा, विज्ञान, साहित्य, सिनेमा, प्रशासनात आघाडी घेतात,उद्योजक होतात, आंतरधर्मीय विवाह करतात, हे नक्कीच आश्वासक आहे.

आपल्याला समाजात पुरुषांवर झालेला निर्ढावलेपणाचा संस्कार पदोपदी जाणवतो. तो इतका अंगात भिनलेला असतो की त्याबद्दल कधी अपराधीपणाची जाणीवसुद्धा शिवत नाही. अगदी साधं उदाहरण पाहा, अंघोळ झाल्यानंतर स्वत:ची आतली वस्त्रं धुऊन टाकणं हा पुरुषांना बायकीपणा वाटतो. ही कामं बायकांनीच करायची असतात असा कोरला गेलेला अलिखित संस्कार आहे. घरी आलेले मित्र, पाहुणे यांच्यासाठी चहा करणं किंवा जेवणानंतर आपलं ताट धुणं, या गोष्टी खऱ्या तर या काळात अगदी सहजपणे पुरुषांकडून व्हायला हव्यात. मला लहानपणापासूनच, म्हणजे आठवीत शिकत असल्यापासून स्वत:ची कामं स्वत: करण्याची सवय आहे. परंतु या माझ्या सवयीवर शेरेबाजी होत असते. बायकोनं कपडे धुणं, इस्त्री करणं, याला स्वाभाविक समजलं जातं, मात्र पुरुषानं आपल्या बायकोचे कपडे धुणं, तिच्या कपडय़ांवर इस्त्री फिरवणं, या सहज बाबीसुद्धा संकुचितांना अचंबित करतात.

या पार्श्वभूमीवर मला एक प्रसंग आठवतो. मला प्रा. ग. प्र. प्रधान सरांच्या घरी भेटायला जायचं होतं. त्यांनी सायंकाळी पाच वाजता यायला सांगितलं. मी पंधरा मिनिटं लवकर गेलो. बेल वाजवली. सरांनी दार उघडलं आणि म्हणाले, ‘‘अजून पंधरा मिनिटं आहेत. तू पंधरा मिनिटांनंतर ये.’’ मी पुन्हा पंधरा मिनिटांनी गेलो. सरांनी आत घेतलं आणि म्हणाले, ‘‘मला क्षमा कर. मी माझ्या बायकोची सेवा करत होतो. हल्ली तिचे पाय सुजतात. मी रोज चार ते पाच तिची सेवा करतो. पायाला तेल लावून चोळतो. तिनं आयुष्यभर माझी सेवा केली. आता मी नको का करायला?’’ या अशा माणसांचे संस्कार आपला पारंपरिकतेचा चष्मा उतरवतात आणि तो उतरवण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे. मात्र आमचे निगरगट्ट  संस्कार तसं करू देत नाहीत. बलवान समजला गेलेला विवाहित पुरुष कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी इतर वेळी कमजोर समजल्या जाणाऱ्या बायकोला पुढे करतो. या बाबतीत असणारी आकडेवारी आणि त्यातील धर्मनिरपेक्षता सर्वज्ञात आहेच.

समाजातील स्त्री आणि पुरुषांनी आपल्या समाजवर्तनाचं, स्त्री-पुरुष नातेसंबंधाचं एक रिंगण तयार केलं आहे. या रिंगणाबाहेर जाण्याचा ते फारसा विचार व प्रयत्न करत नाहीत. आज शिकलेले काही तरुण-तरुणी काळानुरूप या रिंगणाच्या परिघावर वावरतात, तर काही परिघाबाहेर पडताना दिसतात. ‘मनुष्यस्वभावाला औषध नाही’ हे नीतिवचन मोडीत काढणारे निर्माण होत आहेत. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे.

(लेखक ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष आहेत.)

tambolimm@rediffmail.com