माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

‘‘मुलांवरील लैंगिक अत्याचार या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी, लोकांना माहिती आणि मदत मिळवण्यासाठी, त्यांची अनामिकता जपणारी  ‘मुस्कान’तर्फे ‘हेल्पलाइन’ सुरू असून अनेक मुलांनी आपल्यावरील अत्याचाराला त्यामार्फत वाचा फोडली आहे. राज्यभरातील पालक आणि बालकांना त्यामुळे मदत मिळू लागली आहे.’’

पोनरेग्राफीमुळे बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्रात लक्षणीय वाढ झाल्याची बातमी आली आणि त्यावरचा लेख गेल्याच शनिवारी ‘चतुरंग’नेही प्रसिद्ध केला. ‘फाऊंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन पुणे’ यांच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘मुस्कान’ या प्रकल्पाच्या ‘हेल्पलाइन’वरून अशा कॉल्सची संख्या खूप वाढत आहे, अशी माहिती या संस्थेच्या चालकांनी देत या बातमीला पुष्टी दिली.

बालकांवरील लैंगिक अत्याचारांत सध्या खूप प्रमाणात वाढ झाल्याचे यासाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या निदर्शनास आले आहे. कदाचित पूर्वी या संवेदनशील विषयावर बोलण्याची समाजाची मानसिकता नव्हती. पालकांमध्येही मोकळेपणा नव्हता. त्यामुळे हे काम अवघड होतं. ‘मुस्कान’ या संस्थेच्या व्यवस्थापक शर्मिला राजे सांगतात, ‘‘पूर्वीपासून लहान मुलं लैंगिक अत्याचाराला बळी पडतच होती; पण तेव्हा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या फारशा संस्था नव्हत्या. या विषयावर बोलण्यास, माहिती देण्यास कोणीही तयार नसत. त्यामुळे त्या काळी वर्तमानपत्र हाच आमच्या माहितीचा स्रोत असे. वर्तमानपत्रात एखादे प्रकरण प्रसिद्ध झाले की, आम्ही ‘मुस्कान’च्या कार्यकर्त्यां पोलीस स्टेशनमध्ये जात असू. तेथील पोलीस पीडित मुलाचं नाव – पत्ता कधी द्यायचे, तर कधी देतही नसत; पण आम्ही प्रयत्नपूर्वक ते मिळवून त्या बालकापर्यंत पोहोचून त्याला मदत मिळवून देत असू. आम्ही अनेक वेळा शाळाचालकांना भेटत असू; पण ते आम्हाला पालकांशी, शिक्षकांशी बोलू देत नसत. कारण शाळेत या विषयावर कार्यक्रम केल्यास शाळेचं नाव बदनाम होईल, शिक्षकांवर अकारण संशय घेतला जाईल, अशी त्यांना भीती वाटे. अशा परिस्थितीत या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी, लोकांना माहिती आणि मदत मिळवण्यासाठी अनामिकता जपणारी एक ‘हेल्पलाईन’ सुरू करावी असं आम्ही ठरवलं. या ‘हेल्पलाइन’चा दुसरा महत्त्वाचा फायदा असा की, एरव्ही पुण्यापुरतं मर्यादित असणारं आमचं कार्य इतर प्रांतांतील बालकांपर्यंत आणि तेथील संस्थांपर्यंत पोहोचलं आणि दूरदूरच्या पालक आणि बालकांना त्यामुळे मदत मिळू लागली.’’

‘मुस्कान’च्या हेल्पलाइनवर पहिलीच केस आली, एका सतरा वर्षांच्या मुलाची! ‘‘या मुलाशी त्याचा टय़ुशन टीचर लैंगिक चाळे करत असे. त्याने आईला हे सांगितलं. मुलगा धीट होता. त्याने ‘हेल्पलाइन’वरून आम्हाला माहिती दिली. पालकांना पोलीस केस करायची नव्हती; पण आम्ही मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. मग आम्हाला प्रश्न पडला की, या मुलाने धीटपणे अत्याचाराला वाचा फोडली म्हणून आम्हाला हा प्रकार कळला. कदाचित शिकवणी वर्गातील इतर मुलांसोबतही असं घडलं असेल, म्हणून आम्ही शिकवणी वर्गात एक सेशन वा सत्र घेतलं. त्या वेळी आणखी एक मुलगी पुढे आली. मग आम्ही त्या शिक्षकावर पोलीस केस केली. स्त्रिया आणि बालकल्याण विभागाच्या खास सेलमध्ये त्याचा समुपदेशन वर्ग घेतला. त्याच्याकडून लेखी हमीपत्र घेतलं.’’ ही ‘हेल्पलाईन’ चालवणारे समुपदेशक दिगंबरसर सांगत होते.

‘हेल्पलाइन’ला मिळणारा प्रतिसाद पाहून संस्थाचालकांच्या हे लक्षात आलं की, ‘मुस्कान’च्या ‘हेल्पलाइन’वर आलेली प्रकरणे सोडवणं किंवा गुन्हेगाराला शासन करणं एवढं मर्यादित कार्य करणं पुरेसं नाही. तर या समस्येच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वस्त्या, शाळांमधून या विषयाची माहिती लोकांना देणं सुरू केलं. विशेष असं की, जाणीव-जागृतीच्या या सत्रांनंतर ‘हेल्पलाइन’वर येणाऱ्या फोन कॉल्सच्या संख्येत खूप वाढ झाली. ‘मुस्कान’च्या स्वयंसेविका सायली अत्रे सांगतात, ‘‘आमची सत्रं ऐकून अनेक जण आमच्याकडे येतात. एखादी स्त्री सांगते, ‘आमच्या वस्तीत एक माणूस मुलांना आपले लिंग दाखवतो, त्यांच्याशी गैरवर्तन करतो.’ आम्ही त्यांना सल्ला देतो की, वस्तीतल्या सगळ्या महिला मिळून पोलीस स्टेशनला तक्रार द्या. एखादी घटना घडली असेल तर मात्र आम्ही त्या मुलीला तातडीने भेटतो. तिची केस समजावून घेतो. तिच्यावर बलात्कार झालेला असेल तर तिची वैद्यकीय तपासणी करतो. समजा, शारीरिक इजा झाली असेल तर तिला रुग्णालयात भरती करतो. नंतर पोलिसांत तक्रार दाखल करतो आणि तात्काळ आरोपीला अटक केली जाते. या दरम्यान ती पीडित व्यक्ती सज्ञान वयातील असेल तर पोलीस स्टेशन, न्यायालय येथील वातावरणाची पूर्ण कल्पना देऊन सतत त्यांना भावनिक आधार देतो. एकदा एका अडीच वर्षांच्या मुलीची ‘हेल्पलाइन’वर केस आली. तिच्या सावत्र बापाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला होता. भयानक रक्तस्राव पाहून आमच्यासह पोलिसांचीच बोलती बंद झाली. त्या मुलीचं म्हणणं नोंदवून घेणं तर शक्यच नव्हतं. ती फक्त ‘पपांनी मारलं’ एवढंच बोलत होती. तिचा योनीमार्ग एवढा फाटला होता की, तिथे अठरा टाके घालावे लागले. ससून इस्पितळाच्या

डॉ. भोसलेंनी ही अवघड शस्त्रक्रिया केली. अशा वेळी डॉक्टर्स, पोलीस यांची खूप मदत होते. पुढे त्या माणसाला जबर शिक्षा झाली.’’

‘मुस्कान’च्या अधिकारी/स्वयंसेवक यांनी ‘हेल्पलाइन’वर येणाऱ्या तक्रारींचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं आढळलं की बहुतेक वेळा अत्याचार करणारी व्यक्ती परिचित वा कुटुंबातील असते; काका, मामा, भावंड, वडील, आजोबा, शेजारी, वॉचमन, शिक्षक वगैरे े खरंच आहे. कारण त्यांना बालके सहज उपलब्ध असतात. ती मोठय़ांवर अवलंबून असतात. त्यांना भीती दाखवून वा फूस लावून, त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा मोठय़ा वयाच्या व्यक्तींकडून घेतला जातो. सुरुवातीला चॉकलेट, बिस्किट आदी खाऊ देऊन त्यांच्याशी मैत्री केली जाते, लाड केले जातात. पुढे लाड करता करता स्पर्श बदलतो, शरीराशी चाळे सुरू होतात. बालकालाही स्पर्शज्ञान असतं. स्पर्शातलं हे वेगळेपण मूल आई-बाबांना सांगतं. मग ‘हेल्पलाइन’वर ‘मुस्कान’कडे त्यांचे फोन येतात. अशा वेळी त्यांच्या घरी जाऊन वा त्यांना संस्थेत बोलवून केसची माहिती घेतली जाते. अशा केसेसची हाताळणी केल्यावर जनतेत या समस्येची जाणीव-जागृती व्हावी याची निकड भासू लागते. ‘हेल्पलाइन’वरील तक्रारदारांची, स्थळांचा अभ्यास करून ‘मुस्कान’तर्फे शाळा, वस्त्या, मंडळांमधून समुपदेशनाची सत्रं घेतली जातात. तसंच काही सत्रं बालवाडीतही घेतली जातात. अशा लहान मुलांना सुरक्षित – असुरक्षित ज्ञान व्हावं यासाठी ‘मुस्कान’तर्फे टेलरमेड मॉडय़ुल्स, पपेट्सचा वापर केला जातो. खेळाखेळांतून त्यांना हे सांगितलं जातं की, असे प्रकार घरांत, शाळेत किंवा मैदानावर घडल्यास सर्वात जवळची व्यक्ती अर्थात आई किंवा शिक्षिका यांच्या कानावर ते घालावं आणि मदत मिळवावी. ‘हेल्पलाइन’मुळे ‘मुस्कान’च्या कार्यकर्त्यांना ही सत्रं मुलं, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शेजारी या सर्वासाठी घेणं सुलभ आणि सोपं झालं.

‘मुस्कान’च्या ‘हेल्पलाइन’ चालवणाऱ्या स्वयंसेविका दीपाली दंडवते सांगतात, ‘‘हल्ली आमच्याकडे पौगंडावस्थेतील मुलांचे फोन येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. अशा मुलांना प्रेम, मैत्री, आकर्षण यातली सीमारेषा समजावून देणं खूप आवश्यक असतं. आम्ही त्यांचं ऐकून घेतो. त्यांच्या घरून विरोध असतो, पण त्यांना लग्न करून एकत्र राहायचं असतं. अशा वेळी आम्ही त्यांना कायद्याची माहिती देतो. अल्पवयीन मुलांनी ठेवलेल्या शरीरसंबंधाला कायदा मान्यता देत नाही हे त्यांना माहीत नसल्याने ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत आपण गुन्हेगार ठरतोय हेच मुलांच्या लक्षात येत नाही. एकदा ‘हेल्पलाइन’वर एक फोन आला. त्या प्रकरणात मुलगा सतरा आणि मुलगी एकोणीस वर्षांची होती. प्रेमाच्या नादात दोघं घरातून पळाले. पालकांनी मुलं हरवल्याची तक्रार केली. दुर्दैवाने अशा वेळी मुलालाच दोषी धरलं जातं आणि त्याची रवानगी सुधारगृहात केली जाते. मुलगी मात्र आईवडिलांसोबत घरात ‘सुरक्षित’ असते. आणखी एका प्रकरणात मुलगी गरोदर होती. दोघांनी परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवलेला असूनही मुलावर बलात्काराचा आरोप लावला गेला. मुलगी सुटली, पण मुलगा तुरुंगात गेला. सध्या ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत अशा गुन्ह्य़ांची गंभीर दखल घेतली जाते.’’

ज्येष्ठ समाजसेविका आणि ‘मुस्कान’च्या डायरेक्टर नंदिता अंबिके पोलिसांच्या भूमिकेबाबत स्पष्टपणे सांगतात. ‘‘सुरुवातीच्या काळात थेट वा ‘हेल्पलाइन’वरून आलेल्या समस्यांबाबत पोलिसांची भूमिका जुन्या विचारधारणेची होती.  ‘हेल्पलाइन’वरून पीडित मुलग्यांच्या येणाऱ्या प्रकरणाची वाढती संख्या, त्यांतील गांभीर्य आणि एकूणच पोलिसांची मानसिकता जाणून आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांची भेट घेतली आणि लहान मुलांच्या या नाजूक आणि संवेदनशील विषयावरील प्रकरणे पोलिसांनी भावनिक दृष्टिकोनातून हाताळाव्यात, अशी त्यांना विनंती केली. विशेष म्हणजे त्यांनी तत्काळ पुढाकार घेऊन प्रत्येक विभागात बाललैंगिक अत्याचारांवर ‘पोलीस संवेदनशील कार्यक्रम’ राबवण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर मुलं मोकळेपणाने बोलत नाहीत हे जाणवल्यानंतर आम्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अशा केसेस हाताळण्यात, असा आग्रह धरू लागलो.  पुढे आम्ही महिला पोलीस अधिकारी आणि रायटर्स यांची एकत्रित सत्रं घेणं सुरू केलं या सर्वाच्या परिणामस्वरूप आज पोलिसांची मानसिकता खूप बदलली आहे. त्यांच्या सकारात्मक आणि संवेदनशीलतेचा आम्हाला खूप उपयोग होत आहे.

‘हेल्पलाइन’वर अनेकदा पाळणाघरांविरुद्ध पालकांच्या तक्रारी येतात. आपण प्रत्येक वेळी मान्यताप्राप्त पाळणाघरांची निवड करत नाही. त्यामुळे तिथे काम करणारे स्त्री-पुरुष, पाळणाघराचे चालक, एखादा पालक या बालकांसोबत शारीरिक चाळे करत असल्याच्या तक्रारी येतात. अशा वेळी ‘मुस्कान’ त्या पाळणाघराविरुद्ध पोलिसांत तक्रार करून मुलांना न्याय मिळवून देते.

शर्मिला राजे सध्या वाढीस लागलेल्या ऑनलाइन गुन्ह्य़ांविषयी सांगतात. ‘‘लैंगिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांतील सीमारेषा धूसर आहे. त्यामुळे मुलांमध्ये व्हिडीओ कॉल करणं, फोटो काढणं सर्रास चालतं. कधी कधी तर मजा म्हणून लैंगिक संबंधांचं शूटिंग केलं जातं आणि नंतर ते व्हायरल होतं. अशा अनेक तक्रारी येतात. शाळकरी मुलांना थ्रिलिंगच्या नादात तुम्ही ‘सायबर क्राइम’ करत आहात याची रास्त जाणीव करून द्यावी लागते. हल्ली अनेक वस्त्यांमध्ये मोफत वायफायची सुविधा दिली गेली आहे. त्यामुळे ऑनलाइन असताना अचानक पोनरेसाइट्स पॉपअप होतात. ते बघण्याचा आणि ती मित्रांना दाखवण्याचा त्यांना मोह होतो; पण हा ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा आहे आणि त्यासाठी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते हे मुलांना कळणं अत्यंत गरजेचं आहे!’’

बाल लैंगिक अत्याचार हा सध्याचा अत्यंत गंभीर विषय झाला आहे. त्यात इंटरनेटमुळे अधिकच तीव्र झाला आहे. ‘मुस्कान’ची हेल्पलाइन हा त्यातल्या काहींसाठी दिलासा ठरतो आहे. अशा अनेक हेल्पलाइन्स कार्यरत होणं गरजेचं आहे.

फाऊंडेशन फॉर चाइल्ड

प्रोटेक्शन : मुस्कान

‘हेल्पलाइन’ नंबर – ९६८९०६२२०२, ९११२२९९७८४, ९११२२९९७८५