हरीश सदानी

तमिळनाडूमधील अरुणाचलम मुरुगनंतम या ‘पॅडमॅन’चं नाव आता सगळ्यांना ठाऊक झालं आहे. अरुणाचलम यांच्याकडून प्रेरणा घेऊन आसाममधल्या एका तरुणाला आपणही असाच सामाजिक उद्योग सुरू करावा असं वाटू लागलं आणि त्यानं ते करून दाखवलं. नेल्सन डेब हे त्या तरुणाचं नाव. केवळ स्वस्त सॅनिटरी पॅडची निर्मिती करून तो थांबला नाही, तर मासिक पाळी या विषयाबद्दलची अस्पश्र्यता दूर व्हावी यासाठी त्यानं मुलामुलींमध्ये जनजागृती सुरू केली. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यासाठी गरजेची असलेली निरोगी मानसिकता रुजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या ईशान्येतील ‘पॅडमॅन’विषयी –

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…

एकीकडे भारतानं आर्थिक महासत्ता बनावं यासाठी प्रयत्नशील असणारा एक वर्ग आहे, तर दुसरीकडे मूलभूत गरजांची पूर्तता करू न शकणारा जनसंख्येचा मोठा वर्ग आहे. मानवी विकासाच्या निकषांमध्ये नीचांक दाखवणाऱ्या बाबींमध्ये आरोग्यसुविधांचा समावेश होतो. त्यात स्त्रियांच्या आरोग्य सुविधांबाबतची एक दुर्लक्षित गरज म्हणजे दरमहा मासिक पाळीच्या दरम्यान लागणारा स्वच्छ कापडाचा तुकडा अर्थात सॅनिटरी पॅड मिळणं. पाळीसंदर्भात असणारे ‘टॅबू’, गैरसमजुती हादेखील एक अलक्षित मुद्दा.

व्हॅन इजिक या संशोधकानं २०१६ मध्ये भारतातल्या वयात आलेल्या मुलींची पाळीसंदर्भात एक विस्तृत पाहणी केली होती. यात आढळलेल्या ठळक बाबी अशा-  मासिक पाळीदरम्यान त्याने के लेल्या पाहणीतील ८७ टक्के  मुलींना कुठल्या ना कुठल्या बंधनांना सामोरं जावं लागतं. घरात काय खावं, कसं बसावं, कुठे (इतरांपासून वेगळं) झोपावं, उपासनास्थळी जाण्याबाबतचे निर्बंध इत्यादी.

– केवळ ५५ टक्के  मुलींना पाळी येणं ही सामान्य बाब वाटते.

‘दसरा’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार देशातील केवळ ४८ टक्के  किशोरवयीन मुलींना पहिल्यांदा पाळी येण्यापूर्वी त्याबाबत शास्त्रीय माहिती मिळालेली असते आणि ७० टक्के  मातांना मासिक रक्तस्राव म्हणजे घाणेरडी, अशुद्ध बाब आहे, असं वाटतं. या सर्व पार्श्वभूमीवर नेल्सन डेब हा आसाममधील ३४ वर्षांचा तरुण मासिक पाळीसंदर्भातली निगा आणि व्यवस्थापन, सुविधा आणि प्रबोधन यात पुढाकार घेऊन आठ वर्षांपासून हा विषय सतत ऐरणीवर आणत आहे. आज या ‘पॅडमॅन’ची कहाणी जाणून घेऊ.

काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळील बोकाखाट या कसब्यात राहाणाऱ्या नेल्सनचं शालेय शिक्षण तेजपूर (आसाम) येथील एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळेत झालं. पुढील शिक्षणासाठी २००२ मध्ये तो बंगळूरु येथे गेला. अ‍ॅनिमेशन आणि मल्टीमीडिया तसंच फॅशन डिझाइन यांबद्दलचे दोन पदविका अभ्यासक्रम त्यानं केले. पुढे इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झाल्यानंतर त्याला एका ऑस्ट्रेलियन कंपनीत वेब डिझाइनिंगचं काम मिळालं. तीन वर्ष तिथे काम केल्यानंतर नेल्सनच्या मनात इंटरनेटच्या आभासी दुनियेद्वारा लोकांशी ‘कनेक्ट’ होण्यापेक्षा लोकांसाठी प्रत्यक्ष वेळ देऊन काहीतरी वेगळं करण्याची ऊर्मी निर्माण झाली. बंगळूरुला तेव्हा सामाजिक उद्योजकतेची (सोशल आँत्रप्रेन्युअरशिप) चर्चा जोरात सुरू झाली होती. यादरम्यान २०१० मध्ये एका परिषदेत नेल्सननं अरुणाचलम मुरुगनंतम या तमिळनाडूतील ‘पॅडमॅन’चं वक्तव्य ऐकलं. त्यानं भारावून त्यांच्याविषयी, सामाजिक उद्योजकतेविषयी अधिक वाचन केलं. या क्षेत्रातील लोकांनाही तो भेटला. नाताळच्या सुटीत घरी आल्यावर नेल्सननं आईवडिलांना सॅनिटरी पॅड निर्मितीचा लघुउद्योग सुरू करण्याचा मनोदय सांगितला. आईची पहिली प्रतिक्रिया होती, की ‘तुला यापेक्षा वेगळं- म्हणजे स्त्रियांच्या वापराच्या वस्तूंपेक्षा वेगळं काही काम मिळालं नाही का?’. पण आपला मुलगा काहीतरी मनापासून, जिद्दीनं करायचं ठरवतो तेव्हा तो ते काम उत्तमरीत्या करतो, हा दृढ विश्वास तिला होता. वडिलांनी त्याला अरुणाचलम यांचं काम जवळून पाहाण्यासाठी प्रोत्साहित केलं, उद्योग सुरूकरण्यासाठी लागणारं भांडवलही देऊ केलं. २०११ मध्ये नेल्सन कोइम्बतूर येथे अरुणाचलम यांच्या कारखान्याला भेट द्यावयास गेला.

साधी राहाणी असणाऱ्या, उद्यमशील अरुणाचलम आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर नेल्सननं आपली भावी दिशा निश्चित केली. दशकभर बंगळूरु येथे वास्तव्य केल्यानंतर तो आसामला परतला. सामाजिक उद्योग म्हणून त्यानं ‘दि इको हब’ची रीतसर नोंदणी केली. ‘डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड’ निर्मितीसाठी २०१२ मध्ये स्वत: राहात असलेल्या इमारतीतच निर्मिती कें द्र सुरू केलं. अरुणाचलम यांच्या फॅक्टरीतून ४-५ मशीन्स विकत घेतली. दहा गरजू स्त्रियांना शिफ्ट डय़ुटीमध्ये नोकरी दिली. प्लॅस्टिकचा दुरुपयोग थांबावा या उद्देशानं कागदी पिशव्यांची निर्मिती सुरू केली. ‘लेडी केअर’ या नावानं काढलेल्या सॅनिटरी पॅडचं विपणन करण्यासाठी नेल्सन   ५-६ स्वयंसेविकांना घेऊन गावागावांतील किराणा दुकानं, फार्मसी शॉप्स, हॉस्पिटल्स येथे जनसंपर्क वाढवू लागला. घरात हस्तकलेचं काम करणाऱ्या स्त्री कारागिरांना बरोबर घेऊन त्यानं फॅशन डिझाइनिंगच्या पूर्वी शिकलेल्या कौशल्याचा वापर केला. हातानं विणलेल्या सुरेख कांथा एम्ब्रॉयडरीचं कापड, कुर्ते, फाइल कव्हर्स यांची विक्री डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्स, ब्युटिक्स यांना भेट देऊन करू लागला. अनेक नातलगांनी त्याला सॅनिटरी पॅडच्या विक्रीकरिता साहाय्य केलं.

प्रजनन आरोग्य आणि संबंधित मुद्दय़ांवर नेल्सन अधिक अभ्यास करू लागला. ऑरोविल (तमिळनाडू) येथे जाऊन कॅथी वॉकिंग या ‘इको फेम’ नावाची सामाजिक संस्था चालवणाऱ्या प्रशिक्षकाकडून नवा दृष्टिकोन त्याला मिळाला. रसायनयुक्त डिस्पोझेबल पॅड हे पर्यावरणस्नेही नसून पुनर्वापर करता येईल असे                 जैव-विघटनशील कापडी सॅनिटरी पॅड हा उत्तम पर्याय असल्याचं त्याला कळलं. २०१७ अखेरीस केंद्र सरकारच्या एका प्रकल्पांतर्गत नेल्सनला त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम, मणिपूर येथे जाऊन कापडी पॅड निर्मिती युनिट सुरू करण्याची संधी मिळाली. महिला स्वयंसहाय्य गटांद्वारे हे के ंद्र सुरू करून ते ईशान्येकडील अनेक राज्यांत चालवण्यासाठी तो प्रशिक्षण देऊ लागला. केंद्र सरकारद्वारे मग नेल्सनच्या ‘दि इको हब’ला आसाम येथे कापडी पॅड तयार करण्यासाठी लागणारी तीन मशीन्स पुरवली गेली.

उद्योगात जम बसल्यावर नेल्सनच्या लक्षात आलं, की स्वस्त सॅनिटरी पॅड स्त्रियांना मिळवून देण्याबरोबरच संबंधित विषयावर शास्त्रीय शिक्षण द्यायला हवं. त्यासाठी आसाममधील शाळा-महाविद्यालयं, चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मुलींना भेटून तो जाणीव जागृती करू लागला.  २०१८ मध्ये ‘बोधना ट्रस्ट’ स्थापन करून या कामाला गती देण्यासाठी कष्ट घेऊ लागला. मासिक पाळी संदर्भातली लाज, लांच्छन दूर सारून या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयावर तो शाळांमधील मुलग्यांशीही संवाद करू लागला. आतापर्यंत १५,००० हून अधिक मुली आणि मुलग्यांना संवेदनशील करण्याचं काम ‘बोधना’नं केलं आहे.

गुवाहाटी येथे दरवर्षी प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात जून महिन्यातील तीन दिवस अंबुबाची उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस देवी मासिक पाळीतून जात असते, अशी श्रद्धा बाळगून साधूंसह लाखो देशीविदेशी पर्यटक इथे धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. मंदिरात  आदिशक्तीच्या सर्जनशीलतेचं पूजन करत असताना जिवंत स्त्रीला पाळीदरम्यान निर्बंध घालण्याच्या प्रवृत्तीबद्दलचं वास्तव टिपण्यासाठी नेल्सननं अंबुबाची उत्सवाला भेट देऊन त्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. स्वत: यावर कुठलंही भाष्य न करता भाविकांचं मनोगत टिपून युटय़ुबवर त्याविषयी संवाद घडवण्याचा त्याचा हेतू होता. अलीकडे त्यानं आसामच्या एका आदिवासी समुदायातील पहिल्या पाळीच्या उत्सवाचंही दस्तऐवजीकरण केलं आहे. त्यावर तो लवकरच माहितीपट करणार आहे.  २०१९ मध्ये गुवाहाटीच्या ‘रोटरी इंटरनॅशनल- जिल्हा ३२४०’ विभागानं बोधना ट्रस्टबरोबर एक महत्त्वाचा उपक्रम राबवला. आसामबरोबरच ईशान्येकडील १४० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी भट्टय़ा (इन्सिनरेटर्स) उभारणं, प्रजननसंस्थेचं आरोग्य आणि हात स्वच्छ धुण्यासंबंधीच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम, याचा त्यात समावेश आहे.

नेल्सनच्या कामाला भरारी आणि लौकिक मिळाला ते ‘पिरियड.  एण्ड ऑफ सेन्टेन्स.’ या ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या बोलपटाच्या टीमनं संपर्क केल्यावर. मासिक पाळीच्या विषयावर बेतलेल्या या बोलपटाद्वारे ‘दि पॅड प्रोजेक्ट’ या संस्थेची अमेरिकेत स्थापना झाल्यानंतर त्याच्या प्रवर्तक मेलिसा बर्टन यांनी नेल्सनची सामाजिक बांधिलकी आणि उद्यमशीलता टिपली आणि नागालँड येथील डिमापूर जिल्ह्य़ात डिस्पोजेबल पॅड निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ‘दि इको हब’ला अर्थसहाय्य दिलं.

पावसाळ्यात दरवर्षी आसाम येथे ब्रह्मपुत्रा ओसंडून वाहते. जून-जुलै महिन्यात मोठा पूर येतो. नेल्सन आणि त्याची टीम पूरग्रस्तांना भेट देऊन गरजू वस्तूंचं स्वयंस्फूर्तीनं वाटप करतात. या साहित्यात साबण, मास्क, सॅनिटायझर तसंच सॅनिटरी पॅड्स यांचा अंतर्भाव असतो.   सप्टेंबर २०२० पासून नेल्सन एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सक्रिय आहे. ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज’ (मावा) संस्थेबरोबर राबवण्यात येणाऱ्या ‘मानुष’ प्रकल्पांतर्गत आसाममधील २० ते २५ वयोगटातील मुलग्यांमध्ये लैंगिकता, स्त्री-पुरुष नातेसंबंध, पुरुषत्व याबाबत सतत संवाद करीत आहे. दीर्घ प्रशिक्षण देऊन या तरुणांमध्ये स्त्री-जाणीवविषयक संवेदनशीलता तयार करत आहे. यासाठी तो स्वत: या विषयांवर खोलवर वाचन, अभ्यास करत आहे. युवकांना समवयस्क मुलग्यांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आणि आंतर-क्रियात्मक चर्चासत्र, कार्यशाळा घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

जिद्द, ध्येय बाळगून त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नेल्सनची कहाणी पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही नक्कीच प्रेरित करेल. पाळीबद्दलची लज्जा व निषिद्धता दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस स्वत:पासून नक्कीच सुरुवात करता येईल.

wsaharsh267@gmail.com