प्राप्त परिस्थितीला कुरकुर न करता सामोरं जाणं यालाच ‘अध्यात्म’ म्हणत असतील तर तुझ्यात ते चांगलं मुरलं होतं, खरं ना! आई, जाता जाता हा संस्कार तू आमच्यावर करून गेलीस.. उद्याच्या मदर्स डे निमित्ताने.

‘भे ट तुझी माझी स्मरते’ असे भूतकाळात घेऊन जाणारे निराशेचे उद्गार माझ्या ओठावर कधी रेंगाळलेच नाहीत कारण एक रहदारीचा रस्ता ओलांडला की सासर, त्यामुळे तुझी रोजची भेट ठरलेली. पण त्या दिवशी तिन्ही सांजेला आले आणि भेटीचा नियम मोडला. मी तुला भेटले पण तू डोळेही उघडायला तयार नव्हतीस, नजरभेटही नाकारलीस. पाव कप दूध प्यायला किती वेळ लावलास, तान्ह्य़ा बाळासारखं बाहेरच काढून टाकायला लागलीस. खरं तर तुझ्या प्रवासाची दिशा कळत होती, पण मन मानायला तयार नव्हतं. घरी परतले खरी, पण रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. फोनची रिंग केव्हाही वाजू शकते, धास्तावलेलं मन म्हणत होतं.
 ..आणि झालंही तसंच. सकाळी सकाळी फोनच्या आवाजाने तो न उचलता ही तुझ्या अस्तित्वाच्या अखेरच्या क्षणाची दु:खद बातमी सांगून टाकली. डोळ्याच्या पापणीशी जमलेल्या गंगायमुना लगेच बाहेर धावल्यात. वाहू दिलं त्यांना मुक्तपणे जरा वेळ. नंतर मीच विचारांच्या गर्दीत वहावत गेले.
 खरं तर मला रागच आला तुझा. तुझ्या नखांतही रोग नसताना नव्वद म्हणजे काय जाण्याचं वय होतं का तुझं? एवढी घाई कसली झाली तुला? अलीकडे दोन-चार महिने जरा जेवण कमी झालं होतं तुझं, त्यामुळे अशक्त झाली होतीस. पण तरी तू स्वावलंबीच होतीस. कारण तुझी जीवनशैली साधी होती. खा-खा, हे पाहिजे ते पाहिजे, असं काही नव्हतं, जे पुढय़ात येईल ते आनंदाने ‘स्वाहा’ करायचं. नाही म्हणायला काही दिवस, तोंडाला चव नाही, या कारणास्तव पाणीपुरी, शेवपुरी, भेळ असे डोहाळे लागले होते तुला. एका गोष्टीबद्दल मात्र तुझं कौतुक करायलाच पाहिजे. हालचाली कमी होत गेल्या, जेवण तुटत चाललं, पण तू कधी तोंडाने ‘देवा सोडव रे मला’, ‘ही म्हातारी दिसत नाही का तुला’ ‘उगाच लोळत ठेवू नको, माझा आता काही उपयोग नाही’ असे निराशाजनक उद्गार चुकूनसुद्धा काढले नाहीस. उलट भाजणी भाजायला उभीच राहणार आहेस, अशा थाटात ‘करू या की दिवाळीला चकलीची भाजणी’ असंच तू म्हणायचीस. प्राप्त परिस्थितीला कुरकुर न करता सामोरं जाणं यालाच ‘अध्यात्म’ म्हणत असतील तर तुझ्यात ते चांगलं मुरलं होतं, खरं ना! जाता जाता हा संस्कारच आमच्यावर करून गेलीस.
तुझ्या आयुष्याची गोळाबेरीज करायची म्हटलं तर ‘माळीया जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, पाणिया ऐसे केले, होआवे गा’ असंच सुखी आयुष्य तुझ्या वाटय़ाला आलं. मध्यमवर्गीय श्रीमंती होती, भरलं घर होतं. खायला प्यायला कमी नव्हतं. आलं गेलं, पै पाहुणा यांचं ‘या घर आपलंच आहे’ अशा थाटात स्वागत करणारी तू अन्नपूर्णा सुगरण होतीस. हात सढळ होता. घरी करून खाऊ-पिऊ घालायची हौस होती. गरजवंताचा आधार बनत होतीस. अर्थात यामागे बाबांची भरभक्कम ‘साथसंगत’ होती. आम्ही भावंडं, तुझी नातवंडं चांगली शिकली. कष्टाने त्यांना सांभाळत ओढ लावलीस. त्यांना पंख फुटेपर्यंत घराला केंद्रस्थानी ठेवलंस. नंतर मात्र घरात गुंतून न पडता हळूच देवधर्म, भजनीमंडळ याकडे वळलीस. तुझ्या स्वभावाच्या कडा अति धारदार, बोचऱ्या नव्हत्या. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याची वृत्ती नव्हती. त्यामुळे सहज कुणातही मिसळण्याकडे तुझा कल होता.
घरातलं अर्थ खातं कधी बघायची वेळ आली नाही तुझ्यावर, पण भजनीमंडळात मात्र ८८-८९ वर्षांची तू कोषाध्यक्ष. नवरात्रीच्या भजनाच्या कार्यक्रमाबरोबरच तिथे म्हणायच्या अभंगाचं उत्तम नियोजन. वेळ पाळणं हा तर तुझा हातखंडा. पेन्शन आणायला जायचं असलं की सगळं आवरून हातात पिशवी घेऊन तू वाट बघत बसलेली असायची. मला त्रास होऊ नये, माझा वेळ फुकट जाऊ नये, माझ्या घरच्यांची अडचण होऊ नये म्हणून केवढी काळजी.
तसा तुझा उत्सवी स्वभाव. जुन्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा, पक्ष यांचा तुला अभिमान, नसानसांत भिनलेला. संक्रातीला सुगडांचं वाण देवापुढे ठेवायला तू कधी विसरली नाहीस. त्यानिमित्ताने सुगडं विकणाऱ्या बाईच्या घरी ‘दिवाळी’ येते असा तुझा आग्रह आमच्यावरही तू लादायचीस. हरितालीका, वटपौर्णिमा पूजा केल्यासच पण उपासही शेवटपर्यंत केलास. तोही आमच्यासारखा भरपूर खिचडी खाऊन नाही तर दूध, फळं खाऊन. मनोनिग्रह तुझा पक्का असायचा. ‘एक दिवस राहता येतं गं’ असा तुझा सूर असायचा. तू घालून दिलेलं सणावारांच्या बाबतीतलं वळण घरातली पुढची पिढी सांभाळते आहे यांचं समाधान तुझ्यां चेहऱ्यावर तरळायचं.

पहाटे उठून हळूहळू उंबऱ्यावर पाणी शिंपडून रांगोळीच्या दोन रेघा ओढल्याशिवाय तुझा दिवस सुरू व्हायचा नाही. तुझी दुपारची झोप तर गमतीशीर होती. पाट उशाशी घेऊन तू आडवी व्हायचीस आणि अक्षरश: दोन मिनिटंसुद्धा पडायची नाहीस. निवडक टिपण, लगेच चहा करून झोपेला तू अडवून लावायचीस. केरवारे, वेणीफणी करून झुळझुळीत नऊवारी पातळ नेसून देवळात जायची वेळ होईपर्यंत पोथीबिथी वाचत बसायचीस. सगळ्यांशी अगदी मेतकूटही नाही आणि भांडणही नाही, असा तुझा नात्यांचा गोफ. घरी मसाला, मेतकूट, कोरडी चटणी केलीस की देवळातल्या एकटय़ा रहाणाऱ्या बाईच्या पिशवीत गुपचूप ‘पुडी’ सरकवायला तू विसरायची नाहीस. किती हळहळल्या अशा काही जणी तू गेल्यावर. देण्यातला आनंद तू मिळवलास आणि आम्हाला अलगद त्या ‘वाटेवर’ आणून सोडलंस. तुझ्या स्मरणशक्तीने तुला शेवटपर्यंत दगा दिला नाही. त्यामुळे सारासारविवेक तू ‘समर्थपणे’ जपलास.
तशी तू भाग्यवानच. स्वत:च्या हक्काच्या घरी हक्काच्या माणसांकडून तू काही दिवस सेवा करून घेतलीस. कधीही आडवी न होणारी तू जी आडवी झालीस ती कधीच उभी राहिली नाहीस. पहाटेची वेळ तुझी फार आवडती. नेमका तो मुहूर्त साधून तू चोरपावलांनी निघून गेलीस. प्रत्येकाला जायचंच असतं गं, पण त्या जाण्याने पोकळी निर्माण होते त्याचं काय? आजकालच्या प्रथेप्रमाणे आम्ही मातृदिन कधी साजरा केला नाही. पण यावर्षी सतत काही तरी करत राहायचे, आळस दूर सारायचा, रामकर्ता यावर पूर्ण श्रद्धा ठेवून वर्तनशैली ठेवायची या तुझ्या आचार-विचारांचं संक्रमण वहातं ठेवायचं, ही पोकळी त्याने भरून काढायची, हाच आमचा मातृदिन असणार आहे. आठवणींचा पिंगा एकच सुरावट आळवतो आहे, ‘आई तुझी आठवण येऽऽतेऽ’.  
सुचित्रा साठे