मुलांनी परदेशात स्थायिक होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, त्यामुळे लेकीच्या वा सुनेच्या बाळंतपणासाठी भारतातल्या आजी-आजोबांनी जाणं अपरिहार्य झालंय, अनेक जण आनंदाने जातातही. पण त्या अतिगरजेच्या प्रसंगाव्यतिरिक्त आई-वडील थकले असताना, स्वत:चं आयुष्य शांतपणे जगण्याची वेळ आलेली असताना ‘फक्त लक्ष तर ठेवायचंय,’ असं म्हणत आपल्या स्वार्थासाठी त्यांना तिथेच ठेवणं किंवा आई-वडिलांची ताटातूट करणं, हे आजच्या ‘व्यवहारी’ पिढीसाठी ‘सो व्हॉट’ असेल, पण त्या आजी-आजोबांचं काय? त्यांच्या मनस्थितीचा विचार कोण करणार?  १५ मेच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त या प्रश्नांचा उहापोह..

जागतिक कुटुंब दिन म्हणून ‘१५ मे’ हा दिवस ओळखला जातो. कुटुंब व्यवस्थेचे गोडवे गाणाऱ्या आपल्यालाही आता कुटुंब दिन साजरा करायची वेळ आली आहे. अर्थात आजही अनेक घरांत कुटुंबसौख्य गुण्यागोविंदाने अनुभवलं जातंय, पण हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय हे मात्र खरं. एकत्र कुटुंबातून, विभक्त कुटुंब आणि आता तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’कडे जाणाऱ्या कुटुंब व्यवस्थेत प्रेम, घट्ट नातेसंबंध याला असलेलं महत्त्व कमी होतंय का? एकमेकांना सांभाळून घेणं, समजावून घेणं, एकमेकांसाठी असणं कमी होतंय का? की ते फक्त जुन्या पिढय़ांपुरतंच मर्यादित होतं? हे प्रश्न निर्माण होण्यामागे आहेत अनेक अनुभव, विशेषत: परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबात निर्माण झालेले आणि पुढे वाढत जाणारे..
माहिती तंत्रज्ञानामुळे काळ एवढा झपाटय़ाने बदलला की जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे चित्रच बदलले. आपली तरुण पिढी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, नव्हे बहुतांशी स्थायिकही झाली आणि वृद्ध आई-वडील भारतात एकेकटे रहू लागले. प्रथम बाळंतपण व नंतर त्यांना करिअर करायचं म्हणून आई-वडिलांना ते परदेशात बोलावू लागले. त्यांचे वय, तब्येत, मन, जीवनशैली कसलाही भावनिक विचार न करता अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर ठेवू लागले. सुरुवातीला एखाद्-दुसऱ्या वेळी आई-वडिलांचा उत्साह असतोही. वयही फारसं झालं नसल्यास सारं सांभाळून घेण्याची ताकदही असते, पण त्या पलीकडे जेव्हा मुलांकडून अपेक्षा केल्या जातात तेव्हा? या काही प्रातिनिधिक सत्य घटना. मी अनुभवलेल्या, माझ्यासमोर घडलेल्या. सगळ्याच घरात असे होईल असे नाही, परंतु कुटुंबात प्रेमापेक्षा व्यवहार वाढू लागलाय का या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करायला लावणाऱ्या..
फोनची बेल वाजत होती. घडय़ाळात पाहिले तर पहाटेचे चार वाजले होते. ‘मावशी’पलीकडून सोनलचा, माझी जीवलग मैत्रीण सुहासच्या मुलीचा आवाज, अमेरिकेहून! आवाज थोडा घाबरलेला, पण त्याहीपेक्षा जास्त वैतागलेला. ‘मावशी, आईला अ‍ॅडमिट केलंय, तिला दुसरा हार्ट अ‍ॅटॅक आलाय. काल दुपारपासून तिला अस्वस्थ वाटत होतं.. अगं, तरी मी तिला सारखी सांगत होते की आई तिकडून येताना सर्व ‘कव्हर’ होईल असा इन्श्युरन्स घेऊन ये. पण तिने ऐकलेच नाही.. आता हा सर्व खर्च कसा काय करणार?’ तिची बडबड सुरू झाली. म्हटलं, ‘सोनल, आता तुमचे खर्च.. कोणाची चूक आहे याचा पाढा वाचायची वेळ नाही.. मला फक्त, सुहासच्या तब्येतीची माहिती दे.’
माझ्या बोलण्यातील कडवटपणा तिला जाणवला. ती म्हणाली, ‘मावशी तू कसंही करून लवकरात लवकर इथे ये. मला वाटतं आईला तुझ्याशी बोलायचे आहे..’
मी ‘ठीक आहे, कळवते’, असं म्हणून फोन ठेवला. दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट.. एके सकाळीच दारात सुहास उभी होती, माझी जिवाभावाची मैत्रीण! तिचा अवतार बघून मी दचकलेच. एखाद्या मोठय़ा आजारातून उठल्यासारखा चेहरा, रात्रभर न झोपता विचार करत बसलेय हे समजणारे जागरणाचे डोळे, त्याच अवस्थेत सांगू लागली. ‘अगं, मी उद्या अमेरिकेला चालले आहे, सोनलकडे. आठ दिवसांपूर्वी सोनलचा फोन आला होता, मला म्हणाली, ‘आई थोडे दिवस तू इकडे ये. मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाले आहे. त्यामुळे ऑफिस अवर्स वाढतील. जबाबदारी वाढेल, दररोज घरी यायला उशीर होईल, मुलं घरी एकटी असतील. समीरला तर दररोज होतोय उशीर, त्याच्या जिवावर तर ऑफिस चाललं आहे ना! आम्ही दोघेही घरी नसलो तरी तू मुलांना बघू शकशील. मुलांना तुझ्या हातचं जेवण आवडतं. तू असलीस की आम्हाला कसलीच काळजी नाही. आमच्या दोघांच्याही करिअरच्या दृष्टीने हे जॉब फार महत्त्वाचे आहेत. आता जरा त्रास होईल आम्हाला, पण पुढे ‘फ्युचर’ खूप ‘ब्राइट’ आहे. खरं तर दोन्ही मुलांची बाळंतपणं तू होतीस म्हणून निभावली. आता तू आलीस तर मी निश्चिंत होईन.’
त्यावर मी तिला म्हटलं, ‘सोनल, अगं, आता नुकतीच मी एवढय़ा आजारातून उठले, एक हार्ट अ‍ॅटॅक मला येऊन गेलाय. अजून ६ महिनेपण झाले नाहीत, अजूनही मला थकवा जाणवतोय. एवढा लांबचा प्रवास मला कसा झेपेल? तिथे येऊन आजारी पडले म्हणजे?’ त्यावर सोनल म्हणाली, ‘अगं आई, अशी काय करतेस? एकदा डॉक्टरना विचार. उगीच तब्येतीचा बाऊ करू नकोस. फर्स्ट क्लासचं तिकीट काढून आरामात ये. फक्त इन्शुरन्स व्यवस्थित काढ, सर्व कव्हर होणारा. म्हणजे मागून कटकट नको.. मी वाट पाहतेय. इथं आल्यावर हवा बदलेल व घरात काय मुलांना जेवायला करायचं व लक्ष ठेवायचं.. बाकी काही काम नाही.. आरामच होईल तुला इथे!’
‘अगं, ही पोटची पोर ना गं माझी? आपली आई सहा महिन्यांपूर्वी एवढी आजारी होती, कशीबशी वाचली. त्या आईला आता विश्रांती घ्यायला इथे ये म्हणणं राहिलं बाजूला आणि मुलांना सांभाळायला, जेवण करायला ये म्हणून बोलावतेय? अगं, तिची मुलं म्हणजे माझी नातवंडं आहेत. दुधापेक्षा त्यावरील साय प्रियच आहे मला. आपल्या कुटुंबासाठी काहीही करताना कधीही मनात असे विचार येत नव्हते. पण असं वाटतंय, कुठे तरी चुकतंय.. काही तरी हरवलं आहे.. हे सर्व एकांगी होतंय.. या दिवसांत मला मानसिक शांती हवी आहे. अमेरिकेमधलं जग वेगळं, आपलं जग वेगळं. त्यांच्या जगात मन नाही रमत! हे या मुलांना कसं कळत नाही?’
     सोनलला सांगायचा प्रयत्न केला मी, पण ‘फक्त मुलांवर तर लक्ष ठेवायचंय, ये तू इकडे’ म्हणत रागावलीच ती. मान्य आहे, हक्क आहे ना तिला माझ्यावर रागवायचा? पण शरीर साथ देत नाहीये, तरीही मन सांगतंय, ‘अगं आई आहेस तू. कर्तव्यच आहे तुझं जायचं!’ शेवटी निर्णय घेतला, आता मागे वळून बघायचं नाही. जायचंच. ३ व ६ वर्षांची मुलं सांभाळायची.. नव्हे नुसतं लक्ष ठेवायचं. आजीच्या हातचं मिळत नाही म्हणून तेही करून वाढायचं.. डॉलर्सचे हिशेब ऐकायचे.. अनामिक दडपणाखाली राहायचं..उद्या निघतेय!’ माझ्या उत्तराची वाट न पाहता ती गेली. मनावर एक ओझं टाकून.. आणि आज सोनलचा हा फोन..
संपूर्ण दिवस या विचारांच्या ओझ्याखालीच गेला माझा. एक विचित्र भीती मनावर पसरली होती.
 फोनच्या आवाजानेच भानावर आले. तिन्ही सांजा झाल्या होत्या. सोनलचा आवाज आला, ‘मावशी, आत्ताच आई गेली. आता तू धांदल करू नकोस यायची. उगाचंच खर्च नको!’
काय घडतंय नेमकं? बदलत्या वेगाने बदलणाऱ्या जगाप्रमाणे विचारपद्धतीतच बदल होत आहे का? आपल्या लहानपणी आपण गोष्टी ऐकल्या त्या आईच्या आज्ञेवरून १४ वर्षे वनवास भोगणाऱ्या रामाची, आई-वडिलांची सेवा करीत असताना प्रत्यक्ष विठ्ठल भेटायला आला तरी त्याला थांबायला सांगणाऱ्या पुंडलिकाची, आई-वडिलांना कावडीत घालून तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाची! त्यानंतर मधल्या काळात विचारांत बदल घडले. मुलांना स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगू द्यावे, आई-वडिलांनी त्यात पडू नये, अशी विचारधारा आपणच स्वीकारली. त्याचेच फळ आहे का हे?
गेली ३६ वर्षे माझे वास्तव्य दुबईत आहे. जगभर हिंडून आले. तिथल्या कुटुंब व्यवस्था अनुभवल्या. विशेषत: अमेरिकेतल्या अशा तणावग्रस्त अनेक भारतीय आई-वडिलांना भेटले. सुहासच्या घटनेमुळे आणखी एक आजी आठवल्या. मी अमेरिकेला चालले होते. माझ्या शेजारीच एक साधारण ६०/६५ वर्षांच्या आजी बसल्या होत्या. तशी त्यांना प्रवासाची माहिती होती. दोन-चार वेळा तरी त्या अमेरिकेला जाऊन आल्या होत्या. पाहिलं तर आजी रुमालाने डोळे टिपत होत्या. हातातली बॅग घट्ट आवळून धरली होती त्यांनी. एकंदर अस्वस्थतेतून त्यांनी मनाच्या तळाशी खूप काही साठवून ठेवलंय हे जाणवत होतं. आजी मूळ मुंबईच्या राहणाऱ्या! मोठय़ा मुलाकडे चालल्या होत्या. त्यांना दोन मुलगे. धाकटा मुंबईत असतो. दोघांची लग्न झाली आहेत. तसं म्हणाल तर जबाबदाऱ्या पार पाडलेल्या. जरा शांतपणे विसावा घ्यायचे दिवस. पण?
त्या म्हणाल्या, ‘आम्ही दोघेही निवृत्त आहोत आता. बऱ्यापैकी पैसे साठवले. मुलांना इंजिनीअर, डॉक्टर केले. अमेरिकेला पाठवले व आता जरा आयुष्याच्या धकाधकीत जे जमले नाही ते करावं, हिंडावं, फिरावं असं ठरवलं. पण या अशा जबाबदाऱ्या संपतच नाहीत हो.. मोठय़ाची बायको अमेरिकेत नोकरी करते. तिचं बाळंपण आत्ताच तिच्या आईने केले तिथे. आता तिचा व्हिसा संपतोय. आता माझी ‘टर्न’. आता सहा महिने मी तिथे राहायचं. असं दोन र्वष तरी चाललंय, ‘टर्न बाय टर्न’ तिथे ‘डे केअर’ खूप महाग आहेत. बाळ खूप लहान आहे ना? नॅनी ठेवणं तर आणखीन महाग! आणि आम्ही काय रिकामेच आहोत ना!’ त्यांच्या बोलण्यात एक विषण्णता दाटून आली होती, एक उपहास होता.
मी विचारलं, ‘पण आजी, आजोबा का नाही आले तुमच्याबरोबर एकमेकांची कंपनी असेल तर बराच फरक पडतो तेथील वास्तव्यात!’
आजी म्हणाल्या, ‘अहो, मुंबईतील मुलगा डॉक्टर आहे. त्यांची बायकोपण डॉक्टर आहे. दोघांचा स्वत:चा दवाखाना आहे. त्यांना दोन मुलं. पण आता मोठय़ाला पण जरूर आहे आमची, म्हणून मग दोघा भावांनी आमची वाटणी केली. आई अमेरिकेला व वडील मुंबईत! दोघंही रिकामीच आहोत, कशात तरी बिझी असलो की बरं आणि काम तसं काहीच नाही, फक्त ‘मुलांवर लक्ष ठेवायचं’ बाकी कामं बाई करेल! आणि त्यांच्या या न बोलता केलेल्या ‘हुकमाप्रमाणे’ वाटणीनुसार मी आता निघाले आहे.. यांना मुंबईत एकटे ठेवून!..’ आजींच्या मनाचा बांध फुटला.. थोडं सावरल्यावर म्हणाल्या, ‘आयुष्य नोकरी करण्यात गेलं. दिवस पूर्ण घराबाहेर जायचा.. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं  म्हणून हौसमौज न करता पै पै जमवली. सर्व कर्तव्य पार पाडली. आता जरा इच्छा-आकांक्षा पूर्ण कराव्यात म्हणून ठरवलं तर ही वाटणी! दोघांचेही किती दिवस राहिले आहेत कुणास ठाऊक? काही दुखलं-खुपलं तर एकमेकांना सांगणंही अशक्य, ‘सात समुद्र’मध्ये आहेत.. फोन असले तरी ते इंटरनॅशनल कॉल म्हणून निदान आमच्यासाठी तरी महाग! या मुलांना आई-वडिलांचे हे दु:ख समजत नाही की कानाडोळा करतात? ४०/५० वर्षांचा संसार आहे आमचा. सहवास आहे. सुखदु:खाला एकमेकांच्या साक्षीने तोंड दिलंय. उतार वयात तिथे काही व्हायला लागलं तर बोलायचीही भीती.. बिझी असल्याचं कौतुक ऐकतो. जसं काही आम्ही नोकऱ्याच केल्या नाहीत. फारच फार तर सांगतील डॉक्टरकडे जाऊन ये. पुन्हा अमेरिकेमध्ये डॉलर्सचे नाटक. औषधोपचार किती महाग आहे.. इन्शुरन्स, टॅक्सेस.. विचारच नको करायला. अनामिक दडपण येतं हो. खरंच सांगते, आम्हाला त्यांच्याकडून काही नको आहे, फक्त या वाटण्या करू नका? शेवटचे दिवस एकत्र घालवू देत.. सुख दु:खाचे क्षण एकत्र उपभोगू देत. यांना कोणी हक्क दिला गं या वाटणी करण्याचा? आमच्या आयुष्यावर काय अधिकार यांचा? आम्ही आजारी पडल्यावर ही आमची मुलंच येणार ना धावून असं वाटायचं. पण आता त्यांचं वागणं बघून वाटतं की ते तर आपल्याला वृद्धाश्रमात, ओल्ड एज होममध्ये ठेवतील व मोकळे होतील. फार फार बिझी लाइफ आहे ना त्यांचं! ’ आजी कळवळून बोलत होत्या.
आजीचं दु:खं समजलं, भीती समजली.. जीवनाचा सोबती, सहचरी ज्याच्या बरोबर एवढी वर्षे काढली, त्याची साथ सोडून जीवनाच्या संध्याकाळी दोघे दोन ध्रुवांवर..!
नुकतीच मी मुंबईला आले होते. अचानक माझी मामेबहीण भेटली. ती पण सुट्टीवर आली होती अमेरिकेहून. ती व तिचा नवरा दोघेही डॉक्टर! कर्करोगतज्ज्ञ. पुढील शिक्षणासाठी म्हणून दोघेही अमेरिकेला गेले. त्यांना एक मुलगा झाला. तो ४-५ वर्षांचा असताना त्यांनी भारतात परत यायचे ठरविले! भारतात आले. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पण यशस्वी होऊ शकले नाहीत. भारतात असतानाच त्यांना एक मुलगी झाली. भारतात त्यांचे मन रमेना. त्यांनी परत जायचा निर्णय घेतला. मुलाचा जन्म अमेरिकेचा आणि त्या दोघांचे ग्रीन कार्ड होते. प्रश्न होता मुलीचा. काय झाले माहीत नाही ‘पण प्रत्येक वेळी मुलीचा व्हिसा नाकारला जात होता. (असं ते सांगायचे, खरं काय ते त्यांनाच माहीत. ) शेवटी मुलीला आजी आजोबांकडे ठेवून, ही दोघे मुलाला घेऊन अमेरिकेला गेली. मुलगी तर बिचारी खरीच! पण त्याहीपेक्षा बिचारे आजीआजोबा! दोन वर्षांच्या नातीला घेऊन राहायला लागले. त्यांना गृहीतच धरलं गेलं होतं. स्वत:ची मुलं नेक परिस्थितीतून वाढवली. आता नातीला! मुलगी जावयापुढे बोलायची सोय नाही. त्यांचे स्पष्टीकरणं ठरलेलं, ‘आम्ही एवढे पैसे पाठवतो, उत्तम बंगला घेऊन दिला. कामाला नोकर चाकर, गाडी- ड्रायव्हर सर्व सुखं दिली आहेत. रिकामे असता, काहीतरी उद्योग हवाच म्हातारपणात! नुसतं मुलीवर लक्ष तर ठेवायचं..’आजोबा नुकतेच वारले. आजी एकटय़ाच आहेत.. मुलगी मोठी झालेय.. ही जबाबदारी पेलत असताना आजींच्या मनात येतंच, तेव्हाच धैर्याने ‘नाही’ म्हटले असते तर..?  
या धैर्यावरून शिकागोत ८/१० वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आठवली. मुलांना सांभाळायला नव्हे, नुसते ‘लक्ष ठेवायला’ म्हणून आजी-आजोबांना बोलावून घेतले. मुलांची वय ५ व ८ वर्षे. दोघंही खूप दांडगट! खेळता खेळता भांडणात पर्यवसान झालं. मोठय़ा मुलाने धाकटय़ाला ढकलले. आजी-आजोबांच्या ओरडण्याकडे तर ते लक्षच देत नव्हते. धाकटा पडला व कपाळाला खोक पडली. आजीने धाकटय़ाला जवळ घेतले. पटकन हळद आणून जखमेवर दाबून धरली व रक्त थांबवले. इकडे आजोबांचा पारा चांगलाच चढला. त्या भरात त्यांनी मोठय़ाच्या श्रीमुखात भडकावली. इतर कशापेक्षाही आजी-आजोबांच्या मनात भीती होती की मुलगा व सून काय म्हणतील? ‘नुसतं लक्ष’ पण ठेवता येत नाही का? छोटय़ाला एवढं लागलंच कसं! पण या भीतीपेक्षाही एक वेगळंच नाटक पुढे घडलं. मोठय़ाने पोलिसांना फोन केला, आजोबांनी मारले म्हणून. झालं, मुलगा- सून घरी आले. सर्व दोष त्यांनी आजी-आजोबांना दिला की ‘तुम्ही काय करत होता, छोटय़ाला एवढं लागलंच कसं? मुलांना मारायचंच नाही हा येथील कायदा आहे, माहीत आहे ना?’ मोठय़ाला समजवायचे, रागवायचे बाजूलाच. उलट मुलांसमोर आजोबांनाच सुनेने झापले व मुलाने री ओढली. पोलीसच्या गाडीचे सायरन वाजले. गाडी दारापुढे थांबली, आजोबांची ‘चौकशी’ झाली. आजोबांच्या मनावर या गोष्टीचा जबरदस्त परिणाम झाला. ते कोसळलेच. आपल्यासारख्या मध्यवर्गीयांची ‘चारित्र्य’ हीच आयुष्याची पुंजी असते. त्याला तडा जाऊ नये म्हणून आपण अतोनात जपतो आणि पोलीस घरी आले. चौकशी वगैरे सर्व सोपस्कार झाले. रात्रभर त्यांच्या डोळय़ाला डोळा लागला नाही. पोलीस प्रकरणापेक्षाही त्यांना टोचले मुलाचे वागणे, बोलणे! आजोबा जे अंथरुणाला खिळले ते उठलेच नाहीत. १५ दिवसांत आजींना मागे ठेवून ते कायमच्या प्रवासाला निघून गेले. बिचाऱ्या आजी मागे राहिल्या. ऐकायला, ‘बॉडी इंडियात पाठवायला किती डॉलर्स खर्च येईल ते!..’
‘अमेरिकेत मुलांना सांभाळायला या,’ म्हणून जेव्हा मुलाने सांगितले तेव्हा नाही म्हणण्याचे धैर्य ते दाखवू शकले नव्हते, पण आता मात्र आजोबांच्या मृत्यूने आजी एवढय़ा संतापल्या की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘हा माझा निर्णय आहे. त्यांचा देह मुंबईलाच न्यायचा. जो काही खर्च येईल तो आम्ही साठवलेल्या पैशातून मी करीन. तुम्हाला खर्च सहन करावा लागणार नाही’.. आजींनी दु:खाचा कडेलोट झाला तेव्हा तोंड उघडले. धैर्य दाखवले. जिद्दीने मृतदेह भारतात आणला. मुलगा जेव्हा वडिलांना अग्नी द्यायला लागला तेव्हा त्यांनी त्याचा हक्क काढून घेतला..!
पुढे काही महिन्यांतच आजीही गेल्या.. एका आजी-आजोबांचा करुण अंत झाला!
एक ना अनेक अशी हजारो उदाहरणे! आज माझ्याच घरात हे दृश्य आहे, असे नव्हे तर तुमच्या घरात, शेजारच्यांच्या घरातही तेच दिसते. आधी शिक्षणासाठी, नंतर नोकरीच्या निमित्ताने मुलं परदेशात जातात, तिथेच स्थिरावतात. आईवडील भारतात, म्हातारपणात एकटे राहतात. मुलांची वाट बघत..! पालक अनेकदा नोकरी करून, कष्ट करून, हौस-मौज न करता पै पै साठवतात. मुलांना उत्तम शिक्षण देतात, परदेशी पाठवतात. खरं म्हटलं तर त्यांची लग्नकार्ये झाली की आईवडिलांची जबाबदारी संपलेली असते. विश्रांती घ्यायला, आयुष्याभरात जे काही जमलं नाही हौस-मौज करायला ते मोकळे असतात.. पण नाही, त्यांच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत. अपेक्षांचे ओझे वाढतच जाते. मुलं आईवडिलांना गृहीत धरतात.
बाळंतपण किंवा तशीच काही अत्यावश्यक गरज असेल तर ठीक आहे. आईवडिलांना ते सांगायलाच लागत नाही. ते काहीही करतात मुलांसाठी, पण डे केअर, केअर टेकर महाग आहेत म्हणून आईला तिथे सातत्याने बोलवणे कितपत योग्य आहे? त्यांना एकच मूल असेल तर अनेकदा चालूनही जातं, पण त्या आजी-आजोबांना दोन-तीन मुलं असतील आणि त्या मुलांना दोन-तीन जरी मुलं झाली तर त्यांना सांभाळण्यासाठी त्यांचा किती तरी काळ असा परदेशवारीत जाईल?
आपली मुलं म्हणून आईवडील काहीच बोलत नाहीत, पण परदेशी जायचं म्हटलं तरी अनेक वृद्धांना ताण यायला लागतो. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले बहुतांश आईवडील.. विमानाचा प्रवासही अनेकदा पहिल्यांदाच करणारे.. भिडस्त स्वभाव.. काटेकोर हिशोब करून जवळ घेतलेले एक्स्चेंज डॉलर्स! त्यातून ‘फ्लाइट डिलेड’ झाली की अधिकच ताण, कारण त्याला ‘कनेक्टेड फ्लाइट’ चुकू  शकते व मग अशा वेळी काय करायचं सुचत नाही. विमानतळावर प्रत्येक जण स्वत:तच बिझी. अक्षरश: रडायला लागतात काही आजी-आजोबा!
शिवाय परदेशातल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या. मुलांना परिस्थिती अंगवळणी पडायला एवढा वेळ लागतो, तर आईवडिलांना किती वेळ लागेल हा विचारच मनात येत नाही का त्यांच्या? शाकाहारी असो वा मांसाहारी, परदेशातली जेवण करण्याची पद्धतच वेगळी असते. वयाच्या या टप्प्यावर आवडीनिवडी बदलणे कसे शक्य आहे? जेव्हा मुले आईवडिलांना ४/६ महिने तिथे बोलावतात तेव्हा हा मोठा प्रश्न असतो. आणि नसेल आवडत जेवण तर पुन्हा तिथे जाऊन आईच्या वाटय़ाला असतेच, रांधा वाढा! प्रत्येक जण बिझी, तिला कोण म्हणणार? ‘मी आज तुला करून वाढते वा वाढतो.’
आईवडिलांचे खाणेपिणे, औषधोपचार सर्वाची जबाबदारी मुलांची आहे. पण मुले अनेकदा त्याकडे कानाडोळा करतात अशीही उदाहरणं आहेत. दुखणं कोणी मुद्दाम आणत नाहीत. पण गप्पाच्या ओघात, काही बोलताना का होईना, सारखं इन्शुरन्स, मेडिकल खर्च इ. यावरच चर्चा होते. काटकसर करून राहण्यात ज्याचं आयुष्य गेलं त्यांनाच ही मुलं खर्चाच्या गोष्टी सांगतात. या सर्वाचा ताण या म्हाताऱ्या जिवांना येतो. एका अनामिक दडपणाखाली ते राहतात हे कटू सत्य आहे.
एकदा असंच ऐकलं, एका आजी-आजोबांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी नवस बोलला होता. अमेरिकेला मुक्कामात आजारी नाही पडलो तर सत्यानारायणाची पूजा घालीन म्हणून! यातील विनोदांचा भाग सोडला तर लक्षात येते की त्या दोन जिवांच्या डोक्यावर किती ताण आहे किंवा आजारी पडले तर त्यांना किती कानकोंडे होत असेल?
मुलांना वाटतं आईवडील एवढा काय बाऊ करतात मुलांना ‘सांभाळण्याचा?’ नुसते लक्ष तर ठेवायचं असतं बसल्या बसल्या! पण दुसऱ्यांची मुल सांभाळायची मग ती मुलाची असोत वा मुलीची एक ताण असतोच. स्वत:ची मुलं नाही का वाढवली? या प्रश्नाला उत्तर असतं, एक तर ते वय तरुण होतं, अंगात ताकद होती, उमेद होती, मुलांपाठी धावू शकत होते, आपलीच मुलं वाढवणं सोपं होतं, कारण कोणाला उत्तर द्यायची गरज नव्हती. आता परिस्थिती बदलली. वय वाढले, मुलं पडली, धडपडली तर आपल्यालाच दोष! बरं त्यांना चापटपण मारायची नाही. आपल्यालाच ऐकवतील मुलाचं मानसशास्त्र आणि पुन्हा परदेशातील कायदे!
हीच सर्व परिस्थिती भारतातही आहे. तिथेसुद्धा मुलांच्या आईवडिलांकडून याच अपेक्षा आहेत. त्यांचं करिअर, त्यांचं फ्युचर यासाठी ‘रिकाम्या’ आईवडिलांनी नातवंडांची जबाबदारी घ्यावी, असं त्यांना वाटतं. फरक एवढाच की, आजी-आजोबांना याच मातीत आयुष्य गेल्याने परिस्थितीशी काही प्रमाणात जुळवून घेता येतं. परदेशात अतिशय कठीण जातं. त्यांचं मुळी सैरभैर होतं जीवन! लांब लांब अंतरं, वाहन व्यवस्था नाही. त्यामुळे कुठे जायचं तर जावई-मुलगी/मुलगा- सून यांच्या इच्छेवर बाहेर जाणं अवलंबून!  ४/६ महिने असे काढणे हे खरोखरच जिवाची घुसमट करते. हीच मुलं भारतात कोणी आजारी असेल तर दोन दिवस मोजून येतात व भेटून जातात.
म्हणूनच परदेशातल्या मुलांनीच यावर उपाय शोधायला हवा. आपली मुलं मोठी होईपर्यंत एकाने नोकरी सोडून मुलांना सांभाळायला हवे. तिथे करिअर वा नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तिशीनंतरही तुमच्या चांगल्या जॉब प्रोफाइलला वाव मिळतोच. आपला संसार, आपली मुले, आपले प्रश्न आपणच सोडवले, एकाच्याच पगारात काही काळ घर चालवले, तर स्वत:च्या करिअरसाठी आईवडिलांना गृहीत धरले जाणार नाही.
हल्लीची पिढी व्यवहारी आहे. त्यांच्या कोशात नातं, भावना या शब्दांना फारसं स्थान नाही, असं म्हटलं जातं. त्या मुलांना एवढेच सांगणे आहे..‘आईच्या आज्ञेवरून चौदा वर्षे वनवास भोगणाऱ्या रामाचे अवतार होऊ नका, आईवडिलांची सेवा करत असताना प्रत्यक्ष देव दारी आला तरी त्याला थांबायला सांगणाऱ्या पुंडलिकाचे अवतारही होऊ नका, किंवा आईवडिलांना कावडीत घालून कावड खांद्याला लावून, त्यांना तीर्थयात्रेला फिरवणारा श्रावण बाळही होऊ नका.
पण निदान, मुलांना कावडीत घालून कावड खांद्यावर घेऊन फिरण्याची वेळ तरी या आजी-आजोबांना आणू नका!   
या लेखात वापरलेली छायाचित्रे ही लेखातील  विषयाला पूरक म्हणून वापरली आहेत. त्यातील व्यक्तींचा लेखातील मजकुराशी काहीही संबंध नाही.