भारतातच नव्हे तर जगातही महिला अर्थशास्त्री नाहीत. त्यावर अनेकांची सहमती आहे ती एका मुद्दय़ावर, तो म्हणजे अर्थशास्त्राचा विचार करायला लागल्या की महिला ‘डाव्या’ होतात. म्हणजेच भावनेनं मांडणी करतात. याचाच दुसरा अर्थ असा की अर्थशास्त्राची मांडणी करताना पुरुष जेवढे कर्तव्यकठोर होतात तेवढा कोरडेपणा महिला अर्थशास्त्रींमध्ये दिसत नाही..
एलिनॉर ओस्त्रोम यांचं गेल्या वर्षी जून महिन्यात निधन झालं. ७८ वर्षांच्या होत्या त्या. फार काही मोठी बातमी वगैरे आली नाही कुठे. खरं तर मोठय़ा बातमीत बसण्याचे जे काही निकष असतात..म्हणजे नोबेल पुरस्कार वगैरे.. त्यात त्या बसत होत्या. पण तरीही आली नाही मोठी बातमी हे खरं. ती यायला हवी होती.
कारण अर्थशास्त्रासाठी नोबेल मिळविणाऱ्या त्या एकमेव होत्या. म्हणजे जवळपास ११२ वगैरे वर्षांच्या नोबेल पारितोषिकांच्या इतिहासात अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक महिलेला एकदाच मिळालंय. तेदेखील विभागून. त्याच एलिनॉर ओस्त्रोम. २००९ सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता. जंगल, मासेमारीची खाडी वगैरे नैसर्गिक संपत्ती सरकारी आणि/किंवा खासगी क्षेत्र दोघांच्याही हस्तक्षेपाशिवाय उत्तम पद्धतीने सहकारी तत्त्वावर कशी चालवता येईल हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यासाठी त्यांना विभागून नोबेल पुरस्कार मिळाला.
अर्थात एलिनॉर यांच्या नोबेल पुरस्कार विजेत्या प्रबंधाची चर्चा करणं हा काही उद्देश नाही इथं. मुद्दा हा आहे की अर्थशास्त्रात महिला मोठय़ा प्रमाणावर का नसतात. म्हणजे खरं तर रुचकर स्वयंपाक ही कौटुंबिक पातळीवर तशी महिलांची मक्तेदारी. पण बल्लवाचार्य पुरुषच का? बल्लवाचारी का नाही? तसाच हाही मुद्दा. एरवी जगताना संसारी पातळीवर काटकसरीनं जगणं शिकविणाऱ्या.. म्हणजेच अप्रत्यक्षपणे अर्थशास्त्राचं महत्त्व जाणणाऱ्या ताई माई अक्का यांच्यातून अर्थशास्त्रज्ञ का तयार होत नाहीत? महिला उद्योजक दिसतात, वैमानिक वगैरे महिला झाल्या त्या आता निवृत्त व्हायची वेळ आली, फोर्ब्सच्या ज्येष्ठ आणि o्रेष्ठ उद्योगपतींच्या यादीत महिला आता चांगल्याच स्थिरावल्यात. पण महिला अर्थशास्त्री काही मोठय़ा प्रमाणावर जाऊ दे.. पण लक्षणीय म्हणता येईल अशा प्रमाणातदेखील दिसत नाहीत.
काय कारण असेल?
डेबी श्लुसेल नावाची एक लोकप्रिय पत्रकार आहे अमेरिकेत. वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल अशा बडय़ा वर्तमानपत्रांत तिचं स्तंभलेखन प्रसिद्ध होत असतं. तिचा स्वत:चा एक ब्लॉगदेखील आहे. चटपटीत असल्यानं तो लोकप्रियही आहे. अशा ठिकाणी फार अभ्यासाची वगैरे गरज नसते. त्यामुळे तिचं वाचलं जातं बऱ्यापैकी. आपल्याकडच्या शोभा डे वगैरेंसारखं. तर तिनं गेल्या वर्षी महिला अर्थशास्त्रज्ञ का नसतात या मुद्दय़ावर लिहिलं होतं. तिचे निष्कर्ष धक्कादायकच आहेत. ती म्हणते, महिला अर्थतज्ज्ञ या उत्तम प्रतीच्या मूर्ख असतात. (वुमेन इकॉनॉमिस्ट्स आर एक्सेप्शनली स्टुपिड.) तिचं म्हणणं असं की महिला अर्थशास्त्राच्या नजरेतून आर्थिक मुद्दय़ांकडे पाहतीलच असं नाही. त्यामुळे त्यांच्या अर्थविचारात बऱ्याचदा डावेपणा येतो. तिला असं लिहावंस वाटलं कारण महिला आणि पुरुष अर्थतज्ज्ञांचा अर्थविचार यावरच अमेरिकेत झालेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच प्रसृत झाले होते. त्यातला एक प्रश्न असा होता- अर्थतज्ज्ञ कसा विचार करतात? त्याचं उत्तर आलं, हा तज्ज्ञ तो आहे का ती यावर बरंच काही ठरतं. म्हणजे महिला अर्थतज्ज्ञ असेल तर सरकारी क्षेत्राला अधिक वाव मिळावा असं तिला वाटेल तर पुरुषाचं मत खासगीकरणाच्या बाजूने पडतं. अमेरिकी अर्थव्यवस्थेवर खूप नियंत्रणं आहेत का, असा एक प्रश्न होता त्यात. तब्बल ६५ टक्के महिला अर्थतज्ज्ञांनी नकारार्थी उत्तर दिलं. ही संख्या पुरुष अर्थतज्ज्ञांपेक्षा २४ टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजे या महिला अर्थतज्ज्ञांना अर्थव्यवस्थेवर आणखीही काही नियंत्रणं आली तर चालणारं होतं तर पुरुष अर्थतज्ज्ञांचं म्हणणं होतं आहेत तीच नियंत्रणं कमी करायला हवीत. प्रत्येक टप्प्यावर हे मतभेद आढळले. महिलांचं म्हणणं पडलं, कर्मचाऱ्यांना आयुष्यभरासाठी आरोग्य विमा देणं हे व्यवस्थापनाचं.. मग ते सरकारी असो की खासगी..कर्तव्यच आहे. जवळपास ६० टक्के महिला या मताच्या होत्या. पण तसा विचार फक्त २१ टक्के पुरुषांचाच होता. आरोग्य विमा देणं ही आपली जबाबदारी आहे, असं फक्त २० टक्केच पुरुषांना वाटलं. बाकी सगळय़ांचा अशा काही समाजवादीसदृश विचारांना विरोध होता.
बरं हा प्रश्न काही आताच पडलेला आहे, असं नाही. चालरेट गिलमन हिने या विषयावर पुस्तकच लिहिलंय, ‘वुमेन अँड इकॉनॉमिक्स/अ स्टडी ऑफ द इकॉनॉमिक रिलेशन बिटवीन मेन अँड वुमेन अॅज अ फॅक्टर इन सोशल इव्हॉल्युशन’. कधी? तर १८९८ साली. हे दशक महिलांसाठी खूप उलथापालथीचं होतं. महिला घराबाहेर पडू लागल्या होत्या, समान हक्कांची भाषा सुरू झाली होती. त्या वेळी जी घुसळण झाली त्यावर भाष्य करणारं हे पुस्तक खूपच लोकप्रिय झालं त्या वेळी. विवाह, मातृत्व, कुटुंबातील मध्यवर्ती भूमिका आदी कारणांमुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही, असा या पुस्तकाचा युक्तिवाद आहे. त्या काळाची पाश्र्वभूमी याला आहे. अमेरिकेतली पहिली आणि प्रामाणिक स्त्रीवादी असं तिचं वर्णन केलं गेलं. यातला अर्थातच स्त्रीवादी हा शब्द तिला आवडला नाही. तिने ते विशेषण नाकारलं. तोपर्यंत वर्ग, वर्ण यामुळे होणाऱ्या भेदांवर वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले होते. त्याचा अर्थशास्त्राशी संबंध जोडला गेला होता. पण लैंगिकता आणि अर्थविचार हा मुद्दा तिने पहिल्यांदा मांडला.
तिचं म्हणणं असं की समस्त पृथ्वीतलावर फक्त माणसांतच अशी प्रथा आहे की ज्यात स्त्रीला आर्थिकदृष्टय़ा पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. पुरुष कुटुंबाच्या उद्योगासाठी कर्ज काढतो, अर्थार्जन करतो आणि त्या कर्जातल्या आपल्या वाटय़ाची परतफेड स्त्री गृहिणी राहून, घर चालवून करते, असंही तिचं म्हणणं आहे. वास्तविक स्त्री ही पुरुषापेक्षा शारीरिकदृष्टय़ा अधिक सक्षम असते, खूप दीर्घकाळ ती कष्ट उपसू शकते. पण घर चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आल्यामुळे महिलांचा अर्थकारणातला वाटा कमी कमी होत गेला आणि उगाच पुरुषाला श्रेय मिळत गेलं, असाही तिचा दावा आहे.
कारणं काहीही असोत. एक मुद्दा सर्वानुमते अजून स्पष्ट करता आलेला नाही. तो म्हणजे महिलांमधून थोर थोर असे अन्य अनेक काही घडत असताना महिला अर्थशास्त्री का नाहीत? पण हे असं आहे हे मात्र खरं असं अनेकांना वाटतं. आणि सहमती आहे ती आणखी एका मुद्दय़ावर. तो म्हणजे महिला अर्थशास्त्राचा विचार करायला लागल्या की डाव्या होतात. म्हणजेच भावनेनं मांडणी करतात. याचाच दुसरा अर्थ असा की अर्थशास्त्राची मांडणी करताना पुरुष जेवढे कर्तव्यकठोर होतात तेवढा कोरडेपणा महिला अर्थशास्त्रींमध्ये दिसत नाही. म्हणजे बाईचं बाईपण तिला अर्थवेत्ती बनवण्याच्या मार्गात येत असावं का?
आपल्याकडे असा काही अभ्यास झाल्याचं ऐकिवात नाही. या निमित्तानं तो व्हायला हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
‘अर्था’मागचं बाईपण आणि बाईपणामागचा ‘अर्थ’
भारतातच नव्हे तर जगातही महिला अर्थशास्त्री नाहीत. त्यावर अनेकांची सहमती आहे ती एका मुद्दय़ावर, तो म्हणजे अर्थशास्त्राचा विचार करायला लागल्या की महिला 'डाव्या' होतात. म्हणजेच भावनेनं मांडणी करतात. याचाच दुसरा अर्थ असा की अर्थशास्त्राची मांडणी करताना पुरुष जेवढे कर्तव्यकठोर होतात …
First published on: 23-02-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on first woman nobel prize winner in economics elinor ostrom